देशाचे दुश्मन, ( भाग 22) लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
भटजींचा भरणा सापडेल! कुळकर्ण्याने शेतकऱ्याला फसवून जमीन उपटली नाही, अशी दहा गावे तरी महाराष्ट्रात सापडतील की नाही, परशुराम जाणे ! भटांच्या मुखाच्या बरणीत वेदांचे लोणचे ठेवले तर ते नासत नाही, त्याला सुते पडत नाही, असा दुराग्रह धरणारे मुखमर्द भटजी, खून करविणे, विषप्रयोग करविणे यांत अतिप्रविण असतात. जोतिराव आपल्या वीरवृत्तीने जेव्हा भटांच्या छाताडावर हिंदू धर्मांचे निशाण लावू लागले, तेव्हा त्यांनी जोतिरावांना छळण्याची कसून तयारी केली. जोतिराव रस्त्याने चालले की, त्यांच्यावर माधुकन्या पोऱ्याकडून खडे मारवावेत, तुळशीबागेसमोर जोतिराव व्याख्याने देत असत. एके दिवशी एका मनुष्याच्या पोटी (?) आलेल्या भटाने मैल्याची पाटी जोतिरावावर ओतली आणि बजावून सांगितले, 'जर पुन्हा असे ब्राह्मणांना दोष देशील तर नाक कापून गाढवावर धिंड काढू.' जोतिरावांनी या चिलटाच्या फडफडीकडे लक्ष न देता आपले कार्य अव्याहत सुरू ठेवले. जोतिराव कोणत्याच उपायाने हटेनात, तेव्हा ब्राह्मणांनी शेवटचा उपाय म्हणून 'जय ओंकारेश्वर' म्हणत जोतिरावावर मारेकरी पाठविले. 'जोति हिंदू धर्म बुडवितो ! तुमचे वाडवडिल काय मूर्ख होते? त्यांनी पायांचे तीर्थ घेतले हा काय त्यांचा वेडेपणा ? तुम्ही गोब्राह्मण प्रतिपालक मराठे, आम्ही हात पसरावा, तुम्ही आम्हाला द्रव्य द्यावे असले तुम्ही बळीराज ! या जोतिला जगात राहू देऊ नये' असे मारेकऱ्यांना चिथावून जोतिरावांच्या खूनाची जय्यत तयारी केली गेली. मारेकरी जोतिरावांवर पाळत ठेवण्याकरिता त्यांच्या व्याख्यानांच्या वेळी आसपास उभे राहू लागले. जोतिरावांच्या व्याखानात मारेकरी म्हणून राहू आलेले मराठे तद्रूप होऊन त्यांनी जोतिरावांच्या चरणांवर साष्टांग दंडवत घातले. आपण कोणाच्या चिथावणीने आलो, हे त्यांनी कबूल केले. या मारेकरी पाठविणाऱ्यांच्या मुळाशी कोणते धेंड होते, याचा नामनिर्देश करण्याची जरुरी नाही. पुढे हेच मारेकरी जोतिरावांचे शिष्य बनून जन्मभर सत्यशोधक मताचा प्रचार करीत होते. ज्यांनी आपल्याला पाठविले, त्यांना खून करण्याची मारेकऱ्यांनी इच्छा दर्शविली; पण जोतिरावांना ते पटले नाही. त्यांनी सांगितले ब्राह्मणांनी खून करविण्याचा प्रयत्न केला, हे त्यांच्या जातीला शोभले, आपणही तसेच उलट वागण्याचे कारण नाही. कै. राजर्षी शाहू छत्रपती यांच्यावरही आपल्याच लोकांकडून टिळकांच्या चेल्यांनी धोंडे फेकवले होते. त्याचवेळी
काठ्यांचा वर्षाव होऊन खून पाडण्याचा प्रसंग आला होता, पण आज ब्राह्मणांचे कपटी कावे सर्व जनतेने वळखल्यामुळे या जेध्यांच्या पुढारपणाखाली तेच आपले धोंडे मारणारे बंधु 'शाहू महाराज की जय' म्हणत ब्राह्मण्यांचा धुव्वा उडवीत आहेत. ब्राह्मण लोक आपल्याच लोकांना आपल्याविरुद्ध चिथवून मारामाऱ्या करावयास लावतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. जनता भोळी होती, तोपर्यंत ही ब्राह्मण कारस्थाने ठणठणली. दिवसेंदिवस ब्राह्मणांच्या अंगावरच त्यांचे डाव आलेले पाहण्याचे सुप्रसंग येणार आहेत.