Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

आरक्षणाची पोटदुखी

मी : पेशव्यांचे राज्य हे ब्राम्हणी राज्य होते. ह्याकाळात सोनारांना 'संध्या' करण्याचा अधिकार नव्हता. ह्याबाबत जो वाद गाजला होता तो महात्मा ज्योतीबा फुलेनी प्रसिद्ध केलेल्या व तुकाराम तात्या पडवळ  लिखीत 'हिंदु जातिभेद - विवेकसार' ह्या ग्रंथात अंतर्भूत करण्यात आलेला आहे. मनुस्मृतीत ब्राम्हणांनी सोनारांच्या हातचे अन्न ते शुद्र असल्यामुळे घेउ नये असेच म्हटले आहे.

कर्मारस्य निषादस्य रड:गावतारकस्य च । ।
सुवर्णकर्तुर्वेस्य शस्त्रविकयिणस्तथा ।।

     म्हणजेच लोहार, भिल्ल रंगभुमीशी निगडीत व्यवसाय करणारा, सोनार बांब तोडून उदरनिर्वाह करणारा, शस्त्रे विकणारा यांच्याजवळील अन्न ब्राम्हणाने घेउ नये. ब्राम्हण सोनारांना शुद्रासारखीच वागणूक देत. पेशवाईत सोनारास ब्राम्हणाप्रमाणे निऱ्या घालून धोतर नेसण्यास मनाई होती. 

     ह्या धार्मिक दाखल्याखेरीज मागील तीन चार शतकातील काही ऐतिहासिक व सामाजिक दाखल्याची माहिती आम्हास हेच सांगते. शिवाजी महाराज हे जातीने कुणबी-मराठा होते. त्यामुळे कुणबी म्हणजेच शुद्र आणि शुद्राचा राज्याभिषेक होऊ शकत नाही कारण ते क्षत्रिय नाहीत. आणि त्यामुळेच पुण्याच्या ब्राम्हणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. शेवटी काशीहून गागाभट्ट नावाच्या ब्राम्हणाला शिवाजींना बोलवावे लागले. त्याने शिवाजींचे संबंध कुठल्यातरी क्षत्रिय कुटूंबाशी जोडून आधी शिवाजी हे क्षत्रिय आहे हे सिद्ध करून त्यानंतर शिवाजीचा राज्याभिषेक केला. छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा शुद्र मानून ब्राम्हणांनी वेदांचा अधिकार नाकारला होता. संतशिरोमणी तुकाराम महाराज जे की कुणबी होते. हे त्यांनीच त्यांच्या एका अभंगात म्हटले आहे. 

