( भगतसिंगचा हा लेख 'साप्ताहिक मतवाला-वर्ष २, अंक ३८, १६ मे १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला होता. )
यौवनकाल हा मानवी आयुष्यातील वसंत ऋतू आहे. तारुण्याच्या प्राप्तीने माणूस बेभान होतो. हजारो प्याले झोकल्यासारखी नशा चढते त्याला. विधात्याने दिलेल्या सगळ्या शक्ती कंध फुटावा तशा सहस्त्रधारांनी कोसळू लागतात. मदांध मातंगाप्रमाणे निरंकुश, आषाढ-मेघा सारखी उमत्त, प्रलयकालीन प्रभंजनाप्रमाणे प्रचंड, वसंतातील नवजात कलिकेसारखी सुकोमल, ज्वालामुखीसारखी मुक्त आणि भैरवीच्या सुरांसारखी मधुर असते ही युवावस्था! उजळलेल्या पहाटेची शोभा, सायंकालची स्निग्धता, ग्रीष्मातल्या मध्यान्हीची तप्तता आणि भाद्रपदी अमावस्येच्या मध्यरात्रीची भीषणता तिच्यात सामावलेली असते-जसा क्रांतिकारकाच्या खिशामध्ये बॉम्ब आणि वीर योद्ध्याच्या हातामध्ये खड्ग तशीच मानवाच्या शरीरात ही तरुणाई! १६ ते २५ या वर्षांमध्ये हाडा-मांसाच्या या संदुकीत जगातले सारे तेज, सारी भीषणता विधात्याने बंद केलेली असते. १० वर्ष ही धाडसी नौका भयंकर तुफानांना तोंड देत, डगमगत मार्गक्रमण करत असते. ही तरुणाई दिसायला सस्यशामल वसुंधरेपेक्षाही सुंदर आहे खरी, मात्र तिच्यात खोलवर भूकंपाची भीषणता दडलेली असते. त्यामुळेच तारुण्यावस्थेत माणसापुढे दोनच मार्ग असतात. तो उसीच्या सर्वोच्च शिखरावर चढू शकतो किंवा अध:पतनाच्या अंधाऱ्या खाईत कोसळू शकतो. त्याने ठरवले तर तो त्यागी बनू शकतो, हवे तर विलासी! तो जसा देवत्वाला पोहोचू शकतो तसा पिशाच्चही बनू शकतो. साऱ्या जगाला तो सळो की पळो करून सोडू शकतो तसे भयंकर संकटांपासून वाचवूही शकतो. जगात युवकांचेच साम्राज्य आहे. युवकांच्या पराक्रमाच्या कहाण्यांनी जगाचा इतिहास समृद्ध आहे. युवकच रणचंडीच्या ललाटीची रेखा आहे, युवकच मायभूमीच्या यश-दंभीचा उच्चारव आहे. तोच तिच्या विजयरथाच्या अग्रस्थानी आहे.
तो महासागराच्या उत्तुंग लाटांसारखा उमत्त आहे. महाभारतातील भीष्म पर्वाच्या प्रथम ललकारी सारखा भयावह आहे. पहिल्या वहिल्या चुंबना सारखा रसपूर्ण आहे. तो रावणाच्या अहंकारासारखा बेदरकार आहे. प्रल्हादाच्या सत्याग्रहासारखा दृढ आणि अटळ आहे. कुणाला जर विशाल हृदयाची आवश्यकता असेल, युवकांकडे मागा. रसिकताही त्याच्याच पाशी सापडेल तुम्हाला आणि भावुकतेवरही त्याच्याच नावाची नोंद आहे. छंद शास्त्राचा गंध नसूनही तो प्रतिभावान कवी आहे. काव्य त्याच्याच हृदय-कमलातला मधुरस आहे. त्याला रसांची परिभाषा ठाऊक नाही. तरीही तो कवितेचा खरा जाणकार आहे. सृष्टीला पडलेले एक न उलगडलेले कोडे आहे युवका ईश्वराच्या रचनाकौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना! संध्यासमयी तासन्तास तो नदीकाठावर बसून रहातो, क्षितिजापार जाणाऱ्या रक्तवर्णी सूर्याकड़े अनिमिष नेत्रांनी पाहात. पलिकडच्या तीरावरून येणाऱ्या हळुवार संगीत लहरींच्या मंद प्रवाहात तल्लीन होऊन! असे विचित्र त्याचे जीवन! अद्भुत त्याचे साहस! अमोघ त्याचा उत्साह !
तो निश्चिंत आहे. बेदरकार आहे. एखाद्या गोष्टीत मन रमले तर रात्र रात्र जागणे त्याला नवीन नाही. ज्येष्ठातली झार त्याच्यासाठी चांदणी रात्र आहे. पावसाचा वर्षाव म्हणजे पुष्पवृष्टी आणि स्मशानातील नीरवता जणू उद्यानातील पाखरांचा गुंजारव! तो मनात आणेल तर साऱ्या समाजाला हलवून सोडेल, अवघ्या देशाचे भले करेल, साऱ्या राष्ट्राचे वर्तमान उज्वल करेल. मोठमोठी सम्राज्ये उलथून टाकेल. पतितांचे उत्थान करणे, साऱ्या जगाला प्रगतीपथावर नेणे त्याच्याच हातात आहे. या विशाल विश्वाच्या रंगभूमीवरचा तो एक कुशल रंगकर्मी आहे.
