देशाचे दुश्मन, ( भाग 19) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
बनवून तेवढ्यात देशाचे वाटोळे करायला कचरत नाहीत. महात्मा जोतिरावांनी सर्व हिंदूंकरिता चळवळ केली; पण 'सेक्शनल' (जातिविषयक) अशी त्यांच्या हातून एकच कामगिरी झाली. ती कामगिरी म्हणजे अनाथ बालकागृह उर्फ ऑर्फनेज स्वतःच्या घरात उघडणे. ब्राह्मण जातीची नाक्यानाक्यावरून आठवड्यात आठदा पडणारी अब्रू वाचविणे, हे त्यांना आवश्यक वाटले. विधवांना ब्राह्मण जातीत सक्त संन्यासाची जन्मठेप झालेली असते. भटजी मेला की बिचारी भटीण जिवंत असून मेलेली समजावी, असा मेलेल्या ब्राह्मण्यांचा वटहुकूम आहे. पाऊणशे वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आजच्यासारखा ब्राह्मणांच्या सुधारणेचा काळ नव्हता. आज ब्राह्मणींनी नर्सेस, डॉक्टर तर आहेतच; सर्वसाधारण बहुतेक ब्राह्मण विधवासुद्धा शिक्षणाच्या मानाने ब्राह्मणेतर पुरुषांच्याही पुढे आहेत. वैद्यकीचे सर्वसाधारण ज्ञान वैषयिक पापाला चव्हाट्यावर येऊ न देता आतल्या आत नामशेष करू शकते; परंतु आजही ऑर्फनेजिस भरून शिवाय ब्राह्मण वस्तीत हौदांतून, गटारातून मुले पडलेली सापडतात इतकेच. इतकेच नव्हे तर थेट कोर्टातून जन्मठेपीपर्यंत शिक्षा झालेली भटीण सापडते. हे ताजे उदाहरण तर याच वर्षातले आहे. पाऊणशे वर्षांपूर्वी परशुरामाचा कडक बंदोबस्त होता. आठ वर्षाच्या पोरीला जरी वैधव्य आले तरी हे सनातन कसाई तिच्या डोक्यावर न्हावी फिरवून जीवितावर निर्दय संस्कृतीचा वरवंटा फिरवीत. ब्राह्मण स्त्रिया त्यावेळी पुरुषांपेक्षा अज्ञानच असणार ! ब्राह्मणेतरात पुनर्विवाहाचा दणका असल्यामुळे आणि कष्टाचाही कणका असल्यामुळे ब्राह्मणेतर विधवांना असले रंगढंग सुचणे शक्य नव्हते. एखादी अपवादादाखल निघते. पण ब्राह्मण विधवांच्या हातात कापसाच्या वातीबरोबर अर्भकांची बाळोती द्यायलाही हरिदास पुराणिक टपलेले असतातच. ब्राह्मण विधवांचे वातावरण अशा नरपशूंनी बुचबुचलेले असल्यामुळे, भोळी बिचारी अभागी विधवा फसते आणि बालहत्येस प्रवृत्त होते. जोतिरावांनी हरदास पुराणिकांचा उठाव करण्याचा जसा प्रयत्न केला, तसाच ब्राह्मण स्त्रियांची अब्रू वाचविण्याचाही प्रयत्न चालविला. जोतिरावांनी आपल्या घरी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' उघडले. जगन्माता सावित्रीबाईने कोवळ्या ब्राह्मण मुलीचे बाळंतपण करावे, अशा तऱ्हेने शेकडो ब्राह्मण विधवा बालहत्येच्या पातकापासून वाचविल्या. जोतिरावांच्या घरात चुकूनसुद्धा ब्राह्मणेतर विधवा आली नव्हती, सर्व भटणी होत्या हे त्यावेळच्या माहितीवरून सिद्ध होत आहे. सत्यशोधकांनी जोतिरावांची ही क्षमाशीलता आचरणात आणावी. आपल्या बायकोवर भटांनी खडे फेकले म्हणून जोतिराव त्यांच्या बायकांवर जोडे घेऊन धावले नाहीत, तर उलट बदकर्माने घायाळ झालेल्या भटणी विधवांना त्यांनी सहाय्य करून 'पापकर्म करणार नाही' अशा शपथा वाहून घेतल्या आणि जगाच्या उद्धाराचा आपला उत्साह ब्राह्मण जातीकरिता काही वेळ खर्चला. हे जोतिरावांचे महदुपकार ब्राह्मण विसरतील, पण ज्या ब्राह्मण विधवांवर असे प्रसंग येतात त्यांना महात्मा जोतिरावांची आठवण होऊन त्या अजूनही मुळूमुळू रडत मनात जोतिरावांचा धावा करीत असतील, पण त्याची भट मुर्दाडांना खबरही नसणार ! पुढे न्या. रानडे आणि लालशंकर उमियाशंकर यांनी याच धर्तीचे पण सर्वांकरता पंढरपूरला ऑर्फनेज उघडले. जोतिरावांचे ऑर्फनेज सर्वांकरिताच होते, पण त्याचा उपयोग फक्त ब्राह्मण विधवांनाच झाला. चिपळूणकरादी भटांना हे जोतिरावांचे सत्कृत्य खपले नाही. ब्राह्मण्याला गारद केल्याशिवाय पारतंत्र्याची पक्की नरद मारली जात नाही हे जोतिरावांना कळून चुकले. त्यांनी पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली आणि