अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
वहिनी : मग भाऊजी मुलगा मुलगी झाल्यावर त्याचे नाव काढाण्यासाठी आम्ही ब्राम्हणाकडे जातो त्याबद्दल आपल मत काय मत आहे ?
मी : खरं तर आपल्या मुलाचे नाव आपणच का ठेवू नये ? मनुस्मृती वर्णानुसार नाव ठेवण्यात यावे असा सक्त आदेश होता आणि त्यामुळे सर्व वर्णाचे लोक ब्राह्मणाकडे नाव विचारायला जात.
मङ्गल्यं ब्राम्हणस्य स्यात क्षत्रिस्य बलान्वितम् ।
वैशस्य धनसंपुक्तं शुद्रस्य तु जुगुत्सितम् ॥2.3॥ मनुस्मृती
ह्याच अर्थ; ब्राम्हणाच्या मुलाचे नाव असे ठेवावे ज्यातून पावित्र्य सूचित होईल. उदा. शुभम, पावन क्षत्रियांच्या नावात, शक्ती, सामर्थ्य ही कल्पना गोवलेली असावी. उदा बल, महाशक्ती, जगबहाद्दर वैश्याच्या नावात संपत्तीचा उल्लेख उदा. लक्ष्मीधर, लक्ष्मीचंद, तर शुद्राचे नाव किळसवाणे असावे. उदा : दास, दीन, धोंडोबा, दगडू इत्यादी.
आता परिस्थिती बदलल्यामुळे ब्राह्मण आम्हास टिंगलटवाळी करणारी नाव सुचवत नाहीत. परंतू आम्ही दोन - तीन पिढ्या मागे गेलो तर आताही आमच्या आजोबा पणजोबांची अशी नावे आढळील. महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते श्री. दत्ता पाटील ह्यांच्या आजोबांच नाव ‘नागो पाटील’ असे होते. ते बदलवून त्यांनी आता ‘नागेश पाटील’ असे सन्मानजनक केले आहे. ब्राम्हणाकडे नाव काढण्यास जाण्यासाठी मनुस्मृतीचा हा अतिशय वाईट आदेश कारणीभूत होता. हे लक्षात घेऊन तरी आता बहुजनांनी ब्राम्हणांकडे जाऊ नये. बदलत्या परिस्थिती नुसार ब्राम्हणानी सूचविलेल्या नावाला, आम्ही पाळण्यातले नाव म्हणतो व समाजात संबोधीत करण्यासाठी चांगले नाव वापरतो. नाव ही माणसाची ओळख आहे. म्हणूनच चांगली नावे माणसाची चांगली ओळख निर्माण करतात. माझे नाव प्रदीप आहे. शाळेपासून माझे बालमीत्र मला ह्या नावाने संबोधयाचे, तेव्हापासून मला वाटायचे की आपण प्रज्वलीत दिपासारखे जीवन जगायचे. अंधारात वावरणार्यांसाठी प्रकाशाचा दिपक बनायचे.
काहीच दिवसापूर्वी, मी माझ्या बहीणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी नागपूरला गेलो होताे. माझी बहीण संध्या व तीचे पती महेंद्रकुमार धावडे हे फुले - आंबेडकरी विचारधारेचेच. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव जॉर्ज ठेवले. आज आमेरिकेचा राष्ट्रपती जॉर्ज बुश हा जगातील सर्वात शक्तीमान पुरूष असल्यामुळे, त्यानी त्यांच्या मुलाचे तेच नाव ठेवले. आणि वर्णानुसारर नव्हे तर धर्मानुसार ही नावे का ठेवावी ? ह्या प्रथेला तिलांजली देत त्यांनी एका हिंदू मुलाला ख्रिश्चन धर्मीय नाव दिले. जाती, धर्म, पंथ ह्यांच्या भिंती ढासळून माणूस म्हणून जगण्याची, आमची तयारी असली पाहीजे.
साळवी : लग्नाच्या आधी मुला मुलींची पत्रिका जोडायला आपण ब्राम्हणाकडे जातो, त्याबद्दल आपल काय मत आहे ?
