- अनुज हुलके
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांचे स्थान एकूणच मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत. त्यांनी केलेले कार्य आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आयुष्यभर केलेली सामाजिक परिवर्तनाची साधना यामुळे महात्मा जोतीराव फुले यांना खऱ्या अर्थाने 'महात्मा' बिरुदावली शोभून दिसते. महात्मा फुले संपूर्ण हयातभर कार्य करत असताना अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले तसेच अनेक प्रसंगी त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाला त्यांच्या हयातीत ह्या घटना त्यांचे अवघे आयुष्य कनकाप्रमाणे तेजस्वी करणाऱ्या ठरल्यास, परंतु त्यांच्यापश्चातदेखिल सामाजिक चळवळीच्या शिलेदारांना आणि एकूणच मानवी समाजाला त्यांचे जीवन प्रेरणादायी ठरणाऱ्या या घटना मानवी इतिहासाची प्रचंड समृद्धी संपन्नता देणाऱ्या होत.
महात्मा फुले यांचे असंख्य चाहते आणि त्यांना काळजात जपणारे तपस्वी अभ्यासक आहेत. प्रसिद्ध संशोधक आणि चरित्रकार धनंजय कीर यांच्या 'महात्मा जोतिराव फुले' या ग्रंथातील त्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारा एक हृदयस्पर्शी प्रसंग या ठिकाणी मुद्दाम द्यावासा वाटतो.
"जोतीबांच्या गौरवार्थ विश्रामबागवाड्यात १९ नोव्हेंबर १८५२ रोजी सरकारने देशी सर्व सरदार आणि प्रमुख लोक यांची सभा बोलावली होती. समारंभाच्या प्रारंभी मेजर कँडी यांनी सरकारी शिक्षा मंडळीचे निवेदन सभेकडे वाचून दाखवले आणि नंतर सभेचा उद्देश मराठीत कथन केला. भाषणाच्या शेवटी त्यांनी सरकारच्या वतीने जोतिबांना एक शालजोडी (दोनशे रुपये किमतीची) सन्मानपूर्वक अर्पण केली. "
जोतिरावांचा हा सन्मान अनेक अर्थाने ऐतिहासिक होता, कारण स्त्री शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणासाठी झटणारा पहिला भारतीय पुरुष म्हणून जोतीरावांची उंची त्यामुळे उत्तुंग हिमालयाएवढी झाली. ज्या धर्मग्रंथांनी व चातुर्वर्ण्यव्यवस्थेने स्त्री शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी घालून पशुवत जीवन जगण्यास बाध्य केले, त्याविरोधात उभे राहून शिक्षणाचा ओनामा रचणे म्हणजे हिमालयाप्रमाणे वादळवारे अंगावर घेण्यापेक्षाही भयंकर दिव्य होय. ते जोतिरावांनी झेलले, किंबहुना त्यापेक्षाही कठोर प्रसंग आणि जाच जोतीराव सहन करत ही शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचेल या ध्येयाने झपाटले होते. पण ज्यांच्यासाठी प्रयत्न चालू होते त्यांना त्याची फारशी जाणीव असण्याचे कारण नव्हते. इंग्रजी अमदानीत शिक्षणव्यवस्थेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र या कार्याचे महत्त्व किती वाटत होते आणि ऐतदेशीयांपेक्षा आंगलादेशीच्या गोऱ्या भावंडांना या देशातील लोकांच्या शिक्षणाबद्दल ज्योतिरावांची भूमिका कशी वाटत होती त्याचे प्रत्यंतर देणारी ही घटना सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना होय.
त्या काळात सामाजिक कार्य करणे अतिशय कठीण होते. कारण पेशवाईचा अंत होऊन पेशवाईची खुमखुमी अजून जिरली नव्हती, पण जोतीरावांनी विरोधाची तमा न बाळगता प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याबद्दल कीर म्हणतात, ङ्ग मुलींच्या शाळा काढून जोतिरावांनी स्त्री शिक्षण क्षेत्रात जे प्रचंड कार्य केले होते त्याविषयी हा त्यांचा सत्कार झाला होता. त्यांच्या ज्या मित्रांनी त्यांना धैर्याने पाठिंबा दिला होता त्यांच्या जीवनातील हा एक सोन्याचा दिवस होता. हिंदी स्त्रियांच्या शिक्षणाच्या इतिहासातील हा एक सुवर्ण दिन होता. एकोणिसाव्या शतकातील भारतातील शैक्षणिक इतिहास काही व्यक्तींच्या नावाशी निगडित झालेला आहे, असे सर हेन्री शार्प यांनी यथार्थपणे म्हटले आहे. त्या व्यक्ती म्हणजे डेव्हिड हरे, राम मोहन राय, विल्यम कॅरे प्रभुती होत. जोतिराव फुले हे त्यांच्यापैकी एक होते. स्त्रियांच्या हक्कासाठी, उद्धारासाठी त्याग करणाऱ्या आणि कष्ट भोगणाऱ्या ज्योती रावांचा 'स्त्रियांचा उद्धारकर्ती' म्हणून सत्कार झाला, त्यावेळी न्यायमूर्ती माधवराव रानडे हे दहा वर्षाचे होते. प्रतिगाम्यांचे शंकराचार्य म्हणून पुढे प्रसिद्धीस आलेले विष्णुशास्त्री चिपळूणकर हे दोन वर्षाचे होते. सामाजिक चळवळीचे कैवारी गोपाळ गणेश आगरकर, स्त्रियांच्या विद्यापीठाचे संस्थापक धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई आणि महात्मा गांधी सेवा जन्मास आलेले नव्हते.
