मोहन देशमाने.
सातारा स्टँडवर आलो. डोक्यात एकच विचार पक्का झालेला. “मी पुन्हा शिपाई म्हणून काम करणार नाही.” सगळेच मार्ग खुंटले. घरी सांगून तरी काय उपयोग ? ते काय म्हणणार - "बढती गेली तरी शिपायाची नोकरी आहे ना! तीच कर.” ज्या बापूजी साळुखेनी मला सातारच्या सदाशिव पेठेतून हायस्कूलवर शिपाई केले. आणि सांगितलं, “तू चित्रं काढतोस, कविता लिहितोस. लेखनिक होऊ नकोस. शिक्षक हो." त्यांनी शिक्षक म्हणून बढती दिली. त्याला गरजेची होती फक्त हेडमास्तरची शिफारस. ती हेडमास्तर देत नव्हते. त्यांना व्यवहार साधायचा होता. तर दबा धरून बसलेल्या काही मंडळींना मला थांबवावयाचे होते.
कोणाला काहीही न सांगता निघालो. गणपती पाहण्यासाठी माणसांचे तांडे पुण्याकडे निघाले होते. गर्दी मरणाची होती. एस.टी.पेक्षा ट्रकवाले कमी पैसे घेतात, हा विचार करून स्टैंडबाहेर ट्रक पकडला. ट्रकची चाके फिरत होती. मागे मटकन बसलो होतो. लिंब खिंड आली. तसा मनात कल्लोळ सुरू झाला.
चंदल वंदनचा हा सुलपानी डोंगर. त्याच्याशेजारी उभी असलेली दगडाची गवळण-त्यापलीकडे मेरूलिंगचा डोंगर आणि पायथ्याशी वसलेली गावे. बारा वाड्यांचे गाव-सायगाव. मेरूलिंगाच्या डोंगरात उगम पावलेला ओढा जसा वळण घेत वहात जातो तसे गाव वसलेले. त्या ओढ्याच्या काठाला मावळतीकडे तेल्यांची घरे.
आम्हा आठ भावंडांसाठी खांद्यावर पोती घेऊन “शेंगा, धने, घेवडे हायत का ?" म्हणून वाड्या-वस्त्या शोधणारे वडील. तो माल घरी येताच मान पाठ एक करून निवडणारी आई. पहाटे चार वाजल्यापासून बैलाला झापड बांधून घाना घेणारे वडील. “माझी लेकरं जगली पाहिजेत.” ही उमेद, पण १९७२ च्या दुष्काळाने सगळाच इसकोट केला. त्यात भुईंजेला साखर कारखाना सुरू झाला. शेंग पीक कमी होऊ लागले. घर चालविणे कठीण झाले. आणि तेव्हाच ही सर्व कुतरओढ थांबविण्यासाठी सातारची सदाशिव पेठ, मग खोजेवाडी हायस्कूलवर शिपाई म्हणून नोकरी केली. कधी कधी शेणही उचलले. हाताने शाळा सारवली. डोळ्यांतले अश्रू पुसणारे भेटले. शामराव घोरपडेचे बंधू अप्पा. ते मला प्रिय होते. मी असा उद्ध्वस्त मनाने वावरत होतो. त्यांनी मला ब्रश दिला. रंग दिले. मी चित्रे काढू लागलो.
या गोष्टींचा उजाळा करण्यात पुण्याचे स्वारगेट आले. बाहेर मुसळधार पाऊस. तसाच स्टँडवर बसलो. झोंबणारा वारा अंगावर घेत झोपलो. सकाळी स्टँडवर तोंड धुऊन मंडई शोधत निघालो. मंडईत शरद कश्यप होता. एक चळवळ्या मित्र. सातारला सुतारकाम करून जगणारा; चळवळ हा त्याचा केंद्रबिंदू. सध्या तो पुण्यात मंडईत असतो. त्याला भेटावे म्हणून मंडईत गेलो. शरद समोर आला. "चल, कधी आलास?"
“रात्री'
“गणपती पहात पहात इकडे आला असतास तर रात्रीच भेटला असतास. चला, चहा घेऊ."
पेल्यातले पाणी गटागटा जेव्हा पोटात गडगड करीत गेले तेव्हा शरद सावध झाला. उपाशीपोटी दिवसदिवस राहून वावरताना हीच अवस्था होत असते हे त्याने ओळखले.”
“मग नवं, जुनं काय? अरे हो, तू शिक्षक झालास ना? परवा विजय मांडके म्हणत होता...'
“सर्व गोष्टी पुरात वहात गेल्या." “नक्की काय झाले?"
“नक्की एकच. मला पुन्हा शिपाई व्हावे लागत आहे. आणि यासाठी मी नोकरी सोडली."
