Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बुद्ध आणि कार्ल मार्क्स

बुद्ध आणि कार्ल मार्क्स - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

     कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्यामधील तुलना विनोद म्हणूनही मानली जाईल. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मार्क्स व बुद्ध यांच्या २३८१ वर्षांचे अंतर आहे. बुद्ध इ.स. पूर्व ५६३ मध्ये जन्माला आला व कार्ल मार्क्स इ.स. १८१८ मध्ये. कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्वज्ञानाचा-नव्या राज्यव्यवस्थेचा-एका नव्या अर्थशास्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समज्यात येते. दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राज्यशास्राशी वा अर्थशासाशी काहीही संबंध नाही अशा धर्माचा संस्थापक, यापेक्षा आणखी कोणीही नाही, असे मानले जाते. अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळी विचारक्षेत्रे व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्वांमधील तुलना अथवा विरोध विचारर्थ मांडणारे "बुद्ध आणि कार्ल मार्क्स" हे या निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे स्वाभाविक आहे. मार्क्सवाद्यांना साहजिक त्याचे हसू येईल आणि मार्क्स व बुद्ध यांचा एकाच पातळीवर परामर्श घेण्याच्या कल्पनेची ते कुचेष्टा करतील. मार्क्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन ! मार्क्सवादी म्हणतील की, बुद्धाची त्यांच्या गुरूशी तुलना करता बुद्ध निव्वळ आदिम ठरणे क्रमप्राप्त आहे. अशा दोन व्यक्तींमध्ये कसली तुलना होऊ शकणार? मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार ? बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकवू शकणार ? काहीही असो, या दोहोंमधील तुलना आकर्षक व बोधपर आहे. दोहोंचेही वाचन झाले असल्यामुळे व दोहोंच्या तत्त्वज्ञानात रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्यावर येऊन पडते. जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धाचा अभ्यास केला व त्याची भूमिका काय होती हे समजून घेतले तर मला खात्री वाटते की, ते त्यांचा रोख बदलतील. बुद्धाचा उपहास करण्याचे त्यांनी ठरवले असल्याने ते त्याची  प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थात अवाजवी होईल. परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की, त्यांनी दखल घ्यावी असे, त्यांच्या योग्यतेचे बुद्धाच्या शिकवणुकीतून काहीतरी आहे, हे त्यांच्या लक्षात येईल.

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar१. बुद्धाचा सिद्धान्त

    सर्वसाधारणपणे बुद्धाचा अहिंसेच्या तत्त्वांशी संबंध जोडण्यात येतो. त्याच्या शिकवणुकीचा तो आदि व अंत असल्याचे मानले जाते. बुद्धाने शिकवले ते अहिंसेच्याही फार पलीकडचे, अत्यंत व्यापक आहे, हे कचितच कोणाला माहीत असेल. म्हणून त्याची तत्त्वे तपशीलवार मांडणे आवश्य आहे. त्रिपिटकाच्या वाचनातून मला जी तत्त्वे समजली ती मी खाली नमूद करीत आहे :

१. स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. 

२. प्रत्येक धर्म स्विकारण्यासारखा असतोच असे नाही. 

३. धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर किंवा आत्मा स्वर्ग किंवा पृथ्वी यांविषयीच्या सिद्धांतांशी व कल्पनांशी संबंध असता कामा नये. 

४. ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे अयोग्य आहे. 

५. आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. 

६. प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे.

७. खरा धर्म माणसाच्या मनात बसत असतो, शास्रात नव्हे. 

८. मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल. 

९. जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा. 

१०. धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे आहे, त्याचा आरंभ वा अंत यांचे स्पष्टीकरण करणे नव्हे. 

११.  हितसंबंधांच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय.

१२. संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. 

१३. समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. 

१४. सर्व मानव समान आहेत. 

१५. माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. 

१६. महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श; उच्च घराण्यातील जन्म नव्हे. 

१७. सर्वांबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे. 

१८. प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क आहे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे विद्येचीही आवश्यकता आहे. 

१९. सदाचरणाशिवाय ज्ञान हे घातक होय.

