Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बबनची कहाणी 

लेखक - डॉ. सतीश शिरसाठ

     बऱ्याच वर्षांनी मी गावी गेलो होतो. गावात बरेच बदल झाले होते. विहिरी आणि आड जवळपास बंद पडले होते. चौकाचौकातून नळाची कनेक्शन्स् दिसत होती. नळाचे पाणी उंचावर चढत नाही, म्हणून जमिनीखाली खड्डे करून त्यातून नळाचे पाणी लोक भरत होते. त्या खड्ड्यांच्या आसपास चिकचिक झालेली होती. पूर्वीचा भकास तरीही निवांत गाव गजबजलेला दिसत होता. पण या गजबजाटामध्ये जिवंत सळसळ नव्हती. गळेकापू स्पर्धा आणि पळापळ होती. ओळखीचे बरेचसे संदर्भ दिसत नव्हते. लहानपणी दिसणारी कर्तबगार माणसं जगातून निघून गेली होती. जी अद्याप जिवंत होती ती अंथरुणाला खिळली होती. आताची कर्तीसवरती पिढी मला माहितीची नव्हती.

  story of Balutedar    सगळं बघून गुदमरायला झालं. 'चलो जमाना बदल गया है' असं मनाला समजावत एका सायंकाळी गावातून चक्कर मारत होतो. गावाबाहेरच्या पाराजवळ पोहचलो. तिथं पूर्वी एस.टी.स्टैंड होता. आता दूर एक मोठा एस्.टी.चा स्टँड बांधला गेला होता. तिथे एस्ट्या थांबतात. पूर्वीच्या एस. टी. स्टँडच्या जागेत कसले तरी ऑफीस झालं होतं. भिंतीवर काहीतरी लिहिलेले दिसले. तो मजकूर वाचायला कुतुहलाने जवळ गेलो. भिंतीवर त्या ऑफीसच्या कामकाजाव्यतिरिक्त पल्स पोलिओचे वेळापत्रक होते. 'कुठल्यातरी निवडणुकीत कुणाला तरी निवडून द्या' असं आवाहन लिहिलं होतं. अनेक माणसं गटागटानं उभी होती. कुणी बोलत बसले होते.

     "नानाऽऽऽ वडापाव घे ना."

     वडा-पावाच्या एका गाडीवरून कुणीतरी मुलगा मला म्हणाला. गावी मला माझे पुतणे 'नाना' म्हणत. त्याच्यावरून जवळजवळ सारे गाव मला 'नाना' म्हणू लागले होते.

     मी वडा-पावाच्या गाडीकडे गेलो. स्टोवर कढईत तेल तापत होते. अॅल्युमिनीयमच्या परातीत काही वडे काढले होते. एका पत्र्याच्या डब्यात काही पाव होते. मोठा झारा कढईवर ठेवत त्या मुलाने जवळच्या फडक्याला हात पुसले. कपाळावरचे केस मनगटाने मागे करत तो बळेबळेने काहीसा केविलवाणा हसत माझ्याकडे बघत राहिला.

     "तू... ? ” मला ओळख पटत नाही हे पाहताच तो म्हणाला,  “वरच्या आळीच्या बबन मिस्त्रीचा मुलगा मी. संपत बबन सुतार."

     माझ्या काळजात गलबलले. काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, "तुझी गाडी आहे का ही ? कधीपासून टाकली ? "

     “गेल्या वर्षी धौवीला होतो. दोन विषय राहिले. आईलापन मदत पायजे. तवा वडापाव विकायला लागलो. गाडी आपली नाही. चालवायला घेतली.'

     “किती मिळतात दिवसाला ?"

     “तसं काही नाही. शहरासारखं गिहाईक नसतं. कधी जास्त, कधी अंगावर पडतं. रात्रीची हीच भाजी आईन मी खाऊन टाकतो. गावातल्या गावात उधारीपन हाते.”

     "तुझी आई-भामावहिनीचं काय चाल्लंय ?"

     “शेतावर कामाला जाती. पन आता पहिल्यासारखं होत नाही. आठवड्यातून एक-दोन दिवस घरीच असते. पाय दुखतात.''

     गाडीवरची वडा-पावाची अवस्था बघूनच ते खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण संपतला काहीतरी मदत करायचीच असं वाटत होतं. एक कळकटलेला फाटक्या कपड्यातील माणूस पाय खाजवत आशाळभूतपणे गाडीकडं बराच वेळ पहात होती. तो कोणीतरी निघायचा- या भीतीनं जास्त 

     काही बोललो नाही. संपतला म्हणालो, "याला एक वडा-पाव दे.” हे माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्या माणसानं संपतकडून एक वडापाव घेतलाही.

     "मारत्या पळ." त्या माणसाला संपत म्हणाला. मारत्या खातखातच बाजूला पळत गेला.

     खिशात हात घालून मी वीसची नोट काढून संपतच्या पावाच्या डब्यावर ठेवली.

     "राहू दे. परत कधी आलो तर वडापाव घेईन. आज उपास आहे." माझ्या या वाक्याची संपत जणू वाटच पहात होता.

     स्टोची काजळी पीनने काढण्यात संपत रमला. तिकडे मारत्याचं खाणं संपलं होतं. पायजम्याला हात पुसत तो गावाकडं निघून गेला. मीही संपतचा निरोप घेतला.

     दुसऱ्या दिवशी काम संपल्यावर एस.टी.त बसून घरी निघालो. तिकीट काढून झाल्यावर निवांत बसलो; आणि संपतच्या-बबनच्या घराच्या आठवणी तुकड्यातुकड्याने डोळ्यांसमोर येऊ लागल्या.

     माझ्या जन्म याच गावातला. याच गावात मी लहानाचा मोठा झालो. अगदी शाळेतलं शिक्षण इथंच झालं. हायस्कूल संपल्यावर सायकलनं जवळच्या गावी कॉलेज केलं. नोकरीसाठी गाव सोडलं.

     गावचे दोन भाग होते. आम्ही खालच्या आळीला रहायला होतो. लहानपणी खेळायला कधी वरच्या आळीला जायचं तर बबनच्या घरी. सुतारवाड्यातील ते शेवटचं घर. तिथून पुढे ब्राह्मणांची वस्ती सुरू व्हायची. ती वस्ती म्हणजे गावचं टोक.


     बबन माझ्यापेक्षा थोडा मोठा असावा वयाने. कोंडीबाबा म्हणजे बबनचे वडील. कोंडिबा मिस्त्री नेहमी अंगणात उघड्या अंगाने कुणाचंतरी बलुत्याचं काम करीत बसलेले असायचे. कुणाचा कु-हाडीचा दांडा, कुणाची खुरप्याची मूठ करताना, वेळ असेल तेव्हा आम्हा पोरांना ते खोकडी करून देत. जेव्हा पहावं तेव्हा कोंडीबाबाचा हात आणि तोंड चालू असायचं.  त्यांच्या पुढे येणाऱ्या, असणाऱ्या प्रत्येकाला त्यांचे अनुभव, देवधर्माविषयी उदाहरणं देऊन खुलवून ते सांगत. एवढा शब्दसंग्रह आणि शैली त्यांनी कुठून मिळवली हे त्यावेळी कोडं होतं-आताही वाटतं. त्यांच्या गप्पा ऐकत बसणं हा एक सुखद अनुभव वाटायचा.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209