'ड्रीमलँड' ची प्रस्तावना (लाला रामशरण दास हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक होते. लाहोर षडयंत्र केस मध्ये फसवून त्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली होती. तुरुंगात असतानाच त्यांनी 'ड्रीमल.' हा कवितासंग्रह लिहिला आणि भगतसिंगला त्याची प्रस्तावना लिहावयास सांगितले. भगतसिंगने लाहोर तुरुंगामध्ये १५ जानेवारी, १९३१ ला ही प्रस्तावना लिहिली. ह्या लेखावरून भगतसिंगची साहित्यिक संवेदना व समजदारी दिसून येते.)
माझे थोर मित्र रामशरण दास यांनी त्यांच्या 'ड्रीमलँड या कविता संग्रहासाठी मला प्रस्तावना लिहावयास सांगितले आहे. मी कवी किंवा साहित्यिक नाही. तसेच वृत्तपत्रकार किंवा टीकाकारही नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे त्यांनी माझ्याकडून केलेली ही मागणी योग्य नाही. पण मी ज्या परिस्थितीत सध्या आहे. तिच्यात मला लेखकाशी याबद्दल सविस्तर चर्चा करण्याची व वाद घालण्याची संधी मिळणे शक्य नाही. त्यामुळे अखेर माझ्या परममित्राची इच्छा पूर्ण करण्याशिवाय मला गत्यंतर उरलेले नाही.
मी कवी नसल्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी या पुस्तकाची चर्चा करणार नाही. मला वृत्तछंदांचे कणभरही ज्ञान नाही आणि त्या मोजपट्टीने मोजल्यास ह्या कविता बरोबर आहेत का नाहीत हे ही मला ठाऊक नाही. मी साहित्यिक नसल्यामुळे त्या लिखाणाचे राष्ट्रीय साहित्यातले उचित स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीनेही मी चर्चा करणार नाही.
मी राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे मी फक्त त्याच दृष्टिकोनातून या पुस्तकाची चर्चा करू शकेन. परंतु इथेही एका गोष्टीमुळे हे काम प्रत्यक्षात अशक्य किंवा निदान भलतेच कठीण बनले आहे. लेखकाच्या आशयाशी सहमत असलेल्या माणसाने प्रस्तावना लिहावी असा सर्वसाधारण प्रघात आहे. पण येथे तसे मुळीच एकमत नाही. बऱ्याच मूलभूत महत्वाच्या मुद्यांवर माझी मते त्याच्याहून भिन्न आहेत याची त्याला जाणीव होती. त्यामुळे 'ड्रीमलँड वर जे मी लिहिणार आहे ती त्याची प्रस्तावना होऊ शकत नाही. जास्तीत जास्त त्या पुस्तकावरील ही एक टीका होऊ शकेल आणि तिचे स्थान खरे म्हणजे पुस्तकाच्या शेवटी हवे. सुरुवातीला नव्हे.
राजकारणाच्या क्षेत्रात 'ड्रीमलँड चे स्थान फार महत्वाचे आहे. सध्याच्या एकंदर परिस्थितीत चळवळीतील एक महत्वाची त्रुटी या पुस्तकाने भरून निघत आहे. खरे पाहिले तर आधुनिक इतिहासात आत्तापर्यंत महत्वाच्या भूमिका गाजवलेल्या आपल्या देशातल्या सर्व राजकीय चळवळींना एक निश्चित आदर्श, ज्यासाठी धडपडायचे असे पक्के उद्दिष्ट नव्हते. क्रांतिकारी चळवळ ही सुद्धा याला अपवाद नाही. बरेच प्रयत्न करूनही मला असा एकही क्रांतिकारी पक्ष सापडला नाही की ज्याला आपण कशासाठी लढतो आहोत याची स्पष्ट कल्पना आहे. गदर पक्ष हा त्याला अपवाद आहे. अमेरिकन धाटणीच्या राज्यव्यवस्थेपासून स्फूर्ती घेतलेला हा पक्ष स्पष्टपणे असे म्हणतो की सध्याच्या सरकारऐवजी प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. बाकी सर्व पक्षातल्या लोकांना एकच ठाऊक आहे. परकीय सत्तेविरुद्ध लढणे. हा विचार अगदी स्तुत्य असला तरी त्याला क्रांतिकारक विचार म्हणता येणार नाही. आपण हे स्पष्ट करायला पाहिजे की क्रांती म्हणजे केवळ एखादा उठाव किंवा रक्तरंजित लढा नव्हे. अस्तित्वात असलेली परिस्थिती (म्हणजे राजवट) संपूर्ण नष्ट करून त्या जागी नव्या आणि जास्त सुयोग्य पायावर आधासि अशा समाजाच्या पद्धतशीर पुनर्रचनेसाठी आखलेला कार्यक्रम हा क्रांतीमध्ये अभिप्रेत असणे आवश्यक आहे.
