Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

बबनची कहाणी 

     बबनची भरभराट अशी चालू होती तसा त्याचा मित्रपरिवारही वाढू लागला. बबनच्या घरी किंवा कुणाच्या घरी त्यांच्या दारू-मटणाच्या पार्ष्या झडू लागल्या. दिवाळीत बबन भरपूर फटाके विकत आणी, आळीतल्या पोरांना वाटून टाकी. लक्ष्मीपूजनाच्या पहाटे गावाला जाग वरच्या आळीवरून बबनच्या हजार हजार फटाक्यांच्या आवाजाने येई. बबनचा दरारा वाढला. अरेरावीही वाढली. त्याला पैसा मिळत होता; तसा तो वाहतही होता. बबनचं लग्न अगदी थाटात झाले. लग्नासाठी गावातून त्याने दोन ट्रक भरून माणसे नेली होती. 

     काही दिवसांनी बबनला मुलगा झाला.

     बायको, मुलाला घेऊन बबन कुठं चालला की, सारेजण कुतूहलाने पहात रहात. मुलाला बाळोते म्हणून नवा कोरा टर्कीश टॉवेल असे. ऊन असेल तरी गोंड्याच्या कुंचीत मुलाला गुंडाळलेले असे.

     कधीतरी बैलगाडीतून देवाला, कुठल्या गावाला जाताना भामावहिनी मुलाला मांडीवर घेऊन बसलेली असायची. बबनच्या दोन्ही आयांपैकी कुणीतरी एकजण मुलाच्या आणि भामावहिनीच्या डोक्यावर छत्री धरून बसलेली. बाजारपेठेत कुठेतरी गाडी थांबवून भामावहिनी कुणाला तरी ऑर्डर द्यायची, “पोराच्या बापाला सांगा रे, गाडी चालली म्हणून." बबन कुठूनतरी सिगारेटचे झुरके घेत गाडीजवळ येई. वरच्या खिशातील नोटांचं बंडल काढून त्यातल्या काही नोटा न मोजता बायकोच्या हातात देई. गाडीतल्या आईकडे बघून म्हणे, “अरे, तुमी सगळ्याजणी चालल्या तर घर संभाळायला कोन हे?" काय ते समजून एखादी आई डोक्यावर पदर सावरीत हळूच खाली उतरून बाजारपेठ टाळून दुसऱ्या मार्गाने घरी चालू लागे. गाडीचालकाच्या पाठीवर थाप टाकत बबन त्याला विचार, “वैरन घेतली ना ?"

     "हा.” तो खालच्या मानेनं बोलून गाडी चालू लागे. ती दूरवर जाईपर्यंत बबन तिथेच सिगरटचे झुरके घेत उभा असे.

     बबनचं दारू पिणे प्रमाणाबाहेर वाढलं. एकदा गावात कीर्तन करायला कुणीतरी मोठे बुवा आले होते. सर्वांदेखत बबननं त्यांच्या हाताने तुळशीची माळ घातली. दोन दिवस ते टिकलं. बबननं दारू पिणं परत सुरू केलं. दारू पिऊन ट्रॅझिस्टरची गाणी ऐकत तो दिवसदिवस स्वतःच्या किंवा कुणाच्या तरी घरी पडून राही. कामावरचं लक्ष उडू लागलं. कामाचे वायदे, वेळ, दर्जा पाळणं त्याला अशक्य होऊ लागलं. त्याच्या संसाराला ग्रहण लागलं.

     मी कॉलेजचं शिक्षण संपवून नोकरीसाठी शहरात आलो. नोकरीचं शेड्यूल, बदल्या, लग्न, घरच्या कटकटी याच्या गुंतलो. वयोमानामुळं आईवडिलांनाही मी आणि भावांनी शहरात आणलं. गावचा संपर्क कमी झाला.

     गावचं कुणी कधी भेटलं की, बबनचा विषय निघायचा. जी बातमी ऐकायला मिळे ती वाईटच असे. धक्काच बसायचा. बबनचा कामधंदा सुटला. त्याच्या घरी अवकळा आली. घरातील एक एक वस्तू विकली जाऊ लागली. तशात बबनला कोणत्या तरी आजाराने पछाडलं. तो अंथरुणाला खिळला. दुकानाच्या उधाऱ्या थकल्यामुळे कुणीही उधार देईनासं झालं. उसनंपासनं करून बबनच्या आया आणि बायकोने काही दिवस काढले. पण ते किती दिवस टिकणार? त्यांना कोणी दारात उभे करीनासं झालं. गावात एक डॉक्टर होता. त्याने “औषध पाहिजे असतील तर आधी पैसे द्या." असं म्हटल्यानं बबनची औषधंपण बंद झाली. बबनला शेठ म्हणणारे तोंडावर बोलू लागले. “क्यवढा माज आला होता. त्याच्या दरबारात सगळं फेडावं लागतं. तो वरून बघत असतो." बबन खुरडत अंगणात येई. दिसेल त्याला हात जोडून माफी मागे, गयावया करी. पण ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत कोणीच नसायचं.

