देशमुख : पण साहेब, शुद्र वर्णात तर महार, मांग चांभार ह्या जाती मोडतात ना?
मी : नाही. महार, मांग, चांभार ह्या अस्पृश्य जाती वर्णव्यवस्थेच्या बाहेरील जाती आहेत. महात्मा गांधीजींनीही ह्यांना पंचम वर्ण म्हटले आहे.
तलमले : वर्णव्यवस्था म्हणजे काय? आणि ओबीसी हे शुद्र वर्णीय होत हे तुम्ही दाव्याने कसे म्हणू शकता? मी तेली आहे. आम्ही वर्षानुवर्षे तेलाचा व्यवसाय करतोय. म्हणजेच आम्ही व्यापारी आहो. त्यानुसार तर आमचा वर्ण वैश्य ठरतो.
देशमुख : आम्ही कुणबी. म्हणजेच शेतकरी. पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जेव्हा आम्ही हातात तलवार घेऊन लढलो तेव्हा आमच्यातीलच काही मंडळी मराठे झालेत. मराठे म्हणजेच क्षत्रिय. त्या अनषंगाने तर आम्ही क्षत्रिय वर्णीय ठरतो. माझे एक मित्र आहेत धोत्रे. ते सोनार आहेत, म्हणजेच ओबीसी. पण ते देवज्ञ ब्राम्हण आहेत. त्यानुसार पाहिले गेल्यास ओबीसीत तर ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य हे तीन ही उच्च वर्णाचे लोक येतात. तरी तुम्ही म्हणता की आम्ही शुद्रवर्णीय आहोत. हा आमचा दर्जा खाली नेण्याचा भाग आहे. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न आहे. ह्याबाबत आपले मत स्पष्टपणे मांडा.
मी : अरेरे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मंडल आयोगाने शास्त्रशुद्ध पद्धतीने शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करून आमच्या जातींना इतर मागासवर्गीयात टाकले हे तरी तुम्ही मानता का ?
देशमुख : हो आम्ही मागासवर्गीयात येतो हे आम्ही निश्चित मानतो.
मी : महार, मांग, भंगी हे अतिशय मागासलेले राहिले ह्यामागे सामाजिक व्यवस्थेशी संबंधीत काही कारणे आहेत का ?
देशमुख : होय. कारण की ते अस्पृश्य होते.
मी : जर ही मंडळी अती मागासवर्गीय राहिली तर त्यामागे त्यांची अस्पृश्यता हे जसे कारण आहे, त्याप्रमाणेच आम्ही मागासवर्गीय राहिलो ह्यामागे सुद्धा काही समाज व्यवस्थेशी निगडीत कारण असतील का ?
देशमुख : हो निश्चित असायला पाहीजे.
मी : ब्राम्हण, रजपूत, ठाकुर ह्यासारखी उच्चजातीय वा उच्चवर्णीय मंडळी ओबीसीच्या यादीत आहेत का ? .
देशमुख : नाही. कारण ही मंडळी सामाजिकदृष्ट्या मागासलेली नाही.
मी : हुशार व्यक्ती ह्या ब्राम्हणात जन्म घेतात आणि बुद्धू लोक महार मांगात जन्म घेतात असे आहे का ?
देशमुख : निश्चितच नाही. नाहीतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान महापुरुष महार जातीत जन्मालाच आला नसता.
मी : तरीही आज अमेरिकेत कॉम्पूटर इंजिनीयर म्हणून काम करणाऱ्या भारतीय युवकात ८०-९० टक्के ब्राम्हणच आहेत हे तुम्ही मानता का ?
देशमुख : निश्चितच असले पाहिजे.
मी : भारतीय प्रशासन सेवेत प्रथम श्रेणीच्या ७० टक्के जागांवर फक्त लोकसंख्येच्या दृष्टीने ५ टक्के असलेल्या ब्राम्हणांचे प्राबल्य आहे. हे तुम्ही जाणता का ?
देशमुख : होय, वरच्या पदावर हीच मंडळी आरुढ आहे.
मी : क्रिकेटच्या टिममध्ये तलमले, देवरे, पाचपुते, देशमुख, ढोबळे ह्यासारखी आडनाव असणारी ८५ टक्के लोकसंख्या असलेल्या बहुजन समाजातील कमीतकमी ८-९ खेळाडू असले पाहिजेत पण एवढे खेळाडू दिसतात का ?
देशमुख : निश्चितच नाही. कधी कधी विनोद कांबळी मात्र दिसतो.