मी : खरं तर आज जन्मपत्रिका जोडण्याऐवजी मुलामुलींच्या रक्तचाचणी पत्रिका जोडायला पाहीजे. रोमन कॅथलीक धर्मगुरूंच्या संसदेने नुकताच विवाह जुळविण्यापूर्वी जोडप्यांना एच.आय.व्ही. एडस रक्तचाचणी बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. आणि लग्नाआधी मुली दाखविणे ह्या प्रथेवरही बंधन आले पाहिजे. मुलगी काय बाजारातील वस्तू आहे की जिला पाहून वरपक्षाकडील निर्णय घेतात ‘मुलगी दाखविणे’ ही प्रथा पुरूषप्रधान संस्कृतीची देणं आहे. आणि म्हणूनच ही प्रथा ताबडतोब नष्ट करायला पाहीजे. मुलीस सुयोग्य वराकडून नकार आल्यासतिच्या मनाची काय दशा होत असेल हचा अंदाज लावलेलाच बरा.
साळवी : चार वर्ग शिकलेल्या ब्राम्हणावर तुमची श्रद्धा नसेल परंतु अवतारी पुरूषांवर तरी तुम्ही श्रद्धा ठेवता की नाही ?
मी : अवतारी पुरूष म्हणजे बाबाबुवांबद्दल बोलतास, का तुम्ही ?
साळवी : ढोबळेसाहेब ह्या बर्याचशा महाराजात स्वत:स साईबाबा वा साईबाबाचे अवतार म्हणण्याची परंपरा कुठून आली.
मी : बरेचसे बाबाबुवा स्वत:स साईबाबा वा साईबाबाचा अवतार म्हणुन प्रचलीत करतात. ह्यामध्ये ह्या बाबांची स्पर्धाच लागली असते. मीच खरा साईबाबा आणि इतर सर्व खोटे म्हणुन मग स्वत:स सत्य साईबाबा म्हणेपर्यंत ह्यांची मजल जाते. ह्याचा अर्थ महा सत्य म्हणजेच खरा साईबाबा आहे, तर इतर साईबाबा हे खोटे आहेत. तात्पुरता मनुष्याचा पुर्नजन्म होतो, ह्याबाबीला मान्यही केल्यास, एका काळात पुर्नजन्मात एकच साईबाबा असावास हवा, पण तसे नाही, एकाच काळात अनेक साईबाबा म्हणजे एका व्यक्तीचा अनेक व्यक्तीत पुर्नजन्म होतो असे आपणास म्हणावे लागले व तसे मानल्यास शास्त्र प्रचलित पुर्नजन्माची थेअरीच खोटी ठरते.
साळवी : तसे तर बरेच होऊन गेले, पण ह्या सर्व बाबाबुवांचा आपण साई बाबा म्हणण्यावर एवढा जोर का ?
मी : आजच्या जमाना हा इन्स्टंटचा जमाना आहे. इन्स्टंट टी, इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट लॉटरी. सर्वांनाच झटपट पैसा कमवायचा, प्रसिद्धी मिळवायचा हव्यास लागला आहे. साईबाबा हे असे संत होऊन गेले आहेत की ज्यांना, सर्व धर्माचे व जमातीचे लोक मानतात. साईबाबावर बरेचसे मराठी व हिंदी चित्रपट सुद्धा निघाले आहेत. त्यामुळे स्वत:स साईबाबा घोषीत केल्यास इन्स्टंट वा लवकरच प्रसिद्धी मिळेल, हा ह्या सर्व बाबांचा वा तत्सम बिरूदावली न लावता काम करणारे बाबा महाराज ह्या साईबाबा फेम बाबा बापूपेक्षा जास्त चांगले. कमीतकमी एखाद्या महात्मा वा संताच्या नावाचा गैरवापर तरी, ते आपला धंदा वाढविण्यासाठी करीत नाही, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
साळवी : धर्मरक्षणासाठी निर्माण झालेले हे बाबा महाराज आपणास धार्मीक वाटत नाही का ? मला तरी ह्या महाराजात काहीतरी दैविक शक्ती आहे असे वाटते.
