महार मांगांच्या दु:खाविषयी - मुक्ता साळवे

१५ फेब्रुवारी १८५५ आणि १ मार्च १८५५ 'ज्ञानोदय'मध्ये प्रकाशित झालेला सत्यशोधक मुक्ता साळवेंचा निबंध....

    ईश्वराने मज दीनदुबळीच्या अंत:करणात आम्हा दुर्दैवी पशुंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगमहारांच्या दु:खाविषयी भरविले; तीच जगत्कर्त्याचे मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे. परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता, मांगमहारांस व ब्राम्हणांस उत्पन्नकर्ता जगन्नाथ आहे.

 Mahar mangache dukh vishay - Mukta Salve   महाराज, आता जर वेदाधारेकरून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडण करावे तर हे आमच्यापेक्षा उंच म्हणविणारे, विशेषे करून लाडूखाऊ ब्राम्हण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राम्हणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राम्हणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे? हर हर! असे वेद की ज्यांचे (ब्राम्हणांच्या मताप्रमाणे) अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेस किती मूर्खत्व (दोष) येईल बरे? मुसलमान लोक कुराणाच्या आधारेकरून, व इंग्रज लोक बैबलच्या आधारेकरून, आणि ब्राम्हण लोक वेदाधारेकरून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खर्‍या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पहावे. तो व त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो.

    आम्हा गरीब मांगमहारांस हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले, व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राम्हण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते त्या वेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानीत होते की काय? पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारे कोण बरे? त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राम्हणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यास शिक्षा करी.

    दुसरे असे की, लिहीण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही. बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय? पण तोहि मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणार्‍या लोकांचा एवढाच हेतु की, काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दु:खे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंतःकरणात द्रव येतो की काय? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार? बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडितहो, तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याजकडेस लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुद्धा नसते म्हणून हीव पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दु:ख होत असेल बरे! ह्याचा विचार स्वताच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली?

    मांगमहारांच्या मुलांस ब्राम्हणादिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाहीत. ते म्हणतात की आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते. असे म्हणून उगीच राहतात. हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ? हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं. ह्या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठविले. आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमे लिहिते:-

    शूरपणा दाखविणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिकमजी, आंधळा पानसरे, काळे, बेहरे हे निरर्थक मांगमहारांवर स्वाऱ्या घालून विहिरी भरीत होते, व गरोदर बायकांसही देहांत शासने करीत होते ती बंद झाली; आणि पुणे प्रांती मांगमहारांवर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंदाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने महारमांगांवर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते; ती बंद झाली. (किल्ल्याच्या) पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंशहि वाढत चालला. मांगमाहारांवर ह्यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता ते म्हणत कि, ह्यांनी चोरी करून आणले, हे पांघरून तर ब्राम्हणानेच पांघरावे. जर मांगमहार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यांस बांधून मारीत, पण आता इंग्रजाच्या  राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचेकिंवा महाराचे डोके मारीत होते ती बंद झाली. जुलमी बिगार बंद केली. अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारात फिरण्याची मोकळीक झाली. 

    आता निःपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी कि जे ब्राम्हण आम्हांस वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हांस ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राम्हण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार सैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात. आणि जे माझे प्रिय बंधु आम्हांस बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यांस म्हणतात कि तुम्हांस जातीबाहेर टाकू. 

    आमच्या प्रिय बंधूंनी मांगमहारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत. व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करितात. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच साहाय्य आहे. अहो दरिद्रांनी व दुःखानी पिडलेले मांगमहार लोक हो, तुम्ही रोगी आहात, तर ज्ञानरूपी औषध घ्या. म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल; तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जानवराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील, तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही; परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही. ह्यास उदाहरण, जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट कर्म करितात, मग तुम्ही तर मांगमहारच आहात.

(ज्ञानोदय, १८५५)

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209