डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक भाषण अखिल मुंबई इलाखा महार परिषद, नायगाव, मुंबई दि. 31 मे 1936.
ही परिषद मी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलावण्यात आलेली आहे, हे तुम्हास कळून चूकले आहेच धर्मांतराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, इतकेच नव्हे तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अबलंबून असल्याकारणाने तो बिषय मला अत्यंत महत्वाचा वाटतो. हे महत्त्व तुम्हा सर्वाना पटले आहे असे म्हणण्यास हरकत वाटत नाही. असे नसते तर आज एवढ्या मोठ्या समुदायाने तुम्ही येथे जमला नसता आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी जमला आहात ते पाहून मला अतिशय आनंद वाटतो.
धर्मांतराची घोषणा केल्यापासून अनेक ठिकाणी लहान - मोठ्या प्रमाणावर सभा भरवून आपल्या लोकांनी या विषयावरील आपली मते व्यक्त केलेली सर्वाच्या कानी आलेले आहे. परंतु सर्वाना एक ठिकाणी जमवून विचारविनिमय करून धर्मांतराच्या प्रश्नाचा निर्णयात्मक चर्चा करण्याचा संधी आज पर्यंत आपल्याला प्राप्त झालेला नव्हती. तशा संघाची तुमच्यापेक्षा मला अत्यंत जरूरी होती. धर्मांतराची मोहीम सफ़ल होण्याकरिता पूर्वतयाराची फारच आवश्यकता आहे. हि गोष्ट तुम्ही सर्वाना कबूल करावी लागेल. धर्मांतर हा काही पोरखेळ नव्हे. धर्मांतर मौजेचा विषय नव्हे. हा माणसाच्या जीविताच्या सफल्याचा प्रश्न आहे. जहाजातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराला नेण्याकरिता नावाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते. तेवढीच पूर्वतयारी धर्मांतराकरीता करावी लागणार आहे. त्याशिवाय हा तीर सोडून पैलतीर गाठणे शक्य होणार नाही. परंतु नावेत किती उतारू येतात याचा अंदाज समजल्या खेराज नावाडा सामान सुमान जमविण्याच्या प्रयत्नास लागत नाही. त्याप्रमाणे माझी ही स्थिती आहे. किती लोक धर्मांतर करावयास तयार आहेत याचा कयास लागल्याशिवाय मला धर्मांतराची पूर्वतयारी करण्याच्या उद्योगाला लागणे शक्य नाही. परंतु आपल्या लोकांची कोठे तरी परिषद झाल्या शिवाय लोकमताचा कयास घेण्याची संधी मला प्राप्त होणार नाही, असे जेव्हा मी मुंबईच्या कार्यकत्र्या लाेकांस सांगितले तेव्हा त्यांना खर्चाची अगर परिश्रमाची सबब पुढे न करता परिषद भरविण्याची जबाबदारी आपल्या अंगावर मोठ्या खुशीने घेतली. ती जबाबदारी पार पाडण्याकरीता त्यांना किती कष्ट सोसावे लागले याची हकीकत आपले परमपूज्य पुढारी व स्वागत मंडळाचे अध्यक्ष राजमान्य राजश्री रेवजी दगडुजी डोळस यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितली आहे. इतक्या खस्ता खाऊन त्यांनी माझ्याकरिता हा जो सभेचा घाट घडवून आणला त्याकरता मी परिषदेच्या स्वागत मंडळींचा अत्यंत ऋणी आहे.