देशाचे दुश्मन, ( भाग 13) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
पुराणांच्या राखेने बुजवून टाकावा. धर्मग्रंथांच्या या जुलमी अरेरावींने महात्मा जोतिरावांचे चित्त खवळून जाणे अगदी सहज होते. जोतिरावांनी व्याख्याने, पुस्तके, पत्रे वगैरे अनेक साधनांच्याद्वारे चळवळ उडवून दिली; त्यामुळे भिक्षुकशाहीचा पोटशूळ मुसळासारखा उठला. जोतिरावांच्या हाडीमासीही दृष्ट ब्राह्मण्यांची जाणीव बाळकडू म्हणूनच आली होती. सातारा जिल्ह्यात कटगुण गावी जोतिरावांच्या पणजाला तिथल्या ब्राह्मण कुलकण्याने सळो की पळो होईपर्यंत त्रास दिला. ज्या वंशात जोतिरावांसारखा कुलदिपक जन्मणार ते घराणेही असले बहाद्दर असणारच. भर पेशवाईच्या मगरमस्तीत जोतिरावांच्या पणजाने
आणि कटगुण हे गाव सोडून पुणे जिल्ह्यात खानवडी मुक्कामी ठायी दिला. पणतूचे गुलामगिरीला तोंड देण्याचे धैर्य जोतिबांच्या पणजातही स्पष्ट दिसत होते. जोतिरावांची कार्यभूमी पुणे शहर व्हावी व त्यांच्या हातून यावच्चंद्रदिवाकरौ खळबळ उडवून सोडणारा मानवी अपक्रांतीला धक्का बसावा, ज्या आखाड्यात एक-एक माजुरी पेशवा उत्मात करून गेला. त्याच आखाड्यात जोतिरावांनी मैदान मारावे, अशी परमेश्वरी योजना होती; म्हणून जोतिरावांचा आजा शेटीबा पुण्यास रहावयास आला. पेशवाईच्या राज्यातला अंदाधुंदीचा जुलूम पाहून या गोऱ्हे उपनावाच्या शेटीबांना आपल्या वंशात रंजल्या-गांजल्यांना जुलमातून मुक्त करणारा महात्मा निघणार आहे, अशी कल्पना सुद्धा नसेल. शेटीबांच्या कृष्णाजी, राणोजी व गोविंदराव या तीन पुत्रांपैकी गोविंदराव यांच्यापोटी शिवाजी महाराजानंतर बरोबर दोनशे वर्षांनी १८२७ साली जोतिराव जन्मले. पुण्यात आल्यावर यांचे गोऱ्हे हे उपनाव जाऊन पेशवे दरबारात फुलांचे काम पुरवीत असल्यामुळे फुले हे उपनाव पडले आणि आज ते कोणत्याही तेजस्वी ज्योतीपेक्षा जास्त फुलत आहेत. देशाच्या उद्धाराकरिता टिळकटलेले व कळकटलेले वांत्युद्भव विप्रजोराने त्वंपुरा करीत असतात; त्याच विप्रांनी आमचा काय म्हणून छळ केला नाही? गोविंदरावांनी जोतिरावांना शाळेत घातले तेव्हा, हा तैलबुद्धिचा विलक्षण पराक्रमी मुलगा 'शूद्र' आहे, म्हणून गोविंदरावांच्या पाठी लागून जोतिरावांना शाळेतून काढावयास लावले, पण यावेळी परमेश्वर निजला नव्हता आणि परशुरामही सद्दीत नव्हता. टिळक-चिपळूणकरांच्या ब्राह्मण्य प्रेमावर निखारे पसरणारा महात्मा उत्पन्न ही महाकालाची मनिषाच ठरलेली दिसत होती. पाचकळ पुराणांच्या काळजाला हात घालून टिळकटलेल्या चिपळूणकरांचे दात पाडणारा म्होरक्या, धैर्याचा गगनस्पर्शी मेरू ब्राह्मणेतरांना लाभावयाचा होता म्हणूनच गफवार बेगमुनशी या सज्जन गृहस्थाने गोविंदरावांचे मन वळविले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी जोतिरावांस पुन्हा शाळेत घातले. १८४२ साली जोतिराव इंग्रजी शिकू लागले. शिक्षणाने प्रगल्भ झालेल्या जोतिरावांच्या अस्सल तेजाने उसळी मारली. देशोद्धार कसा करावा याचा ते विचार करू लागले. मातंग समाजातील प्रसिद्ध लहुजी बुवाजवळ दांडपट्टा शिकून तरबेज झाल्यावर बंडखोरी करावी असा त्यांच्या मनात विचार घोळत होता. जबरदस्त कर्तबगार माणसे जरा वाट चुकली की भलतीकडे भटकतात, पण मेंग्यामारूतीप्रमाणे स्वस्थ बसत नाहीत. जोतिराव म्हणजे उत्साहाचा, कर्तबगारीचा, पहाडी पुरूष. जन्मत:च पोलादी काळीज घेऊन आलेले महात्मे संकटांना थोडेच कचरणार ! बंड उभारू की राज्य उलथू, काय करू ? याविषयी तरूण जोतिच्या मनात काहूर माजले. माझी हिंदू भूमी,