Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

आरक्षणाची पोटदुखी

 जोशी : ढोबळे साहेब हिंदु धर्मावर तुम्ही एवढी टिका करू शकता कारण की हिंदु सहनशील आहे. पण मुसलमानात असणाऱ्या परदा, बुरखा व तलाक ह्यासारख्या रितीरिवाजाबद्दल तुम्ही पुरोगामी मंडळी अजिबात बोलत नाही, त्यांना घाबरता का? 
 
 मी : जोशीसाहेब प्रश्न घाबरण्याचा नाही आणि तुमच्या अशा बोलण्यामुळे मी चिथणार पण नाही. सहनशील हिंदु म्हणता तो बहुजन हिंदु होय, ब्राम्हण हिंदु नव्हे. बहुजन हिंदु हजारो वर्ष ब्राम्हण हिंदुच्या अत्याचाराला व अन्यायाला सहनच करत आला त्यामुळे हिंदु सहनशील वा सहिष्णु आहे असे म्हटल्या जाते. आम्ही आमच्या समस्या मांडल्या की भलतेच  कारण सांगणे हा तुमचा धंदा आता बंद करा. जेव्हा मंडल आयोग लागायचा होता तेव्हा आम्हाला नोकरी न मिळण्याचे कारण दलितांना मिळणारे आरक्षण असे सांगून दलितांविरुद्ध भडकविले. आता मंदिर-मस्जिद वाद स्वत:च उकरून आम्हास मुसलमानांविरुद्ध भडकविण्याचे मनसुबे तुम्ही बांधत आहात. वरून विचारता घाबरता का? मी हिंदु आहे आणि ह्या देशात हिंदुची संख्या ८२ टक्के आहे, त्यामुळेच आपण आधी आपल्या घरातील घाण साफ केलेली बरी. आपण लक्षात ठेवायला हव की हिंदु धर्मावर टिका करणाऱ्या बुद्धीवादीमुळेच हिंदुतून केशवापन, बालविवाह, विधवा विवाह बंदी, स्त्री-शुद्र शिक्षण बंदी ह्यांसारख्या कुप्रथा बंद झाल्या आहेत. मुसलमानांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांच्यातील बुद्धीवाद्यांनी त्यांच्यातील प्रश्नासाठी पुढाकार घेतल्यास आम्ही पाठींबाच देऊ.
 
जोशी :
ढोबळे तुमचं म्हणनं मला पटतयं. ही व्यवस्था ब्राम्हणवादी असण्यापेक्षा बहुजनवादीच असली पाहिजे. अल्पजन हिताय असण्यापेक्षा बहुजन हिताय असली पाहिजे. आमच्यातील बरीचशी हिंदु मंडळी आमच्याच सनातन धर्माला कंटाळून मुस्लीम झालीय हे पटलय मला. 

मी : हिंदु धर्मात झालेली बंड, निरनिराळे निर्माण झालेले पंथ, आतापर्यंत झालेली धर्मपरिवर्तने ही मूळ धर्मात असणाऱ्या दोषामुळे निर्माण झाली आहेत. आम्हाला आमचा धर्म टिकवायचा असेल तर आम्ही तो धर्म अधिकाअधिक मानवतावादी व समतावादी बनवायला हवा. प्रत्येकच हिंदुला धर्मामध्ये समान सामाजिक दर्जा मिळायला हवा. जातीनिहाय हिंदुव्यवस्था नष्ट व्हायला हवी. हिंदु आणि मुसलमांनामध्ये राममंदिर व बाबरी मस्जीद ह्यांची भिंत उभी करून सर्व हिंदु एक आहे ही कृत्रिम भावना राजकीय स्वार्थासाठी निर्माण करणाऱ्या हिंदुनी सर्वप्रथम आपल्या घरातच डोकावून पाहिले पाहिजे. आम्हा हिंदुच्या घरातच जातीच्या एवढ्या छोट्या छोट्या भिंती आहेत, त्या आम्ही तोडल्या तर समतावादी हिंदु धर्माची पुनर्स्थापना होईल. जातीव्यवस्थेचा अंत झालेल्या हिंदु धर्मीयांची संख्याच मुळात ८२ टक्के असेल. मग मुसलमान वा खिश्चन ह्यांच्या विरुद्ध उगाचाच डोंब पेटवून हिंदुचे नकारात्मक मतदान करवून घेऊन राज्य करण्यापेक्षा हिंदुचे सकारात्मक मतदान घेऊन राज्यकारभार करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे जाती ह्या मुळातच अराष्ट्रीय आहेत. शाहू महाराज म्हणायचे – 'जाती टिकण्याचा मुख्य आधार हा जातीतील द्वेष आहे, म्हणूनच ही जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. द्वेषावर आधारीत कुठलीही व्यवस्था जास्त काळ टिकणे हे देशास घातक असते.' 

