बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
भारताचा इतिहास बघितला तर तो केवळ पराभूताचा आहे. या देशाचा पराभव या देशातील हिंदु धर्माने केला. हिंदु धर्मात असलेली जातीप्रथा व वर्ण व्यवस्था हे त्याचे मुख्य कारण आहे. वैदिक आर्यानी प्रत्येक जातीवर ठरावीक व्यवसाय लादला. लढाई मध्ये क्षत्रियाशिवाय इतर कोणाचाही सहभाग नसायचा.ब्राम्हणी धर्माने बहुजन समाजाला एकेमकाच्या कामात हस्तक्षेप करु नये असी धर्माज्ञा केली होती. अशा स्थितीत क्षत्रिय हेच लढाईच्या मैदानात असत. त्यामुळे मोजक्या क्षत्रीयांवर लढाईचा भार पडत असे व त्याचा परीणाम लढाई हरण्यात होत असे. मात्र इतर देशात युध्दाच्या वेळी सर्व समाज सामूहीकपणे शत्रूचा प्रतिकार करीत असायचे.मेगॅस्थेनिज ने लिहिले आहे की सिकंदर च्या आक्रमणाच्या काळात केवळ क्षत्रिय युध्द लढत बाकीच्या जाती ह्या आपापल्या कामात गर्क असत. जे सैनिक शत्रूद्वारा बंदी बनविले जात असत त्याला हिंदु धर्मीय बहिष्कृत करीत असत. हिंदु धर्मात परत येतो म्हटले तर अत्यंत कठीण अशा चाचण्यातुन बाहेर पडावे लागत असे. अल्बेरूनीने लिहले आहे की इथचे लोक हे मोठे अहंकारी होते. त्याना वाटायचे की आमच्या सारखे शुरवीर जगात कोठेही नाहीत. धर्माने या देशाला बेचिराख केले. आक्रमण कर्त्याला या देशातील हिंदु धर्मियांनी निमत्रंण देऊन बोलविले.
इ.स.712 मध्ये दाहीरच्या राज्यावर मोहम्मद बिन कासीम ने युध्द पुकारले. युध्दात दाहीरची सरशी व्हायला लागली होती. कासीम युध्दातून माघार घेणार तोच त्याचे सोबत असलेल्या वैदिक ब्राम्हणाने त्याला सल्ला दिला की मंदीरावर जो झेंडा दिसतो. तो झेंडा जर खाली पाडला तर दाहीरचे सैनीक मैदानातून सैरावैरा पळायला लागतील. कारण या लोकांची अशी धारणा आहे की मंदिरावरचा झेंडा खाली पडेपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. परंतु तो खाली पडला तर लढाईत आपला पराभव अटळ आहे अशी त्यांची अढळ श्रध्दा आहे त्यामुळे मंदिरावरचा झेंडा पडताच मैदानातून पळायला लागतील. ब्राम्हणाने हे सांगताच कासीम ने एका बाणाने तो झेंडा खाली पाडला. तसे मैदानातून सैनिक सैरावैरा पळायला लागले व दाहीरचे राज्य आयतेच कासीमला मिळाले. कथा रचणार्या ब्राम्हणाने झेंड्याचे गुपित सांगून देशद्रोह केला. परंतु खरे दोषी बहुजन सैनिक व राजेच होते की ज्यांनी ब्राम्हणानी रचलेल्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवला व पराजित झाले. ते स्वत:च्याच विवेक बुध्दीने वागले असते तर या देशाला गुलाम करण्याची कोणालाही हिंमत झाली नसती.
वैदिक संस्कृतीने या देशातील जनतेला खोट्या समजुतीच्या आवरणाखाली ठेवले.तैमुर व खिलजीने येथील लाखो बहुजनाची कत्तल केली तेव्हा वैदिक ब्राम्हण म्हणायचे हे पूर्वीच्या जन्माचे पाप आहे. वैदिक ब्राम्हण त्याही काळात सर्वात सुरक्षित होते. कारण ज्यांच्या कडे शक्ती व राज्य असे तिकडे ते जात असत. इतिहासकार ईब्न असीर लिहतात जेव्हा मोहम्मद गझनीने सोमनाथ शहरात प्रवेश केला.तेव्हा लोक प्रसन्नपणे म्हणायचे सोमनाथ भगवान आता सार्या सैनिकांना मारुन टाकेल. परंतु जेव्हा गझनीने लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली. तेव्हा लोक मंदीराच्या दिशेने धावत सुटत. मुर्तीसमोर लोटांगन घालीत व वाचवा म्हणून देवासमोर प्रार्थना करीत. पण सोमनाथाने त्याना वाचविले नाही. उलट मंदिरातील सारी संपती गझनीने लुटून नेली. डॉ. रामविलास शर्मा लिहतात, जेव्हा गझनीने इतर मंदिरे लुटून आपला मोर्चा सोमनाथ मंदिराकडे वळविला. तेव्हा लोक म्हणायचे की गझनीने केलेल्या पापाचा दंड देण्यासाठी सोमनाथ भगवानाने गझनीला आपल्याकडे आकृष्ठ केले. आता तो क्षणात नष्ट होईल. एवढी अंधश्रध्दा वैदिकानी बहुजनांच्या डोक्यात टाकली होती. ब्राम्हणांच्या अशा खोट्या कल्पनांमुळे भारत देश इतरांचा गुलाम बनला होता.