बरे देवा कुणबी केला। उगाची असतो मेला।।

     कुणबी म्हणजेच शूद्र. शुद्राला लिहीण्या वाचण्याचा वा शिक्षणाचा अधिकार नव्हता. तरीसुद्धा तुकारामांनी ब्राम्हणी व्यवस्थेचा प्रघात मोडून साहित्य निर्माण केले. हे त्याकाळातील काही ब्राम्हणांना आवडले नाही आणि म्हणूनच त्यांनी त्यांचे साहित्य इंद्रायणीत बुडविले. साहित्य बुडविल्यावर तुकाराम अस्वस्थ झाले आणि त्यांनी इंद्रायणी काठीच आपला देह त्यागण्याचा निर्धार केला. त्यांची ही स्थिती त्यांचा प्राणप्रिय मित्र असलेल्या श्री. संत जगनाडे महाराज जे की जातीने तेली-शुद्रवर्णीय होते, त्यांना पाहविली गेली नाही. श्री. जगनाडे जे की सदानकदा तुकारामांसोबत भजन किर्तनाला फिरायचे व आपल्या वाणीने तुकारामांचे भजने म्हणायचे, त्यांनी दिवसरात्र बसून त्यांना आठवू शकतील तेवढे तुकारामाचे साहित्य पुन्हा निर्माण केले. मरणासन्न अवस्थेत असलेल्या आपल्या मित्राला झोपेतून जगनाडेनी उठविले आणि म्हणाले, 'हे तुक्या ब्राम्हणी व्यवस्थेने तुझे जे साहित्य भंग केले होते त्यास मी पुन्हा लिहून 'अभंग' केले आहे. आता त्यास कोणीच भंग करू शकणार नाही.' पण तरी सुद्धा तुकारामांचे बरेचसे साहित्य ह्या घटनेत नष्ट झालेच आहे. ही आम्हा सर्वाच्या दृष्टीने दुःखाची बाब आहे. एवढे सर्व झाल्यावर ब्राम्हणांनी आवई उठविली की तुकारामांच्या गाथा इंद्रायणीतून वर तरंगायला लागल्या. आजच्या वैज्ञानिक युगातील शेंबड पोर ज्यावर विश्वास ठेवणार नाही अशा भाकड कथा शतकानुशतके आमचा बहुजन समाज ब्राम्हणांच्या सांगण्यावरून निमूटपणे ऐकत होता. शेवटी ह्याच ब्राम्हणी व्यवस्थेने तुकारामांचा खून करून त्यांचे शरीर सुद्धा गुप्त ठिकाणी पुरुन बहुजनसमाजात अफवा पसरविली की तुकाराम सदेही पुष्पक विमानात बसून वैकुंठात गेले. त्यामुळे खरे तर विमानाचा शोध लावण्याचे श्रेय अमेरीकेतील राईट ब्रदर्स ऐवजी ब्राम्हणांनाच मिळायला हवे होते. पण ब्राम्हणांना माहित आहे त्यांचा धादांत खोटेपणा फक्त भारतातच भोळ्याभाबड्या अंधश्रध्दाळू बहुजनातच चालू शकतो. आंधळ्यात लंगडी गाय शहाणी. ह्यासाठी वाचा डॉ. आ.ह. साळुखे लिखीत 'विद्रोही तुकाराम' हे पुस्तक. ब्राम्हण आपला खून करणार ह्याची चाहुल लागल्यामुळेच तुकाराम महाराज म्हणत, 'आपुलेच मरण पाहिले म्या डोळा.' पण तुकारामाच्या ह्या म्हणण्याचा अर्थ न समजणारा बहुजनसमाज त्या काळात होता आणि म्हणूनच शेवटी तुकारामांना प्राणाला मुकावे लागले. तुकारामांनी जे साहित्य निर्माण केले ते ब्राम्हणी व्यवस्थेला उलथावणारे होते. १६ व्या शतकातील तुकारामांचा दृष्टीकोन हा अतिशय वैज्ञानिक होता. त्यांनी देवधर्म, श्राद्ध, यज्ञ ह्याचा निषेध केला होता. तुकाराम महाराज म्हणत

'तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।। 

     तुकाराम म्हणत तिर्थास जाऊ नका. तिर्थात दगडाचा देव असतो व पाण्याला तिर्थ म्हणतात. रोकडा म्हणजेच खरा देव तर सज्जन महापुरुषातच असतो. तुकारामांनी सांगितलेल्या ह्या कसोटीवर जर आम्ही आज देशात गाजत असलेला मंदिर-मस्जीद वाद तपासून पाहिला तर आजचे तथाकथित संत, महंत व संघटना आमच्या बहुजन समाजाची दिशाभूल करीत आहे हे सहज लक्षात येईल. ब्राम्हणी व्यवस्थेला बळी पडून आजच्या विज्ञान युगातही आमच्यातील सुशिक्षित मंडळी मूल होण्यासाठी नवस, होम वा सत्यनारायण करतात, जेव्हा की तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकात अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्हास हा प्रश्न विचारला आहे की -


नवसे कन्या पुत्र होती । तर का करावे लागे पती ? 