     परिस्थितीच्या धक्क्याने बबनची सख्खी आई हाय खाऊन मेली.

     एकदा गावी गेलो तेव्हा मुद्दाम बबनच्या घरी भेटायला गेलो. बबन हमसून रडत बोलत होता. भामावहिनी दाराआडून तोंडाला पदर लावून आमच्याकडं बघत होती. ओसरीवर त्याची सावत्र आई खाली मान घालून गोधडी शिवत होती. बबनचा मुलगा-संपत नाकातला शेंबूड शर्टाला पुसत आजीजवळ होता. त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नव्हतं, किंवा सवय झाली असल्याने काही वाटत नसावे.

     बबनच्या वडलांच्या, कोंडीबाबाच्या वेळीही गरिबी होती. पण आता घरात एक प्रकारचा भकासपणा, कुबटपणा वाटत होता. सारे उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत होते. ठिकठिकाणी जमीन उखणली गेली होती. सगळीकडं माशा घोंगावत होत्या. ओसरीवर म्हातारी गोधडी शिवत होती. मधघरात बबनचं अंथरूण होत. मागच्या घरात चूल होती. काही काटक्या तिथं पडल्या होत्या. बबनच्या अंथरुणाचा ऊग्र वास येत होता. कित्येक दिवस नव्हे, महिने त्याच्या अंगाला पाणी लागले नसावे. सारा चेहरा, शरीर बेढब वाटत होते.

     “नाना... मी उतमात लै केला. त्याचा तरास सगळ्यांना कह्याला रे?" बबननं काकुळतीनं प्रश्न केला. माझ्याकडे अर्थात त्या प्रश्नाला उत्तर नव्हते.

     “देवानी म्हतारीला उचलून नेलं. सुटली बिचारी. आता मला कवा नेतो कायनू." बबन परत रडू लागला. भामावहिनी दाराआडून पदरानं डोळं टिपत होती. बबनच्या सावत्र आईचं गोधडी शिवायचं काम बधिरपणे चालू होतं. बाहेरून संपत त्याच्या आईकडं पळत गेला. त्याला वाटलं आई आता चहा करील या पाहुण्याला (म्हणजे मला) ती संधी घेऊन तो हळूच म्हणाला, “आई, मलापन च्या कर ना.” मुलाचं अनपेक्षित वाक्य ऐकून भामावहिनी बावचळली. तिनं त्याच्या पाठीत धपाटा मारला. तसा तो कोकलत पळून गेला. मी ओळखलं की, भामावहिनीवर धर्मसंकट पडलं. मीच म्हणालो, “वहिनी. चहाबिही नको. सकाळपासून बराच झालाय."

     “थोडासा करते ना...”

     'नको नको' म्हणत मी बबनचा निरोप घेऊन सटकलो. माझ्याकडे 

     बबन शेवटपर्यंत केविलपणानं बघत होता. बबनला मी ते शेवटचंच भेटलो.

     कुठंतरी मला कळलं की, बबन गेला.

     त्यावेळी त्याची बायको शेतावर कामावर गेली होती. मुलगा घरी नव्हताच. सावत्र आई रोजच्यासारखीच ओसरीवर गोधडी शिवत बसली होती. दिवसा कधीतरी बबन मरून पडला होता. संध्याकाळी त्याची बायको घरी आली. बबनचा आवाज नाही म्हणन हालवन पाहिलं तर हा गेलेला. प्रेतावर माशा घोंगावत होत्या. लोकांना प्रश्न पडला होता की, त्याची आई दिवसभर घरी होती. तिला कसं काही कळलं नाही? बबनचा शेवट असा झाला.

     काही दिवसांनी त्याची सावत्र आईही गेली. मी हे विसरूनदेखील गेलो होतो.

     संपतच्या वडापावच्या गाडीमुळं सगळं आठवलं. काही दिवसांनी पुन्हा गावी जाण्याचा योग आला. तेव्हा हटकून पाराजवळ गेलो. तिथं आता वडा-पावाच्या दोन-तीन गाड्या होत्या. धंद्याच्या त्या स्पर्धेत संपतची गाडी एका बाजूला होती. तिच्याकडं कुणीही फिरकत नव्हते. यावेळी मी संपतकडून मुद्दाम दोन वडा-पाव घेतले.

     काही संकल्पनांचे / शब्दांचे अर्थ, स्पष्टीकरणआड - लहान परीघ असलेली शक्यतो घरगुती विहीर. बुटकुली- लहान भाडी. पितळ्या - खोलगट ताट (शक्यतो पितळेच्या भांड्याची) लव - कौलारू घराच्या छपराचा पुढचा भाग. त्याचेखाली उभे राहिले तर पावसापासून बचाव होतो. रेडौ - रेडीओ. कह्याला - कशाला.

(स्रोत- डॉ. सतीश शिरसाठ यांची कथा, ‘ओबीसींच्या जीवनकथा', २००१)



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209