बस फाट्याला येताच कंडक्टर बेल मारून ओरडला, “हा जांभळफाटा. उतरा!" तसा आनंदा जागेवरून उठला. बॅग खांद्याला लटकावत तो बसमधून खाली उतरला. बस लगेच पुढे निघून गेली. तिचा दरवाजा आपटल्याचा आवाज, फाट्यावरल्या लोकांना गाडी निघून गेल्याची वर्दी देऊन गेला. कपडे झटकत आनंदा त्या लोकांना निरखू लागला. आपल्या ओळखीचा, आपल्या गावचा कुणी आहे का, याचा तो शोध घेऊ लागला. आजूबाजूच्या चार-दोन गावचे लोक संध्याकाळी तिथं येऊन टाईमपास करतात. त्यात आपल्याही गावचे लोक असतात हे त्याला माहीत होतं. “आनंदा, लई दिवसानं आलास गा."
आवाजाच्या दिशेने आनंदा बघू लागला. श्रीधर माळी त्याच्या खांद्यावर हात ठेवत पुढं म्हणाला, “निघायचं निघून जरा येरवाळी निघूनी? इतका उशीर कशाला केलास बरं?"
"झाला, जरा उशीरच झाला!" आनंदा बोलला.
"चल च्या पिऊ.” असं म्हणत श्रीधर जवळजवळ त्याला ओढतच हॉटेलात घेऊन गेला.
“मग काय मनतोय आब्यास? आन् पेपरात नवकरीबी करू लागलास मनं!"
"होय. स्वत:चं स्वतः भागवून शिकायचं म्हटल्यावर काहीतरी करायला पाहिजे.”
“कर बाबा कर. तू कष्ट करून शिकलास. हामाला समदं मिळूनबी हामी शिकलो न्हाई. हामचा बारक्या आन् तू एकाच वर्गात होता नि रे?"
"होय. काय चालूय त्याच सध्या?” आनंदानं विचारलं.
"दुसरं काय करणाराय शेत सोडून? पर शेतात चांगलं करलालात. ट्रॅक्टरबी घेतलाय. सम्दं त्यानं सांभाळालाय. हामाला एक लागलाय राजकारणाचा येडपट नाद."
“चालायचंच. कुणीतरी हे करायला हवंच की! पंचायत समिती मात्र थोडक्यात हुकली तुमची."
“आता राजकारण मनल्यावर इलेक्शन आलं. हार-जीत आली. पर खरं सांगू, जमानाच इचितर झालाय. कडू एकात एक न्हाई आण बापात लेक न्हाई."
“पन्नास मतांनी पराभव म्हणजे फारच थोडक्याने गेली सीट."
"गावातच मायनस व्हायला गा जरा. तुझे मायबाप तर कुठं केले मला मतदान ? त्याच्यात तुझी माय सरपंच. रावसाहेबाच्या पॅनलची. पर जाऊ दे, फाईट तर चांगली दिली आपण. तुजं काय चाललंय ते सांग.'
"काही नाही. सकाळी एम.ए.चे तास. संध्याकाळी चार वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत पेपरचं काम.”
दोघांचाही चहा पिऊन झाला. श्रीधरने मोटारसायकल स्टार्ट केली. आनंदा पाठीमागे बसला.
“गावातल्या योजना न राबवता पैसे खाण्यावर भर दिलाय रावसाहेबानं. हे खरं आहे का दादा?" आनंदा बोलला. “तेच हामचं जमून न्हाय. ह्याच्यावर म्या जास्त कशाला बोलू? मला ज्यानं इलेक्शनमदी पाडलं तो ह्येचा पावना. पर एक गोष्ट कळली, कागदावर सह्या घेण्यासाठी तुज्या मायवर दबाव आणालेत म्हनं."
आनंदा काहीच बोलला नाही. गाडी श्रीधरच्या घरासमोर आली.
“येतो दादा.” म्हणत आनंदा गाडीवरून उतरला. मापारी
"तसं कसं! काई च्या-पानी."
"आता नको उद्या येतो वाटल्यास."
“वाटल्यास काय, येच की. हामच्यासारख्या पुढाऱ्याला पेपरवाल्यासोबत लई जपून वागावं लागतं बाबा.' असं म्हणत श्रीधर हसला. आनंदानेही हसून त्याला दाद दिली. तो हळूहळू घराच्या दिशेने सरकू लागला.
घरी पोहचला तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. त्याचा बाप-मारोती लोहार बाजंवर बसून बिडी ओढत होता. त्याची माय विठाबाई लगबगीने दारात आली. “लईच उशीर केलास रं माज्या वागा!" असं म्हणत तिनं त्याच्या हातातली बॅग घेतली. आनंदा न्हाणीकडं सरकला. हाता-तोंडावर पाणी मारून रुमालाने तोंड पुसत बापाजवळ टेकला. तोवर बापानं बिडी विझवली होती.
"बिड्या ओढायचं कमी झालं नाही का अजून ?"
आनंदानं बापाला विचारलं.
“वडंना झालावं बाबा. उगं आता एक पेटविल तो.”
"हे उगं पेटविनंबी बंद कर मनून सांग तुज्या बापाला."
विठा बोलली, तसा मारोतीला राग आला.
"लेकरू आलंय. तुजं तू सयपकाचं बग. माजं डोस्कं उठवू नकु." मारोती रागात बोलला.
“सरपंच झाल्यापासून लई श्यानी झाल्याय रं तुजी माय.' असं म्हणत त्यानं बोलण्याचा मोर्चा आनंदाकडं वळवला.
“ह्या सरपंचकीनं तर काव आणलाय मला."
असं म्हणत विठा चुलीजवळ गेली.
"आजून कवर शिकणार हाईस बाबा? वरीस वरीस गावाचं तोंड बगंना झालाईस."
तो काहीच बोलला नाही. शहरात शिकायला गेलो म्हणून बऱ्याच गोष्टी समजल्या. एका लोहाराच्या पोटी जन्माला आलेला आनंदा आज एम.ए.करत होता. एका दैनिकाचा पत्रकार म्हणूनही बातम्या गोळा करत होता. स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेत होता. घरी कमालीचं दारिद्र होतं. मारोती कुठलंच काम करत नव्हता. रावसाहेबाच्या मागेपुढे करणे एवढेच करायचा. गावातल्या अशा काही लोकांचा एक ताफाच हिंडायचा त्याच्यासोबत. त्यातच सरपंचपद ओबीसी महिलेला सुटलं, तेव्हा विठाबाईला रावसाहेबानं निवडणुकीला उभं केलं, आणि निवडून आल्यावर ती सरपंच झाली. मारोतीला तिनं निवडणुकीला थांबलेलं आणि निवडून आलेलं फार चांगलं वाटलं. आपला मान त्यामुळे वाढला, असं त्याला वाटू लागलं. रावसाहेबामुळे आपली बायको सरपंच झाली, तेव्हा रावसाहेब सांगेल तसं वागायचं हा नियम त्याने स्वतःला घालून घेतलेला. विठा तसंच वागत होती. मात्र जेव्हा तिच्या लक्षात येऊ लागलं की, पैशाची अफरातफर चालू झालीय, तेव्हा मात्र तिच्यात आणि मारोतीमध्ये खटके उडू लागले. आनंदाच्या येण्यानं दोघांनाही आनंद झाला होता. मारोतीला वाटलं पोरगं मायीला समजावून सांगेल, तर विठाला वाटायचं, पोरगं बापाची समजूत घालून “खोटेनाटे काम करायचे नाही.” असं पटवून देईल.
जेवण झाल्यावर बापाजवळ बसत आनंदानं विठाला हाक मारली. “माय, जरा इकडं ये. मला बोलायचंय तुझ्याशी.”
स्वयंपाकघरातली सगळी आवराआवर करून विठा बाहेर आली. वसरीवर टेकत म्हणाली, “काय बोलायचं होतं माय?" .
"काय म्हणतेय तुझी सरपंचकी ?"
"मला कशाला इचारतुस माय. तुज्या दादालाच इचार."
"दादा, काय म्हणत होता तुम्ही ?"
"तुला सांगतो आनंदा, तुझी माय आता श्यानी झाली. पार नाक कापल्याय माजं चारचवघात. आता तू आलाच हाईस तर समजावून सांग बाबा तूच तिला " मारोती बोलला.
“काय झालं ते तरी आधी सांगा." “समदं सांगतो पोरा” असं म्हणत त्यानं सांगायला सुरुवात केली.
“आता तुजी माय सरपंच झाली त्याला दोन वरसं झाली. आपली हाशीद तरी हाय का इलेक्शन लढवायची, आगर सरपंच व्हायची. उगं ते रावसाब हायीत मनून जमलं सगळं. त्यानीच हिला उभं केलं. पैसा खरचला आण निवडूनबी आणलं. मंग तूच सांग मला, त्यांच्या मनापरमानं आपुन कारबार करावा. पर न्हाई. हिला कळंचना झालंय.”
“काय कळंना झालंय?" आनंदानं मध्येच तोडलं. तेव्हा मारोती बोलला, "रावसाबानं ज्याच्यावर सही कर मनलं त्याच्यावर सही करून गप बसायचं दिलं सोडून, त्याला इरोध करायल्याच. त्यानं मला रोज शिव्या घालायलाय. साधी बायकु आवरना मनालाय. एक कागद आणून दिलाव. हिला माना झालं, त्याच्यावर सही करना झाल्याय. मायला हामची काई किंमत हाय का नाही गावात ?"
“का किंमत हाय तुमची? लुबऱ्यावणी रावसाबाच्या मागंपुढं गोंडा घोळतंय मनत्यात.” विठा कळवळून बोलली.
"ह्याल आसलंच आडंग लावाल्याय हिनं त्या कागदावर सही कराया. का चाललंय हिचं ?"
“माय, कसला कागद आहे तो?" आनंदानं विठाला विचारलं. तेव्हा विठा बोलली. “तेच कळंना झालय तुज्या बापाला. दलित वस्ती सुधार योजनेचा कागद हाय तो. रावसाबाच्या मनानं कायबी करुनी गुमान बसावं आन आल्याला पैसा लाटावा."
“लाटलं तर लाटू दे की. मलाबी माजा शेर दिईलच की.” मारोती बोलला.
"तुमाला का देतोय एक बिडीचं बंडल? मला नगं कुणाचा आसला तुकडा."
“पर म्या मनतो त्या मांगाम्हाराच्या घरावरून हिचं का बंद पडलंय ?"
"मला न्हाई खायचं कुण्या गरिबाच्या नशिबातलं.”
"खाऊ नकु की मग. पर सही कराया का जातंय तुजं ?" .
“म्या खाणारबी न्हाई आण खाऊबी देणार न्हाई कुणाला?'
“मग बस बोंबलत. तुजी सरपंचकी जाग्यावर ठिवतंय का बग त्येनं."
"गेली तर गेली सरपंचकी. म्या मनन ज्यानं सरपंच केलं त्यानेच मला काढलं त्या पदावरून बाजूला."
"कोण म्हटलं तुला की, रावसाहेबानं सरपंच केलंय म्हणून?' इतका वेळ शांत बसलेला आनंदा ओरडला.