मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो कि माणूस धर्माकरिता नाहीं धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटना करावयाची असेल तर धर्मातर करा. सामर्थ्य संपादन करावयाचे असेल तर धर्मातर करा. समता प्राप्त करावयाची असेल तर धर्मातर करा. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करावयाचे असेल तर धर्मातर करा. जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जी धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता? ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात मायाकाची माणुसकी ओळखणे अधर्म मानता जातो, तो धर्मं नसून रोग आहे. ज्या अति अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाला स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धन संचय करू नये. शस्त्र धारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्थनांना निर्धन रहा, अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.
धर्मातराच्या बाबतीत जे जे काही प्रश्न उदभवतात त्या त्या प्रश्नांचा मा यधामती उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रश्नावरील माझे विवेचन कदाचित पाल्हाळीक झाले असेल; परंतु या विषयाचा सांगोपांग विचार करण्याचे मी पूर्वीपासून ठरविले होते. धर्मातराच्या बाबतीत विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांना उत्तर देणे आवश्यक होते. धर्मातराच्या घोषणेची सार्थकता पटल्या शिवाय कोणीही धर्मातर करू नये, असे माझे मत आहे आणि त्यामुळे सविस्तरपणे या प्रश्नाचा विचार मला करावा लागला आहे. माझे विचार तुम्हाला कितपत पटतील हे मी काही सांगू शकत नाही. परंतु तुम्ही ते पूर्णपणे ध्यानात घ्याल अशी मला आशा आहे. रुचेल ते बोलावे अशा रीतीने लोकप्रियता मिळविणे हे व्यावहारिक माणसाला शोभते पण ते पुढाऱ्याला शोभणार नाही, असे माझे मत आहे. लोकांचे बरे कशात आहे व वाईट कशात आहे हे सांगणे माझे कर्तव्य कर्म आहे. ते तुम्हाला रुचले नाही तरी ते सांगणे मला भाग आहे. माझे कर्तव्य कर्म मी केले आहे. आता या प्रश्नाचा निर्णय करणे हे कर्तव्य कर्म तुमचे आहे. धर्मातराच्या प्रश्नाचे या मुद्दाम दोन विभाग केले आहेत. हिंदु धर्माचा त्याग करावयाचा कि हिंदु धर्मात राहावयावें, हा त्याचा एक भाग आहे, त्याग करावयास झाल्यास कोणत्या धर्याचा स्विकार करावयाचा किंवा नवीन धर्माची उभारणी करावयाची हि प्रश्नाचा दुसरा विभाग आहे. मला फक्त आज पहिल्या प्रश्नावरच तुमचा काय निर्णय आहे. ते जाणून घ्यावयाचे आहे. पहिल्या प्रश्नाचा निर्णय झाल्या शिवाय दुसऱ्या प्रश्नाचा विचार करावयास झाल्यास त्या बाबतीत तयारी करण्यात काही अर्थ नाही. तेंव्हा पहिल्या प्रश्नावर काही करावयाचे आहे ते ठारवा. तुम्हाला ते ठरविण्या करिता दुसरी संधी मला देता येणार नाही. आज या सभेत जे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे मग पुढचा कार्यक्रम मी ठरवीन. तुम्ही जर धर्मांतराच्या विरुद्ध निर्णय केला तर प्रश्नच मिटला. माझ्या स्वत: करता जे मला करावयावे असेल ते मग मी करीन. तुम्ही धर्मांतराच्या तर्फेचा निर्णय जर केला तर त्या बरोबरच तुम्ही सर्वांनी संघटीत रुपाने धर्मातर करण्याचे आश्वासन दिले पहिजे, धर्मातराचा निश्चय झाला तर वाटेल त्याने वाटेल त्या धर्मात जावे. अशा प्रकारची फाटाफूट तुम्ही जर करणार असाल तर मी तुमच्या धर्मांतराच्या कार्यात पडणार नाही. तुम्ही माझ्या बरोबर यावे अशी माझी इच्छा आहे. ज्या धर्मात आपण जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नती प्रित्यर्थ जे काही कष्ट व परिश्रम करावे लागतात. ते परिश्रम करण्यास माझी तयारी आहे. परंतु मी सांगतो म्हणून धर्मातर केले पाहिजे, या भावनेला वश होऊन काही करू नका. तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या. माझ्या बरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केलात तरी त्याबद्दल ही मला काही दुख होणार नाही. उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणुन मला आनंद वाटेल. हा निर्वाणीचा प्रसंग आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवालच. तुमच्या भावी पिढीची भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार नाही. तुम्ही आज स्वतंत्र होण्याचा निश्चय ज़र केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल. तुम्हा आज़ पराधीन राहण्याचा निक्षय केला तर भावी पिढी सुद्धा पराधीन राहील, म्हणून तुमची जवाबदारी अत्यंत कठीण आहे.
याप्रसंगी तुम्हाला काय सांगावे याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षु संघास मरण्यापूर्वी जो उपदेश केला व ज्याचा 'महापरिनिर्वाण सुत्तात" उल्लेख केलेला आहे, त्याची मला आठवण होते. एकदा भगवान नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुषमान आनंद भगवंताकडे येऊन त्यास अभिवादन करुन एक बाजूस बसला आणि म्हणाला : "भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारी असताना असताना पाहिले आहे. भगवंताच्या आजराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे. मला दिशाभम झाला आहे. मला धर्मही सुचत नाही परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की, थिक्षु संघा विषयी काही तरी सांगितल्या शिवाय भगवंताचे परिनिर्वाण व्हायचे नाही." भगवान बुद्धांना उत्तर दिले कि, "आनंदा, भिक्षु संघास मजपासून काय हवे आहे? आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्यात तथागताने आचार्यसूप्ती मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा, तुम्ही दिव्या प्रमाणे स्वय प्रकाशित व्हा. पृथ्वी प्रमाणे परप्रकाशित राहु नका. स्वतः वरच विश्वास ठेवा, दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका. सत्याला धरून राहा! सत्याचाच आश्रय करा. व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका." मी देखील बुद्धाच्याच शब्दाचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो कि तुम्ही आपले आधार व्हा. स्वतःच्या बुद्धीला शरण जा. दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका. दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका. सत्याचा आधार घ्या. सत्यास शरण जा. दुसऱ्या कोणासही शरण जाऊ नका. हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे कि तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही.
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर