मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माझी धर्मांतराची घोषणा जर सर्व अस्पृश्या करिता आहे तर मग सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही ? नुसत्या महारांचाच सभा का बोलावण्यात आली असा आक्षेप काही लोक घेण्याचा संभव आहे. ज्या प्रश्नांची चर्चा करण्याकरिता हि सभा बोलावण्यात आली आहे त्या प्रश्नाचा खल करण्यापूर्वी या आक्षेपाला उत्तर देणे मला अनावश्यक वाटते. महारांचीच सभा का बोलाविली व सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही, याला अनेक कारणे आहेत.
पहिले कारण असे कि या परिषदेत कसल्या ही प्रकारच्या मागण्या मागावयाच्या नाहीत किंवा हिंदू लोकांपासून काही सामाजिक हक्क मागावयाचे नाहीत. आपल्या जीविताचे काय करावयाचे, आपल्या आयुष्यक्रमाची रूपरेखा कशा ठरवावयाची एवढाच प्रश्न या परिषदे पुढे आहे. तो प्रश्न ज्या त्या जातीने स्वतंत्र विचार करून सोडविणे बरे. ज्या कारणांकरिता सर्व अस्पृश्य लोकाची सभा एकत्रित करण्याची मला आवश्यकता वाटली नाही त्यापैकी हे एक कारण आहे.
नुसत्या महारांचीव परिषद भरविण्याचे दुसरे ही एक कारण आहे. धर्मांतराची घोषणा केल्या पासून आज़ जवळ जवळ दहा महिण्याचां अवधी लोटलेला आहे. या अवधीत लोक जामृतीचे काम पुष्कळसे झाले आहे. आता लोकमत अजमाविण्याचा वेळ आली आहे, असे मला वाटते. हे एक साधे आणि सोपे साधन आहे. अशी माझी समजूत आहे. धर्मांतराचा प्रश्न कृतीत उतरविण्या करीता जो प्रयत्न करणे आवश्यक आहे तो प्रयत्न करण्यापूर्वी खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि माझी अशी समजूत आहे का, जाती जातीची सभा करून आजमविलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल तशी खात्री सर्वसाधारण अस्पृश्यांची सभा भरवून अजमाविलेल्या लोकमताबद्दल देता येणार नाही. कारण सर्व अस्पृश्यांची परिषद असे नाव देऊन ज़रा सभा बोलाविली तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रातिनिधिक स्वरूपाची सभा होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांचा सभा भरविण्यात आलेली आहे. या सभेत इतर जातीचा समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही. त्यांना धर्मांतर करावयाचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांना धर्मातर करावयाचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणुन त्यांच्या धर्मातरास कसली ही आडकाठी येऊ शकणार नाही. जशी महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे तशीच अस्मृश्यांतील इतर जातीना आपापल्या जातीच्या सभा भरवून या विषया संबंधाने अपले लोकमत व्यक्त करण्याची संधी मोकळी आहे, व तशा सभा त्यांनी कराव्या अशी मी त्यांना सुचना करतो. व त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती भी अवश्य करीन. येथवर झाली ती केवल प्रस्तावना झाली. आता मी आजच्या सभेच्या मुख्य विषयाकडे वळतो.
धर्मातराचा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच तो गहन ही आहे. साध्या माणसाच्या बुद्धीला त्याचे आकलन होणे कठीण आहे. तसेच साध्या माणसाला धर्मातरासारख्या विषयक समजूत करून देणे है काम काही सोपे दिसत नाही. तथापि तुम्हा सर्वाची समजूत पटल्याशिवाय धर्मातर कृतीत उतरविणे कठीण आहे. याची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि म्हणून जितक्या सुलभ रीतीने या विषयाची मांडणी मला करता येईल तितक्या सुलभ रीतीने मी ती करणार आहे.