Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

आम्ही कशासाठी लढत आहोत  ? - शहीद भगतसिंग व बटुकेश्वर दत्त

दिल्ली कोर्टातील ऐतिहासिक जबानी - शहीद भगतसिंग व बटुकेश्वर दत्त

(असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यानंतर ६ जून १९२९ रोजी दिल्लीचे सेशन जज्ज न्या. लिओनिल मिडल्टन यांच्या कोर्टात भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केलेले ऐतिहासिक निवेदन.) 


    आमच्यावर गंभीर आरोप ठेवले गेले आहेत. त्यामुळे आमच्या बचावासाठी आम्ही काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे. आमच्या तथाकथित गुन्ह्यांविषयी खालील प्रश्न उद्भवतात: (१) असेंब्लीत बॉम्ब फेकले गेले होते हे सत्य आहे का ? आणि हे जर सत्य असेल तर ते का फेकले गेले होते ? (२) खालच्या कोर्टात आमच्यावर जे आरोप ठेवले गेले आहेत ते खरे आहेत की खोटे ?

     पहिल्या प्रश्नाच्या पहिल्या भागाबद्दल आमचे उत्तर होकारार्थी आहे. परंतु हा प्रकार 'डोळ्यानी प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदारांनी जी साक्ष दिली आहे ती निखालस खोटी आहे. आम्ही बॉम्ब फेकल्याचे नाकारत नाही आणि म्हणूनच इथे या साक्षीदारांच्या जबान्यांचा खरेपणा पारखून पाहिला गेला पाहिजे. उदाहरणार्थ, आम्ही हे सांगू इच्छितो की आम्हा दोघांपैकी एकाजवळ पिस्तुल सापडले हे सार्जट टेरीचे म्हणणे धडधडीत असत्य आहे; कारण आम्ही जेव्हा स्वेच्छेने स्वत:ला पोलीसांच्या स्वाधीन केले तेव्हा आम्हा दोघांपैकी कुणाजवळही मुळीच पिस्तुल नव्हते. आम्ही बॉम्ब फेकत असताना आम्हाला पाहिले असे ज्या साक्षीदारांनी सांगितले ते खोटे बोलत आहेत. न्याय आणि सचोटी यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी या खोट्या गोष्टींपासून धडा घेतला पाहिजे. त्याचबरोबर सरकारी वकिलांचा व्यवहार औचित्यपूर्ण होता आणि कोर्टाने आतापर्यत आम्हाला दिलेली वागणूक न्यायाला धरून होती हे आम्ही मान्य करतो.

Historical statements in Delhi court - Shaheed Bhagat Singh and Batukeshwar Dutt     पहिल्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागाचे उत्तर देण्यासाठी आम्हाला या बॉम्बफेकीसारख्या ऐतिहासिक घटनेचा जरा विस्तारपूर्वक परामर्श घ्यावा लागेल. आम्ही हे कृत्य कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या परिस्थितीत केले याचे पूर्ण व खुलमखुला स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. 

     जेलमध्ये आमच्याकडे काही पोलीस अधिकारी आले होते. त्यांनी आम्हाला सांगितले की या (बॉम्ब फेकीच्या) घटनेनंतर लगेच लॉर्ड आयर्विनने संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकत्रित अधिवेशनात सांगितले की, 'कुणा एका विशिष्ट व्यक्तीच्या विरुद्ध केलेला हा विद्रोह नाही. तर तो संपूर्ण शासनव्यवस्थेच्या विरुद्ध केलेला विद्रोह आहे.' हे एकून आम्ही त्वरित ताडले की आमच्या या कृत्यामागील उद्दिष्ट लोकांना खऱ्या अर्थी समजून आले आहे. 

