"तुला सरपंच बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय."
दोघंही डोळे विस्फारून पोराकडं बघू लागले. तो काय बोलला ते दोघांनाही कळलं नाही.
थोड्या वेळानं आवसान गोळा करत मारोती म्हणाला,
“बाबासाहेबामुळे हिला सरपंच... काई कळलं नाही पोरा!"
"खरं तेच बोलतोय मी!' आनंदाचा स्वर आणखी मोठा झाला.
“पर लोकं तर त्यांला म्हारामांगाचे लीडर मनत्यात-".
"खोटंय ते. ते आपल्या ओबीसीचे पण नेते आहेत. आपल्यासाठी घटनेत त्यांनी सवलतीची तरतूद केलीय. त्यांचा जन्म झाला नसता तर कुत्रंसुद्धा पुसलं नसतं आपल्याला. तुमचा रावसाहेबही आला नसता 'व्हा सरपंच' म्हणत विनंती करायला. आणि हो दादा, माझं शिक्षण चालूय ना, दर वर्षी शिष्यवृत्ती मिळते, माय सरपंच झाली ते सगळं बाबासाहेबांमुळे. कुण्या रावसाहेबांमुळे नाही."
पोराचं बोलणं ऐकूण मारोतीची वाचा बसली. काय बोलावं तेच त्याला कळत नव्हतं. विठाचीही तीच अवस्था झाली. बराच वेळ कुणीच बोललं नाही. रात्रीचा अंधार अधिक गडद होत गेला.
आनंदाला बराच वेळ झोप लागली नाही. त्याला अवस्थता वाटू लागली. दहावीची परीक्षा पास झाल्यावर आनंदा मोठ्या जिद्दीने शहरात पुढच्या शिक्षणासाठी गेला. कॉलेजच्या वसतिगृहात राहून पडेल ते काम करत तो एकेक इयत्ता सर करत होता. हातात पडेल तो कागद वाचायचा त्याला नाद लागला. त्या नादातच तो ग्रंथालयाकडे ओढला गेला. महात्मा फुले, मार्क्स, आंबेडकर यांचे विचार त्याला कळू लागले. त्यांच्या कार्याची महती, त्यांची ध्येयनिष्ठा यामुळे आनंदाच्या विचारांना एक नवी दिशा मिळत गेली. ओबीसी म्हणून शिष्यवृत्ती उचलताना आम्हाला लाज वाटत नाही. मात्र आंबेडकरांना नेता मानायला आम्ही लाजतो. अशा अनेक ओबीसी पोरांना त्याने आंबेडकर समजावून सांगितला होता. त्या साऱ्यांना सोबत घेऊन त्यानं महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्याच्या आसूड'चे पारायण केलं होतं. बलुतेदारांच्या घरात आपला जन्म झाला. मात्र विचार करण्याचा शहाणपणा आपल्याला आंबेडकरांनी दिला, हा विचार त्याच्या मनात अधिकच ठळक होत गेला. शिकलेल्या पोरांची ही तरुण पिढी अजून बदलत नाही. मात्र हळूहळू ती बदलेल. ओबीसींच्या मलामलींना हळहळ कळायला लागेल की. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व्ही.पी.सिंग हे आपले भाग्यविधाते आहेत. त्याशिवाय त्यांना आत्मभान येणार नाही. चतकोर तुकड्याच्या स्वार्थापायी कुण्याही गावठी पुढाऱ्याच्या पुढे लोटांगण घालण्याची वृत्ती त्याशिवाय संपुष्टात येणार नाही असं त्याला वाटत होतं. शहरातल्या या सात वर्षांच्या वास्तव्याने त्याच्यामध्ये हा आत्मविश्वास आलाच होता. मात्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या वैचारिक प्रेरणेने हा आत्मविश्वास अधिकच प्रखर होत गेला.