राजकीय क्षेत्रात नेमस्तांना सध्याच्याच सरकारच्या छत्राखाली काही सुधारणा हव्या आहेत. जहालांची त्याहून किंचित जास्त मागणी आहे आणि त्यासाठी जहाल मार्ग वापरण्याची त्यांची तयारी आहे. क्रांतिकारकांमध्ये परकीय सत्ता उलथून टाकणे या एकाच ध्येयाने आत्यंतिक मार्ग अनुसरावा या मताचे लोक नेहमीच जास्त राहिले आहेत. त्या मार्गानी जबरीने काही सुधारणा पदरात पाडून घेणे हे देखील काहींना पसंत होते यात शंका नाही. अशा सर्व चळवळींना खऱ्या अर्थी क्रांतिकारक चळवळी म्हणणे योग्य ठरणार नाही.
रामशरण दास हा १९०८ साली फरारी झालेल्या एका बंगाली माणसाने, औपचारिकपणे पंजाबमध्ये भरती केलेला पहिला क्रांतिकारक. तेव्हापासून त्याचा क्रांतिकारक चळवळींशी सतत संबंध होता आणि शेवटी तो गदर पक्षात सामील झाला होता. परंतु चळवळीच्या ध्येय-उद्दिष्टांबाबत त्याच्या कल्पना जुन्याच राहिलेल्या होत्या आणि या सर्व घटनांच्या सौंदर्यात व मूल्यात भर टाकणारी आणखी एक गोष्ट सुद्धा आहे. १९१५ साली रामशरण दास यांना फाशीची शिक्षा झाली होती. परंतु नंतर ती कमी करून जन्मठेपेची केली. आज मी या फाशीच्या कैद्यांच्या कोठडीत बसलो असताना जन्मठेप ही मृत्यूदंडापेक्षाही फार अधिक कठोर शिक्षा आहे याची मला अधिकारवाणीने वाचकांना जाणीव करून द्यावीशी वाटते. रामशरण दास यांना प्रत्यक्षात चौदा वर्षांची कैद भोगावी लागली. दक्षिणेकडील कोणत्या तरी तुरूंगात त्यांनी हे काव्य लिहिले. लेखकाची त्यावेळची मानसिकता आणि मनातली द्वंद्वे यांची छाप त्या काव्यावर उमटली आहे आणि त्यामुळे ते अधिकच सुंदर व लक्षवेधक बनले आहे. हे लिहिण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तो निराश मनस्थितीशी बराच काळ झगडत होता. त्या काळात त्याच्या बऱ्याच सहकाऱ्यांची चांगल्या वर्तणुकीचे जब च देऊन मुक्तता झाली होती. इतरांना आणि त्यालासुद्धा हा एक प्रचंड मोह होता. बायका-मुलांच्या सुखदुःखाच्या आठवणींनी सुटकेच्या या तळमळीत आणखी भर घातली होती. अशा वेळी या मनोधैर्य खच्ची करणाऱ्या गोष्टीविरुद्ध त्याला झगडा द्यावा लागला आणि या लेखनावर लक्ष केंद्रित करावे लागले. म्हणूनच पुस्तकाच्या पहिल्याच परिच्छेदात याचा उद्रेक आपल्याला आढळतो.