२०. कोणतीही गोष्ट अंतिम (अस्खलनशील) नाही. कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यांस पात्र आहे. 

२१. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. 

२२. प्रत्येक गोष्ट कार्यकारणाभावाच्या नियमाला धरून आहे. 

२३. कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील (बदलास पात्र) आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते. किंबहुना परिवर्तनशीलता हाच जगाचा नियम होय. 

२४. युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक आहे. 

२५. विजेत्याची जितांबाबत काही कर्तव्ये आहेत.

संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्त्वे ही आहेत फार प्राचीन काळात जरी सांगितलेली असली तरीही आजही ती तितकीच नवीन वाटतात. (किती प्राचीन, पण किती नवीन) !

२. कार्ल मार्क्सचा सिद्धांत

    आता आपण कार्ल मार्क्सने मुळात प्रतिपादन केल्याच्या तत्त्वांचे विवेचन करू (त्याच्या तत्त्वांकडे वळूया). कार्ल मार्क्स हा आधुनिक समाजवादाचा अथवा साम्यवादाचा जनक आहे यात शंका नाही. परंतु केवळ समाजवादाचा सिद्धांत प्रतिपादन करण्यात त्याला स्वारस्य नव्हते. ती गोष्ट त्याच्याही फार पूर्वी इतरांनी केली होती. मार्क्सला त्याचा समाजवाद वैज्ञानिक होता हे सिद्ध करण्यात अधिक स्वारस्य होते. त्याची चळवळ भांडवलदारांविरुद्ध जशी होती तशीच ती ज्यांना त्याने स्वप्नरंजित किंवा अव्यावहारिक समाजवादी म्हटले त्यांच्याविरुद्धही होती. आपला समाजवादाचा प्रकार हा वैज्ञानिक असून स्वप्नरंजित नाही, हे आपले म्हणणे प्रस्थापित करणे, यापेक्षा मार्क्सने प्रतिपादन केलेल्या सर्व सिद्धांतांचा अन्य कोणताही हेतू नव्हता.

    'वैज्ञानिक समाजवाद' द्वारे कार्ल मार्क्सला जे अभिप्रेत होते ते हे की, त्याचा समाजवादाचा प्रकार हा अटळ आणि अपरिहार्य आहे आणि समाज त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे व त्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही. आपले हे नवे आणि विचारसरणी (म्हणणे) सिद्ध करण्यासाठी मार्क्सने विशेषतः (कष्ट घेतले) परिश्रम केलेले आहेत.

मार्क्सची विचारसरणी (म्हणणे) पुढील सिद्धांतांवर आधारलेली आहे ती अशी - 

१. तत्त्वज्ञानाचा हेतू (जगाची पुनर्रचना करणे हा असून) विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे हे नसून विश्वाचे पुननिर्माण करणे हा आहे. 

२. आर्थिक शक्ती हीच मुख्यतः इतिहास घडविण्यात जबाबदार असतात. 

३. समाजाची मालक व कामगार या दोन वर्गामध्ये विभागणी झालेली आहे. 

४. या दोन वर्गामध्ये नेहमीच वर्गकलह (चालू आहे) सुरू असतो. मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाचे नेहमीच शोषण होत असते. कामगारांच्या श्रमाचे फळ असलेल्या नफ्यांचे (Profit) अथवा अतिरिक्त मुल्याचा' मालक वर्गाद्वारे दुरूपयोग होत असतो.

६. ही पिवळणूक उत्पादनसाधनांचे राष्ट्रीयीकरण करून म्हणजे (खाजगी) व्यक्तिगत संपत्ति नष्ट करून (संपुष्टात आणता येईल), नष्ट करता येईल. 

७. मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाची पिळवणूक हीच श्रमिक वर्गाला अधिकाधिक दुर्बल आणि दारिद्र्य बनवित आहे. 

८. कामगारांमधील ह्या वाढती दुर्बलता आणि दारिद्र्याचा परिणाम म्हणून कामगारांमध्ये क्रांतिकारी भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे वर्गकलहाचे रूपांतर वर्गलढ्यात होत आहे. 