     मानवतेवर प्रेम करण्याच्या बाबतीत आम्ही कुणापेक्षा तसूभरही मागे नाही. आम्ही कुणाचाही व्यक्तिगत द्वेष करीत नाही. आम्ही सर्व प्राणिमात्रांकडे नेहमी आदरपूर्वक नजरेने पहात आलो आहोत. स्वत:ला सोशालिस्ट म्हणवणाऱ्या दिवाण चमनलालने म्हटल्याप्रमाणे, रानटी वर्तनाने देशाला कलंक लावणारे उपद्रवी लोक आम्ही नाही; किंवा लाहोरच्या 'ट्रिब्यून आणि इतर काही वर्तमानपत्रांनी आम्ही माथेफिरू आहोत असे सिद्ध करण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रकारचे माथेफिरूही आम्ही नाही. स्वत:च्या देशाचा इतिहास. त्याची सद्यपरिस्थिती आणि मानवोचित आकांक्षा यांचा अभ्यास करणारे आम्ही केवळ मननशील विद्यार्थी आहोत एवढाच विनम्रतापूर्वक दावा आम्ही करू शकतो. ढोंग किंवा पाखंडीपणाचा आम्ही तिरस्कार करतो.

एक अनर्थकारक संस्था

     आम्ही हे कत्य कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थापोटी किंवा विद्वेषाच्या भावनेने केलेले नाही. ज्या शासनाच्या प्रत्येक कृतीतून त्याची अयोग्यताच नव्हे तर अपाय करण्याची क्षमतासुद्धा प्रकट होते अशा शासनसंस्थेला विरोध व्यक्त करणे एवढाच आमचा उद्देश होता. या विषयावर आम्ही जितका जास्त विचार केला तितका आमचा असा दृढविश्वास होत गेला की जगासमोर भारताच्या लज्जास्पद आणि असहाय अवस्थेची ढोल बडवून जाहिरात करणे एवढ्यासाठीच केवळ हे शासन तेथे आहे. हे शासन म्हणजे एक बेजबाबदार आणि निरंकुश सत्तेचे प्रतीक आहे. 

     जनतेच्या प्रतिनिधींनी कितीतरी वेळा आपल्या राष्ट्रीय मागण्या सरकारसमोर मांडल्या, परंतु त्या मागण्यांची सर्वथा अवहेलना करून सरकारने प्रत्येक वेळी त्या कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिल्या. संसदेने पास केलेल्या गंभीर ठरावांना भारताच्या तथाकथित पार्लमेंटसमोरच तिरस्कारपूर्वक पायदळी तुडवले गेले आहे. दडपणूक करणारे आणि निरंकुश कायदे रद्द करू पहाणाऱ्या ठरावांकडे नेहमीच अवहेलनेच्या नजरेने पाहिले गेले आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जे कायदे आणि ठराव लादलेले होते आणि अवैध ठरवून रद्द केले होते त्यांना केवळ लेखणीच्या फटकाऱ्याने सरकारने पुन्हा लागू केले आहे.

    थोडक्यात, या शासनसंस्थेच्या चालू अस्तित्वात काय चांगले आहे हे खूप विचार करूनही आम्हाला समजू शकले नाही. ही शासनसंस्था भारतातील कोट्यवधी कष्टकऱ्यांच्या श्रमांच्या कमाईच्या आधारे जरी डामडौल करत असली तरी ती एक केवळ दिलबहलाव करणारी, पोकळ, दिखाऊ व बदमाशपणाने भरलेली अशी संस्था आहे. आमच्या सार्वजनिक नेत्यांची मनोवृत्ती समजून घेण्यासही आम्ही असमर्थ आहोत. भारताच्या असहाय पारतंत्र्याची इतक्या उघङमणे चेष्टा करण्यामध्ये आणि पूर्वनियोजित अशा दाखवेगिरीवर सार्वजनिक संपत्ती आणि वेळ खर्च करण्यामध्ये आमची नेतेमंडळी सहाय्य का करतात ते आम्हाला कळू शकत नाही.

    आम्ही या समस्यांबद्दल आणि कामगार आंदोलनाच्या नेत्यांच्या धरपकडीबद्दल विचार करत होतो, इतक्यात ट्रेड्स डिस्प्यूट बिल घेऊन सरकार सामोरे आले. याच संबंधात असेंब्लीमधील कामकाज पाहण्यासाठी आम्ही गेलो. जी असेंब्ली दीनट्यळ्या श्रमिकांच्या दास्याची आणि शोषण करणाऱ्यांच्या गळाकापू शक्तीची  कडवट आठवण करून देते त्या संस्थेकडून भारतातील लाखो श्रमिक लोक कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू शकत नाहीत, हा आमचा विश्वास तेथे गेल्यावर आणखीनच दृढ झाला.

    ज्याला आम्ही रानटी आणि अमानुष समजतो असा तो कायदा देशाच्या प्रतिनिधींच्या माथी मारला गेला. कामगारांना अशा प्रकारे त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित केले गेले आणि त्यांच्या आर्थिक मुक्तीचे एकमेव हत्यार त्यांच्या हातातून हिसकावून घेतले गेले. अंग मोडून मेहनत करणाऱ्या मूक श्रमिकांच्या परिस्थितीचा ज्याने आमच्याप्रमाणे विचार केला आहे असा कुणीही माणूस शांत चित्ताने हे सर्व पाहू शकेल असे वाटत नाही. शोषकांच्या बलिवेदीवर आणि सरकार स्वत:च सर्वात मोठा शोषक आहे-मजुरांचे दररोज होणारे ते बकऱ्यांसारखे मूक बलिदान पाहून ज्याच्या ज्याच्या आतड्याला पीळ पडतो तो माणूस स्वत:च्या आत्म्याच्या चित्काराची सेक्षा करू शकत नाही.

    गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणी समितीचे माजी सदस्य स्वर्गीय एस.आर. दास यांनी आपल्या मुलाला लिहिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले होते की इंग्लंडची सुखनिद्रा भंग करण्यास बॉम्बचा योग आवश्यक आहे. श्री. दास यांचे हेच शब्द प्रमाण मानून आम्ही संसद भवनात बॉम्ब फेकले. कामगारांच्या वतीने बिलाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही ते कृत्य केले. आपल्या जीवघेण्या यातना व्यक्त करण्यासाठी त्या निराधार मजुरांकडे दुसरे कोणतेही साधनच नव्हते. आमचा एकमेव उद्देश होता: "बहिऱ्यांना ऐकवणे आणि संधी मिळालीच तर या पीडित जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला वेळ आहे तोवर इशारा देणे. हे आमचे एकमेव उद्दिष्ट होते. 

    अथांग प्रशांत सागररूपी भारतीय मानवतेची ही वरवर दिसणारी शांतता म्हणजे कोणत्याही क्षणी उद्भवणाऱ्या एका भीषण तुफानाचे चिन्ह आहे. आम्ही तर फक्त येणाऱ्या भीषण संकटाची पर्वा न करता बेफाम वेगाने पुढे धावणाऱ्या लोकांसाठी (जांसाठी) धोक्याची घंटा वाजवली आहे. 'आदर्श अहिंसे चे युग आता संपले आहे आणि आज उदयाला येणाऱ्या नव्या पिढीला त्या 'आदर्श अहिंसेच्या व्यर्थतेबद्दल कोणत्याही प्रकारचा संदेह उरलेला नाही. एवढेच फक्त आम्ही जनतेला सांगू इच्छितो.

    मानवतेबद्दल आम्हाला हार्दिक सद्भावना आणि निस्सीम प्रेम वाटत असल्यामुळे निरर्थक रक्तपातापासून तिला वाचवण्यासाठीच. केवळ इशारा देण्याकरता आम्ही हा पाय वापरला आणि नजिकच्या भविष्यातला तो रक्तपात आम्हालाच नव्हे तर लाखो लोकांना आधीपासूनच दिसतो आहे. 

आदर्श अहिंसा

    वर आम्ही 'आदर्श अहिंसा हा शब्दप्रयोग वापरला आहे. येथे त्याची व्याख्या करणेही आवश्यक आहे. आक्रमण करण्याच्या हेतूने जेव्हा बळाचा वापर केला जातो  त्याला हिंसा म्हणतात आणि नैतिक दृष्टिकोनातून त्याचे समर्थन करता येत नाही. परंतु जेव्हा एखाद्या उचित आदर्शासाठी त्याचा वापर केला जातो तेव्हा नैतिकदृष्ट्याही ते कृत्य उचित असते. कोणत्याही परिस्थितीत बलप्रयोग केला जाऊ नये हा विचार आदर्शवादी आणि अव्यवहारी आहे. गुरू गोविंद सिंग, शिवाजी, केमाल पाशा, रिजाखान, वॉशिंग्टन, गॅरीबाल्डी, लाफायेत आणि लेनिन यांच्या आदर्शापासून स्फूर्ती घेऊन आणि त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवूनच भारतात उसळणारे हे नवे आंदोलन निर्माण होत आहे की ज्याची पूर्वसूचना आम्ही देत आहोत. भारतातील परकीय सरकार आणि आमचे राष्ट्रीय पुढारी दोघेही या आंदोलनाबाबत उदासीन आहेत आणि जाणूनबुजून त्याच्या हाकांना प्रतिसाद न देता आपले कान बंद ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही असा एक इशारा त्यांना देणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानले. 

आमचे म्हणणे 

     आतापर्यंत आम्ही या घटनेमागील मूळ उद्देशावरच प्रकाश टाकला. आता आम्ही आमचे म्हणणे काय आहे हे स्पष्ट करू इच्छितो.

    या घटनेमध्ये मामुली जखमा झालेल्या व्यक्तींबद्दल किंवा असेंब्लीमधील कुणाही दुसऱ्या व्यक्तीबद्दल आमच्या मनात थोडीही वैयक्तिक द्वेषभावना नव्हती हे सांगण्याची जरूर नाही. पण तरीही आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मानवजीवनाला आम्ही अत्यंत पवित्र मानतो आणि आम्ही दुसऱ्या कुणा व्यक्तीला इजा करण्याऐवजी मानवजातीची सेवा करता करता हसत हसत स्वतः प्राणार्पण करू, मनुष्यहत्या हेच ज्यांचे काम असते त्या साम्राज्यशाहीच्या भाडोत्री सैनिकांसारखे आम्ही नव्हेत. आम्ही मानवजीवनाची कदर करतो आणि त्याचे रक्षण करण्याचा सतत आटोकाट प्रयत्न करतो. असे असूनही आम्ही हे मान्य करतो की आम्ही जाणूनबजून असेंब्लीत बॉम्ब फेकले.

    आमच्या या म्हणण्यावर घटनाच प्रकाश टाकत आहे आणि आमच्या कृत्याच्या परिणामांवरूनच आमचा इरादा काय होता हे ठरवले पाहिजे. केवळ तर्काने किंवा काल्पनिक गोष्टींवरून ते ठरवले जाऊ नये सरकारी तज्ज्ञांच्या साक्षीविरुद्ध आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही असेंब्लीत फेकलेल्या बॉम्बमुळे फक्त एका रिकाम्या बाकड्याची मोडतोड झाली आणि सुमारे पाचसहा माणसांना थोडेसे खरचटले. सरकारी शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे बॉम्ब शक्तिमान होते आणि तरीही त्यांच्यामुळे अधिक नुकसान झाले नाही हा चमत्कारच म्हणावा लागेल. पण आमच्या मते शास्त्रशुद्ध पद्धतीने ते बॉम्ब तसेच बनवले गेलेले होते. पहिली गोष्ट म्हणजे बाके आणि डेस्क्स यांच्यामधील रिकाम्या जागेत दोन्ही बॉम्ब पडले. दुसरी गोष्ट म्हणजे त्या जागेपासून दोन फुटांच्या अंतरावर बसलेल्या लोकांना-ज्यांच्यात श्री. पी. आर. राव, श्री. शंकर राव आणि सर जॉर्ज शूस्टर यांची नावे उल्लेखनीय आहेत-कोणतीही इजा झाली नाही किंवा अगदीच नाममात्र इजा झाली. सरकारी तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अधिक शक्तिमान असे पोटॅशियम क्लोरेट आणि पिक्रिक अॅसिड त्या बॉम्ब मध्ये असते तर त्याने लाकडी कठडा तोडून काही फागांवर उभ्या असणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांना उडवले असते आणि जर त्याहूनही शक्तिशाली स्फोटक पदार्थ त्या बॉम्बमध्ये भरला असता तर असेंब्लीतील बहुतेक सभासदांना त्या बॉम्बने निश्चितच उडवले असते. एवढेच नाही, आमची इच्छा असती तर आम्ही ते बॉम्ब सरकारी कक्षात फेकू शकलो असतो कारण ती गॅलरी खास व्यक्तींनी अगदी खच्चून भरलेली असते. किंवा आम्ही सर जॉन सायमनलाच आमचे लक्ष्य बनवले असते. कारण त्याच्या दुर्दैवी कमिशनमुळे विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याच्याविषयी तीव्र तिरस्कार निर्माण झालेला होता आणि त्यावेळी तो असेंब्लीच्या अध्यक्षीय कक्षामध्ये बसलेलाही होता. परंतु आमचा असला कोणताही हेतू नव्हता आणि ज्या कामासाठी ते बॉम्ब तयार केले गेले होते नेमके तेवढेच काम त्या बॉम्ब ने केले. तो नेमक्या ठरवलेल्या ठिकाणी म्हणजेच रिकाम्या असलेल्या जागीच पडला, या पलीकडे त्याने दुसरे काही वाईट केले नाही! 