    अक्षरओळख नसलेल्या तुकारामांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याची लायकीही शिक्षण घेउनही आमच्यातील बऱ्याच मंडळीत निर्माण झाली नाही, ही लज्जास्पद बाब आहे आणि आमच्या मागासलेपणाचे एक कारणही आहे.

     बहुजन समाजाच्या स्वातंत्राचे उद्गाते राष्ट्रपिता महात्मा फुले हे ही माळी जातीचे होते. कुणबी, माळी, तेली ह्या जाती ओबीसीत येतात आणि शुद्रातही मोडतात, हे समजविण्यासाठीच मी एवढा खटाटोप करत आहे हे आपण समजून घ्या. महात्मा फुलेनी अतिशय वैज्ञानिक पद्धतीने व तर्कशास्त्रीय दृष्टीकोनातून ब्राम्हणी व्यवस्थेवर हमले चढविले. आज बहुजन समाजातील आम्ही जी काही मंडळी सुस्थितीत आहो त्या स्थितीस कारणीभूत होणारी घटना म्हणजेच महात्मा फुलेचा त्यांच्या ब्राम्हण मित्राच्या लग्नसमारंभात 'शुद्र' म्हणून झालेला अपमान. आपल्या जवळच्याच मित्राच्या लग्नाच्या वरातीत महात्मा फुले घोडाबग्गीला धरून चालत होते. हे दृश्य काही सनातनी ब्राम्हणांना खपले नाही. त्यांनी तेथेच भर रस्त्यावर महात्मा फुलेंचा पाणउतारा केला. ते म्हणाले, 'हे शुद्रा, तुला लाज कशी वाटत नाही. एकतर तू ब्राम्हणांच्या लग्नाच्या वरातीत सामील झाला आहे आणि वर नवरदेवाच्या घोडाबग्गीला धरून चालतो आहेस, पळतोस की हाणू तुला.' महात्मा फुले निमूटपणे वरातीतून गहिवरल्या अंत:करणाने घरी परत आले. दक्षिण आफ्रीकेत गोऱ्या इंग्रजांनी महात्मा गांधीना रेल्वेतून धक्के मारून बाहेर काढले. कारण भारतीय हे इंग्रजांचे गुलाम. गुलामांनी स्वामीची बरोबरी केल्यास त्यास हिच शिक्षा मिळते. ह्या प्रसंगातूनच गांधीनी भारतीयांच्या स्वातंत्र्याची शपथ घेतली. त्याप्रमाणेच ह्या भारतात बहुजन समाज हा ब्राम्हणांचा गुलाम होता. गुलामांना जी वागणूक मिळते तीच वागणूक ब्राम्हणांनी शुद्र महात्मा फुलेसोबत केली. महात्मा फुलेनी विचारांती निर्णय घेतला. 'इंग्रजांची भारतीयावर असणारी गुलामगिरी ही राजकीय गुलामगिरी आहे पण ब्राम्हणांची बहुजनावर असणारी गुलामगिरी ही सामाजिक गुलामगिरी आहे. राजकीय गुलामगिरी ही राजकीय सत्ता पालटून नष्ट करता येते. पण सामाजिक गुलामगिरी ही एक सामाजिक व्यवस्था आहे आणि ती नष्ट करायची असेल तर समाज परिवर्तन हाच त्यावर हुकमी उपाय आहे. राजकीय गुलामगिरी ही आर्थिक शोषणाची व्यवस्था आहे तर सामाजिक गुलामगिरी ही मानसिक शोषणाची व्यवस्था आहे. राजकीय गुलाम हा फक्त आर्थिकदृष्टया कमकुवत होतो तर सामाजिक गुलाम हा मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो आणि त्यामुळे त्याच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद होतात.' महात्मा फुलेनी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्य लढाईचे रणशिंग फुकले. 'गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून काढला. आज बहुजन समाजातील जी काही मंडळी समाजात प्रतिष्ठेने वावरतेय त्यांनी महात्मा फलेंचे मानावे तेवढे उपकार कमीच होतील.