आनंदाला जाग आली तेव्हा सकाळचे आठ वाजलेले. तो उठला तेव्हा रावसाहेबांचा सालगडी दाम्या घरी आलेला. दाम्या, मारोती लोहाराच्या भावकीतला. आनंदा आल्याचं त्याला कळलं होतं म्हणूनच तो आलेला. माहीत नसल्यागत करत तो म्हणाला, 'आँ, तू कवा आलास आनंदा ?'
"काल रात्री आलो.” आनंदानं आळस दिला.
“का मनतंय कॉलेज?" काहीतरी विचारायचं म्हणून दाम्या बोलला.
“चालूय. बरं इतक्या सकाळी काय काम काढलंत?' आनंदनं विचारलं.
“काई न्हाई. तेच की, रावसाबानं काय ते फायनल इचारून ये मनलंय. इटावैनीला त्या कागदावर सही कर मनून सांगाया आलतो. तू आलाच हाईस तर तूच समजावनू सांग वैनीला. आसल्या मोठ्या लोकांला टक्कर द्यायची मंजे का तोंडचं काम हाय होय? आपल्यासारख्या बलुतेदारानं देणं होत्याय हुई टक्कर ?"
"भावजी, म्या सही करणार नाही." विठाबाई दारात येत म्हणाली.
"बगा इटावैनी, सरपंच मनून एवढा मान मिळतोय. उगं मालकासंग वाकडं घिऊ नका. अशानं त्यानी तुमाला सरपंच पदावरबी ठिवणार नाहीत."
“पद गेल्यानं गेलं, पर म्या सही करणार न्हाई.''
"काय मारुती, हेच फायनल समजावं का? मायला, उपकाराची थोडीतरी जाण ठिवा बे.”
“कसले उपकार? मोप ढोरागत राबलाय माजा धनी त्याच्या दारात." विठा उसळून बोलली.
“बग बाबा आनंदा, तूच काय तर सांगून. म्या वाटल्यास पुना येतो."
“आता पुन्हा कशाला येताय. माय काय बोलली ते कळलं नाही का तुम्हाला?” आनंदा दाम्याकडे रोखून पाहत बोलला. दाम्याला काय बोलावं ते कळलंच नाही. गुमान खाली मान घालून तो निघून गेला. मारोती मात्र अस्वस्थ झाला. पोराच्या मनात काय चाललंय हे त्याला कळत नव्हतं. अगतिक स्वरात तो पोराला म्हणाला, “आनंदा, माजं आईक. रावसाहेबाबरोबर वयीर घेण्यात का मतलब हाय? आडल्या-नडल्या येळंला आपुण कुणाच्या दारात जावं पोरा?"
“काही नको अडल्या-नडल्या वेळा आणि त्याच्या दारात जाणं. तुमचा मुलगा आहे तेवढा खंबीर. चार आणे देऊन बारा आण्याचं राबवून घेणारे लोक आहेत हे सगळे. आजवर हेच लाचारीचं जगणं आलो आपण." आनंदाचा स्वर अधिकच कठोर होत गेला. मारोतीचा नाईलाज झाला. पोराला काय बोलावं आणि कसं समजून सांगावं हे त्याला कळत नव्हतं. विठा मात्र मनातून सुखावली होती. आनंदा तिच्यासोबत आहे याची तिला खात्री पटली होती. पोरगं सोबत आहे म्हटल्यावर कुणाचीच तिला पर्वा वाटत नव्हती. तिचा चेहरा उजळून निघाला.
आनंदाचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. बापाची लाचारी आणि आईच्या पापभिरूपणाची वृत्ती त्याच्या मनाला केव्हाच स्पर्शन गेली होती. आईचं अडाणीपण किती शहाणपणाचं होत! अडाणीपणाच्या शहाणपणातूनच ती गोरगरिबांच्या कल्याणासाठी हटून बसली होती. मात्र बापाचं लाचारीपण त्याच्या मनाला खाऊ लागलं. बाबासाहेबांच्या वैचारिक क्रांतीने दलितांनी लाचारीचं जगणं सोडून दिलं. मात्र ओबीसी आहेत तिथेच आहेत. शोषक आणि शोषित अशा दोन्ही रूपांत वावरणाऱ्या या समाजाचं कसं होईल? दलितांच्या विरोधात शोषक म्हणून थांबणारे ओबीसी शेटा-भटाच्या पुढे शोषितांच्या रांगेत थांबतात. सामाजिक परिवर्तनाच्या या लढाईत कुठल्या बाजूने थांबावं याचा उलगडा ज्या समाजाला अजून झाला नाही, त्यांचे प्रश्न किती जटिल आणि गहन आहेत याची जाणीव आनंदाला होत गेली..
अंघोळ झाली तसा तो घराच्याबाहेर पडला. डोक्यातल्या विचाराचं थैमान त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. जातीजातींचे बंदिस्त कप्पे करून बसलेल्या बलुतेदारांना आणि आलुतेदारांना शेतीत राबणाऱ्या मागास जातींना एकत्र आणण्याचं जे स्वप्न त्याची नवी कोरी पिढी पाहत होती, ते स्वप्न स्वतःच्या गावात सत्यात उतरवण्यासाठी त्याचं मन तळमळत होतं. आणि त्याचे पाय त्यासाठीच घराच्या बाहेर पडले होते. यश मिळेल का नाही याची खात्री त्याला नव्हती. मात्र श्रीधर माळ्याच्या रूपानं एक आश्वासक व्यक्ती त्याच्या मनातल्या आशा पल्लवित करत होती.
आनंदा गेला तेव्हा श्रीधर बैठकीत बसून होता.
"आरं ये आनंदा, मला वाटलं येतूस का न्हाई की..." श्रीधरनं त्याचं स्वागत केलं.
"दादा, तुमचं एवढं प्रेमाचं आमंत्रण म्हटल्यावर मी का येणार नाही?" हसून आनंदा बोलला.
“ये, दोन कप च्या पाठवा भाईर.” मधल्या दिशेनं फर्मानं सोडत तो म्हणाला, “बस बाबा.” बराच वेळ कुणी कुणाशी बोललं नाही. आनंदाला काहीतरी बोलायचंय याची जाणीव श्रीधरला झाली.
"तुला काय तर सांगायचं हाय आनंदा.” श्रीधरनं आनंदाच्या मनाला चाचपलं.
"बरंच काही सांगायचंय दादा."
“मग बोल की."
“नाही. सुरुवात कुठून करावी हेच समजत नाही."
“आता आणि हे घ्या, तुझ्यासारख्या पत्रकार माणसाला आता हामी सांगावं होय ?' श्रीधर हसला.
“दादा, गावची इलेक्शन, तिचा निकाल, माईचं सरपंच होणं हे सगळं तुम्हाला माहीत आहे.” आनंदानं बोलायला सुरुवात केली.
“सम्दं ठावं हाय की! रावसाब सावकाराच्या पॅनलचे पाच निवडून आले. आण माज्या पॅनलचे चार. म्हणून तर तुजी माय सरपंच झाली."
"जेव्हा इलेक्शन झाली तेव्हा मी गावी नव्हतो. मला मायनं फॉर्म भरला वगैरे काहीच माहीत नव्हतं. त्या काळात मी पुण्याला गेलो होतो. एका शिबिराच्या निमित्तानं महिनाभर मी तिकडंच होतो. त्यांची चूक झाली असं मला अजूनही वाटतं.”
"आरं, त्याच्यात चूक कसली आली? आयता चान्स मिळाल्यावर घ्यायला का हरकत हाय? सरपंच झाली की तुजी माय."
“सरपंच झाली, मात्र तिनं रावसाहेब सावकाराच्या पॅनलमधून थांबायला नको होतं.”
"ते ठरवणारी ती बिच्चारी कोण बाबा. समदं तुजा बाप ठरवणार."
“तेच सांगतोय. त्यांना आपलं कोण आणि परकं कोण हेच कळलं नाही.”
“मला काई समजलं नाही गा!"