Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बांधलेली झापड तोडून टाकली

     नेहरूनगरच्या शाळेत राजमाने सर भेटले. इथे दोघेही सविस्तर बोललो. गेल्या दहा-पंधरा दिवसांचे चित्र समोर होते. ठरले, बेळगावला जायचे. शिक्षकी कोर्स पूर्ण करायचा.

Story of teli o.b.c.      सरांकडून पंचवीस रुपये उसने घेतले. भोसरीत येऊन हॉटेलवाल्याचे बिल देऊन निघालो. एस्.टी.त बसल्यावर जाणवले, बेळगाव या पैशात येणार नाही. तेव्हा कराडवर उतरलो. कराडजवळ ढेबेवाडी रस्त्यावर तळमावले हे गाव. इथे मुक्काम आहे, पण साधे पोष्टही नाही. अशा गावात बापूजींनी कॉलेज सुरू केलेले. बापूजी आठवले की, यातना निवळते. याहीपेक्षा त्यांनी यातना सहन केल्या, आणि आज लाखो विद्यार्थी ज्ञानमंदिरातून बाहेर पडले. तळमावल्याच्या कॉलेजवर महामुनी सर भेटले.

     १९७३ ला खोजेवाडीत शिपाई म्हणून हजर झालो होतो. हातात झाडू आला होता. तेव्हा धीर दिला होता. त्यांच्याजवळ बरेच शिकलो. तेही माझ्यासारखे. मी शिपाई, ते लेखनिक होते. असेच शिक्षण घेऊन शिक्षक झाले.

     मुक्काम करून पंचवीस रुपये उसने घेऊन निघालो. का, कशासाठी कुठे याचा सुगावा लागू दिला नाही असेही नाही. फक्त बोललो, “रजा टाकून कोर्स पूर्ण करतोय." नोकरी सोडली सांगितलं असतं, तर ते रागावले असते.

     बेळगावच्या सिबीटीवर आलो. रात्र तिथेच काढली. सकाळी सकाळी खडे बाजारामधून बोगारवेसकडे गेलो. बेनन स्मित स्कूल ऑफ आर्टमध्ये जाईपर्यंत नऊ वाजले. तीन आठवड्यांत जसा माणूस भेटंल तसे बोलायचे. "कॉलेजवर नाव दाखल करा.” म्हणून बोललो आणि “मला बेळगावात नोकरी लागली.” हेदेखील सांगितले. अकरा वाजता बाहेर आलो.

     मार्केटमध्ये रवा मैद्याचे व्यापारी हुडकले. एका व्यापाऱ्याला नांदगिरीकरांची मिल विचारली. त्यांनी सांगितले “कंग्राळी माळावर जावा." मार्ग विचारून चन्नम्मा सर्कल हॉस्पीटलसमोरून सदाशिवनगर. बसवनगरजवळून कंग्राळी माळ सात ते आठ किलोमीटरचा मार्ग चालत गेलो. माळावर एक मिल होती. दुसरी बांधकाम सुरू झालेली. हीच नांदगिरीकरांची मिल उभी. शेडवजा खोली, आत टेबल-खुर्ची व सिमेंटचा ढीग. कृष्णाप्पा नोकर होता. मालकाचा पाहुणा म्हणून चहा दिला; सांगितलं. "कदाचित पाच-सहा दिवसांत येतील मालक.”

     चालत चालत कंग्राळा गल्लीत आलो. बेळगावातले दोन वर्षापूर्वीचे दिवस असेच होते. तेव्हा इथं मुसमाडे, अशोक जाधव ही महाराष्ट्रातून आलेली आणि मेडिकल कॉलेजला असलेली मुले होती. त्यांनी आधार दिला होता. दोन वर्षात संपर्क तुटला होता. कंग्राळा गल्लीत चौकशी केली. पहिल्या जागेवर तिथे कोणच नव्हते. रात्र रेल्वे स्टेशनवर काढली.

     सकाळी उठून कॉलेज.

     तेथून चालत चालत कंग्राळी माळावर नांदगिरीकरांची चार वाजेपर्यंत वाट पाहून पुन्हा परत चालणे. बेळगावात आल्यावर चालण्याचे प्रमाण वाढले. पोटात भूक पेटत होती.

     स्टेशनवर किंवा सिबीटीवर जाऊन झोपावे. भूक सहन होत नसेल तर नळावर पाणी पिणे. मेडिकल कॉलेजची ती मुलेही भेटेनात. का कोण जाणे त्यांना माझ्याविषयी आस्था होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी ताटातली चतकोर भाकरी देऊन मला आधार दिला होता.

     आर्ट कॉलेजमधील मित्रांना मी चुकवत होतो. कारण माझे हे असे उसवणे त्यांना दाखवू नये असे वाटत होते. कोर्ससाठीचे वर्ष गेले. पदरात निराशा आली. बाकी पेपरात सत्तर टक्के, ओरलला नापास. का नापास? उत्तर नाही. कोण म्हणे मी महाराष्ट्रीयन ; त्याचा राग. ओरल घेणारे कानडी शिक्षक काढतात. कोण म्हणे नंबर देतात, तेवढेच पास होतात. त्यासाठी पैसे मोजावे लागतात. कोणी काहीही म्हणो; पण दोन वर्षापूर्वी बेळगावात आलो तेव्हाच कोर्स पूर्ण होऊन पास झालो असतो, तर आज शिक्षक असतो. या कागदाच्या चिठोरीसाठी ही अशी दशा झाली.

     आज बेळगावला पाच दिवस उपाशीपोटी होतो. दोन दिवस कॉलेजवरही गेलो नाही. रेल्वे स्टेशनवर तसाच बसलो. पोटातली आग शांत होईना. समोर बसणारा माणूस जवळ आला. ही शोधक नजर दोन-तीन दिवस पाळतीवर आहे, हे लक्षात आलेच नाही. तो गप्प गप्प. मी बाहेर गेलो. स्टैंडसमोर हातगाडीवर चहा प्यालो. पैसे देण्याची वेळ आली. तेव्हा हात जोडून सांगितले, “उद्या देतो.” ती शोधक नजर पाणी पिण्यास आली होती. पुन्हा बाकड्यावर आलो. ती शोधक नजर जवळ बसली, मला बोलते केले. तुटकच बोललो, पण “मी अडचणीत आहे, पोटाचा प्रश्न ऐरणीवर आहे." हे मात्र त्याने निश्चित ओळखले. अशा वेळी धर्मांतर करणे, जगणे, मोठे होणे हा एक मार्ग त्याने सांगितला. “एक-दोन दिवसात सांगतो.” म्हणून मी सुटका करून घेतली.

     सकाळी उठलो. पाटील गल्लीतून गणपती गल्ली. तेथून चालत सर्कलमार्गे सदाशिवनगर मार्केटयार्डजवळून कंग्राळी माळ हा दहा-बारा किलोमीटरचा रस्ता सहा-सात तास चालत गेलो. बसवनगरला आलो तेव्हा फॅक्टरीचे बांधकाम दिसू लागले. वाळूच्या ढिगासमोर पांढरी गाडी दिसली, आणि पायाला वेग आला. वेगात विचार घुमत होते. जर इथे नकार मिळाला तर ?

     ती शोधक नजर; त्याच्या जाळ्यात मी अडकला जाईल का? किती रस्ते असे तुडविणार ? 

     अंगावरचे कपडे मळलेले, दाढी वाढलेली, अंघोळ नाही. केस विस्कटलेले. अशा तरुणाला, माझ्या घरच्यांना ‘हा आमचा आहे' हे चार माणसांत सांगावयास कमीपणा वाटेल. नांदगिरीकर हे तर लांबचे नातेवाईक. माझ्यासारखी चारपाचशे माणसे कामावर ठेवणारे. .

     इथे मार्ग मिळेल का ? 

     मी पांढऱ्या गाडीजवळ थांबलो. बाहेर कृष्णाप्पा होताच. त्याने 

     आत जाऊन सांगितले. कानडीतच मला हाक मारू लागला. मी दरवाज्यात गेलो. रघुनाथ नांदगिरीकर आणि पाच-सहा मोठी माणसे होती. या माणसात नांदगिरीकरांनी जवळ बोलवले. शंभर रुपयाची नोट दिली; आणि परत ये' म्हणाले.
आणि मला आधार भेटला. या शेडमध्ये मुक्काम करू आणि कोर्स पूर्ण करू हा माझा विचार सुरू झाला. रस्ता ओलांडून इंडलगा फॅक्टरीच्या कॅन्टीनमध्ये जेवणं करून बसने चन्नम्मा सर्कलला आलो. इथे योगायोग असा रघुनाथ मुसमाडे भेटले. सदाशिवनगरात जो मसनवाट आहे तेथे गेटसमोर म्हशीचा गोठा आहे. तिथे मुसमाडे रहातो. “मुक्कामाची सोय नसेल तर सोय होईपर्यंत रहा." म्हणाले.

     गेला एक महिना हा आसरा मिळण्यात गेला. घाण्याचा बैल घानवडीत फिरतो. जेथून निघाला तेथेच परत परत येत असतो. त्याला झापड बांधलेली असते. रात्रंदिवस काम करतो. बैल झापड काढू पहातो. झापड काढावी तर या गरगर फिरण्यात चक्कर येऊन संपून जाईल हा मालकाचा विश्वास असे. म्हणून त्याला झापड बांधावयाची. मी असा निघालो की, या व्यवस्थेने दिलेली झापड काढली. ओरबडून तोडून टाकली आणि बिनझापडेचा फिरू लागलो. गेल्या महिनाभर चक्कर येऊन कोलमडलो. ज्या बापूजींनी, साहेबराव पवारांनी, शामराव घोरपडे यांनी मला हमाली करता करता शिपाई केले, झाडू मारता मारता हातात ब्रश दिला; त्यांनी जो विश्वास टाकला तो अद्याप तडीस गेला नव्हता.

     ते प्रमाणपत्र मी मिळवणार आणि दिलेला विश्वास दाखविणार, हा रस्ता मिळाला होता.


(स्रोत- श्री. मोहन देशमाने यांची कथा, ‘ओबीसींच्या जीवनकथा', २००१)
 



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209