Aarakshan acchi potdukhi       महात्मा फुलेंचा काळ हा ब्रिटीशांचा काळ. महात्मा फुलेंना ब्रिटीशशाहीपेक्षा ब्राम्हणशाही अधिक अन्यायकारक वाटली. त्यामुळेच त्यांनी प्राथमिकतेने ब्राम्हणशाही विरुद्ध लढा उभा केला. बहुजनाप्रती ब्रिटीशांची वागणूक ब्राम्हणांपेक्षा अधिक चांगली असल्यामुळेच ब्रिटीशांच्या सरकाराला त्यांनी 'मायबाप सरकार' म्हटले आहे. त्यामुळे ब्राम्हणांना फुले हे शत्रुसारखे वाटायला लागले. त्यामुळेच महात्मा फुलेच्या हत्येचाही ब्राम्हणांनी प्रयत्न केला. ब्राम्हणांनी दोन रामोशी रात्रीच्या वेळी फुल्यांची हत्या करण्याकरीता पाठविले. खरे तर ब्राम्हण हे इंग्रजांचे गुलाम असल्यामुळे त्यांनी ब्रिटीश व्हाईसरॉयच्या खुनाचा प्रयत्न करायला पाहीजे होता पण त्याऐवजी त्यांनी फुल्यांच्याच खुनाचा प्रयत्न केला. कारण ब्राम्हण जाणून होते ब्रिटीश हे आज ना उद्या येथून निघून जातील पण आपणाला ह्याच देशात राहून बहुजनावर राज्य करायचे आहे. ब्राम्हणांनी स्वत:च्या राजकीय गुलामीपेक्षा आपल्या स्वत:च्या सामाजीक राज्यशाहीवर जास्त लक्ष दिले. महात्मा फुलेंनी रामोश्यांचे वैचारिक परिवर्तन घडवून आणले आणि त्यामुळेच त्यांचे प्राण वाचले. सामाजीक परिवर्तनाची लढाई वैचारिक परिवर्तनाची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई कशी लढायची ह्याबाबत महात्मा फलेंनी त्यांच्या काळात बहजन समाजाला मार्गदर्शन केले महात्मा फुलेंनी विचार केला की ५ टक्के ब्राम्हण उर्वरित ९५ टक्के लोकांना गुलाम कसे ठेऊ शकतात. कुठलीही लढाई लढायची तर त्यासाठी तुमचा शत्रू व मित्र निश्चित समजायला पाहिजे. त्यांची सुस्पष्ट ओळख असली पाहिजे व त्याविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र असले पाहिजे. महात्मा गांधीनी नागरिकत्वावरून शत्रूची ओळख निश्चित केली. ब्रिटीश नागरिक हे आपले दुश्मन व भारतीय नागरिक हे आपले मित्र. त्याविरुद्ध त्यांनी अहिंसा व सत्याग्रह ही शस्त्रे प्रभावीपणे वापरली. महात्मा फुले ह्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेचा गहन अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आले की ब्राम्हणी व्यवस्था टिकण्याचा मुख्य आधार जातीव्यवस्था आहे आणि ही ब्राम्हणी व्यवस्था टिकविण्याचे काम ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या ब्राम्हणी साहित्यानी, पोथ्यापुराणाने, ३२ कोटी देवांमुळेच शक्य होऊ शकले आहे. त्यामुळेच त्यांनी ह्या ब्राम्हणी साहित्याचा विरोध केला व त्याविरुद्ध त्यांनी स्वत:च बरेच साहित्य लिहून काढले. हे साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित 'समग्र फुले' वाङ्मयात समाविष्ट करण्यात आले आहे. जातीव्यवस्था ही शोषणव्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेचा सर्वात जास्त फायदा ब्राम्हणांना आहे आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत ते ही व्यवस्था टिकवू इच्छितात हे फुल्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी शत्रूची ओळख वर्ण व जातीवरूनच केली. वर्णव्यवस्थेवरून सामाजिक लढाईची मांडणी करतांना फुले म्हणतात – 'शुद्र अतिशुद्र विरुद्ध शेटजी भटजी'. जातीवरून ब्राम्हण हे शत्रू व ब्राम्हणेत्तर हे मित्र अशी ह्या लढाईची त्यांनी बांधणी केली. महात्मा फुल्यांची लढाई ही जरी ब्राम्हणी साहित्य व ब्राम्हणाविरुद्ध होती तरी त्याच्या मागे त्यांचा दृष्टीकोण अतिशय मानवतावादी होता. एकीकडे ब्राम्हणशाहीविरुद्ध हमले चढवत असतांनाच दुसरीकडे काशीबाई ह्या गर्भवती विधवा ब्राम्हण बाईचा जीव वाचवून, तिचे पालनपोषण करुन, तिच्या मुलाला महात्मा फुलेंनी दत्तक घेतले. फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ब्राम्हणशाही विरुद्ध लढतांना महात्मा फुलेचा हा मानवतावादी दृष्टीकोन अजिबात विसरू नये. त्याचप्रमाणे बहुजन समाजातील काही मंडळी 'आता ब्राम्हण तसे राहिले नाही' असे म्हणून सरसकट सर्वच ब्राम्हणांना मानवतावादी झाल्याचे सर्टीफिकेट देतात व त्यांच्याच कळपात घुसून बहुजनसमाजाचे नुकसान करतात. अशा संधीसाधू कार्यकर्त्यापासून वा खासकरून नेत्यापासून सावध राहिले पाहिजे. महात्मा फुलेची हत्या करायला निघालेल्या रामोशांशी अशा नेत्यांची तुलना करता येईल. पण रामोशी हे खरेच आंधळे होते म्हणून त्यांचा कृतीत काही पाप नव्हते. ब्राम्हणवादी व्यवस्थेनेच त्यांना गुन्हेगारी जातीत आणून बसविले होते. खून करणे व पैसा मिळविणे हा त्यांच्या जातीव्यवसायाचा भाग होता. महात्मा फुलेंना ते सरळ सांगतात – १००० रु. साठी आम्ही तुमचा खून करायला आलोय.' महात्मा फुले रामोश्यापुढे कापण्यासाठी आपली मान झुकवतात व म्हणतात – ‘ऐका, ही एक मान कापल्यामुळे तुमचा १००० रु.चा फायदा होत असेलही पण हजारो वर्षापासून आणि समोरील हजारो वर्ष आमच्या समाजाच्या माना ब्राम्हणासमोर अशाच कापण्यासाठी नेहमीच झुकलेल्या राहतील. ते तुम्हाला मंजूर आहे का?' दिव्याच्या अंधुक प्रकाशात डोळयात तेल घालून, फुले त्यावेळेस ब्राम्हणशाही विरुद्धचे लिखाण करीत होते. रामोश्याचे हृदय परिवर्तन झाले. ह्यातील एक मारेकरी महात्मा फुलेंचा अंगरक्षक बनला तर दुसरा सत्यशोधकी अभ्यासक बनला. पण बहुजन समाजातील ब्राम्हणवाद्याच्या कळपात वावरणारी आजची नेतेमंडळी अतिशय स्वार्थी व धूर्त आहेत. रामोश्यांचा गुन्हा क्षम्य आहे, पण अशा नेत्यांचा गुन्हा क्षम्य नाही. कारण हे नेते रामोश्यांसारखे आंधळे नाहीत तर त्यांनी स्वस्वार्थासाठी आंधळेपणाचे सोंग घेतलेले आहे. 

      फुल्यांच्या लक्षात आले की ही ब्राम्हणी व्यवस्था टिकविण्यासाठी जेवढे ब्राम्हण जिम्मेदार आहेत तेवढेच आम्ही शुद्रही जबाबदार आहोत. फुल्यांना वाटले ब्राम्हणांनी आपल्याला शुद्र म्हणून त्याच्या लग्नवरातीतून हाकलले त्यामुळे आपणास अपमानास्पद वाटले पण आपलीही वागणूक अतिशुद्राबद्दल वा अस्पृश्याबाबत तर तशीच निंदनीय आहे. आपणही तर ब्राम्हणवादी व्यवस्थेचाच हिस्सा आहोत. ५ टक्के ब्राम्हण ९५ टक्के बहुजन समाजावर सरळ नियंत्रण ठेवत नाहीत कारण ते शक्यच नाही. तर ब्राम्हण हे जातीच्या श्रृंखलेतून वरपासून खालपर्यंत नियंत्रण ठेवतात. जाती ह्या खालपासून वरपर्यंत एकावर एक श्रृंखलाबद्ध पद्धतीने ठेवल्या आहेत. ब्राम्हणाचे नियंत्रण वा गुलामगिरी त्यांच्या खालच्या जातीवर, खालच्या जातीची अजून त्याच्या खालच्या जातीवर ह्याप्रकारे ही साखळीबद्ध गुलामगिरी आहे. खालची साखळी ही वरच्या साखळीच्या तावडीत आहे. त्यामुळे आपल्याला वरच्या साखळीच्या तावडीतून निघायचे तर संघर्ष करावा लागेल पण खालच्या साखळया तर आपणच आपल्या तावडीतून सोडू शकतो. फुल्यांनी आपल्या आंदोलनाची दिशा निश्चीत केली. एकीकडे ब्राम्हणशाहीच्या गुलामगिरीविरुद्ध त्यांनी ब्राम्हणांशी लढाई सुरु केली तर दुसरीकडे स्वत:च्या तावडीत असलेल्या अस्पृश्यांना मुक्त करण्याचे धोरण आरंभिले. 'ज्याप्रमाणे ब्राम्हण हे आपल्या अधोगतीचे कारण आहेत त्याच प्रमाणे ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे नकळत का होईना आपण अस्पृश्यांच्या अधोगतीचे कारण आहोत, त्यामुळेच आता अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी आपणच झटलो पाहिजे' असा मानवतावादी विचार महात्मा फुलेंनी केला. अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. अस्पृश्यांसाठी आपल्या घरचा पिण्याचा पाण्याचा हौद खुला केला. फुल्यांनी आखलेली आंदोलनाची दिशा ही अखिल बहुजनांच्या स्वातंत्राची एकमेव दिशा होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या आंदोलनाची यशस्वी बांधणी समजू शकले आणि म्हणूनच बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांना आपला गुरु मानले आहे. ज्या सार्वजनिक तळ्यातील पाणी कुत्री, मांजरं पिऊ शकतात, त्या तळ्यातील पाणी पिण्याचा अस्पृश्यांना अधिकार मिळावा ह्यासाठी जेव्हा डॉ. आंबेडकर महाडच्या तळ्यावर १९२७ला पाण्यासाठी आंदोलन करतात त्याचवेळेस ७०-८० वर्षापूर्वी महात्मा फुले सार्वजनिक नव्हे तर आपल्या निजी हौदाचे पाणी अस्पृश्यांना भरू देतात ही गोष्ट बाबासाहेबांच्या मनात महात्मा फुलेंना आपला गुरु मानण्याची प्रेरणा देणारी ठरते. वाळीत टाकलेल्या समाजासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केल्यामुळे आपलाच समाज आपल्यालाही वाळीत टाकू शकतो ह्या प्रकारची कुठलीच भिती न बाळगता महात्मा फुलेंनी केलेली ही कृती अत्युच्च मानवतावादी आहे. 
 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209