देशमुख : वर्णव्यवस्थेची अजून काय वैशिष्ठये आहेत ?
मी : वर्णव्यवस्थेनी शुद्रांवर शिक्षणबंदी, शस्त्रबंदी व अर्थबंदी लादली. ब्राम्हणांनी स्वत:साठी शिक्षणाचे १०० टक्के रिझर्व्हेशन केले. आज जी ब्राम्हण मंडळी तुम्हास असे म्हणत असेल की ह्या आरक्षणाचा वैताग आला. त्यांना म्हणावे – '८५ टक्के बहुजनासाठी फक्त ५० टक्के शिक्षणाचे रिझर्व्हेशन केले आहे तर एवढा वैताग, मग ५ टक्के ब्राम्हणासाठी १००टक्के शिक्षणाचे रिझर्व्हेशन हजारो वर्ष केले होते त्याबद्दल काय ?' आज जी ब्राम्हणांची मुलं आपल्या मुलांपेक्षा साधारणत: हुशार दिसतात त्यामागे कारण आहे त्यांनी भोगलेली ही आरक्षण पद्धती. जी ब्राम्हण मंडळी आज स्पर्धेच्या आणि मेरीटच्या गोष्टी बोलते त्यांना कळल पाहीजे की त्यांचीही गुणवत्ता ही स्पर्धेतून निर्माण झालेली नसून आरक्षणातून निर्माण झालेली आहे. म्हणून न्यूटन, एडीसन तर सोडा पण साधा पेनचा शोधही आम्ही लावू शकलो नाही. भारतात 'अर्जुन पुरस्कार' मिळविणारे अर्जुन आजही खूप आहेत पण आंतरराष्ट्रीय जगतात 'ऑलम्पिक सुवर्ण' मिळवू शकणाऱ्या एकलव्याचे अंगुठे आम्ही आजही कापत आहोत. १०० कोटी भारतीयांची लाज वाचवणारी व २००० च्या सिडनी ऑलम्पिकमध्ये कास्य पदक मिळवणारी बहुजन समाजातील मल्लेश्वरी ह्या स्त्री खेळाडूची प्रतिक्रिया ह्याबाबत अतिशय बोलकी आहे. ती म्हणते, 'माझ्यावर नाही नाही ते खोटे आरोप करण्यात आले. मला स्पर्धेतून वगळण्याचाही प्रयत्न करण्यात आले.' व्यक्ती सर्वश्रेष्ठ दोन पद्धतीने राहू शकतो.
१. स्पर्धात्मक पद्धतीने : ह्यात सर्वश्रेष्ठ ठरू इच्छिणाऱ्या व्यक्तीस अथक प्रयत्न व स्वत: मेहनत करून स्पर्धेत प्रथम यावे लागेल. ह्यात व्यक्ती गुणवत्तेच्या व मेहनतीच्या आधारे प्रथम ठरतो.
२. ब्राम्हणात्मक पद्धतीने : ह्या पद्धतीत सर्वश्रेष्ठ व्यक्ती स्वत:पेक्षा कोणी श्रेष्ठ वा उत्कृष्ट असल्यास त्यास काहीतरी फसवणुकीचा नियम वापरून बाद करते. जसे अर्जुनाला सर्वश्रेष्ठ ठरविण्यासाठी द्रोणाचार्याने एकलव्याचा अंगुठा कापून त्यास श्रेष्ठ धनुर्धाऱ्याच्या स्पर्धेतून बाद केले. ही कपटनिती आहे. कर्ण हा अजेय ठरू नये म्हणून त्याच्या दानी वृत्तीचा फायदा घेऊन त्याची कवचकुंडले काढण्याचा हा प्रकार आहे. द्रौपदीचा विवाह निम्नजातीच्या कर्णाशी होऊ नये म्हणून स्वयंवर स्पर्धेतून निम्नजातीचे कारण करून कर्णाला हाकलण्याचा जा हा प्रकार आहे.
शिक्षण, शस्त्र व अर्थबंदी लागू झाल्यावरही बहुजनांपाशी एक शक्ती उपलब्ध होती ती म्हणजे त्यांची ९५ टक्के लोकसंख्या. ह्या बहुजन लोकसंख्येत जर हा विचार आला की आपण एकत्रितपणे ब्राम्हणी व्यवस्थेचा विरोध केला तर ती कोलमडून पाडू शकतो म्हणून त्यांनी शुद्रांना फक्त एक वर्ण न ठेवता त्यांचे जातीय आधारावर अधिक विभाजन केले व ते विभाजन मजबूत राहावे जेणेकरून बहुजनात एकी होऊ नये म्हणून त्यांनी आणखी चार बंद्या शुद्रांवर लादल्या.
१) व्यवसायबंदी : प्रत्येकाने आपल्या जातीचाच व्यवसाय करायचा.
२) वेशीबंदी : प्रत्येक जातीच्या समुहाने एक दुसऱ्यापासून वेगवेगळे वस्त्यात राहायचे व एका जातीने दुसऱ्या जातीच्या वस्तीत जाऊन राहू नये.
त्यामुळेच आजही खेडयापाडयात व काही अंशी छोट्याखानी शहरातही आपणास वेगवेगळ्या जातीच्या वस्त्या दिसतात जसे की महारवाडा, मांगवाडा, तेलीपरा, कुंभारवाडा, मराठवाडा इत्यादी.
३) बेटी बंदी : बहुजनातील दोन जातीत रक्तसंबंध निर्माण होऊ नये म्हणून आंतरजातीय विवाहबंदी.
४) रोटी बंदी : एका जातीच्या माणसाने दुसऱ्या जातीच्या माणसाकडे जेवण करू नये.
ही रोटीबंदी भारतीय सैन्यातील तुकडयासुद्धा इमाने इतबारे मानीत. जाट बटालीयन, मराठा बटालीयन व महार बटालीयन ह्या जातीय सैनिक तुकडया होत्या. लढायचे एकाच देशासाठी, पण रात्रीचा स्वयंपाक जातीनिहाय वेगवेगळा करायचा. ह्याबाबत एक ऐतिहासिक घटना मी आपणास सांगू इच्छितो. प्रसिद्ध पानीपतच्या लढाईच्यावेळी यमुना नदीच्या एकीकडे अहमदशहा अब्दालीचे सैन्य होते तर दुसरीकडे पेशव्यांचे सैन्य होते. सायंकाळच्या प्रहरी अहमदशहा अब्दाली जेव्हा फेरफटका मारावयास निघाला तेव्हा त्याला पेशव्यांच्या सैनिकी कॅम्पमध्ये शेकोट्या पेटलेल्या दिसल्या. अब्दाली आपल्या सहकाऱ्याला म्हणाला, 'अरे आज तर थंडीही नाही, तरीही ह्या पेशव्यांच्या कॅम्पमध्ये एवढया शेकोट्या का पेटल्या आहेत?' त्याचा सहकारी म्हणाला, 'साहेब त्या शेकोट्या नव्हेत, पेशवा सैन्याची स्वयंपाकाची तयारी आहे. पेशव्यांच्या सैन्यात एका जातीचा सैनिक दुसऱ्या जातीच्या सैनिकाच्या हातचे शिजलेले अन्न खात नाही. त्यामुळे प्रत्येक जातीच्या वेगवेगळया चुली स्वयंपाकासाठी पेटल्या आहेत.' अब्दाली म्हणाला, 'अरे मग ही लढाई आपण जिंकलीच समजा. जी मंडळी एकत्र जेवण करू शकत नाही ती एकत्र लढूही शकणार नाही. आपला विजय निश्चित आहे.' आणि खरोखरच अब्दालीने पानीपतच्या लढाईत पेशव्यांना पाणी पाजले. पेशवाईचे कंबरडे मोडले. या कामी कि महात्मा फुल्यांकडे त्यांच्याच जातीचा एक गृहस्थ लग्नपत्रिका घेऊन येतो व म्हणतो 'साहेब मी सर्व जातीच्या मंडळींना लग्नाला बोलावलय' फुले विचारतात, 'जेवायची व्यवस्था कशी आहे?' त्यावर तो गृहस्थ म्हणाला, 'लोक आपल्या जातीपरीने बसतील जेवायला. आधी ब्राम्हणांची पंगत उरकवू. त्यानंतर आपल्या तेल्यामाळ्याच्या पंगती आणि सरतेशेवटी महार, मांग जेवायला बसतील.' फुलेंनी प्रश्न केला, “सर्वच जातीची मंडळी पहिलेपासुन शेवटच्या पंगतीपर्यत एकत्र का बसू शकत नाही?' तो गृहस्थ म्हणाला, 'महाराज मला हे जमणे नाही.' महात्मा फुले त्या गृहस्थाच्या लग्नकार्यास गेले नाही. संध्याकाळी लग्नाची वरात निघाली. महार, मांग मंडळी दारु पिऊन वरातीच्या समोर नाचतनाचत चालत होती. महात्मा फुले व सावित्रीबाई घराच्या खिडकीतून हे दृश्य पहात होते. * सावित्रीबाई जोतीबांना म्हणाल्या, 'आपण ज्या लोकांच्या अधिकारासाठी लग्नाला गेलो नाही ती मंडळी तर खाऊन पिऊन आनंदाने नाचत गात वरातीत सहभागी झाली आहेत आणि आपणच घरी एकटे बसलो आहोत' जोतीबा म्हणाले, 'सावित्री प्रश्न हा सहभागाचा नाही सिद्धांताचा, सम्मानाचा आहे. हजारो वर्षापासून ह्या गुलामीची सवय ह्या देशातील बहुजनांना झालेली आहे. स्वातंत्र म्हणजे काय हे त्यांना समजलेच नाही. ही मंडळी जरी आज खुळी असली तरी आपण ह्यांच्या स्वातंत्रासाठी लढलो पाहीजे. हीच तर आमची जबाबदारी आहे.' महात्मा फुलेंनी सुरू केलेली बहुजन स्वातंत्राची लढाई आज ही अपूर्ण आहे. ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे.