डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
यांचे अध्यक्षीय भाषण, अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, नाशिक (२००८)
संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक मा. विलासरावजी देशमुख, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आ.सुधाकरराव गणगणे, प्रमुख पाहुणे मा. ना. छगनरावजी भुजबळ, मा.ना. चंद्रकांतजी हांडोरे, मा. ना. भालचंद्र मुणगेकर, मा. अली अजिजी, मा. बाळकृष्ण रेणके, मा. संमेलनाध्यक्ष कविवर्य सुधाकर गायधनी, मा. विनायक पांडे, कार्यकर्ते आणि लेखक बंधू-भगिनींनो
ओबीसी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषत: या बाबतीत आमदार व माजी मत्री सन्माननीय श्री. सुधाकर भाऊ गणगणे हे फार आग्रही होते. त्यांच्यामुळे आणि महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांमुळेच मला हा सन्मान प्राप्त झाला आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच मी प्रथमत: कृतज्ञता व्यक्त केली.
ओबीसी साहित्य संमेलनाचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी मराठीतील थोर कवी सुधाकरजी गायधनी हे अध्यक्ष होते. त्यांनी या साहित्य संमेलनात एक वळण घालून दिलेले आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करीन. आपण प्रेमाने माझ्या बोलण्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो.
मराठीमध्ये १९७० च्या आसपास दलित साहित्याची चळवळ सुरू झाली आणि मराठी साहित्याचे अवकाश संपूर्णतः बदलून गेले. किंबहुना दलित साहित्य चळवळीच्या उल्लेखाशिवाय आपणाला पुढे जाताच ये नाही. दलित साहित्याने आपल्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या अन्वेषण दृष्टी ठेवली होती. त्यातून साहित्य निमिताच स्वरूप बदलून गेले त्यातून नवीन जाणीव साहित्यातून प्रकटायला लागली. तिचा उल्लेख 'निल पहाट' या नावाने होऊ लागला. ही निळी पहाट उगवली आणि सर्व मागासलेल्या समाजामध्ये एक नवी चेतना जागी झाली. दलित साहित्यार साहित्य हे केवळ रंजनाचे माध्यम असत नाही, तर ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम असते, असे ठासून सांगितले. त्यापूर्वी डाव्या चळवळीच्या प्रभावातील लेखक हीच भूमिका घेत असत. कविवर्य कुसुमाग्रज, मुक्तिबोध. विदा करंदीकर आणि नारायण सुर्वे या प्रमुख कवींचा या संदर्भात निक केला तरी हा मुद्दा स्पष्ट होईल. मराठीतील संतांनीही हीच भूमिका मांडली होती. “बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा' असे संत कवी तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेले आहे. तरीही दलित साहित्याचे एक वेगळे महत्त्व आहे. मराठीतील रंजनवादी वातावरणात हे ठासून सांगितले त्याप्रमाणे निर्मिती केली, मूल्यमापनाचे नवे निकष देण्याचे प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, मराठीमध्ये जे शोषित आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक जागृती निर्माण झाली आणि शोषित समाजातील लेखकांच्या लेखनाने मराठी साहित्याचे क्षेत्र विस्तारत जाऊ लागले.
दलित साहित्याच्या पाठोपाठ ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू झाली. आदिवासी लेखकांनी आदिवासी साहित्याची चळवळ सुरू केली. स्त्रिया पूर्वीपासून लिहीत होत्या; परंतु आता स्त्रीवादी लेखनाची चळवळ सुरू झाली. दलित साहित्यापाठोपाठ या तीन साहित्य चळवळी सुरू झाल्या. या चळवळीची अधूनमधून संमेलनेही भरू लागली आणि आता ओबीसी साहित्य संमेलन सुरू होत आहे. ओबीसीमधील विविध समाजांमध्ये एक नवी आणि संघर्षशीलतेची जाणीव निर्माण होत आहे. याचीच ही खूण आहे. एकाप्रकारे आधुनिक काळात ओळख हरविलेल्या या विविध समाजघटकांचा खास स्वतःची ओळख मिळविण्याचा व स्वतःच्या हक्कासाठी जागरूक होत असण्याचा मोठा पुरावाच आहे असे म्हटले पाहिजे.
आज समाजातील विविध घटक संघर्षाच्या पावित्र्यात आहेत. हा संघर्ष करावा असे विविध घटकांना का वाटते आहे हा खरा प्रश्न आहे. आपल्याला त्याचे उत्तर आपल्या देशातील जातिव्यवस्था हेच आहे, असे द्यावे लागते.
जातिव्यवस्थेबद्दल बोलणे अतिशय अवघड आहे. ती कधी सुरू झाली, याचे निर्णायक उत्तर देणे अवघड आहे. ती का सुरू झाली, तेही सांगता येणार नाही; परंतु आजतागायत काही अपवाद वगळता जातिव्यवस्थेच्या जोखडात स्वतःचे जीवन बांधून घेऊनच सर्व समाज वावरतो आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. आज १९ व्या शतकात एवढी वैज्ञानिक प्रगती होत असतांना विवाहसंबंधाच्या बाबतीत मात्र आपण जातिव्यवस्थेचे निमूटपणे पालन करतो. अनेक बंडखोरांची बंडखोरी या मुद्द्यांवर कधी संपून जाते, ते त्यांचे त्यांनाही कळत नाही. एकंदरीत काय की जातिव्यवस्था हे भारतीय समाजाचे एक मुख्य अंग आहे. राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष कार्य करून भारतीय समाजाच्या दुःखाचे मूळ जातिव्यवस्थेत आहे हे परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. एवढे सगळे होऊनही आपण सारेच जातीच्या खुंट्याभोवती का फिरत राहतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
जातिव्यवस्थेमध्ये उच्चनीच भाव आहे, आणि श्रमिकांचीच येथे विभागणी झाली आहे हे तर सिद्धच आहे. परंतु हजारो वर्षे आपण या खुंट्याभोवती फिरत राहिलो. आणि त्यामुळे 'पडिले वळण इंद्रिया सकळ' अशी आपली अवस्था झाली आहे. हे वळण पडण्याचे ऐतिहासिक कारण तरी काय? हा प्रश्नही विचारला पाहिजे. विशेषतः ओ.बी.सी.मधील विविध सामाजिक घटकांच्या संदर्भात विचारला पाहिजे. .