डॉ. शिवानंद भानुसे (प्रदेश प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र)
राज्यकर्ते हे प्रजेचे रक्षक असतात पण हेच रक्षक जर सरळ-सरळ भक्षक झाले तेव्हा न्याय कोणाकडे मागायचा? कारण ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अनूचे दरोडेखोर झाले. आणि अशा अधिकाऱ्यांना त्याकाळी सरकारही मान- सन्मान आणि पदव्या बहाल करीत होते.
कॉ. गोविंद पानसरे लिहितात- 'मध्ययुगीन सरंजामदारांच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजेरजवाडे व राजपुत्र तर सोडाच; सरदार, जमीनदार, वतनदार, देशमुख, पाटील यांच्या दूरदृष्टीने गोरगरिबांच्या लेकीसुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगाच्या वस्तू होत्या. अशा पार्श्वभूमीवर शिवरायांचा स्त्री विषयक दृष्टिकोन अतिशय उदात्त वाटतो. परंतु त्यांच्या या मध्ययुगीन दृष्टीकोनाला आजच्या लोकशाहीवादी मोजपट्ट्या लावण्याचा वेडेपणा कोणीही करू नये. कारण तत्कालीन लोकमानस, गरजा, समाजतत्त्वे, ध्येय-धोरणे, समतेची कल्पना व मानसिकता अतिशय वेगळी होती. आधुनिक काळाची कोणतीही तत्त्वे मध्ययुगातील तत्त्वांशी मेळ खात नाहीत. या सर्व बाबींचा विचार करूनच नंतर शिवरायांच्या कार्याकडे पाहिले पाहिजे, मग कळते त्या काळाच्या मानाने शिवराय फार पुढे होते. आणि त्यांचे कार्य क्रांतिकारी होते.
शिवरायांचे स्त्री संबंधीचे धोरण स्वयंभू होते. तथापि मातोश्री जिजाऊंच्या शिकवणुकीमुळे त्यांचे व्यक्तिमत्व तशा अंशाने आकार घेत गेले. बालवयात झालेले संस्कार दूरगामी परिणाम करणारे ठरत असतात. जिजाऊ मातेच्या भूमिकेशी व प्रसंगानुरूप पित्याची भूमिका पार पाडावी लागली. या दोन्ही भूमिकेचे बाल शिवरायांनी चांगलेच अवलोकन केले असणार.
बाल शिवबाने आईची दयाबुद्धी, उदार अंतकरण, न्यायशिलता, जबाबदार वृत्ती, आणि प्रसंगी कठोरपणा इत्यादी गुणतत्त्वे आत्मसात केली. शिवाय राज्यकर्त्याला हवी असलेली अंगभूत जरब जन्मतःच होती. या सर्व बाबींचे संमिश्रण हाडी-मांसी खिळून एक उदार विचारसरणीचा स्त्रीवादी छत्रपती काळाने निर्माण केला. डॉ. अनिल कठारे लिहितात- 'स्वराज्य उभारणीत मुसलमान, रामोशी, पठाण, बेरड, भंडारी, कोळी, भिल्ल, बेलदार, धनगर, न्हावी, तेली, मराठा याशिवाय ज्यांना गावकुसात आत प्रवेश मिळत नव्हता अशा महार, मांग व चांभार जातीच्या लोकांनासुद्धा शिवरायांनी स्वराज्य उभारणीत सामावून घेतले. स्त्रिया व शूद्रातिशूद्रांवर धर्मग्रंथांनी लादलेल्या नियंत्रणाला झुगारून दिले अशा क्रांतिकारी विचाराचे व विद्रोही वर्तनाचे छत्रपती होते. ज्या काळात बादशाही सरदार वतनदार वगैरे स्त्रियांना पळवून नेणे, त्यांची अब्रू लुटणे, जनानखान्यात जबरीने कोंबणे, गुलाम करणे, असेही प्रकार करीत असत. अशा अंदाधुंदीच्या काळात मराठ्यांचे सैनिक शिवरायांचा आदेश शिरोधार्य मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करीत होते.
'योद्धा स्त्रीचा सन्मान': शिवरायांची लढणारी शत्रू जर स्त्री असेल ती पकडली गेली किंवा शरण आली तर तिला मोठी सन्मानपूर्वक वागणूक दिली जाई, याचे उत्तम उदाहरण रायबाधिन या योद्धा स्त्रीचे आहे. उदाराम माहुरकर देशमुख या सावरगावच्या कुलकर्ण्याची हुशारी पाहून अकबराने त्यास वाशिम व माहूर येथील ५२ महालांची देशमुखी दिली होती. शहाजानने त्यास राजे उदाराम अशी पदवीही दिली. भातवडीच्या लढाईत तो मरण पावला. परंतु त्याच्या स्त्रीने राजपूताविरुद्ध सामना दिला म्हणून औरंगजेबाने तिला रायबघन किताब दिला होता.
