Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बांधलेली झापड तोडून टाकली

     सकाळी पुन्हा भटकंती. या भटकंतीमुळे ऐकून असलेले रस्ते आता ओळखू लागलो. एक-दोन पेंटर सापडले. पण त्यांचा असहकार तसाच; रात्री स्वारगेटवर आलो.

     पुन्हा कविता - ती मुलगी वेडी, देवळात रहाते. तिच्या जोडीला दुसरा वेडा. यांना गावाने वेडे ठरवलेले. गरिबीचा फायदा घेऊन गावपुढाऱ्यांनी तिची अब्रू लुटली आणि तिला वेडी ठरवून ते शहाणे झाले. नायक-बलुतेदार या व्यवस्थेला ठोकरतो, म्हणून गावगुंडी तिढ्यात अडकवला गेला, आणि वेडा झाला. हे लिहून मी झोपी गेलो. सकाळी कॅनॉलवर डायस प्लॉट विचारला. कॅनॉलकडेने चालत निघालो. कालपासून अंग खाजत होते. कपडे मळले होते. माणसांची वर्दळ कमी पाहून शर्ट काढला. शर्टच्या शिवणीतून पांढऱ्या उवा वळवळत होत्या. त्या मारून पँट-शर्ट कॅनॉलवर धुवून सुकवले. उन्हात थोडेफार सुकवून तसेच घालून डायस प्लॉटजवळ असलेल्या ढोले मळ्यात हरिषकडे गेलो. तेथून तळेगाव दाभाडे. तिथे बाळासाहेब भेटलेच नाहीत. तसेच आलो. हरिष गेला शिवाजीनगरवर सोडून. गणपतीतल्या गर्दीतून वाट काढीत स्वारगेट गाठले.

     एक बरे झाले होते. या जगण्याच्या मुळावरचा राग कवितेत उतरत होता... हे बदलणार कधी? यातच झोप लागली.

Story of teli o.b.c.      आज अनंत चतुर्थी. सकाळी सकाळी आठवले, गूळ आळी. त्या गूळ आळीतील तेली धर्मशाळा. लहानपणी भावकीतले लग्न इथे होते. तेव्हा आलो होतो. आज हा नवीन शोध; धर्मशाळा सापडली. मोठ्या दरवाजाचा दिंडी दरवाजा उघडा होता. आत गेलो. बोर्डवरील पंच मंडळींची नावे वाचत  होतो. वाचता वाचता एका नावासमोर थांबलो. अंबादास शिंदे, मेहुणे असलेले. तोच मळकट तेलकट कपड्यातले वयोवृद्ध गृहस्थ आले.

     "कोण आपन? काय पाहिजे?" 

     “मी देशमाने. सातारवरून आलो.” 

     तंबाखू मला खुणवत होती. ती घेऊन मळली.

     "अंबादास शिंदे ना? पांगुळ आळीत जा. शेलारवाडा विचारा. सांगेल कोणीही.”

     निघालो पांगुळ आळीत. आता एक सवय लागली; विचारणे. शोध करून शेलारवाडा सापडला. पायरीवर उभा राहून शिंदे यांची चौकशी केली.

     “आपण कोन ?" म्हणत शिंदे यांच्या सौभाग्यवती बाहेर आल्या. 

     “मी सायगावचा. मोहन दत्तात्रय देशमाने." 

     "दत्तूनानांचे चिरंजीव ना ? असे बाहेर का ?'

     तांब्याभर पाणी, कपभर चहा जेव्हा मिळाला तेव्हा मला समाधान वाटले. त्याच जोडीला नात्याचा जिव्हाळा. बोलता बोलता समजले, जवळच चंपाताई, ही एक माझी दुसरी मावसबहीण आहे. मला त्यांनी ताईकडे पोहच केले. गणपतीच्या गडबडीत दोन्ही घरांत “पुण्यात का आला?" हे कोणीच विचारले नाही. त्यामुळे खोटे बोलता आले नाही याचे समाधान वाटले. चंपाताईनं जेवणाचा आग्रह केला. गणपतीचा सण. पोटात भुकेची आग. पोटभर जेवलो आणि मग घर सोडले. चार-पाच दिवस पुण्यात असूनही गणपती पाहिले नव्हते. आज पोटातली भूक कमी होती. विर्सजन मिरवणूक पहात बसलो. पाय दमले तेव्हा स्टँडवर गेलो आणि झोपी गेलो. आज लिखाण झालेच नाही. कविता तशीच राहिली.

     सकाळी सकाळी पुन्हा पेंटर शोधू लागलो. श्रीनाथ टॉकीजसमोरच्या रस्त्यावर एक पेंटरकडे विचारणा केली.

     “कामावर रहा. रोज एक रुपया.".

     "ठीक आहे." ब्रश हातात घेतला. समोर लक्ष गेले. सर्व खिडक्या. त्यात रंगलेले चेहरे. त्यांची पोटासाठी धडपड. अंगावर काटा उभा राहिला. मी कुठून कुठे आलो? आता कुठे जाणार? त्यापेक्षा हा रुपया महत्त्वाचा. पोटातील भूक भागते हे महत्त्वाचे. बोर्ड करू लागलो. रात्री स्वारगेटवर न जाता आता जागा बदलावी हा विचार केला. कारण पाच-सहा दिवसांत स्टँडवरचे पोलीस ओळखू लागले. रेल्वे स्टेशनवर स्वारगेटपेक्षा सुरक्षितता वाटली. एक रुपयाची मिसळ पोटात होती. कशीतरी झोप लागली. पाचसहा दिवस बुधवार पेठेत काम केले. मी खेडेगावातून आलेलो. कला कसली असणार? मालकाने दोन रुपये हातावर ठेवले; ‘काम बंद' सांगितले.

     रस्ते सापडतात-बंद होतात. आता नवा शोध! विजय देशमाने. लोणी-काळभोर. लोणीत गेलो. वहिनी भेटल्या. घरगुती गप्पा. विजयने येण्याचे कारण विचारले. काय सांगणार ? इथे बाबासाहेब मोहिते आहेत; बापूजी साळुखे यांचे जावई.

     सकाळी सकाळी गरम पाणी समोर आले होते. कितीतरी दिवसांनी अंघोळ केली. नाष्टा होताच विजय कामाला निघाला. मीही निघालो. मी बसस्टॉपवर न जाता स्टेशनवर आलो. पन्नास पैसे जवळ होते. तिकीट न काढता स्टेशनवर बाकड्यावर बसलो. तासाभरात एकाने पेरूच्या पाच-सहा पाट्या आणून ठेवल्या. गप्पा मारू लागला. गाडी येताच ‘पाट्या उचलून दे' म्हणाला. मी तिकीट काढण्याची अट घातली. पुणे स्टेशनवर आलो. आता पुढे काय हा विचार कुरतडू लागला.

     तशी कविता आठवली.

     सकाळी उठलो. बाळ अल्हाट एक कवी. पत्रातून मैत्री वाढलेली. एका कविसंमेलनात बाळ अल्हाट व गोरख भालेराव भेटलेले. तेव्हापासून मैत्री. अल्हाट येरवड्यात, आंबेडकर कॉलनीत राहतात हे लक्षात होते. पावले येरवड्याकडे निघाली. पूल ओलांडला. येरवडा आले. आंबेडकरनगर... विचारपूस सुरू, गुंजन चौक ओलांडला. चौकात सांगितले होते... पुढे एक मोठा चौक लागेल; तेथे विचारा. चौकाच्या कोपऱ्यावर एक पत्र्याचे घर. घरासमोर अठरा-एकोणीस वयाची मुलगी; तिला आंबेडकरनगर विचारले.  

     आंबेडकरनगरात बाळ अल्हाटांचे घर सहज सापडले. दारात उभा राहिलो. विचारणा केली,

     "बाळ अल्हाट आहेत का ?" 

     “आपन कोण ?" 

     “मी सातारचा. त्यांचा मित्र.” 

     "ते गावी गेलेत. चार-पाच दिवस येणार नाहीत.”

     “पाणी द्या.” 

     तांब्याभर पाणी पिऊन रस्त्यावर आलो. क्षणभर झाडाखाली बसलो. एकाला विचारले. त्याने सांगितले, “जवळ खडकी स्टेशन आहे." निघालो खडकीला. दोन-तीन तासांत पोहचलो. एका लोकलमध्ये बसून चिंचवड जवळ करू लागलो. दहा वर्षांपूर्वी अकरावी पास होताच काम शोधत नातलगाकडे आलो होतो. पंधरा-वीस दिवसांत त्याने तोंडावर हात फिरवून रवानगी केली होती. तो प्रसंग विसरू शकलो नव्हतो.

     बिनतिकिटाने चिंचवड आले. हा आनंद वेगळाच होता. आता भोसरी, भोसरीचे शिवाजी हायस्कूल व सुधाकर राजमाने. भोसरी विचारत निघालो. येणारे-जाणारे हसत. त्यांना विचारताच ते सांगत. पण इतके लांब पायी हा प्रश्न त्यांना पडे. मला त्याचे काहीच नव्हते. भोसरीत गेलो. हायस्कूल शोधले. पण राजमाने सर बदलून गेलेले, जवळच नेहरूनगरच्या शाळेत. शाळेत त्याच होते ही गोष्ट पक्की. पण ते शाळेच्या कामाला पुण्यात गेलेले. 'ठीक आहे. उद्या भेटू.' हा विचार करून जवळचे स्टेशन पिंपरी हे विचारून पिंपरी स्टेशनवरं आलो. आज किती चाललो याला मर्यादा नव्हती. डोके चक्रावून गेले.
 
     शबनममधील कविता काढली. 

     ती मजुरी करणारी होती. आज एका वसतिगृहात भाकरी भाजत आहे. तिचा काय दोष! बापाने गरिबाच्या पदरात हा विस्तव नको म्हणून लग्न लावले. मुलगा झाला आणि अपघातात नवरा मेला. आई-बापाकडे आली. टग्यांनी जाळी टाकली. अशोकने तिला आधार दिला. अगदी लग्नाच्या बायकोसारखा. पण गावच्या राजकारण्यांनी गावगुंडीत अशोकला गजाआड टाकले. ती उघड्यावर आली. सोबतीला पोर. त्याला हिणवले या व्यवस्थेने रखेलीचा पोर म्हणून. पोरगा सुडाने पेटलेला. शंभर-सव्वाशे पानांचे काव्य तयार झाले आणि झोपी गेलो, त्या पिंपरीच्या स्टेशनवरच.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209