९. कामगार हे मालकापेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राज्यसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील हे अटळ आहे. ( यालाच त्याने कामगारवर्गाची हुकूमशाही असे म्हटले आहे. ) 

१०. या क्रांतीला कुणीही रोखू शकत नाही त्यामुळेच समाजवाद हा अटळ आहे.

    मला आशा आहे की मार्क्सच्या समाजवादाची मूलभुत विचारसरणी मी अचूकपणे मांडलेली आहे..

३. मार्क्सवादी सिद्धांतातील टिकावूपणा

    बुद्ध आणि काल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानांची तुलना करण्यापूर्वी ह्या मार्क्सवादी तत्त्वांच्या मूळ लिखाणातील कितीसे टिकून राहिले, इतिहासाने किती बाद ठरवले व त्याच्या विरोधकांनी किती नष्ट केले याची नोंद घेणे आवश्यक आहे.

    मार्क्सवादी तत्त्वज्ञान, ज्यावेळी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकालात मांडण्यात आले होते, तेव्हापासूनच त्याच्यावर पुष्कळ टीका होत आलेली आहे. या टीकेचे पर्यवसान कार्ल मार्क्सने उभारलेल्या तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाचे तुकडे पडण्यात झाले आहे. समाजवाद हा अटळ आहे हा मार्क्सवादी दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. यात शंका घेण्यास क्वचितच एखादी जागा असू शकेल. समाजवादाचे बायबल असलेल्या त्याच्या "दास कॅपिटल" चे प्रकाशन झाल्यानंतर साधारणतः सत्तर (७०) वर्षांच्या कालावधीनंतर 1917 मध्ये एका देशात (रशियात) कामगारवर्गाची हुकूमशाही प्रथम प्रस्थापित झाली. साम्यवाद - ( जे कामगारवर्गाच्या हुकूमशाहीचे दुसरे नाव आहे - 

   जेव्हा रशियात आला तेव्हा देखील तो कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयत्नाशिवाय काहीतरी अटल बाब म्हणून आला नाही; त्याच्यासाठी क्रांती झाली) साम्यवाद रशियात प्रत्यक्षात आणण्यासाठी (पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी) पुष्कळच हिंसा व रक्तपात घडवून आणावा ह्याकरिता जाणीवपूर्वक योजना आखावी लागली. साम्यवाद ज्याला कामगार वर्गाची हुकूमशाही म्हणतात. तो रशियात सहजासहजी आलेला नाही तर त्याला देखील मानवी प्रयत्न करावेच लागले अर्थात् क्रांती करावी लागली. रशियाने उर्वरित जगातील देशात आजही साम्यवाद प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याची दिवास्वप्ने बघितली. 'समाजवाद अटळ आहे' हा मार्क्सवादी सिद्धांत सर्वसाधारणपणे फोल ठरला आहे. त्याशिवाय या यादीत सांगितलेली इतर विधाने देखील तर्काने तसेच अनुभवाच्या आधारावर नष्ट करण्यात आली आहेत. इतिहास घडण्यास कारण म्हणून आता कोणीही (इतिहासाचे) आर्थिक स्पष्टीकरण स्वीकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले गेले आहे हे कोणीही मान्य करीत नाही. हीच गोष्ट त्याच्या इतर आधारविधानांना लागू आहे.

    कार्ल मार्क्सचे विचारसरणीतील जे काही अवशेष समान शिल्लक राहतात ते आहेत अवशेष, लहान तरीही अत्यंत महत्त्वाची आहेत. माझ्या मते या अवशेषामध्ये पुढील चार बाबींचा अंतर्भाव होतो : 

१. तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे, विश्वाच्या उगमस्थानाचे स्पष्टीकरण करण्यात वेळ नष्ट करणे नव्हे. 

२. वर्गावर्गांमध्ये हितसंबंधांचा कलह आहे. संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते तर दुसऱ्या

३. वर्गाला त्याची पिळवणूक झाल्यामुळे दुःख मिळते. 

४. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे.
 You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209