मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
असे जे हिंदू लोक विचारतात त्यांच्या विचार शून्यतेचे मला मोठे आश्चर्य वाटते. हिंदुस्थानातील शीख, मुसलमान व ख्रिस्ती हे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते व तेही बरेचसे शूद्र व अस्पृश्य होते. ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला, ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यांचा काहीच अभ्युदय झाला नाही, असे या टिकाकारांना म्हणावयाचे आहे काय? व हे म्हणणे जर सत्य नसेल, धर्मांतराने त्यांचा उत्कर्ष झाला आहे हे जर कबूल करणे प्राप्त असेल तर मग धर्मांतराने अस्पृश्यांचे काहीच कल्याण होणार नाही असे म्हणणे किती अन्यायार्थ होईल याचा त्यांना अवश्य विचार करावा. धर्मांतराने काही होणार नाही या म्हणण्याचा गर्भित अर्थ धर्म हा अगदी कुचकामाची वस्तू आहे, असाच निघु शकतो. धर्म हा कुचकामाची वस्तू आहे, तिच्यापासून काही लाभ नाही, हानी नाही असे त्यांचे म्हणणे आहे, त्यांनी अस्पृश्यांनी हिंदू धर्मातच राहिलं पाहिजे असाच आग्रह का धरावा मला समजत नाही, त्यांना धर्मात काही अर्थ नाही असे वाटते तर कोणता धर्म सोडला आणि कोणता घेतला याबद्दल अशा लोकांनी वितंडवाद का करावा? नुसत्या धर्मांतराने काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांना नुसत्या स्वराज्यापासून काय होणार, असे हिंदुस्थानातील लोकांना देखील विरारता येईल. प्रथम आर्थिक व शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे. हे जर खरे आहे तर नुसत्या स्वराज्याचा काय उपयाग? आणि नुसत्या स्वराज्यापासून जर देशाचा काही फायदा होत असेल तर धर्मांतरापासून अस्पृश्यांचा फायदा झालाच पाहिजे. खोल विचारांती सर्वास मान्य करावे लागेल जी जितकी स्वराज्याचा आवश्यकता हिंदुस्थानाला आहे तितकेच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. धर्मांतर आणि स्वराज्य या दोघांचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य हे जर मनुष्य मात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर ज्या धर्मांतरापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाही.