क्रांतिसिंह स्वातंत्र्यसंग्रामातील लढवय्या क्रांतिकारक समाजसुधारक : नाना पाटील

     सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात की त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.

    क्रांतिसिंहांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे बोरगाव या छोट्याशा गावी ३ ऑगस्ट १९०० रोजी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात आधी राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक सुधारणा, असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले, तर काहींना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु, नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे नानांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने विशेषतः सातारा-सांगली भागाने बहुमोल योगदान दिले आहे. याच भागातून पुढे आलेल्या नानांनी समविचारी तरुणांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली.

Krantisinh Nana Patil    नाना सुरुवातीला तलाठी म्हणून नोकरीला होते. परंतु, स्वातंत्र्याचे आंदोलन ऐन जोमात असताना नानांचे मन नोकरीत रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून सक्रीय राजकारणात व समाजकारणात सहभाग घेतला. सातारा भागात प्रतिसरकार ही समांतर शासनव्यवस्था उभी करून ब्रिटीश सत्तेला चांगलाच चाप लावला. नानांनी तुफानी सेना ही सशस्त्र क्रांतिकारकांची संघटना बांधली. तुफानी सेनेच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडले. ब्रिटिश सत्तेचा प्राण असणाऱ्या रेल्वेसेवा, पोस्टसेवा आदी सेवांवर हल्ले करून ब्रिटिशांचा खजिना लुटून नानांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी त्याचा उपयोग केला.. १९३० चे सविनय कायदेभंग आंदोलन आणि १९४२ चे चाले जाव आंदोलन यात नानांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. १९४२ पर्यंत नानांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर मात्र नाना भूमिगत झाले. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला. नानांची जमीनही सरकारजमा केली गेली. परंतु, घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या भुकेने बाहेर पडलेल्या नानांचा त्याग ब्रिटिशांना काय माहीत? या धावपळीच्या काळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला नानांना वेळ मिळाला नाही. यातच नानांच्या आजचे निधन झाले. स्वतःच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी नाना येतील म्हणून ब्रिटिशांनी पूर्ण बंदोबस्त लावला. तेव्हा नानांनी आपला जीव धोक्यात घालून आजीचे अंत्यसंस्कार केले. मात्र ब्रिटिशांच्या तावडीत ते सापडले नाहीत. सामान्य जनतेची नानांना फार मोठी साथ लाभली. समाज नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ब्रिटिश सरकार नानांना पकडू शकले नाही. भारताला अधिकृतरित्या १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी सातारा- सांगली भाग नानांच्या प्रयत्नांमुळे १९४२ पासूनच स्वतंत्र झाला होता. सातारा-सांगली भागात प्रतिसरकार कार्यरत असताना ब्रिटिश सत्तेचा मागमूस या भागातून जवळजवळ पुसून टाकण्यात आला होता.

सामाजिक कार्य

    नानांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडविण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाज परिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. भटशाही व सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नाडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे.

   सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. सामान्य बहुजन समाज व शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मियता होती. सामान्य जनतेच्या सहभागावर आधारलेला विकेंद्रीत लोकशाहीचा छोटा पण वेगळा प्रयोग म्हणजे प्रतिसरकार होय. नानांच्या प्रतिसरकारचा प्रयोग देशात इतरत्रही राबवला गेला. दारूबंदी, न्यायव्यवस्था, गुंडांचा बंदोबस्त, अस्पृश्यता निवारण, सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे, कमी खर्चात लग्ने लावणे, असे प्रतिसरकारचे कार्यक्रम सामान्य बहुजन समाजाने उचलून धरले. समाजाला नाडणाऱ्या सावकारादी प्रवृत्तींना नानांच्या प्रतिसरकारचा चांगलाच धाक होता. गरीब शेतकऱ्यांवर, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या बड्या धेंडांना प्रतिसरकारने पत्र्या ठोकल्या. त्यामुळे प्रतिसरकार हे पत्रीसरकार म्हणूनही ओळखले जावू लागले.

   आज खर्चिक विवाह समाजामध्ये आर्थिक व सामाजिक ताण निर्माण करताना दिसत आहेत. परंतु, त्याकाळी फक्त पंधरा रुपयात बहिणीचा व वीस रुपयात मुलीचा विवाह करणारे क्रांतिसिंह खरोखर कृतीवीर होते. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर गोरगरीब, दीनदलित व शोषितांसाठी आयुष्यभर लढत राहणाऱ्या क्रांतिसिंहांच्या कर्तृत्वाची महती आजच्या पिढीला समजली पाहिजे. सध्या स्त्री-शिक्षण व स्त्री सक्षमीकरणावर बोलले जात असले तरी शंभर वर्षांपूर्वी स्वतःच्या पत्नीला साक्षर करून समाजाला नवी दृष्टी देणारा हा दूरद्रष्टा विरळच होता. या भूमीतील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा खेडयापाडयात पोहोचवली, तर क्रांतिसिंहानी स्वातंत्र्य चळवळीचे, सामाजिक सुधारणांचे लोण गावोगाव पसरविले. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच त्यांनी शिक्षणप्रसार, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या विषयांवरही सामाजिक प्रबोधन केले. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले हो उक्ती नानांना तंतोतंत लागू पडते.

राजकीय कार्य

    त्याकाळी बहुजन समाजाला राजकीय नेतृत्व नव्हते. तत्कालीन काँग्रेसचे नेतृत्व उच्चवर्णीयांच्या हातात होते. त्यांना गरीब बहुजन समाज व शेतकन्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नव्हते. परिणामी बहुजन समाजाची खूप उपेक्षा होत होती. काँग्रेसची घडण ही परंपरागत चातुर्वर्ण वर्गाच्या नावाखाली चालत होती. त्यातून बहुजन समाजाच्या आर्थिक सोयीचे व कामाचे चीज होईल, असे दिसत नव्हते. म्हणून महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधक पुढाऱ्यांनी मिटींग घेतली. या मिटींगम "ध्ये काँग्रेस अंतर्गतच शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्यशोधक कार्यकत्यांनी गावोगावी सभा - मिटिंग घेऊन बहुजन समाजाला आपली भूमिका समजावून सांगितली. नानांनी यावेळी जनजागृतीसाठी केलेले दौरे महाराष्ट्रभर तूफान व वेगवान असे झाले. सर्वत्र नाना पाटील, जेधे, मोरे, जाधव आदींचा जयजयकार होऊ लागला. सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष हे काँग्रेस अंतर्गतच एक संघटन होते. परंतु, काँग्रेसच्या उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस अंतर्गत कोणताही राजकीय पक्ष राहू शकत नाही, असा ठराव पास करून घेतला. त्यांचे विचार व पद्धती न पटल्याने बहुजन समाजातील कार्यकर्ते काँग्रेसमधून बाहेर पडले व स्वतंत्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

   नाना फक्त एक लढाऊ स्वातंत्र्यसैनिक होते, असे नाही तर ते एक उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते. त्यांचे विचार सहज सुलभ व सर्वसामान्यांना समजेल, असे होते. भाषाशैली लोकाभिमुख होती. आपल्या विचारांमुळे व कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय झाले होते. ते १९५७ साली सातारा उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बीड मतदारसंघातून निवडून आले. शेकाप व कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून नानांनी बहुजन समाजाच्या व शेतकन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते. आज नानांचे कार्य बहुजन समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. नानांच्या कार्याचे खरे मूल्यमापन झाल्याशिवाय त्यांच्या कार्याचे चीज होणार नाही. कथा, कादंबऱ्या, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून नानांचे कार्य उपेक्षित राहिले आहे. नानांच्या जीवनावर, कार्यावर यापुढे अधिकाधिक साहित्यनिर्मिती करणे हीच क्रांतिसिंहांना खरी आदरांजली ठरेल.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Krantisinh Nana Patil
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209