स्त्रियांचा शैक्षणिक इतिहास अर्थात, महात्मा जोतीराव फुले यांच्या देदीप्यमान कामगिरीने प्रारंभ होतो हे विशद करणारी ही टिप्पणी खऱ्या अर्थाने जोतिरावांचे महात्म्य लोकाभिमुख करणारी होय. जोतिरावांनी सामाजिक परिवर्तनासाठी स्त्रीशिक्षण किती प्राधान्याने घ्यायचे हे दाखवून दिले पण ते त्याच ठिकाणी थांबले नाही, रमलेही नाही. स्त्रीशूद्रातिशूद्र यांच्या सर्व अनर्थाचे कारण अविद्या आहे, तिची चिरफड करतात. आणि या देशातील उच्च जात वर्ण समाज धर्म यांची चिकित्सा करुन मानव मुक्ती लढा त्यांच्या साहित्यकृतीतून सशक्त करतात. या देशातील जात-वर्ण व्यवस्थेविरोधातील, आर्यभटाच्या अन्याय्य धर्म 'ग्रंथविरोधातील लढ्याचे लढवय्यांचे अनेक दाखले उदाहरणे जोतिराव फुले व्यासंगपूर्ण मांडणीतून देतात. आणि शूद्रातिशूद्रांची सांस्कृतीक प्रतीके बळीराजा - खंडोबा- ज्योतिबा पासून कृषी संस्कृतीशी साधर्म्य पावणारी श्रमिकांच्या जीवनाशी त्यांचे साहचर्य दाखवून देतात. सांस्कृतिक लढ्यात खऱ्या अर्थाने न्याय लढा आहे. खरा शोषक जाणून घेता येऊ शकतो, हा आत्मविश्वास देऊन ख्रिस्ती महंमदी आणि बुद्धपरंपरेतील समतेची प्रतीके या लढ्यात सहाय्यभूत ठरणारे आहेत, याची ज्योतिराव वारंवार मांडणी करतात. त्या समग्र मांडणीला, कार्याला संस्थात्मक पद्धतीने समाजाकडे हस्तांतरित करण्यासाठी मग २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना करतात. आणि सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाची ही घटना जोतीरावांच्या एकुणच जीवनाचा सार आणि कार्याची दिशा स्पष्ट करणारी ठरते. शूद्रातिशूद्रांना ज्या भट भिक्षुकांनी अमानवी जीवन जगण्याची एक प्रकारे शिक्षा दिली त्यांचे पौरोहित्य नाकारुन अनेक ठिकाणी शूद्रातिशूद्र मंगल प्रसंग पार पाडू लागले. ह्यामागे शोषकांच्या बद्दल त्यांनीच शूद्रातिशूद्रांवर लादलेला पूज्यभाव त्यागून मनपरिवर्तन करणे ही महत्त्वाची भूमिका होती. पौरोहित्य नाकारणे म्हणजे ब्राह्मण्य नाकारणे, जातीयता नाकारणे होय. आणि डिकास्ट होण्यासाठी ही प्रक्रिया खूप मूलभूत समजली पाहिजे. जोतिरावांच्या या झंझावातापुढे प्रभिक्षकवर्ग तोंडघशी पडत गेला आणि बहुजन समाजात चैतन्य येऊ लागल्याने या विचाराच्या समर्थकांची संख्या पटीत वाढू लागली. जोतीरावांच्या पश्चातही ही कार्ये अनेक वर्ष चढ उतारासह होत आहे. वर्तमान परिस्थितीतही सांस्कृतीक लढे मुख्यतः जोतीरावांच्या विचारधारेवर आधारित गतिमान आहेत. याचे ईप्सित जोतीरावांच्या दूरदृष्टीत दिसून येते. भारतीय समाजाचे नीटपणे केलेले विश्लेषण आणि परिवर्तनाची अचूक दिशा जोतीरावांच्या जीवन- कार्य- विचारातून स्पष्ट होते हा विश्वास अनेक पिढ्यांसाठी फलदायी ठरणारा वाटत आहे.
जोतीरावांच्या कार्याचा गौरव सांगणारी एक घटना किती लोकांना प्रेरणादायी ठरू शकते. त्या कार्याचे महत्त्व लोकांना पटवून देऊ शकते. खुद्द ज्योतिरावांना विश्वास अन् आत्मविश्वास देऊ शकते. याचा विचार धनंजय कीरांसारख्या असंख्य ज्ञान तपस्वींना मोलाचा वाटत असल्याने साहित्यातील साधना पिढ्यानपिढ्या लोकोपयोगी ठरते, त्याचप्रमाणे सामाजिक चळवळी आणि एक एक कार्यकर्ता समाजोपयोगी ठरत असतात. हे स्पष्ट होते.
- अनुज हुलके
Satyashodhak, Mahatma phule, Bahujan, Savitri Mata Phule