अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
मी : आप आपल्याला आपल्या धर्माबद्दल तरी किती माहीती आहे ?
साळवी : मला आपल्या धर्माबद्दल पूर्ण माहीती आहे.
साळवी : महाभारत
मिसेसे साळवी : रामायण
राजेश : वेद
मी : हे बघा, येथेच तुम्हा तिघांची तीन उत्तरे आली. आणि राजेश ज्या वेदाबद्दल तु बोललास, ते वेद वाचण्याचा अधिकार फक्त 5 टक्के ब्राम्हणांपुरता मर्यादित होता. ज्या धर्माचे आम्ही अनुयायी आहो त्या धर्माचा धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार वर्णव्यवस्थेनुसार, शुद्र असल्यामुळे, आम्हास नव्हता. रामायणात एक प्रसंग आहे. शुद्र शंबुक ऋषीनी जेव्हा वेदपठनाचा असा प्रयत्न केला, तेव्हा रामाने, शंबुकास मृत्यूदंडाची शिक्षा दिली. अगदी अलीकडच्या काळात बघतो म्हटल तर, संत तुकारामांनी, शुद्र असुनही, अभंग लिहल्यामुळे , त्यांच्या गाथा ब्राह्मणांनी नदीत बुडवून दिल्या होत्या. शुद्रास, शस्त्र धारण कण्याचा अधिकार नसतानाही, मोघल साम्राज्याशी लढा देऊन, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मीती केली. पण जेव्हा शिवरायांनी राज्याभिषेकाचा प्रस्ताव मांडला, त्यावेळेस पुण्याच्या ब्राम्हणांनी हा प्रस्ताव, हे म्हणून नाकारला, की शिवाजी हे शुद्र होत. शेवटी शिवाजींनी वाराणसीवरून गागाभट्ट ह्या ब्राम्हणास, भरपूर मोबदला देऊन बोलावले व स्वत:चा राज्याभिषेक करून धेतला. आजतरी ह्या वैज्ञानिक युगात उगाच आमच्या धर्माचा अभिमान बाळगण्याच कारण नाही. विज्ञानाच्या प्रगती मुळे शंभर टक्के आपला धर्म कोणीच मानत नाही. आणि आमच्यासाठी तर ते फारच अवघड आहे. कारण हिंदु धर्म मानल्यास, आम्ही शुद्र वर्णीय ठरतो. आणि शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही. आज आमच्या बहुजन समाजात जेवढेही शिकलेले लोक आहेत, ते ह्या अर्थाने, धर्मभ्रष्टच ठरतील. धर्म पाळण्यासाठी ब्राम्हण मांस मच्छी खात नसत. पण आता ब्राम्हणही सशक्त आरोग्यासाठी मांस मच्छी खातात. इस्लाम मध्ये दारू वर्ज्य आहे, पण कित्येक मुस्लीम, मद्यालयात भेटतात. बुध्द धर्मानुसार मास खाण वर्ज्य आहे. पण सर्वात जास्त मास खाण्याचे प्रमाण, मी माझ्या बुध्द धर्मीय मित्रातच पाहीले आहे. मग ह्या सर्वच लोकांना आम्हास धर्मभ्रष्ट म्हणावे लागेल. धर्म हा खरा तर कर्मकांडापेक्षा आचरणत आणायचा असतो. रस्त्यावर पडलेल्या एखाद्या माणसाला बघून, फक्त दु:ख व्यक्त करणार्या सभ्य गृहस्थापेक्षा, एखाद्या दारूड्या जर त्याला दवाखान्यात नेत असेल, तर तो दारूड्या, माझ्या दृष्टीने तो जास्त धार्मीक आहे. तुकाराम महाराजांनी म्हणूनच ह्याची कसोटीही सांगीतली आहे.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे तो आपुले ।
देव तेथेची ओळखावा, साधू तेथेची जाणावा ॥
विज्ञानाच्या प्रगतीबरोबर मनुष्याचे बदलेले आचरण हाच त्याचा धर्म. आणी हे आचरण वा हा धर्म मनुष्याची आर्थीक परिस्थीती व नैतिकता ठरवित असते. आर्थीक परिस्थिती खुप चांगली असल्यामुळे चंगळवादी जीवन जगणारे हे अधार्मीक, तर गरीब असुनही एका पैशाचीही बेईमानी न करणारे जास्त धार्मीक धर्माची माझी ही अशी व्याख्या आहे.
