Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना

बुद्ध आणि कार्ल मार्क्स - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

४.  बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना

     मार्क्सवादी सिद्धांतातून जी तत्त्वे टिकून राहिली आहेत ते घेऊन आता आपणास बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये तुलना करता येईल. 

     पहिल्या मुद्यावर बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये पूर्ण एकमत आहे. हे एकमत किती घनिष्ठ आहे हे दर्शविण्यासाठी मी बुद्ध आणि पोट्ठपाद ब्राह्मण यांच्यामध्ये झालेल्या संवादातील काही भाग खाली देत आहे.

     "त्यानंतर पोट्टपादाने पुढील शब्दात (बुद्धाला) प्रश्न विचारले : 

१.      जग नित्य नाही काय ? 

२.     जगाला अंत आहे काय ?

३.      जग अनंत आहे काय ? 

४.      चेतना (जीव) ही शरीरासारखीच आहे काय ?

५.      चेतना ही एक गोष्ट व शरीर ही दुसरी गोष्ट आहे काय ? 

६.      ज्याला सत्य प्राप्त झाले आहे तो (तथागत) मरणोत्तर जिवंत राहतो काय ?

७.      तो मरणोत्तर पुन्हा जिवंत रहातही नाही किंवा जिवंत रहात नाही असेही नाही, असे आहे काय ? 

    आणि मग या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले आहे ते असे - "पोट्ठपाद, या बाबतीत मी माझे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही." 

२८.      "परंतु भगवंतांनी त्यावर कोणतेही मत का व्यक्त केलेले नाही."

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar      (कारण) या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही, त्याचा धम्माशी संबंध नाही ते सदाचरणाच्या कोणत्याही तत्त्वांची वृद्धी करीत नाही, किंवा त्यापासून अनासक्ति, लोभापासून हृदयाची मुक्ती किंवा शांती दमन किंवा अभिज्ञान (अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान) किंवा निर्वाण साध्य होत नाही, म्हणून मी आपले मत व्यक्त केलेले नाही."

     दुसऱ्या मुद्याबाबत, बुद्ध व कोसलचा राजा प्रसेनजित यांच्यामध्ये झालेल्या संवादातील भाग मी खाली देत आहे ?

     “आणखी असे की, राजाराजांमध्ये, सरदारासरदारांमध्ये ब्राह्मणाब्रह्मणांमध्ये, गृहस्थागृहस्थांमध्ये, माता व पुत्रामध्ये, पुत्र व पित्यामध्ये, बंधुभगिनींमध्ये, मित्रामित्रांमध्ये नेहमी कलह चालू आहे." जरी हे शब्द प्रसेनजिताचे असले तरी त्यातून त्याने समाजाचे खरे चित्र उभे केल्याचे बुद्धाने नाकारलेले नाही.

     वर्गकलहाबाबतचा बुद्धाचा स्वतःचा दृष्टिकोन विचारात घेता, त्याचा अष्टांग मार्गाचा सिद्धांत हा 'वर्ग-कलह अस्तित्वात आहे वा हा वर्गकलह हेच दुःखाचे कारण आहे,' यास मान्यता देतो.

     तिसऱ्या प्रश्नाबाबत मी पोट्ठपादाबरोबर झालेल्या बुद्धाचा त्याच संवादातील भाग उद्धृत करतो ?

     "मग भगवंतांनी काय सांगितले ?"

     पोट्ठपाद, मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितले ! मी दुःखाचे मुळ काय आहे, हे सांगितले. मी दुःखाचा अंत कसा होऊ शकतो ते सांगितले, मी कोणत्या मार्गाने दुःखाचा अंत घडवता येईल, ते सांगितले." 
 
 ३०      "आणि भगवंतांनी याप्रमाणे का सांगितले ?"

     "कारण पोट्ठपाद, हे विधान लाभदायक आहे. ते धम्माशी संबंधित आहे. ते सम्यक् आचरणाचा प्रारंभ, वैराग्य, लोभापासून मुक्ती, शांती, दमन, अभिज्ञान ऊर्फ जीवनातील उच्चतर अवस्थांची दृष्टी (संबोधि) व निर्वाण यांना कारणीभूत होते. म्हणून पोट्ठपाद, मी त्याप्रमाणे विधान केले आहे.'

     भाषा वेगळी आहे, परंतु अर्थ तोच आहे. जर दुःखाचा अर्थ 'पिळवणूक' असा घेतला तर बुद्ध व मार्क्स यांमध्ये अंतर नाही.

     खाजगी संपत्तीच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यात झालेल्या संवादातील पुढील उतारा उद्बोधक आहे. आनंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतो,

     "धन लालसा 'हाव' असण्याचे कारण 'मालकी' असे मी सांगितले आहे. तर, ते तसे कोणत्या प्रकारे सांगितले, ते आनंद, या पद्धतीने समजून घेता येईल.'

     "जे कोणत्याही त-हेची किंवा कोणत्याही प्रकारची मालकी नसेलमग ती कोणाचीही असो वा कोणत्याही गोष्टीची असो-तेथे कोणतीही मालकी नसल्यामुळे, तेथे मालकीच्या अशा नसण्यामुळे कोणत्याही प्रकारची धन लोभ (हाव) दिसून येईल काय ?

     "दिसून येणार नाही, भगवन्  !"

     "म्हणून, आनंद, हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. लोभ (हाव) असण्याचे कारण मालकी."

३१. "मी आसक्ती हे मालकी असण्याचे कारण सांगितले आहे. तर आनंद, ती तशी कोणत्या प्रकारे आहे या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. जेथे कोणत्याही त-हेची किंवा कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही-मग ती कोणी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत दाखविलेली असो-ती जी काही असेल त्या आसक्तीच्या नसण्याने, कोणत्याही प्रकारची मालकी दिसून येईल काय?" 

     "दिसून येणार नाही, भगवन् !"

     'म्हणून आनंदा, हे त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे.' मालकीचे कारण आसक्ती.'

     चौथ्या मुद्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भिक्षुसंघाचे नियमच यांचे उत्तम प्रमाण आहेत.

     या नियमांनुसार भिक्षू केवळ पुढील आठ वस्तूंपुरतीच खाजगी संपत्ती जवळ बाळगू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. या आठ वस्तू म्हणजे : 

१.      रोजच्या वापरासाठी तीन वसे (चीवर) 

२.      कमरबंध 

३.      एक भिक्षापात्र 

४.      एक वस्तरा 

५.      एक सुई 

६.      धागा 

७.      एक पाणी गाळण्याचे फडके

     दुसरी गोष्ट, भिक्षू त्याला जवळ बाळगण्यास परवानगी दिलेल्या आठ वस्तूंशिवाय सोन्याने वा चांदीने आणखी काही वस्तू विकत घेईल या भीतीपोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षूला पूर्णपणे मनाई होती.

     हे नियम रशियातील साम्यवादात दिसून येणाऱ्या नियमांपेक्षा कितीतरी अधिक कठोर आहेत.

५. साधने

     आता आपण साधनांचा विचार करूया. बुद्धाने प्रतिपादन केलेली साम्यवाद घडवून आणणारी साधने अत्यंत निश्चित अशी (स्पष्ट) होती. ही साधने तीन भागांमध्ये वर्णन करता येऊन शकतील.

     भाग एक यामध्ये पंचशीलाच्या आचरणाचा समावेश होतो. बुद्धाने एका नव्या धर्मतत्त्वाला (गॉस्पेल) जन्म दिला. त्याला जो प्रश्न सतावत होता त्या प्रश्नाच्या उत्तराची किल्ली त्या धर्मतत्त्वात (गॉस्पेल) होती.

     जग दुःखाने व दैन्याने भरलेले आहे, हे सत्य या नव्या धर्मतत्त्वाचा पाया आहे. हे सत्य केवळ दखल घेण्यापुरते नाही, तर मुक्तीच्या कोणत्याही उपाययोजनेत ते पहिले व सर्वप्रथम मानणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती जाणून घेणे हा बुद्धाने त्याच्या धर्मतत्त्वाचा प्रारंभबिंदू मानला.

     ते धर्मतत्त्व कोणत्याही उपयुक्त प्रयोजनार्थ उपयोगी ठरण्यासाठी हे दुःख व दैन्य दूर करणे हे त्याचे ध्येय व उद्दिष्ट होते.

     या दुःखाची कारणे कोणती असू शकतील याची चौकशी करता बुद्धाला ती केवळ दोन कारणे असतील असे दिसून आले. माणसाचे दुःख व दैन्य काही अंशी त्याच्या स्वतःच्या दुराचरणाचा (गैरवर्तणुकीचा) परिणाम असतो. दुःखाचे हे कारण दूर करण्यासाठी त्याने पंचशील आचरणात आणण्याचा उपदेश केला. पंचशीलामध्ये पुढील (नियमांच्या) तत्व पालनाचा अंतर्भाव होतो. 

१.      कोणत्याही प्राणिमात्राला ठार करण्यापासून वा ठार करण्यास कारण ठरण्यापासून अलिप्त राहणे, 

२.      चोरीपासून म्हणजे दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने किंवा बळजबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहणे,

३.      असत्य भाषणापासून अलिप्त राहणे, 

४.      कामवासनेपासून अलिप्त राहणे,
५.      मादक पेयांपासून अलिप्त राहणे.

     जगातील दुःख व दैन्य यांचा काही भाग, बुद्धाच्या मते, माणसाच्या माणसाबाबत असलेल्या असमानतेचा परिणाम होय. ही असमानता कशी दूर करता येईल ? माणसाची माणसाबाबत असलेली असमानता दूर करण्यासाठी बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. आर्य अष्टांगिक मार्गाची तत्त्वे अशी आहेत. 

१.      सम्यक् दृष्टी, म्हणजे अंधश्रद्धांपासून मुक्ती;

२.      सम्यक् संकल्प, म्हणजे बुद्धिमान व निश्चयी माणसाला साजेसा उच्च संकल्प 

३.      साम्यक् वाचा, म्हणजे करूणेची, मुक्त व सत्यपूर्ण वाचा;

४.      सम्यक् व्यायाम, म्हणजे इतर सर्व सात तत्त्वांचे पालन; 

५.      सम्यक् आजीव, म्हणजे प्राणिमात्राला दुखापत किंवा इजा न करणारी उपजीविका; 

६.      सम्यक् कर्मांत, म्हणजे इतर सर्व सात तत्त्वांचे पालन; 

७.      सम्यक् स्मृति, म्हणजे जागृत व कृतिशील मनाने ठेवलेली स्मृती; 

८.      सम्यक् समाधि, म्हणजे जीवनातील गहन गूढ तत्त्वांवरील गंभीर विचार. पृथ्वीवर न्यायाचे साम्राज्य प्रस्थापित करणे व त्याद्वारे जगाच्या पाठीवरून दुःखाला व दैन्याला हद्दपार करणे हे आर्य अष्टांगिक मार्गाचे ध्येय होय.

     काहीतरी उपयोग होऊ शकेल या विचारापासून मुक्त झाल्याशिवाय कोणतेही सत्संकल्प केले तरी-मग ते कितीही ठाम असोत-त्यांच्यापासून त्याला कसलाच लाभ होणार नाही.

     या अडथळ्यांवर मात केली तरच माणसाने उत्तम प्रकारे कार्यारंभ केला आहे व त्याला लवकरच किंवा उशीरा का होईना विजय प्राप्त होण्याची शक्यता आहे, असे म्हणता येऊ शकेल. चौथ्या अडथळ्यात शारीरिक वासनांचा (कामतृष्णा) समावेश होतो.

     पाचवा अडथळा इतर व्यक्तींबाबतची दुष्ट भावना (क्रोध) हा आहे.

     सहावा अडथळा भौतिक आस्तक्तिंपासून असलेल्या भावी प्राप्ती करण्यासाठी सुखाचा लाभ हो.

     सातवा अडथळा अरूप देवलोक - प्राप्तीची इच्छा (अरूपराग) हा आहे. आठवा अडथळा अहंकार (मान) आहे व

     नववा अडथळा (दंभ) होय.

     या अशा भावना आहेत की माणसांना त्यांवर मात करणे सर्वात कठीण आहे व अधिक श्रेष्ठ व्यक्तींना स्वतःपेक्षा जे कमी समर्थ आहेत व कमी चारित्र्यवान आहेत. त्यांच्याप्रति तिरस्कार वाटण्याच्या भावनेवर विजय मिळविणे आणखीच कठीण असते.

     दहावा अडथळा 'अज्ञान (अविज्ज)' होय. जरी सर्व अडथळ्यावर मात केली तरी हा एक अडथळा उरेलच. सुज्ञ व सद्गुणी माणसाला सलणारा तो काटा आहे. तो माणसाचा अंतिम व कट्टर शत्रू आहे.

     आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करताना निब्बाणाद्वारे अडथळ्यांवर मात करणे अभिप्रेत आहे.

     माणसाने मनाची कोणती अवस्था चिकाटीने विकसित करावी हे आर्य अष्टांगिक मार्गाचा सिद्धांत सांगतो. माणसाला जर आर्य अष्टांगिक मार्गावर चालावयाचे असेल तर त्याने कोणत्या मोहावर व अडथळ्यावर मनःपूर्वक मात केली पाहिजे ते निब्बाण सांगते. 