“अरे मूर्ख आहेस. अजून विचार कर. मला हा जातीचा सुतारकीचा धंदा करावा लागतो. असेल काम तर जेवतो. नसेल तर उपवास. हे कठीण आहे."
"शरद, एक काम कर. इथं पेंटरकडे काम बघ. बोर्ड करीन मी."
"रहाणार कुठे ? तू बघितलेस मी कुठं रहातो ते." .
"रहाण्यास माझ्या मावसबहिणीकडे जाईन. पण काम बघ."
दोघेही चार-पाच पेंटरकडे गेलो. सगळे पेंटर सुस्तावले होते. गणपती बसताच त्यांना विश्रांती मिळाली होती. गणपती जातील तेव्हा कामाचे पाहू हाच स्वर होता. शरदचा निरोप घेतला. पावले स्वारगेटकडे निघाली. बाहेर पाऊस. त्यात गणपती उत्सव. स्टँडवर मोकळी जागा मिळणे कठीण. तसाच बसलो. पोटात दिवसभर शरदने दिलेला चहा होता; आणि भूक, डोक्यात चीड. रागवणार कुणावर? तसाच एका बाकड्यावर बसलो. डोळे झाकले तरी झोप येईना. शबनममध्ये कागद होते. कविता लिहू लागलो.
दहा-बारा पाने झाली कविता लिहून. रोजगार करून जगणाऱ्या घरातली मुलगी. ती वयात येते आणि तिचा होणारा कोंडमारा. तसाच रात्री कधीतरी झोपलो.
पहाटे जागा झालो. डोळे चुरचुरत होते तसाच बसलो. जेव्हा उजाडले तेव्हा स्टँडबाहेर येऊन कॅनॉलवरच प्रातर्विधी उरकून तोंड धुतले. कर्वे रोडला अनाथ महिलाश्रम आहे. नळस्टॉपजवळ. तेथे बेबी रहाते. सर्व नातीगोती असून निराधार असलेली ही मावस-बहीण गावी आली होती तेव्हा पत्ता सांगितला होता. कर्वे रोड, त्या ठिकाणचे वसतिगृह. उगवत्या सूर्याला पाठ करून कर्वे रोड शोधत निघालो. चालून दमलो. तेव्हा कुठे वसतिगृह सापडले, आणि बेबीताई.
"अरे मोहन..."
ताईच्या डोळ्यांत आनंदाश्रू मावत नव्हते. मीच पहिला नातलग तिला शोधत आलेला होतो.
“आलो आहे परवाच."
"काका-मावशी बरी आहेत?"
“हो, सर्व ठीक आहे.”
"चल, चहा घेऊ. गणपती पाहावयास आलास ? "
“नाही, नोकरी सोडली. पेंटरकडे काम करतो."
“रहातोस कुठे?"
“मंडईत एक मित्र आहे. त्याच्याकडे'
“सर्व ठीक आहे?'
"हो, ठीक आहे. ताई, इथे भारती विद्यापीठ कुठं आहे ? तिथं हरिष देशमाने असतो. भेटेल म्हणतो."
ताईकडे चहा घेतला. तिने सांगितल्याप्रमाणे भारती विद्यापीठाकडे निघालो. आपली व्यथा ताईला सांगावी, तिची मदत घ्यावी हा विचार होता. पण जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा माझी मला लाज वाटली. एक अबला असून संकटावर मात करून जगत आहे. आणि मी? तिला मदत न करता उलट तिलाच मदत मागू पहात आहे. हेही दार बंद झाले.
भारती विद्यापीठात हरिष भेटला. जरा मन हलके झाले. त्याच्याबरोबर पुन्हा चहा घेतला. त्याला सविस्तर सांगितले. ठरवले. परवा तळेगाव दाभाडे येथे बाळासाहेब बारमुखांकडे जाऊ. जातवाले म्हणून सहकार्य मागू! एखाद्या शाळेत लावतील कामाला हा विचार केला. हरिषकडून दोनतीन रुपये घेतले, त्याने मला टिळकरोडला सोडले आणि तो गुलटेकडीकडे ढोलेमळ्यात गेला. एका रुपयाची मिसळपाव पोटात गेली तेव्हा हायसे वाटले. चौकाचौकात अंधार पडू लागताच माणसांचे तांडे गोळा होत गेले. त्या गर्दीत आपणही मिसळावे आणि धक्के देत-घेत जावे हा विचार पोटातल्या भुकेमुळे फिक्का पडला होता. स्वारगेट स्टँड आता चांगलेच परिचित झाले होते.
कालच्या कवितेचा पुढचा भाग सुरू केला. पण आजही ती कविता तशीच राहिली. मनात आराखडा नव्हता. फक्त पोटातली भूक; ती शमविण्यासाठी डोक्यात स्फोट झालेला. त्याला शांत करण्यासही कविता उपयोगी पडत होती.