जोशी : पण आम्ही जातपात मानीत नाही. जाती विसरा हिंदु बना असाच प्रचार आम्ही करीत असतो. 'गर्व से कहो हम हिंदु है' असा नाराच मुळी आम्ही देत असतो. 

Aarakshan acchi potdukhi मी : ज्या देशात हिंदुची संख्या ८२-८५ टक्के आहे, त्या देशात 'गर्व से कहो हम हिंदु है' हा नारा देण्याची वेळ येणे हीच लज्जास्पद बाब आहे. गर्वसे कहो असं म्हणावं लागतं म्हणजेच सद्यस्थितीत लोकांना त्याचा गर्व नाही हाच आशय आम्ही व्यक्त करतो. कुठल्याही चांगल्या गोष्टीचा गर्व हा असतोच मग ह्या गर्वाचा प्रसार का करावा लागतो? म्हणजेच कुठेतरी काहीतरी हिंदु धर्मात चुकतय. जे चुकतय त्याला बरोबर केल तर ८५ टक्के लोकसंख्या असलेल्या ह्या देशात असा नारा द्यायचा प्रश्नच उद्भवणार नाही. तुम्ही म्हणता आम्ही जाती मानत नाही. जाती न मानने व तसे वागणे ह्यात जमीन आस्मानचा फरक आहे. सोयीनुसार जाती मानने व विसरणे ही आज काही लोकांची चतुराई झाली आहे. जातीच्या माणसाकडे एखाद काम अडल तेव्हा – 'अरे बाबा आपण जातभाई नाही का?' असे म्हणून काम काढून घेणे व परजातीच्या माणसाकडे काम अडल तर तत्ववेत्ताचा आव आणून 'साहेब मी जातपात मानत नाही', असे म्हणून काम काढून घेणे आजकालचा शिष्टाचार झाला आहे. तुमच्यासाठी तर शर्टाची वरची एक बटन उघडली तर जात सांगायची गरज नसते. तुम्ही जात पात मानीत नाही म्हणता, मग तुमच्या पत्नीची जात कोणती ? 

जोशी : तो माझा व्यक्तीगत मामला आहे. 

मी : उत्तर न देताच उत्तर दिलय तुम्ही जोशी. तुमची पत्नीही ब्राम्हण आहे आणि अस असण्यात तुमचाही काही दोष नाही. तो परंपरेचा वा ब्राम्हणी व्यवस्थेचा भाग आहे. तुमची मुंज झालीय. तुम्ही जाणव घालता. जाणव हे तुम्ही ब्राम्हण असण्याचे जातीय प्रतिक आहे. मागच्याच वर्षी तुम्ही संदीपचीही मुंज केली आणि त्यालाही जाणव घातल आणि वरून म्हणता आम्ही जाती मानत नाही.

जोशी : आम्ही जाणव घातल्यानी तुम्हाला काय फरक पडतो ? 