'बायको, मुले. मित्र मला घेरतात
विळखा घालणारे विषारी सर्प बनून'
सुरुवातीला तो तत्त्वज्ञानाची चर्चा करतो. हे तत्त्वज्ञान म्हणजे बंगाल व पंजाबमधील सर्व क्रांतिकारक चळवळीचा कणा आहे. या मुद्यावर माझे त्याच्याशी तीन मतभेद आहेत. त्याच्या मते विश्व हे मूलत: अधिभौतिक आहे व त्यामध्ये एक गर्भित हेतू आहे; तर मी भौतिकवादी आहे आणि विश्वाचा अर्थ मी कार्यकारण भावाच्या आधारे लावतो. तथापि त्याची मते त्याच्याभोवतीच्या वातावरणाशी जुळणारी आहेत. आपल्या देशात प्रचलित असलेल्या सर्वसाधारण कल्पना ह्या त्याने मांडलेल्या कल्पनांशी जास्त मिळत्याजुळत्या आहेत. पुस्तकाचा सुरुवातीचा संबंध भाग हा ईश्वर, त्याची स्तुती, त्याची व्याख्या आणि ईश्वराच्या ठायी असलेली श्रद्धा यांना वाहिलेला आहे. हे सर्व गूढवादाचे फळ आहे आणि निराश मनोवस्थेचा तो एक नैसर्गिक परिणाम आहे. हे उघड आहे की त्या निराशामय मानसिक स्थितीला टक्कर देण्यासाठी त्याला प्रार्थनेचा आश्रय घ्यावा लागत होता. हे जग 'माया' किंवा 'मिथ्या आहे. स्वप्नं किंवा भ्रम आहे हे मत जुन्या काळच्या शंकराचार्य व इतर हिंदू ऋषींनी निर्माण व विकसित केलेला गूढवादच आहे. परंतु, भौतिकवादी तत्त्वज्ञानात या प्रकारच्या विचारसरणीला अजिबात स्थान नाही. तरीही लेखकाचा हा गूढवाद कोणत्याही प्रकारे निंद्य किंवा शोचनीय नाही. त्याला अंगभूत असे सौंदर्य लाभलेले आहे. त्यातल्या कल्पना प्रेरक आहेत. आता हेच पहा -
तू हो एक पायाचा दगड अनामिक
अन् वागव उल्हासाने स्वत:च्या वक्षावर
ते विराट आणि प्रचंड वास्तुशिल्प,
यातना सोसण्यामध्येच शोध खरी मुक्ती.
नको करू हेवा चकाकत्या कळसाच्या दगडाचा
ज्याच्यावर बरसतात या जगाकडून स्तुतिसुमने.... इत्यादी
माझ्या स्वत:च्या अनुभवावरून मी निर्धोकपणे असे म्हणू शकतो की गुप्त कार्यामध्ये 'न आशा न भीती बाळगता, माणूस जेव्हा जीव धोक्यात घालत असतो, बेवारशीपणे, सम्मानविरहित, शोकगीताशिवाय येणाऱ्या मरणाला सदैव तयार असतो, तेव्हा वैयक्तिक मोह आणि इच्छा यांच्याशी झगडायला त्याला गूढवादाचे सहाय्य घ्यावे लागते आणि ह्या प्रकारचा गूढवाद हा नीतीधैर्य टिकवायला मदत करतो. पुढे तो क्रांतिकारकांच्या मानसिकतेविषयी लिहितो. अनेक हिंसक कृत्यांना जबाबदार असलेल्या क्रांतिकारी पक्षाचा रामशरण दास हा सभासद होता. पण यावरून क्रांतिकारक हे विनाशात आनंद लाभणारे रक्तपिपासू राक्षस आहेत असे सिद्ध होत नाही. हे वाचा -
गरज पडली तर हो क्रूर बाह्यत:
पण हृदयात असू देत सदैव तुझ्या कोमलता
फुत्कार गरज पडली तर परंतु दश नको करू
प्रेम वसू देतुझ्या हृदयात अन् बाहेर युद्ध कर....इत्यादी
रचनेसाठी विनाश हा केवळ आवश्यक नसून अनिवार्य आहे. कार्यक्रमाचा एक आवश्यक भाग म्हणून क्रांतिकारकांनी त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. वरील ओळीत हिंसा व अहिंसाविषयक तत्त्वज्ञान संदसणे मांडलेले आहे. लेनिन एकदा गोर्कीला म्हणाला होता की, “सर्व संवेदना हेलावून सोडणारे आणि कलावंताच्या मस्तकावर थोपटावे अशी इच्छा निर्माण करणारे संगीत मी ऐकू शकलो नाही"; नंतर तो म्हणाला, “परंतु डोक्यावर थोपटण्याचा हा काळ नव्हे. सर्व प्रकारच्या हिंसेचे उच्चाटन करणे हे आपले अंतिम उद्दिष्ट असले तरी आज कवट्या फोडून टाकणारे प्रहार करण्यासाठी हात उठले पाहिजेत." आत्यंतिक गरजेच्या वेळी जेव्हा हिंसेचा अवलंब करण्याची वेळ येते तेव्हा क्रांतिकारकांना अंतर्यामी काय वाटते याचे हे एक उदाहरण आहे.