रक्ताची भेट हवी असेल तर युवकाशिवाय बाकी कोण देईल? तुम्हाला बलिदान हवे असेल तर युवकांकडेच मागावे लागेल. प्रत्येक समाजाचा भाग्य विधाता युवकच तर असतो. एक पाश्चात्य विचारवंत म्हणतो ते ठीकच आहे. “It is an established truism that young men of today are the countrymen of tommorrow, holding in their hands the high destinies of the Land. They are the seeds that spring & bear fruit" भावार्थ असा की आजचे युवक उद्याच्या देशाचे भाग्य घडवणार आहेत, तेच भविष्यातील सफलतेचे बीज आहेत.
जगाच्या इतिहासाची पाने उघडून पहा, युवकांच्या रक्ताने लिहिलेले अमर संदेश आढळतील ! जगातल्या साऱ्या क्रांत्यांची, स्वातंत्र्य युद्धांची वर्णने पाहा, त्यात केवळ ते युवकच भेटलील, ज्यांना बुद्धिवंतांनी माथेफिरू. वाट चुकलेले म्हणून हिणवले आहे. पण जे सुरक्षित किल्ल्यात बसले आहेत त्यांना काय कळणार किल्ल्याच्या खंदकांवर स्वतच्या शरीराचे पूल तयार करणारे जपानी युवक कोणत्या पोलादापासून बनले होते! खरा युवक जराही न अडखळता हसत हसत मृत्यूला अलिंगन देतो! तीक्ष्ण संगिनींसमोर छाती काढून ठाम उभा रहातो. तोफेच्या तोंडीही हसतमुख रहातो, बेडयांच्या तालात राष्ट्रप्रेमाचे गाणे गातो आणि फाशीच्या तख्तावर हट्टाने आरूढ होतो. फाशीच्या दिवशी त्याच्या शरीरावर मूठभर मांस चढलेले असते. तुरुंगातल्या चक्कीवर युवकच प्रकाशाचे मंत्र म्हणतो, काळकोठडीच्या अंधारात विलीन होऊनच तो मायभूमीला अंधारातून बाहेर काढतो. अमेरिकेतील युवक दलाचा नेता पेट्रिक हेन्री एकदा म्हणाला होता "Life is dear outside the prisonwalls, but it is immeasurably dearer within the prisoncells, where it is the price paid for the freedom's fight" म्हणजे तुरुंगाच्या भिंतीबाहेरचे आयुष्य मोलाचे आहे. पण कोठडी मधले आयुष्य तर फारच मौल्यवान आहे. कारण ती स्वातंत्र्यासाठीच्या लढाईची किंमत आहे.
असा जिवंत नेता आहे म्हणूनच अमेरिकेतील युवकांमध्ये साहस आहे अशी ज्वलंत घोषणा करण्याचे : “We believe that when a Government becomes destructive of the natural right of man, it is man's duty to destroy that Government" म्हणजे आमचा असा क्विास आहे की जेव्हा सत्ताधारी मानवाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे वर्तन करू लागतात तेव्हा त्या सत्तेचा विनाश करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे.
हे भारतीय तरुणा, तू का असा मरगळून, अलिप्तपणे झोपला आहेस! उठ, डोळे उघड, पहा, पूर्व दिशा केव्हाच उजळली आहे. आता आणखी झोपून राहू नको, झोपायचेच असले तर अनंत निद्रेच्या कुशीत जाऊन झोप, असा भ्याडासारखा का झोपतोस? माया, मोह, ममतेचा त्याग कर आणि गर्जून सांग.
Farewell, Farewell, My True Love,
The army is on the move,
And if I stayed with you love,
A coward I shall prove.
तुझी पूजनीय, वंदनीय माता, तुझी मायभूमी, ती जगदंबा, अपूर्णा, त्रिशूलधारिणी, सिंहवाहिनी, सस्यश्यामला आज रडते आहे. तिची असहायता पाहून तुझे मन विदीर्ण होत नाही का ? धिक्कार असो तुझ्या निर्जीवतेचा ! तुझी नपुंसकता पाहून तुझ्या पूर्वजांच्या माना शरमेने झुकल्या आहेत. अजूनही तझ्या अंगी थोडीशी लाज शिल्लक असेल तर, आईच्या दुधाची लाज राख, तिच्या उद्धाराचा विडा उचल, तिच्या अणूंच्या प्रत्येक थेंबाची आण घे, तिला मुक्त कर आणि बोल मुक्तकंठाने, वंदे मातरम् !
***