मी : निश्चितच फरक पडतो. त्यासाठी मला माझ्या लहानपणाची गोष्ट सांगावी लागेल. त्यावेळेस मी चौथ्या वर्गात असेल. देशपांडे नावाच्या माझ्या एका मित्राच्या उपनयन संस्काराला मी गेलो होतो. त्या मित्राचा थाटमाट आणि कार्यक्रम बघितला आणि मी घरी येऊन आईला विचारल, 'आई माझी मुंज केव्हा करणार?' ९-१० वर्षाचा कोवळा मुलगा. मला जातीचा गंधही नव्हता. आई म्हणाली, 'बेटा तुझी मुंज होणार नाही. आपण ब्राम्हण नाही. आपली जात खालची.' मी म्हटले, 'आई ही जात काय गोष्ट आहे?' आई म्हणाली, 'बेटा हे तुला आता समजणार नाही. मोठा झाला की आपोआप समजेल.' वर्गात माझा पहिलाच नंबर असायचा. वर्गातल्या सर्व मुलामुलींपेक्षा जास्त मार्क मला असायचे. धावण्याच्या स्पर्धेतही माझा पहिलाच नंबर असायचा. पण कोठेतरी मी खालचा आहे ह्या भावनेमुळे मी अतिशय दुखावला गेलो. काही दिवस मी ह्या गोष्टीचा सातत्याने विचार करायचो, पण गवसत काहीच नव्हते. मग एक दिवस हिम्मत करून आईला विचारलेच, 'आई आपण ब्राम्हण होऊ शकत नाही का?' आई म्हणाली, 'बेटा जात ही जन्माशी जुळलेली आहे. ती बदलल्या जाऊ शकत नाही. पण माणूस मोठा जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो. तुला अभ्यासात शिवछत्रपतीचा इतिहास आहे ना, ते ही आपल्यासारखेच खालच्या जातीचे होते. पण त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळे ते मोठे झाले. त्यामुळे ह्यापुढे तू आपल्या अभ्यासात लक्ष दे आणि असल्या फालतू गोष्टी विचारू नको. जा पळ खेळायला.' आई फक्त चारच वर्ग शिकली असल्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरांबद्दल ती काहीच सांगू शकली नाही. पण नंतरच्या काळात ह्या महापुरुषांचा अभ्यास करण्याचा योग आला आणि मी धन्य झालो. जोशी साहेब देशपांडेच्या मुंजेच्या निमित्ताने जो एक न्यूनगंडाचा संस्कार माझ्यावर पडला असता तो आईने शिवाजीचा इतिहास सांगून पुसून टाकला. पण आमच्या ८५ टक्के लोकसंख्या असलेल्या बहुजन समाजाच्या प्रत्येक पाल्याचा आईला हा न्यूनगंडाचा संस्कार पुसताच येईल असे नाही आणि म्हणूनच माझ्या दृष्टीने हा प्रश्न फार गंभीर आहे. उपनयन सारख्या संस्कारातून तुम्ही हिंदु धर्मात दोन विषमता निर्माण करता. 

१. वर्ण विषमता : ह्यातून ब्राम्हण हिंदु व शुद्र हिंदु अशी हिंदुची विभागणी होते. 
२. स्त्री पुरुष विषमता : हिंदु धर्म संपूर्ण स्त्री वर्गाला शुद्र समजत असल्यामुळे मुलींवर उपनयन संस्कार होत नाही व त्यामुळे निर्माण होणारी विषमता. संदीपची जेव्हा मुंज होत होती त्यावेळेस होऊ शकते तुमच्या छोट्या मनिषालाही वाटले असावे, असाच सुंदर सोहळा माझ्यासाठी का बर न व्हावा. अशाच सुंदर भेटवस्तू मला का न मिळाव्या ? 
 
 जोशी : बरोबर आहे. मनिषाही मला विचारत होती, बाबा माझी मुंज केव्हा होणार.' तेव्हा मी तिला सांगितले, 'मुंज फक्त मुलांचीच होते, मुलींची नाही.' थोड्या वेळाकरिता ती पण हिरमुसली होती. 
 
 मी : भारतात आजही हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच मुली पायलट आहेत. त्यातील रुपाली नावाच्या एका पायलटची मुलाखत रेडीओवर चालू होती. ती म्हणाली, 'माझ्या आईवडिलांना आम्ही सर्व बहिणीच. त्यामुळे मुलामुलींबद्दलचा भेदभावच आमच्या घरात निर्माण होऊ शकला नाही. त्यामुळेच लहानपणची पायलट होण्याची इच्छा, मध्यमवर्गीय कुटुंब असतानाही माझ्या वडिलांनी पूर्ण केली.' जोशीसाहेब पायलटचे प्रशिक्षण म्हणजे लाखो रुपयांचा खर्च. ज्या घरात मुलगा असेल तेथे मायबाप हा खर्च मुलावर करतील व मुलीला डावलतील. हा मुलींवर अन्याय नाही का? आणि धार्मिक संस्कारातून हा भेद आम्ही मुलामुलींवर घट्टपणे बिंबवतो, नाही का? 
 
 जोशी : पण मग आता तुम्ही लोकही मुंज करत चला ना. लोकशाही आहे. आता तुम्हाला कोण रोखतो. कामना 
 
 मी : जोशी, परिस्थिती बदलली आहे. मुंज करण्यासारखी अजून एक नवी परंपरा वा रुढी बहुजन समाजात घुसडून त्यांचा उगाच वेळ बरबाद याचा आमचा मानस नाही. पण तुम्हा ५ टक्के ब्राम्हणांना जर बहुसंख्याक हिंदुबहुजन समाजात समाविष्ट व्हायचे असेल तर तुम्ही आपले जातीय संस्कार झिडकारून आमच्यात या. आम्ही तुमचे खुल्या मनाने स्वागत करू. ब्राम्हण हा हिंदु धर्मातील बुद्धीजिवी वर्ग. हिंदु धर्मातील काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाच्या मेहनतीवर पोसल्या गेलेला वर्ग. पण ह्या वर्गाने आपल्या बुद्धीचा उपयोग आतापर्यंत स्वस्वार्थासाठी व बहुजनाच्या अहितासाठीच केला असा इतिहास आहे. तुम्ही बुद्धीवान असण्यात तुम्ही शिक्षणाचा अधिकार स्वत:पर्यंत मर्यादीत केला हा एक भाग आहे पण त्याही पेक्षा मोठी भागीदारी बहुजनसमाजाची आहे ज्याने तुमच्या खाण्यापिण्याची सोय दान-दक्षिणा देऊन फुकटात केली. काबाडकष्ट करुन एखाद्या शेतकऱ्याने आपल्या मुलाला मोठा डॉक्टर बनवायचे व त्यानंतर त्या मुलाने आपला बाप गावंढळ व गरीब म्हणून नाकारायचे हे बरोबर नाही. हा पोरगा कितीही हुशार असो पण बापाने त्याच्या शिक्षणाची व पोटापाण्याची व्यवस्था लावली नसती तर हा पोरगा डॉक्टर झाला असता का ? आता तुम्ही लोकांनीही आपला जातीय अहंकार सोडून ह्या बहुजन समाजाच्या विकासासाठी ह्यापूढे राबावे. ह्यामुळे ब्राम्हण म्हणून असलेली तुमची ओळख जाईल पण मानवतावादी म्हणून तुमची नवी ओळख निर्माण होईल. शाहू महाराज म्हणतात, 'जपान देशातील सामुराई जातीने म्हणजेच त्या राष्ट्रातील क्षत्रिय वर्णाने, त्यांच्यातील जातीनिबंध मोडून टाकण्याच्या बाबतीत पुढाकार घेतला तसा येथील ब्राम्हणांनी घेतला पाहीजे.' ह्यातल किती तुम्ही करू शकता हा तुमचा निजी मामला आहे. पण शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर ह्या आमच्या बहुजन समाजातील महापुरुषांच्या आचरणाने व विचाराने आम्ही आमच्या समाजाला जागृत करू एवढेही निश्चित. 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209