देशाचे दुश्मन, ( भाग 16) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
यांनी सर्वस्वावर तुळशीपत्रे ठेवून तो धडा पुढे गिरविला. ब्राह्मण शिकला तर जास्त घातक होतो आणि ब्राह्मणेतर शिकला तर जगदुद्धारक होतो हे प्राचीन काळापासून दणक आलेले सत्य जरी बाजूला ठेवले, तरी टिळक-चिपळूणकर व फुले-शिंदे यांची तुलना करून विद्यमान स्थितीत सुद्धा हेच सत्य ब्राह्मण्याचे नाक तळापासून उडविल्याखेरीज रहात नाही. हेच सत्य गरजून ठणकावते आहे की, टिळक-चिपळूणकर ही नसत्या ब्राह्मणांच्या पोटाकरता हेलपाटा खाणारी भटे होती. आणि फुले, विठ्ठलराव शिंदे, अस्पृश्यांचे थोर कैवारी राजर्षी शाहू आणि महात्मा गांधी हेच हिंद देशाचे उद्धारक ठरत आहे. 'यद्यापि सिद्ध' च्या गध्यावर बसून बेहद्द भामटेगिरी करणारे कोठे किटक टिळक-चिपळूणकर आणि 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता' म्हणणारे कोठे फुले-शाहू- गांधी! टिळकांचा
बोलबाला करण्याकरिता कितीही 'नागोबा नर्सोंबा' वारुळातून चळवळत असोत, टिळक-चिपळूणकरांच्या राष्ट्रीय पातकावर टिळक स्मारकाचे पांघरूण घालण्याचा केवढाही अट्टाहास करोत, त्याने टिळक-चिपळूणकर तर श्रेष्ठ ठरत नाहीतच, पण हे पांघरुण घालणारेही देशाचे दुश्मन ठरून जागृत जनताक्रोधाला बळी पडणारे बोकड ठरत आहेत. टिळकांनी चांभाराचा गणपती आपल्या गणपतीबरोबर नेला एवढ्याच रायाचा थाळा करून अस्पृश्योद्धाराचे श्रेय टिळकांच्या कडोसरीला लावू पाहणाऱ्या त्यांच्या मुर्दाड चेल्यांना आम्ही असा इशारा देतो की, तुम्ही तर आणखी टिळकांना कमीपणा आणू नका. तुम्ही त्यांचे अन्न खाल्ले आहे, त्यांच्या जीवावर आपल्या पोराबाळांना सोन्याने मढविले आहे. टिळक मातीच्या गणपतीला शिवायला तयार झाला आणि प्रत्यक्ष जिवंत हिंदू अस्पृश्याला मांजर कुत्र्याहून नव्हे तर मातीहून मातीमोल मानून दूर फेकू लागला; एवढा बदमाष टिळक होता आँ! असे अस्पृश्य का म्हणणार नाहीत? एखाद्या ब्राह्मणाने अस्पृश्याकडून पंचवीस रुपये दक्षिणा घेतली, हे जसे त्या भटाला मोठेपण, तितकेच टिळकांना हे भूषणावह आहे. देवबापाचे खूळ माजविल्याशिवाय भटभाई पोळ पोसले जाणार नाहीत, हे जाणून नुसता चांभाराचा गणपतीच काय पण प्रत्येक अस्पृश्याच्या झोपडीत शिरून व्रतवैकल्ये करा आणि भटांना दक्षिणा द्या, असे सांगायला कमी केले नसते. पण हा अस्पृश्योद्धार कसा ठरतो? एखाद्या भामट्याने अस्पृश्याला खिसा कापला आणि त्याने मोठ्या ऐटीत सांगितले, पहा मी म. गांधींच्या आज्ञेप्रमाणे स्पृश्यास्पृश्य भेद पाळीत नाही. एखादा ब्राह्मण एखाद्या म्हारणीबरोबर बदव्यवहार करून अस्पृश्योद्धाराची शेखी मिरवू लागला, किंवा एकाच गुत्यात एकाच ग्लासाने हिंदू व मुसलमान बेवडा पिऊन हिंदू-मुस्लिमाच्या ऐक्याचे पोवाडे गाऊ लागले, तर ज्या दर्जाचा त्यांचा देशहिताचा कनवाळा ठरेल, त्याच तोडीचा हा टिळकांचा
ठरत आहे. अस्पृश्यांना गणेशोत्सव, व्रतवैकल्ये, ढोंगास प्रोत्साहन देणे म्हणजे अस्पृश्योद्धार नसून भटांच्या कुरणाची चरणहद्द वाढविणे होय ! गेल्या वर्षाखाली काशीच्या एका भटाने सुस्वरूप भगिनीवर पापी नजर ठेवून बलात्कार केल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होताच हा अस्पृश्योद्धार असे केसरी पत्राने म्हणावयास कमी केले नाही. पण हाच संबंध उलटा होऊन एखाद्या भंग्याने एखाद्या भटणीबरोबर संबंध ठेवला असता तर केसरीला तो अत्याचारी अधर्म वाटेल. तेव्हा अस्पृश्योद्धाराची आठवण राहणार नाही. रानडे, गोखले, आगरकर, भागवत, लोकहितवादी यांना त्राही भगवान करून सोडणारे टिळक-चिपळूणकर हे देशाचे कैवारी ? बोलणाऱ्याने जीभ चावली नाही, पण ऐकणाऱ्यांनी तरी कान लांबू देता उपयोगी नाही. कै. आगरकरांनी टिळकांच्या माकड हाडावर ज्या डागण्या दिल्या त्याच आज ब्राह्मण समाजाला काहीतरी ताळ्यावर आणीत आहेत. नाहीतर टिळक-चिपळूणकर स्वदेशाच्या उत्क्रांतीचा गाडा भटकीच्या कोंडवाड्यात कोंडून महाराष्ट्र म्हणजे गुलमांचे राष्ट्र बनवून सोडले असते. पंचहौद मिशनच्या हैदोसात टिळकांचे उघडे झालेले भ्याडपण काशीला मोर्तब होऊन जन्मभर भटभिक्षुकांच्या तंत्रावर वागणारा 'नामर्द भट' यापरती टिळकांना देण्याजोगी पदवी नाही. भटमान्य चिपळूणकर आज जिवंत झाला, तर ब्राह्मण्य बुडते म्हणून म. गांधींच्या नगडीचा घोट घ्यायला तो धावला असता. कुठल्या तरी नरकातून येऊन तो अजूनही गांधींची ही ब्राह्मणद्रोही चळवळ हाणून पाडण्याकरता केसरीकर्त्याच्या अंगात कधी-कधी संचारल्याचा भास होत असतो. स्त्री-शिक्षणाविषयी टिळक- चिपळूणकरांच्या काय कल्पना होत्या, हे केसरीचे हजारो अंकच चाळून पाहावयाची गरज नाही. अगदी परवा पुण्यात टिळकांनी या स्त्री-शिक्षणाच्या बाबतीत विरोध करण्याकरता आपल्या राष्ट्रीय उपरण्याखालची कुत्री भुंकायला सोडली या कुत्र्यांच्या भोकाटीला कोणी जुमानिना तेव्हा