     या नव्या धर्मतत्त्वाचा (गॉस्पेलचा) चौथा भाग पारमितांचा सिद्धांत हा आहे.

     पारमितांचा सिद्धांत माणसाच्या दैनंदिन जीवनात दहा सद्गुणांचे आचरण मनावर ठसवतो. ते दहा सद्गुण असे आहेत - १. प्रज्ञा २. शील ३. नैष्कर्म्य ४. दान ५. वीर्य ६. सत्य ७. अधिष्ठान ८. मैत्री आणि ९. उपेक्षा.

     अविद्या, मोह किंवा ज्ञानाचा अभाव यांचा अंधःकार दूर करणारा प्रकाश म्हणजे प्रज्ञा अथवा शहाणपण होय. आपल्यापेक्षा सज्ञ असलेल्यानां प्रश्न विचारून आपल्या सर्व शंका दूर केल्या पाहिजेत, सुज्ञाची संगत केली पाहिजे व मनाचा विकास करण्यास मदत करतील अशा वेगवेगळ्या कला व शास्रे जोपासली पाहिजेत. या गोष्टी प्रज्ञेसाठी आवश्यक आहेत.

     शील ही नैतिक भावना आहे. वाईट गोष्टी न करण्याचा व चांगल्या गोष्टी करण्याचा, चूक करण्याची लाज वाटण्याचा असा तो स्वभाव आहे. शिक्षेच्या भीतीने वाईट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शीलाचा अर्थ पापाचरण करण्याची भीती. नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखांचा त्याग. 

     दान याचा अर्थ, इतरांच्या भल्यासाठी, त्या बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करता, एखाद्याने आपली मालमत्ता, रक्त, अवयव व आपले प्राणदेखील अर्पण करणे होय.

     वीर्य म्हणजे साम्यक् प्रयत्न. मागे न फिरण्याच्या विचाराने आपण जी काही गोष्ट करण्यासाठी हाती घेतली असेल ती आपली सर्व शक्ती एकवटून पार पाडणे होय.

     शांती म्हणजे सहनशीलता होय द्वेषाला उत्तर न देणे हे तिचे सार आहे. कारण द्वेषाने द्वेष शम्पत नाही, तो केवळ सहनशीलतेने शमतो.

     सत्य म्हणजे खरे बोलणे कधीही खोट न बोलण्याची सत्य ही बुद्धाची एक उत्कट इच्छा होय. त्याचे बोलणे सत्य असते व ते अन्य काही नसून केवळ सत्य असते.

     अधिष्ठान म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला ठाम निर्धार होय.

     मैत्री ही शत्रू व मित्र, प्राणी व मनुष्य अशा सर्व प्राण्यांना सामावणारी मैत्रीची भावना होय.

     'उपेक्षा' ही उदासीनतेहून भिन्न अशी अलिप्तता होय. ही मनाची एक अवस्था आहे. त्या अवस्थेत कोणतीही आवड किंवा नावड नसते. परिणामाने विचलित न होता त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची ती अवस्था होय.

     हे सद्गुण आपण पराकाष्ठेने आपल्या आचरणात आणले पाहिजेत. म्हणूनच त्यांना पारमिता (पूर्णतेच्या अवस्था) असे म्हणतात.

     जगातील दुःख व दैन्य संपुष्टात आणण्यासाठी बुद्धाने त्याच्या संबोधीची फलश्रुती म्हणून अधिकारवाणीने प्रतिपादन केलेला हा धम्मोप्रदेश आहे. बुद्धाने स्वीकारलेली साधने ही माणसाने (स्वच्छेने) प्रज्ञा व शील याचा सन्मार्ग अनुसरून आपला नैतिक आचरण बदलावा व मतान्तर घडवून आणावे यासाठी होती, हे स्पष्ट आहे.

     साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने तितकीच स्पष्ट, अपुरी व झटपट अंमलात येणारी आहेत, ती म्हणजे १. हिंसा आणि २. कामगारांची हुकूमशाही.

     साम्यवाद प्रस्थापित करण्याची केवळ हीच दोन साधने आहेत असे साम्यवादी म्हणतात. पहिले साधन हिंसा आहे. विद्यमान पद्धती मोडून टाकण्यासाठी त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पर्याप्त ठरणार नाही. दुसरे साधन, कामगारांची हकूमशाही आहे. साम्यवादी (नवीन) आणण्यासाठी त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पर्याप्त ठरणार नाही.

     बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील साम्य व भेद आता स्पष्ट झालेले आहे. दोघांचे ध्येय समान आहे. भेद मात्र साधनाबाबत आहेत.You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209