डॉ. दिनेश मोरे लिहितात- 'रायबघन आणि शिवरायांचा संबंध उंबरखिंडीच्या लढाईनंतर आलेला दिसतो. शिवरायांनी मोगलांचा फडशा पाहून सुरत लुटून खिंडीच्या दिशेने येत असताना रायबाघनने त्यांना अडवले. महाराजांच्या फौजेने तिला चोहीकडून घेरून अगदी जेरीस आणले. तेव्हा ती दाती तृण धरून महाराजाना शरण आली. तिचा मोठा आदरमान करून वस्त्रालंकार देऊन शिवरायांनी तिला परत पाठवले. त्यानंतर रायबाघीण स्वतः शिवरायांची धर्मकन्या म्हणू लागली. आपल्या शत्रूच्याही स्त्रीचा सन्मान करून तिच्या अब्रूचे रक्षण करणारा राजा केवळ शिवाजीराजेच असू शकतात. मध्ययुगात अशाप्रकारची स्त्रीवादी विचारसरणी मोठी चमत्कारिक वाटते.
राजपूत स्त्रियांचा सन्मानः राजपूत स्त्रियांशी मराठ्यांचा फारसा संबंध आलेला दिसत नाही. श्री शिवप्रदीप या ग्रंथात रघुनाथ केशव पटवर्धन एक संदर्भ देऊन लिहितात की 'प्रबळगड केदारसिंग नावाच्या राजपुतांच्या ताब्यात होता. भेद करून तो फितेना. शेवटी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला. पण केदारसिंगाने बरेच दिवस हा किल्ला लढवला. शेवटी नाइलाज झाल्यामुळे कबील्याने राजपूत पद्धतीने जोहार केला आणि मग राजपूत महाराजांवर तुटून पडले. परंतू त्यांचा मोड झाला. शिवरायांनी राजपुतांच्या प्रेतांना अग्नी दिला. केदारसिंगची आई आणि बायको मराठ्यांच्या हाती पडली होती. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वस्त्रे उसने देऊन शिवरायांनी मोठ्या इतमाने आपल्या देशी पाठवले.
कानडा प्रांतातील देसाई प्रकरण: शिवरायांनी कर्नाटक स्वारीमध्ये एका नवीन साम्राज्याची निर्मिती केली होती. दक्षिणेतील मोठे मोठे सत्ताधीश शिवरायांच्या स्वारीने गर्भगळीत होऊन शरण आले. कर्नाटकातील उत्तरेस संपगावाकडे महाराज कुच करीत असताना बेलवडीच्या किल्ल्याला वेढा पडला. हा किल्ला प्रसिद्ध सेनापती सेखुजी गायकवाड लढवत होता. त्याने किल्लेदाराला कंठस्थान घातले. पण किल्ला हाती येईना. कारण किल्लेदार जरी पडला तरी त्याची पत्नी सावित्री देसाईने सन १६७८ च्या फेब्रुवारीत मराठ्यांना तीव्र विरोध केला. बेलवाडीच्या या विधवा स्त्रीने सतत २७ दिवस किल्ला लढविला.
सर्व कर्नाटक प्रांत महाराजांना शरण येत असताना एका स्त्रीने आपल्याला आव्हान द्यावे आणि कितीतरी दिवस कडवी झुंज देऊन मराठी सैनिकांची दानादान करावी, याचे वैषम्य सेनापती सेखुजी गायकवाड यांना वाटले. आणि त्यांना भयंकर राग आला. ९१ कलमी बखरीत लेखक लिहितो की, पण सेखुजीने शेवटी किल्ला जिंकला. आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने या सावित्रीबाईवर बलात्कार केला. शिवरायांच्या तत्त्वाला हरताळ फासणारे हे कृत्य होते. मुसलमान शाही सैन्यात आणि मराठा फौजेत काही फरक उरला नाही. म्हणून सेखूजी गायकवाड यांना शिक्षा होणे क्रमप्राप्त होते. कितीही मोठा सरदार असो शिवरायांच्या तत्त्वनीतीला तो जर पायदळी तुडवत असेल तर त्याला क्षमा ही नव्हतीच. सेनापती गायकवाड यांच्या बलात्कार प्रकरणाची बातमी शिवरायांना कळताच ते भयंकर संतापले आणि त्यांनी सेखुजी गायकवाडांचे डोळे काढावयास लावले व जन्ममर तुरुंगात डांबले.
सेखुजी व इतर सैनिकांना कडक शिक्षा ठोठावल्यानंतर मराठी फौजेची प्रचंड वाताहत करणाऱ्या सावित्रीबाईला जी वागणूक दिली तिच्या संदर्भात सभासदकार लिहितो 'अंगावर मांजरे घालून मी विपत्य करून सोडून दिले'. केळुस्करांनी आपल्या ग्रंथात या विधानाचा अर्थ लावताना असे लिहिले की 'स्त्री जातीस शिक्षा करू नये, असा त्यांचा नियम असल्याकारणाने त्यांनी तिला वस्त्रभूषण देऊन गौरवले आणि गावे इनाम देऊन सोडून दिले' अशाप्रकारे अत्यंत आदराचे आणि पुरोगामी धोरण शिवरायांनी अंगीकारले होते. म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतरही सरंजामकालीन राजा शिवरायांचा उदोउदो लोकशाहीत व्हावा; त्याचे इंगीत काय आहे, हे लक्षात येते.
डॉ. शिवानंद भानुसे (प्रदेश प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र)
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan