Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

भारतीय समाजाच्या दुःखाचे मूळ जातिव्यवस्थेत

     ओबीसींच्या साहित्याबद्दल येथे बोलले पाहिजे. कारण हे साहित्य संमेलन आहे. तरीही प्रथमतः ओबीसींच्या स्थिती-गतीबद्दल प्रथमतः विवेचन केले. त्याचे कारण त्यांच्या दुःखाचे मूळ इथल्या जातिव्यवस्थेत आहे. आपण ते अधोरेखित व्हावे यासाठी, शिवाय साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम असत नाही, तर ते समाजपरिवर्तनाचे एक हत्यार असते असे मीही मानतो. म्हणून साहित्यनिर्मितीबद्दल बोलायचे झाले, तर मध्ययुगापासून ओबीसी जातीमधले, तसेच दलित जातीमधले कवी लेखन करीत आहेत. चोखामेळा, सोयराबाई ज्याप्रमाणे दलित समाजातून आलेले संत होते, त्याप्रमाणे नामदेवासारखे संतश्रेष्ठ शिंपी समाजातन आलेले होते. सेना न्हावी. नरहरी सोनार आणि सावता माळी या संतांनी तर वारकरी चळवळीला एक परिमाण मिळवून दिले; नव्हे तर पूर्णत्व मिळवून दिले आहे.

     इंग्रजांच्या आगमनानंतर औद्योगिकीकरणाबरोबरच जे सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन सुरू आहे, त्यात अतिशय कमी संख्येने का होईना इतर मागासवर्गीय समाजातून लेखक, कार्यकर्ते पुढे आलेले दिसतात. बाबा पद्मनजींसारख्या लेखकाचा तर उल्लेख करता येईलच. परंतु म. जोतिबा फुले यांनी तर समाजपरिवर्तनासाठी एक दिशाच दिली. जसा जसा काळ पुढे जात आहे, तसेतसे म. फुले यांच्या विचारांची अन्वर्थकता अधिकाधिक स्पष्ट होत जाते आहे. अर्थात वारकरी चळवळी, संत आणि म. फुले यांच्यासारखे लेखक जातीचा परीघ ओलांडून मानवतेच्या मोठ्या अवकाशात कार्य करू लागले. म्हणूनच त्यांचे स्मरण आजही आपण करतो. याचा अर्थच असा की जे लेखक, कार्यकर्ते जातीचा परीघ ओलांडून व्यापक मानवतेच्या आवकाशात प्रवेश करतात त्यांच्याच हातून काहीतरी अक्षरवाङ्मय निर्माण होते. आज मराठी लिहीत असलेल्या ओबीसी समूहातील लेखकांसमोर ही गोष्ट असली पाहिजे. त्यामुळे त्यांचे लेखन अधिक अर्थपूर्ण होईल. मर होईल व समाजधारणेतील त्यांचा वाटाही महत्त्वाचा राहील.

Second Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan      आज मराठीत लिहिणाऱ्या लेखकांमध्ये ओबीसी जातीगटांतून उदयाला आलेले लेखक मोठ्या संख्येने आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्यापासून कवि सुधाकर गायधनी, उत्तम कोळगावकर यांच्यापर्यंत कवी, लेखक ओबीसी आलेले आहेत. परंतु ओबीसी जातीसमूहामधील असंख्य जातीसमूह देशोधडीला लागले आहेत. त्यांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की या साऱ्यांचे चित्रण मराठी साहित्यामध्ये आले आहे का ? कुंभार समाज नव्या काळात उद्ध्वस्त झाला. प्लास्टिकची भांडी येऊ लागली आणि कुंभारांवर उपाशी मरावयाची पाळी आली त्याप्रमाणेच तेली, साळी, कोळी, भोई, विणकर, कोष्टी, रंगारी, सतार लोहार, सोनार यांसारख्या शेकडो कारागीर जाती संकटात सापडल्या. गेल्या दीडशे वर्षांत हे आकाराला येत गेले. हे सारेच कसेबसे टिकून होते ते शेतीच्या भरवशावर. आता शेतीच संकटात सापडली आहे. शेती कारागीरांसह अख्खा ग्राम इलाका होरपळून निघतो आहे. तेव्हा या साऱ्यांचे समर्थ चित्रण मराठीमध्ये आहे का? आधुनिकीकरणाच्या रेट्यात उद्ध्वस्त होणाऱ्या शिंपी समाजाचे चित्रण फक्त दोन ठिकाणी फार प्रभावीपणे आहे. उद्धव शेळके यांच्या 'धग' व रा. रं. बोराडे यांच्या 'पाचोळा' या कादंबरीमधून असे चित्रण आले आहे. किंबहुना या मराठीतील अविस्मरणीय कादंबऱ्या आहेत. डॉ. जनार्दन वाघमारे, मनोहर तल्हार, र. बा. मंचरकर, रवींद्र शोभणे, चंद्रकांत महामिने, गजमल माळी, प्रल्हाद लुलेकर, सदाशिव माळी, वासुदेव मुलाटे, ना.धों. महानोर, वैजनाथ कळसे, भीमराव वाघचौरे यांच्यासारख्या मान्यवर लेखकांनी काही प्रमाणात या उद्ध्वस्त होणाऱ्या कारागिरांचे जीवन चित्रिले आहे. अर्थात आणखीही काही लेखकांचा निर्देश करता येईल. याचा अर्थ एवढाच की उद्ध्वस्त होणारा, होरपळणारा भारत अजून मराठी साहित्यात आलाच नाही. तो येईल तेव्हा मराठीतील साहित्य फार मोठी होईल. असंख्याना कवेत घेणारे होईल आणि त्यांची शक्तीही फार फार वाढलेली असेल. ही एक संधी ओबीसी जातीसमूहांमधून आलेल्या लेखकांना खुणावते आहे, एवढेच या ठिकाणी मी नोंदवीन. याचा अर्थ आज लिहीत असलेले लेखक महत्त्वाचे नाहीत असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. त्यांपैकी काही लेखकांचा उल्लेख तर मी केलाच आहे. फक्त चित्रणाच्या क्षेत्रात केवढा मोठा जीवनाचा पट द्यायचा राहन गेला आहे हेच येथे सुचवावयाचे आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर, अर्धा भारत अजूनही अक्षरबद्ध व्हायचा राहिला आहे.

     आता या उद्ध्वस्त भारताचे चित्रण करायचे तर नुसते छायाचित्रणात्मक पद्धतीने करून भागणार नाही. या छायाचित्रणात्मक लेखनाला मानवी स्पर्श क्वचितच प्राप्त होतो. म्हणून छायाचित्रणाच्या पुढे जाऊन मानवी स्पर्श प्राप्त करून देणे आवश्यक असते आणि त्यासाठी आवश्यक असते तो मानवी नात्याचा सखोल शोध घेणे व एकूण जीवनाचा अन्वयार्थ लावणे. मानवी नात्यांचा शोध घेण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण, आत्मचिंतन यांसारख्या बाबींची आवश्यकता असते. एकूण जीवनाचा अन्वयार्थ लावण्यासाठी मात्र जीवनाला कवेत घेणाऱ्या एखाद्या व्यापक तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते. किंबहुना अशा तत्त्वविचारांशिवाय लेखन पांगळे असते. कारण जीवनाचा अन्वयार्थ केवळ तत्त्वज्ञानाच्या आधारेच लावता येतो.

     एकंदरीत काय की, भक्कम आणि व्यापक तात्त्विक पाया असल्याशिवाय कुठलीही चळवळ उभी रहात नाही, याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे, एवढे सांगून मी आपला निरोप घेतो.

( स्रोत - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे भाषण, संमेलनाध्यक्ष, दुसरे अ. भा. ओबीसी साहित्य संमेलन, नाशिक, १६-१७, फेब्रुवारी २००८, स्मरणिका-ओबीसी गौरवगाथा, 'जागर' )
 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209