मी : सिनेसृष्टीत एवढ्या नटया आहेत. त्यात आपल्या बहुजन समाजातील किती पोरी काम करताय ?
देशमुख : स्मिता पाटील सारखी एखादी नटी होऊन जाते.
मी : आता तुम्हीच म्हटल्याप्रमाणे कला, गुण, बुद्धी हे जात पाहून जन्म घेत नाही तरी ५ टक्के ब्राम्हण सर्वच क्षेत्रात अग्रणी आहेत ह्या मागे काही व्यवस्था कारण असेल का ?
देशमुख : हो निश्चित असायला पाहिजे.
मी : मी तुम्हाला हेच समजवतोय. ह्यास कारण आहे स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतरही ह्या देशात कार्यरत ब्राम्हणी मानसिकता. एकदा एका टी. व्ही. चॅनेलवर आशुतोष राणा ह्या बहुजन समाजाच्या नटाची मुलाखत सुरू होती. त्याला प्रश्नकर्त्याने विचारले, 'आपण खलनायकाचीच भूमिका का करता?' त्याचे उत्तर मोठे मार्मिक होते. तो म्हणाला, 'नट हा फक्त नटच असतो तो कधीच नायक किंवा खलनायक नसतो. पण वाट्याला ज्या भूमिका आल्या त्याच त्याला कराव्या लागतात.' पुढे तो म्हणाला, 'माझा जन्म उच्च जातीत झालेला नाही. त्यामुळे शाळेच्या दिवसांपासून जेव्हा रामायणाचे नाटक खेळले जायचे तेव्हा मला रावणाचा रोल मिळायचा. महाभारतात दर्योधनाचा रोल मिळायचा. मी माझे रोल प्रामाणिकपणे करायचो. पुढे असा समज झाला की खलनायकाचेच रोल मी चांगले करू शकतो आणि म्हणूनच आज माझ्या वाटयाला खलनायकाचेच रोल येतात. पण मी नायकाचाही रोल चांगला करू शकेल.' ही त्याची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे आणि त्याच्या शाळेतील शिक्षकांच्या मनातील ब्राम्हणी मानसिकता दर्शविणारी आहे. टी.व्ही.च्या वेगवेगळ्या चॅनेलवर होणाऱ्या एवढ्या सिरीयलमध्ये दिसणाऱ्या गोऱ्या चिट्या चेहऱ्यात आपल्या ८५ टक्के बहुजनसमाजाचे किती चेहरे असतात. हे सर्वकाही मी तुम्ही कुणाबद्दल आकस वा द्वेष धरावा ह्यासाठी सांगत नाही तर तुम्हाला समाजव्यवस्था नीटशी समजावी ह्याकरिता सहजसोपी उदाहरणे देत आहेत. ह्याचा अधिक खोलात जाऊन विचार केलात तर अशीच बरीच उद्बोधक माहिती तुम्हाला मिळेल. उदा. १९ व्या शतकात एकुण १२८ मराठी साहित्यिक होते. त्यापैकी ११४ ब्राम्हण होते तर फक्त १४ अब्राम्हण होते. ह्या १४ मध्ये महात्मा फुले एक होत.
तलमले : आता आमच्या डोक्यात बराच प्रकाश पडलाय ढोबळेसाहेब. आमच्या देशातील बहुसंख्य लोक हे गव्हाळ वा कृष्ण रंगाचे आहेत. टी. व्ही वर बातम्या देणाऱ्यामध्ये वा सिरियलमध्ये काम करणाऱ्या मध्ये सुद्धा गव्हाळ व काळया रंगाच्या मुलींसाठी खास आरक्षण असले पाहिजे, मग त्या कोण्याका जातीच्या असेनात. त्यामुळे ह्या मुलींमध्ये सुद्धा आत्मविश्वास वाढेल व त्यांच्यात स्पर्धा सुरू होईल व त्यांचा विकास होईल. माझी मुलगी जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हा ती टीव्ही, सिनेमा पाहुन म्हणायची, ' मी मोठी होऊन हिरोइन बनेल.' पण आज जेव्हा ती १५ वर्षाची आहे, तर म्हणते, “मला कोण घेणार सिनेमामध्ये हिरोइन म्हणून. माझा रंग काळानां. कोणी घेतलं तरी घेतील एखाद्या भांडेवालीच्या रोलसाठी किंवा नायकासोबत एक्सट्रा म्हणून नाचायला'