"त्यासाठी तर मी आलोय तुमच्याकडे.' असं म्हणत आनंदानं त्याला बरंच काही सांगितलं. तरुणांमध्ये वाहणारे विचार, शहरात होणारी वैचारिक क्रांती, समाज परिवर्तन, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अखिल समाजाला शहाणं करण्याचा घेतलेला वसा... याबद्दल बरंच काही सांगितलं. आनंदा बोलत होता. श्रीधर लक्ष देऊन ऐकत होता.
“मायला, तू लईच हुशार झालायस गा. कवा शिकतोस एवढं?" श्रीधरनं आश्चर्यचकित होऊन विचारलं. "दादा, पुस्तकांच्या सहवासात गेलं की मस्तक आपोआप संपन्न होतं."
"खराय तुजं. मायला हामी अडाणी ते अडाणीच व्हायलो बगं."
"पण तुम्ही बरंच काही करू शकता. तुमच्यात ती ताकद आहे म्हणून मोठ्या आशेनं मी तुमच्याकडं आलोय."
"म्या काय करू शकणार हाव बाबा?"
"दादा, आपण सगळे ओबीसी म्हणून एक आहोत ही जाणीव या गावतल्या सगळ्या कष्टकरी समाजात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला हवा. तुम्ही मनात आणलंत तर इथल्या माळी, धनगर, लोहार, सुतार, गुरव अशी मोट करून एकीचा आदर्श जिल्हाभर निर्माण करू शकता. आपण सारे एक झाल्याशिवाय आपल्या अस्तित्वाची जाणीव कुणालाही होणार नाही.?”
“पर आता नेमकं काय करायचं?"
“करायचं बरंच आहे. पण तूर्तास आपण सारे एक आहोत हे दाखवायची एक संधी आलीय.'
"ती कोणती?"
"दलित वस्ती सुधार योजनेच्या कागदावर माझी माय सही करत नाही, हे तुम्हाला माहीत आहेच.” आनंदा बोलला तसं श्रीधरनं मान होकारार्थी हलवली.
"दादा, माय त्या कागदावर सही करणारच नाही. त्यामुळे चिडून रावसाहेब सावकार अविश्वासाचा ठराव आणल्याशिवाय राहणार नाही. तुमचे चार सदस्य आणि माझी माय एका बाजूला आले तर बहुमत तुमचं होणार. माझ्या मायचं सरपंचपद टिकावं म्हणून ही सारी खटपट करतोय असं कृपा करून समजू नका. हवं तर तुम्ही तुमच्या पॅनलच्या बाईला सरपंच करा. मात्र दलित वस्ती सुधार योजनेसारख्या योजना तडीस न्या. आपल्यासारख्या ओबीसीला सन्मानाचं जगणं बहाल करणाऱ्या बाबासाहेबांच्या लेकरांची सोय करा."
"लई शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या गा. समदं डोस्क्यात बसायचं मनल्यावर येळ लागला गड्या."
"वेळ तर लागणार आहेच. दादा, आपला समाज अडाणी आहे. आमच्यासारख्या अनेक ओबीसी घटकांची पोटं हातावर आहेत. अशा वर्कर ओबीसींना तुमच्यासारख्या फार्मर ओबीसींनी आत्मभान दिलं पाहिजे. वेळप्रसंगी संरक्षणही दिलं पाहिजे."
“ठरलं आनंदा. इथून पुढं तुझं डोस्कं आन् माजी ताकद. बाबा तू बगतच रहा."
"दादा, राजकारण हा माझा प्रांत नाही. माझी माय इलेक्शन लढली ती पहिली आणि शेवटची वेळ. पुन्हा माझ्या घरातला कुणी निवडणुकीला थांबणार नाही. तुम्हाला माझ्या विचारांचा सपोर्ट राहिलं. माझी एकच विनंती. गावातल्या सामान्य माणसांचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. मग तो सामान्य दलित असो, ओबीसी असो व ओपनमधला असो. महात्मा फुल्यांच्या दृष्टिकोनातून स्त्री, शेतकरी शूद्र, अतिशूद्र या सगळ्यांच्या कल्याणाचा विचार तुम्ही करणार असाल तर मी तुमच्यासोबत आहे.”
आलेला चहा कधीच थंड होऊन गेला होता. तसाच थंड चहा घशाखाली उतरवून आनंदा जायला निघाला. श्रीधरने उठून त्याला कडकडून मिठी मारली.
आनंदानं अंदाज वर्तवल्याप्रमाणे पुढे महिन्याभराच्या आतच ग्रामसभा भरली. विठाबाईवर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. पाच विरुद्ध चार मतांनी तो नाकारला गेला. कुणालाच काही कळलं नाही. रावसाहेब सावकारासारख्या मातब्बर पुढाऱ्याला धोबीपछाड कशी मिळाली, हे कळायला गावाला बराच वेळ लागला. श्रीधर आता उपसरपंच झाला होता. विकासाच्या बऱ्याच योजना गावात श्रीधरच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत होत्या. तिकडे शहरात राहून आनंदा गावातल्या विकासकामांना वृत्तपत्रातून प्रसिद्धी देत होता. हागणदारीमुक्त गाव संकल्पना, दलित वस्ती सुधार योजना अशा
अनेक योजना राबविल्या गेल्या.
आज दोन वर्षांनंतर आनंदा गावी परत येत होता. त्याचं एम. फिल. पूर्ण होत आलं होतं. ओबीसींच्या चळवळीत आता त्याच्या नावाची दखल घेण्यात येऊ लागली होती. आजवर त्याने केलेल्या धडपडीला आता कुठं मोल मिळत होतं. तो आनंदा आज गावी येणार होता. त्याला कारणही तसंच होतं. आज १४ एप्रिलची तारीख होती. सगळा गाव एकत्र येऊन महात्मा फुले जयंती व बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्तपणे साजरा करत होती. या जयंतीचे औचित्य साधून आनंदा गावातल्या भल्या थोरल्या पटांगणात सगळ्या गावाला साक्ष ठेवून 'शेतकऱ्याच्या आसूड'चं पारायण करणार होता.
(स्रोत- प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे यांची कथा, पहिल्या राज्यस्तरीय, सत्यशोधक ओबीसी साहित्यसंमेलनाची स्मरणिका, बीड, संवेदना,२-३ ऑक्टोबर २०१०)