साळवी : धर्माबद्दल तुमची ही व्याख्या, तर देवाबद्दलची काय आहे ?
मी : माझ्या दृष्टीने देव ही कल्पना आहे. जोपर्यंत ही कल्पना समाजहितासाठी राबत असेल तर त्यात काही आक्षेपार्ह नाही. परंतू जर ह्या कल्पनेच्या अस्तित्वातून कुणी पंडीत, भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करीत असेल तर, हेही कल्पना नाकारण्याची आम्ही तयारी केली पाहजे.
प्रश्न : तुम्ही म्हणता देव नाही, मग आमच्या मनात, देवाची निर्मिती कशी होते ?
उत्तर : खरेतर जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याच्या डोक्यात देवाची वगैरे कुठलीही कल्पना नसते. संस्कारातून देवाबद्दलची प्रतीमा आमच्या मनात निर्माण होत असते. तुम्हाला समजण्यासाठी एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या ऑफीसमध्ये मानसशास्त्र ह्या विषयावर व्याख्यान करण्याासाठी एक बाहेरचे प्रख्यात वक्ते येणार होते. ऑफीस मधील आम्ही सर्व सहकारी सभागृहात जमलो होतो. तेवढ्यात फोन आला की काही महत्वाच्या कारणामुळे प्रायोजीत वक्ता येणार नाही. मी माझ्या बॉसला म्हटले. मी देतो व्याख्यान मानसशास्त्रावर. आता ऑफीसमधील मंडळी माझ्या नित्याचीच ओळखीची. त्यांतील श्री. डिसुजा, श्री. शेख, श्री. कांबळे, श्री. देशमुख ह्या चार व्यक्तींना बोलविले. प्रत्येकाला एक कोरा कागद दिला. व म्हटले तुम्ही एका वाक्यात देवाबद्दल काहीतरी लिहा व कोरा कागदावर आपले नाव वा देवाचे नाव लिहु नका. मी वाक्य वाचूनच, कुणी काय लिहीले आहे, हे सांगेल. ठरल्याप्रमाणे सर्वांना कागद दिले. मी वाक्य वाचले व कोणते कुणाचे आहे हे सर्वासमक्ष 100 टक्के खरे सांगितले.
साळवी : आपण हे कसे करू शकला ?
मी : मी आधीच बोलविलेले लोक, ही चार वेगवेगळ्या धर्माची होती त्यामुळे, त्यांच्या मनात देव म्हणजे काय ? ह्याबाबतचे उत्तर त्यांच्या धर्मानुसार येणार होते. श्री. डिसुझा ह्यांच्या डोळ्यासमोर येशु होता. त्यांनी लिहीले होते, ‘देव, खूप दयाळू असतो.’ मुस्लीम धर्मीय शेखनी लिहीले होते, ‘देवाची रोज प्रार्थना केली पाहिजे.’ मुस्लीम लोक दिवसातुन 5 वेळ नमाज वाचतात, त्यामुळे हे वाक्य त्यानी लिहीले होत. श्री. कांबळे जे की बुध्द होते त्यांनी लिहीले होते, ‘करूणेचे दुसरे नाव म्हणणजेच देव.’ श्री. देशमुख जे की हिंदु होते, त्यांनी लिहीले होते. ‘देव मुर्तीत वास करतो.’ जर देव एकच आहे तर, देवाबद्दल त्यांच्या माहीतीत साम्य असायला पाहिजे होते परंतू ते वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांचे धार्मीक संस्कार भिन्न होते आणि म्हणूनच त्यांनी देवाबद्दल वेगवेगळी माहिती दिली. ह्याचाच अर्थ मनुष्याला ज्याप्रमाणे संस्कारीत केले गेले, त्याप्रमाणेच त्याची मानसिकता बनते. कमीतकमी देवाची कल्पना ही मानसिक संस्काराचा भाग आहे, एवढ तरी तुम्ही निश्चित मानाल.