मी : दैविक शक्ती आहे तर, पेप्सी - कोला सारख्या जाहीरातीत का लावतात ? दैविक शक्तीनीच, लोकांपर्यंत पोहोचून, ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी स्थळी, का बोलावून घेत नाही. कार्पोरेशनच्या निवडणुकीच्या वेळेस ज्याप्रमाणे विवीध पक्षांचे उमेदवार आपआपले, मोठमोठे फोटो छापून प्रचार करतात, तसेच ह्या बाबा बापू महाराजांचे झाले आहे.
मी : आपण एखादी वस्तु विकत घेतांना काय बघतो ?
साळवी : त्याचे पॅकींग ब्रॉडींग वगैरे.
मी : मग हे बाबा महाराज तरी अधिक काय करतात. साधुमहाराज म्हणुन घेतले की भोळेभाबडे बहुजन समाजातले लोक त्या सर्वांना चांगलेच समजतात. साधूसंत महाराज, म्हणजे पूजनीय पुरूष, हे समाजमान्य करण्याचे काम, आमच्या बहुजन समाजातील संत श्री. तुकाराम, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज ह्यांनीच प्रस्थापीत केले आहे. हे आधुनीक लबाड महराज ह्याच लेबलचा उपयोग करून भोळ्या भाबड्या लोकांच्या डोळ्यात धुळ झोकतात.
साळवी : भोळ्या भाबड्या लोकांचे असू द्या हो. आपल्या समाजातील चांगले शिकले सवरले डॉक्टर, इंजीनीयरही ह्या बाबाबापूंकडे जातात, ह्याबाबत आपणास काय म्हणायचे आहे ?
मी : डॉक्टर, इंजीनीयरांचे बाबा बापूंकडे जाणे म्हणजे, बुद्धीची दिवाळखोरीच होय. पण तरीही ही मंडळी बापूंकडे जातात, ह्या मागेही व्यवस्थेतील काही कारणे आहेत. आमच्यातील बरेचसे लोक ब्राम्हणवादी विचारधारेचे असतात. जेव्हा ते एखाद्या बाबाबापूकडे मोठमोठे नेते वा सिनेस्टार जातांना बघतात तेव्हा आपणही त्याच दर्जाचे आहो, हे दाखविण्यासाठी ही मंडळी जातात. आमच्यातील ही मंडळी मग, एक दुसर्यांशी बोलतांना म्हणतो ‘अरे तुला ते महाराज माहीत नाही !’ जसे काही ह्या व्यक्तीला एखादा महाराज माहीत असल्यास त्याने काही मोठा तीर मारला आहे. दुसरे असे की प्रत्येकाच्या आवडीचा बाबा मनुवादी व्यवस्थेने निर्माण कलेला आहे. आधी एक पायलट बाबा होता. आता डॉक्टरबाबा आले आहेत. मग शिकलेल्या लोकांनाही सांगायला बरे होते, ‘अहो, ते बाबा डॉक्टरही आहेत !’ तिसरे असे की, काही मंडळी मन:शांतीच्या शोधात अशा बाबाबुवांच्या चक्रात फसले. अशा लोकांना ह्या चक्रात ओढून नेणारा एखादा मनुवादी कार्यकर्ताच आसतो. पण माझे अशा लोकांना सांगणे आहे की, मन:शांती ही कुणाही बाबाच्या सानिध्यात नव्हे तर, स्वत:च्या कर्तृत्वाने निर्माण होते. आपल्या अवती भवतीच्या परिस्थीतून मन:शांतीचा नाश होत असेल तर, त्याच्यावरचा उपायही आपन शोधावा लागेल. एखाद्या बाबा बुवांकडे जाऊन मन:शांती मिळू शकते, ही भोळीभाबडी भावना, लोकांनी मनातन काढून टाकली पाहीजे.