यानंतर लेखक निरनिराळ्या परस्परविरोधी अशा धर्माच्या प्रश्नाला हात घालतो. सगळे राष्ट्रवादी जसा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे तोही सर्वधर्मसमन्वय करण्याचा प्रयत्न करतो. हा प्रश्न हाताळण्याची त्याची पद्धत फारच लांबलचक व पाल्हाळिक आहे. मी कार्ल मार्क्सच्या एकाच वाक्याने या प्रश्नाचा निकाल लावला असताः धर्म ही जनसमुदायांसाठी अफू आहे.
आपण सर्वजण जो समाज निर्माण करण्यासाठी तळमळत आहोत, त्या भावी समाजाचे विवेचन या काव्यसंग्रहाच्या शेवटच्या भागात केलेले आहे आणि ते सर्वात महत्वाचे आहे. पण आरंभीच मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. 'ड्रीमलँड हे खरोखरीच एक मनोराज्य (यूटोपिया) आहे. लेखकाने सरळपणे ते मथळ्यातच मान्य केले आहे. 'ड्रीमलँड या मथळ्यातूनच ते स्पष्ट होते. पण सामाजिक विकासात मनोराज्येसुद्धा निःशंकपणे महत्वाची कामगिरी बजावतात. सेंट सायमन, फोरीअर, रॉबर्ट ओवेन आणि त्यांच्या स्वप्नाळू विचारधारा नसत्या तर शास्त्रीय मार्क्सवादी समाजवादही अस्तित्वात आला नसता. रामशरण दास यांच्या मनोराज्याचे स्थान तेच आहे. जेव्हा आमच्या कार्यामध्ये चळवळीच्या तत्त्वज्ञानाचे सुसूत्रीकरण करणे आणि चळवळीला शास्त्रीय दृष्टिकोनाचा पाया प्राप्त करून देणे या गोष्टींचे महत्व पटेल तेव्हाच या पुस्तकांचा कार्यकर्त्यांना उपयोग होईल.
मला असे आढळले की विचार मांडण्याची लेखकाची पद्धत ढोबळ आहे. लेखक त्याच्या मनोराज्यात गुंतलेला असतानाही सध्याच्या समाजातील कल्पनांनी त्याची पाठ सोडलेली नाही. उदा. ज्यांना गरज असेल त्यांना भिक्षा दिली जाईल.'
आम्ही उभारू इच्छितो त्या साम्यवादी समाजात आम्ही धर्मादाय संस्था उभारणार नाही. त्यामध्ये गरजू व गरीब कुणी नसेल. भिक्षा देणे व भिक्षा घेणे असले काहीच नसेल. हा दोष असून देखील त्याने हा प्रश्न अतिशय सुरेख हाताळला आहे.
आम्ही उभारू इच्छितो त्या साम्यवादी समाजात आम्ही धर्मादाय संस्था उभारणार नाही. त्यामध्ये गरजू व गरीब कुणी नसेल. भिक्षा देणे व भिक्षा घेणे असले काहीच नसेल. हा दोष असून देखील त्याने हा प्रश्न अतिशय सुरेख हाताळला आहे.
त्याने चर्चिलेली सर्वसाधारण रूपरेषा ही शास्त्रीय समाजवादाशी तंतोतंत जुळणारी आहे. परंतु विरोध करावा, निषेध करावा किंवा अगदी काटेकोरपणे बोलायचे तर दुरुस्त कराव्यात अशा काही गोष्टी येथे आढळतात. उदाहरणार्थ, ४२७ व्या कडव्याच्या तळटीपेत तो लिहितो की सार्वजनिक (सरकारी) नोकरांनी त्यांचा स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी रोज चार तास शेतावर किंवा कारखान्यात काम करावे. पण हे पुन्हा स्वप्नरंजनपर आणि अव्यवहार्य आहे. आज या सेवकांना अनावश्यकपणे लठ्ठ पगार दिला जातो. या सध्याच्या प्रथेचा तिटकारा म्हणून बहुधा हा निष्कर्ष निघाला असेल. वस्तुस्थिती अशी आहे की अगदी बोल्शेविकांनासुद्धा हे मान्य करावे लागले की मानसिक श्रम हे शारीरिक श्रमांइतकेच उत्पादक श्रम आहेत आणि भावी समाजात जेव्हा निरनिराळ्या घटकांतील नाती ही समानतेच्या पायावर आधारलेली असतील, तेव्हा उत्पादक आणि वितरक यांना समान महत्वाचे गणले जाईल. एखाद्या खलाशाने आपल्या चरितार्थासाठी रोजचे चार तास श्रम करण्यासाठी दर चोवीस तासांनी जहाज थांबवून किनारा गाठावा, किंवा शेतावरचे काम पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेतील प्रयोगकार्य बंद ठेवावे अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. दोघेही जण चांगले उत्पादक श्रम करत असतात. फरक एवढाच राहील की समाजवादी समाजात मानसिक श्रम करणाऱ्यांना शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांपेक्षा कोणत्याही प्रकारे श्रेष्ठ मानले जाणार नाही.
रामशरण दास यांची मोफत शिक्षणाची कल्पना खरोखरीच विचार करण्याजोगी आहे आणि रशियामध्ये समाजवादी सरकारने साधारणपणे तशीच योजना अंगिकारलेली आहे.
गुन्हेगारांबद्दल त्याने केलेली चर्चा ही खरोखरच सर्वात प्रगत विचारधारा आहे. गुन्हा ही सर्वात गंभीर सामाजिक समस्या आहे आणि ती फार कौशल्याने हाताळली गेली पाहिजे. लेखक आयुष्याचा बराचसा काळ तुरुंगात होता. त्याला प्रत्यक्ष अनुभव आहे. एके ठिकाणी तो हलकी मजुरी, मध्यम मजुरी व सक्तमजुरी' ही अगदी तुरुंगातील खास भाषा वापरतो. बदला घेण्यासाठी शिक्षा देण्याऐवजी गुन्हेगारात सुधारणा घडवून आणणारी कृती हा शिक्षेचा पाया असला पाहिजे असे इतर समाजवाद्यांप्रमाणे लेखक सुचवतो. शिक्षा देणे नव्हे तर गुन्हेगाराला सुधारून परत आपल्यात आणणे हे न्यायदानाच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे. तुरूंग हे आजच्यासारखे नरक नसावेत, ती सुधारगृहे असायला पाहिजेत. या संबंधाने वाचकांनी रशियन कारागृहांची व्यवस्था अभ्यासायला पाहिजे.
लष्कराविषयी लिहिताना तो युद्धाचीही चर्चा करतो. समाजवादी समाजात युद्धाला कारणीभूत होणारे भिन्न व परस्परविरोधी हितसंबंध नसल्यामुळे त्या काळी 'युद्ध हा विषय विश्वकोशात फक्त काही पाने व्यापेल आणि युद्धसामग्री ही वस्तुसंग्रहालयातील गॅलऱ्या सजवतील.
आपण जास्तीत जास्त असे म्हणू शकू की युद्धे ही स्थित्यंतराच्या काळात आवश्यक अशी गोष्ट या स्वरूपात राहतील. आजच्या रशियाचे उदाहरण आपण घेतले तर हे सहज समजून येईल. तिथे सध्या कामगारांची सर्वाधिकारशाही आहे. त्यांना समाजवादी समाज स्थापन करायचा आहे. पण त्याचबरोबर भांडवलदारी समाजाकडून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांना लष्कर ठेवावे लागते. परंतु युद्धाचे हेतू मात्र वेगळे असतील. आमच्या 'ड्रीमलँडमधील लोकांना साम्राज्यवादी प्रेरणा युद्ध पुकारण्यास उद्युक्त करणार नाहीत. युद्धात जिंकून घेतलेले प्रदेश तेथे नसतील. दुसऱ्या देशातल्या बांडगुळी सत्ताधाऱ्यांना सिंहासनावरून खाली खेचून जनसमुदायाचे रक्तशोषण थांबवण्यासाठी आणि गांजवणुकीतून त्यांना मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक सेना परदेशात जातील; तेथल्या लोकांवर सत्ता गाजवणे, त्यांची लूटमार करणे हा त्यांचा हेतू नसेल. आमच्या सैनिकांना लढण्यासाठी चेतना आणण्याकरता आदिमानवाला शोभेल अशी राष्ट्रीय किंवा वांशिक द्वेष भावना वापरण्याची गरज तेथे नसेल.
