बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
बहुजन समाज हा नेहमी धर्माच्या आड चिरकाल अज्ञानी व अंधश्रधाळू राहावा यासाठी धर्माच्या ठेकेदारांनी अवतार कल्पना उदयास आणली. मत्स्यावतार, कुर्मावतार, वराहवतार, नृसींहवतार,वामनावतार व परशुराम अवतार. वरील सर्व अवतारी पुरुष हे ब्राम्हण होते. बहुजनातील दोन महापुरुष राम व कृष्ण यानाही अवतारी बनविले. या आठ अवतारानंतर नववा अवतार हा बुद्धाचा होय. गौतम बुध्दाने आपल्या उभ्या आयुष्यात देव, स्वर्ग, नरक व आत्मा या गोष्टीना थारा दिला नाही. वैदिकांनी निर्माण केलेल्या अनेक गोष्टींवर त्यानी कठोर हल्ले चढविले. त्याच गौतम बुध्दाना विष्णूचा अवतार बनविले. काही कामानिमीत्त भुवनेश्वरला असताना पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या परीसरात भेट दिली असता मुर्ती विकणारा एक मुलगा मुर्ती घेण्यासाठी फार आग्रह करीत होता. त्याने वेगवेगळ्या मुर्त्या दाखवित असताना दशावताराची मुर्ती दाखविली. ती बघून मी चाटच पडलो. नवव्या अवताराच्या ठिकाणी गौतम बुध्दाच्या ऐवजी जगन्नाथाची मुर्ती कोरली होती. त्या मुलाला विचारले हा कोण आहे? तर तो म्हणाला ये जगन्नाथ भगवान है. जो विष्णू का नववा अवतार है. याचा अर्थ वैदिकानी बुध्दाला जगन्नाथाचा अवतार मानने सुरु केले आहे. आर्याच्या अशा कारस्थानांची बहुजन समाजाने नोंद घेतली पाहीजे.
आर्याच्या ज्या टोळ्या या देशात घुसल्या. त्या टोळ्या शस्त्रसज्ज होत्या. ब्राम्हणानी निर्माण केलेला पहिला अवतार हा मत्स्यावतार होय. आर्य टोळी प्रमुख मत्स्य याने हैग्रीव या बहुजन राजाचा विश्वास संपादन केला. राजाने त्याना वेगवेगळ्या सवलती दिल्या. पण संपूर्ण राज्यच हडपण्याचे मनसुबे केलेल्या मत्स्य टोळीने एके दिवशी बेसावध क्षणी राजाचाच खून केला व खून करणा-या मत्स्य टोळीप्रमुखाला कथा रचून मत्स्यावतार हे नाव दिले. तर दुसरा अवतार हा कुर्मावतार होय. जलद युध्द पध्दतीत आर्य टोळीचा सतत पराभव होत होता. बहुजन राजे विजयी होत होते. तेव्हा आर्य टोळीने आपली निती बदलली.कासवाच्या गतीने युध्द जिंकायचे ठरविले. या नितीतून ते बहुजनात मिसळले. हळूहळू बहुजनात फुट पाडून राज्य हस्तगत केले.
तिसरा अवतार हा वराह अवतार होय. डुकरासारखी मुसंडी मारत आर्याच्या टोळीने जास्तीत जास्त प्रदेश हस्तगत केला. टोळीच्या डुकरासारखी मुसंडी मारण्याच्या प्रवृत्तीमुळे टोळीप्रमुखाला आर्यानी वराहवतार हे नाव दिले. आर्य हे झपाट्याने प्रदेश पादाक्रांत करु लागले. एकेक मुळनिवासी आर्याच्या गच्छपी लागत गेले. परंतु हिरण्यकश्यपु हा त्याला विरळाच होता. तो शुर होता. पराक्रमी होता. आर्यप्रमुख नृसींह याच्या कोणत्याही युक्तीला तो दाद देत नसे. जो कोणी रणांगणाच्या मैदानात हरु शकत नाही. अशा तुल्यबळ शत्रुला आर्य मग कपटनितीने मारीत असतात. हिरण्यकश्यपुला हरविण्यासाठी कपटनितीचा वापर केला गेला. हिरण्यकश्यपुच्या प्रल्हाद या मुलाला आर्यानी फितुर केले व त्याच्या मार्फत नृसींह या आर्यप्रमुखाने त्याच्या घरात प्रवेश केला. हिरण्यकश्यपु झोपेत असताना वाघनखानी ठार केले. हाच तो नृसींहावतार होय. आपली दिशाभूल करुन हिरण्यकश्यपूस कपटाने ठार मारले हे प्रल्हादास समजून स्वत:ची चूक लक्षात आली. मग प्रल्हादने आर्यांच्या नृसींह टोळीस सळो की पळो करुन सोडले. तरीही बहुजनांची दिशाभूल करण्यासाठी आर्यानी प्रल्हादाचे गुणगान गायला सुरु केले. त्याचेवर आख्यायिका रचल्या व त्या बहुजनाच्या माथी मारल्या.
पुढील काळात प्रल्हाद चा वंशज बळी हा सत्तेवर आला. तो मनाने दानशुर असला तरी शुर पराक्रमी होता. पण तो सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवणारा होता. या बळीच्या राज्यात सारी जनता सुखी होती. सगळीकडे आनंदीआनंद होता.हीच आर्याची पोटदुखी होती.त्याकाळात आर्याचा प्रमुख हा वामन होता. या वामनाने बळीशी मैत्री करुन त्याचा विश्वास संपादन केला. वामनाने आपल्या कपटनितीला पुर्णत्वास नेत बळीचा खुन केला. बेसावध बळीला ठार करून त्याच्या हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून बळीची खोटी कथा रचण्यात आली. त्या कथेच्या द्वारे बहुजन समाजाला मुर्ख बणविण्यात आले.