एक ऐतिहासिक धडा

    यानंतर आमच्या कृत्याबद्दल शिक्षा भोगण्यासाठी आम्ही जाणूनबुजून स्वत:ला पोलीसांच्या स्वाधीन केले. साम्राज्यवादी शोषकांना आम्ही हे सांगू इच्छितो की मूठभर लोकांना मारून कोणतेही उदात्त ध्येय गाडून टाकता येत नाही किंवा दोन य कश्चित व्यक्तींना तुडवून टाकून राष्ट्र दमून ठेवता येत नाही. फ्रम्समधील क्रांतिकारक चळवळ दडपण्यासाठी परिचयपत्र वा परिचयचिन्ह (आयडेंटिटी कार्ड) पद्धत अथवा बॅसिलचा भयानक दगडी तुरुंग असमर्थ ठरले. रशियन क्रांतीची आग फाशीचे तख्त आणि सैबेरियातील हद्दपारी यामुळे विझली नाही. या इतिहासाच्या अनुभवावर लक्ष वेधण्याची आमची इच्छा होती. मग वटहुकूम आणि सुरक्षा कायदे भारतीय स्वातंत्र्याची ज्योत विझवू शकतील काय? गुप्त कटांचा तपास लावून किंवा कपोलकल्पित कट-कारस्थानांचा आधार घेऊन नौजवानांना शिक्षा ठोठावून, किंवा एका महान ध्येयाच्या स्वप्नाने प्रेरित झालेल्या नवयुवकांना तुरूंगात डांबून क्रांतीचे अभियान थोपवता येईल काय? होय, जर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नसेल तर वेळेवर दिलेल्या सार्वत्रिक इशाऱ्याने लोकांचे प्राण वाचवणे शक्य आहे आणि निरर्थक हालअपेष्टांपासून त्याचे रक्षण करणे शक्य आहे. अशी पूर्वसूचना देण्याच्या कामाचा हा भार उचलून आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण केले आहे. 

क्रांती म्हणजे काय ?

    'तुमच्या मते क्रांतीचा अर्थ काय? असा प्रश्न भगतसिंगाला खालच्या कोर्टात विचारला गेला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने सांगितले होते की क्रांतीसाठी रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही. तसेच यामध्ये व्यक्तिगत प्रतिहिंसेला कसलेही स्थान नसते. क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब व पिस्तुले यांचा पंथ नव्हे. आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूल परिवर्तन. 

    समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते आणि शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हअन टाकतात. दसऱ्यांचे अन्नदाते असणारे शेतकरी आज सहकुटुंब एकेका दाण्यासाठी गरजवंत बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी काडे अलब्ध करून विणकरांना आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतके देखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या झोपड्यात राहून आपली जीवनलीला समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार छोट्यामोठ्या कारणांसाठी लाखो लोकांचे नशीब उलटेपालटे करू शकतात

    ही भयानक विषमता आणि जबरदस्तीने लादला गेलेला भेदभाव जगाला एका महाभयंकर प्रलयाकडे खेचून नेत आहे. ही स्थिती अधिक काळ टिकून रहाणे शक्य नाही. हे स्पष्ट आहे की धनिक समाज एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून रंगेल चैनबाजी करत आहे आणि या शोषकांची निष्पाप मुले आणि कोट्यवधी शोषित जनता एका भयानक दरीच्या काठावरून चालत आहे. 

आमूलाग्र परिवर्तनाची आवश्यकता

    संस्कृतीचा हा प्रासाद वेळीच सावरला गेला नाही तर लवकरच चक्काचूर होऊन तो जमीनदोस्त होईल. एका आमूलाग्र परिवर्तनाची गरज आहे आणि ज्यांना ही गोष्ट उमजली आहे त्यांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी साम्यवादी सिध्दांतावर आधारित समाजाची पुननिर्मिती केली पाहिजे. जोपर्यंत हे केले जात नाही आणि माणसाचे माणसांकडून होणारे शोषण किंवा ज्याला आपण साम्राज्यशाही म्हणतो ते एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्राकडून होणारे शोषण नष्ट केले जात नाही तोपर्यंत मानवतेची यात नातून सुटका होणार नाही; आणि तोपर्यंत युद्ध थांबवून विश्वशांतीचे युग निर्माण करण्याच्या सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ ढोंग असण्याखेरीज दुसरे काही नाही. क्रांतीचा आम्हाला अभिप्रेत असणारा अंतिम अर्थ असा आहे की जी वरील प्रकारच्या सर्व संकटापासून मुक्त असलेली आणि जिच्यात सर्वहारा वर्गाची अधिसत्ता सर्वमान्य असेल अशी एक समाजव्यवस्था स्थापन करणे. याच्या परिणामी निर्माण होणारा विश्वसंघच पीडित मानवतेला भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यास आणि साम्राज्यवादी युद्धाच्या विनाशातून सोडवण्यास समर्थ होऊ शकेल. 

समयोचित इशारा

    हे आमचे ध्येय आहे. आदर्श आहे आणि या ध्येयापासून प्रेरणा घेऊन आम्ही कळकळीचा आणि जोरदार इशारा दिला आहे. पण जर आमच्या या इशाऱ्याकडे लक्ष दिले गेले नाही आणि सध्याच्या शासनसंस्थेने उठणाऱ्या जनशक्तीच्या वाटेत अडथळे आणण्याचे काम बंद केले नाही. तर मात्र क्रांतीच्या ह्या ध्येयाच्या पूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्या युद्धाच्या शेवटी, सर्वहारा वर्गाच्या सर्वाधिकारशाहीची स्थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्या ध्येयाची पूर्ती करण्याचा मार्ग प्रशस्त बनवेल. क्रांती हा मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे की जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. खरे पाहता श्रमिकवर्गच समाजाचे पोषण करतो. जनतेच्या सर्वकष सत्तेची स्थापना हे श्रमिकवर्गाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या ध्येयासाठी आणि या विश्वासासाठी आम्हाला जी काही शिक्षा होईल तिचे आम्ही सहर्ष स्वागत करू. क्रांतीच्या या पूजावेदीवर आम्ही आमचे यौवन नैवेद्य म्हणून आणले आहे. कारण या महान ध्येयांसाठी मोठ्यात मोठा त्यागसद्धा कमीच आहे. आम्ही संतुष्ट आहोत आणि क्रांतीच्या आगमनाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत. 

इन्किलाब झिंदाबाद ! 


1

Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209