विश्वसंघ हा मुक्तपणे विचार करणाऱ्या सर्व लोकांचे सर्वात लोकप्रिय आणि निकडीचे उद्दिष्ट आहे. लेखकाने हा विषय नीट विस्तृतपणे मांडला आहे. त्याची तथाकथित 'लीग ऑफ नेशन्स वरची टीकाही उत्तम आहे.
५७१ (५७२) कडव्याच्या तळटीपेत लेखक थोडक्यात क्रांतीच्या मार्गाचा परामर्श घेतो. तो म्हणतो, “निव्वळ हिंसक क्रांतीने अशा प्रकारचे राज्य आणता येत नाही. समाजवाद बाहेरूनही समाजावर लादता येत नाही. असे राज्य समाजाच्या आतूनच उमलायला हवे. वर सांगितल्याप्रमाणे जनसमुदायांना शिक्षण देऊन, उत्क्रांतीच्या संथ प्रक्रियेद्वारा अशी राजवट आणावी लागेल" वगैरे. या विधानात तशी काही चूक नाही. ते अगदी बरोबर आहे. परंतु जर नीट स्पष्ट केले नाही तर त्यामुळे गैरसमज किंवा आणखी वाईट म्हणजे गोंधळ माजण्याची शक्यता आहे. यातून असा निष्कर्ष निघतो का की रामशरण दासला बळाच्या वापरावरील निष्ठेची निरर्थकता कळून चुकली होती? तो कर्मठ अहिंसावादी बनला आहे का? नाही. त्याचा तसा अर्थ नाही.
वर उल्लेखिलेल्या विधानाचा प्रत्यक्षात अर्थ काय होतो हे मला स्पष्ट करू दे. इतर कोणापेक्षाही क्रांतिकारक हे जास्त चांगले जाणतात की हिंसक पद्धतीने समाजवादी समाज आणता येत नाही आणि त्याची वाढ व विकास समाजाच्या अंतर्यामातूनच व्हायला हवा. शिक्षण हेच अयोगात आणण्याजोगे एकमेव हत्यार आहे असे लेखक सुचवतो. परंतु कोणाच्याही सहज ध्यानात येईल की सध्याचे सरकार, किंबहुना सर्वच भांडवलशाही सरकारे अशा प्रकारच्या कोणत्याही प्रयत्नाला पाठिंबा देणार नाहीत, उलट तो निघृणपणे दडून टाकतील. तर मग लेखक सांगतो
त्या 'उत्क्रांतीची निष्पत्ती काय होणार? आम्ही क्रांतिकारक आमच्या हाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही प्रथम क्रांतिकारी सरकार संघटित करू व नंतर हे सरकार जनसमुदायांच्या शिक्षणासाठी सर्व साधनसंपत्तीचा वापर करील. रशियात आज हेच घडत आहे. एकदा सत्ता हस्तगत केल्यावर रचनात्मक कार्यासाठी शांततामय मार्ग अवलंबिले जातील. अडथळे दूर करण्यापुरताच बळाचा वापर केला जाईल. लेखकाला जर हेच म्हणायचे असेल तर मी त्याच्याशी सहमत आहे आणि मला असा विश्वास आहे की लेखकाला नेमके हेच म्हणायचे आहे.
मी पुस्तकाविषयी बरेच सविस्तर विवेचन केले आहे. किंबहुना त्यावर टीकाच केली आहे. पण मी त्यात काही बदल करावा असे मुळीच सुचविणार नाही, कारण त्याला एक ऐतिहासिक मूल्य आहे. १९१४-१५ या काळातील क्रांतिकारकांच्या ह्याच कल्पना होत्या.
ह्या पुस्तकाची मी विशेषकरून तरूणांसाठी जोरदार शिफारस करतो; परंतु एका इशाऱ्यासहित. अंधानुकरण करण्यासाठी किंवा त्यात जे लिहिले आहे तेच प्रमाण मानण्यासाठी कृपया ते वाचू नका. ते वाचा, त्याची समीक्षा करा, त्यावर चिंतन करा आणि त्या आधारे तुम्ही तुमची स्वत:ची मते बनवा.
लेखक - शहिद भगतसिंग