कांबळे : या ढोबळेसाहेब. सकाळी जोशीकडे बसलेल पाहिले तुम्हाला? काय म्हणतात जोशी ?
ढोबळे : खरंच सांगू ?
कांबळे : सांगाच की? आमच्या लोकांविरुद्ध बोलण हा त्यांचा खानदानी धंदाच आहे. तसलच काही बोलले असतील. त्यात नवल असे काही नाही. तरी सांगाच तुम्ही.
ढोबळे : जोशी म्हणत होते तुमच्यासारख्या इन्कमटॅक्स इन्सपेक्टरच्या पोराला आरक्षण व सवलती आणि त्यांच्यासाख्या क्लर्कच्या पोराला काहीच सवलत नाही. हे न्याय्य कसे ?
कांबळे : म्हटल ना ? ह्या लोकांचा धंदाच आहे तुम्हा ओबीसींना आमच्या विरुद्ध भडकविण्याचा आणि तुम्ही लोक त्याला बळी पडता.
ढोबळे : ते असू द्या. पण त्यांच्या प्रश्नाच काय उत्तर आहे तुमच्यापाशी, आम्हाला समजविण्याकरिता ?
कांबळे : उत्तर सोप आहे. अहो बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आम्हाला आरक्षण मिळायला लागलयं. ५० वर्षाच्या आरक्षणामुळे ह्यांची एवढी पोटदुखी आणि त्यापूर्वीच्या हजारो वर्षापर्यंत स्वत:च भोगलेल्या आरक्षणाबाबत आणि वरून आम्ही लोकांनी तोंड उघडल तर शास्त्र समोर करून 'तोंड दाबून बुक्याचा मार' दिला, त्याबद्दल काय म्हणनं आहे ह्यांचं. बरं आरक्षण हे फक्त ५० टक्के आहे. उरलेल ५० टक्के ह्या ५ टक्के लोकांसाठीच तर आहे. तरी चोरांच्या उलट्या बोंबा! अहो आरक्षण जरी बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे लागू झाले तरी त्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी ब्राम्हण वा तत्समच होते. त्यांना मनापासून कुठे आरक्षण आवडलयं. त्यामुळे आरक्षण वस्तुस्थितीत उतरविण्यात ह्या लोकांनी नेहमीच टाळाटाळ केली. आज ही केंद्र व राज्य सरकारत लाखो नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे तो ह्याच धोरणामुळे. श्री. करिआ मुंडा ह्यांच्या नेतृत्वात काम केलेल्या सांसदीय कमिटीनेसुद्धा निष्कर्ष काढला की मागासवर्गियांना नोकऱ्यांबाबत डावलण्यात येते.
मी : पण कांबळेसाहेब, हा बॅकलॉग योग्य उमेदवार न भेटल्यामुळे निर्माण होतो असे नाही का तुम्हाला वाटत ?
कांबळे : योग्य उमेदवार न भेटणे ही मनुवादी मानसिकता आहे. ज्या मनुवादी व्यवस्थेने आम्हा लोकांना हजारो वर्ष अयोग्य वा अस्पृश्य ठेवले त्यांच्याच प्रतिनिधीच्या डोक्यात आम्ही योग्य उमेदवार आहे असे सहजासहजी कसे बसणार. अहो देश स्वतंत्र होऊन ५० वर्षे झालीत. आम्हा दलितांच्या कमीतकमी तीन पिढ्या शिकून तयार झाल्या. तरीही योग्य उमेदवार नाही असे कसे होणार ?
मी : दलितांबाबतची हीच मानसिकता तुम्हाला ओबीसी वर्गातही आढळते का ?
कांबळे : नोकऱ्यांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास आज आम्हा २२ टक्के एससी व एसटी वर्गाचे ८ टक्के कर्मचारी प्रथम श्रेणीच्या नोकऱ्यात आहे आणि तुम्ही ५२ टक्के ओबीसी फक्त ४ टक्के प्रथम श्रेणीवर आहात. माफ करा ढोबळे साहेब, पण नोकरीच्या संदर्भात तुम्ही आमच्यापेक्षा बरेच मागासलेले आहात. ओबीसी नोकऱ्यातच कमी असल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी आढळतो.
मी : ओबीसी नोकरीच्या बाबतीत मागासलेले असल्याचे कारण काय ?
कांबळे : कारण ओबीसी वर्गाने आपली स्वतंत्र अशी सशक्त चळवळ उभी केली नाही. आणि आमच्याही चळवळीत सामील झाले नाही. तुम्ही लोकांनी तुमच्यातच निर्माण झालेल्या फुले व शाहुंच्या संघर्षाचा इतिहास समजून घेतला नाही. त्यापेक्षा आम्ही लोकांनी फुले व शाहूंना आपले दैवत मानल. बाबासाहेबांनी तर फुल्यांना आपले गुरु मानले. बाबासाहेबांनीच फुल्यांना गुरु मानल्यावर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी, फुल्यांच्या मार्गाने मार्गक्रमण करू लागलो. त्यामुळे आमची चळवळ मजबूत झाली आणि आरक्षण हे हक्काच्या स्वरुपात आम्ही प्रस्थापित केले. आजही तुमच्यातील बरीचशी मंडळी महात्मा फुले ऐवजी एखाद्या आयाराम गयाराम महाराजांना आपला गुरू मानून आपले व समाजाचेही नुकसान करून घेत आहेत. मनुवाद्यांचे प्रशासनात वर्चस्व असल्यामुळे त्यांनी प्रशासनात आम्हाला आमच्या हक्काच्या नोकऱ्याही एकीकडे दिल्या नाही तर दुसरीकडे समाजजीवनातही म्हणजेच वृत्तपत्र, मिडीया, विवीध संघटना, पक्ष ह्यात त्यांचेच वर्चस्व असल्यामुळे 'दलितांना मिळणाऱ्या आरक्षणामुळे ओबीसीना नोकऱ्या मिळत नाही' असा खोटा प्रचार करून आमच्याबद्दल व बाबासाहेबाबद्दल तुमच्या डोक्यात असंतोष निर्माण केला. ह्यामुळे ओबीसी व दलितातील दूरी वाढली व मनुवाद्यांचे फावले. तुम्ही मंडळी मनुवाद्यांच्या प्रचाराला नेहमीच बळी पडता व स्वत:चेच नुकसान करून घेता
मी : कांबळे, तुम्ही बोलता ते अर्धसत्य आहे. पण मनुवाद्यांच्या प्रचाराला तुम्हीही बळी पडले हे ही तेवढेच सत्य आहे. हे मी सिद्ध करू शकतो.
कांबळे : कसे बरे ?
मी : आपण म्हणालात फुले व शाहू हे ओबीसींचे नेते व बाबासाहेब हे दलितांचे नेते, हेच मुळात चूक आहे. बाबासाहेब हे दलितांचे नेते आहेत ह्या मनुवाद्यांनी केलेल्या प्रचाराला तुमच्यातील बुद्धीजीवीही बळी पडले. बाबासाहेब हे दलितांचे नेते हा प्रचार खोडून ते बहुजन समाजाचे नेते होते हा विचार तुमच्यातील बुद्धीजीवीं प्रस्थापीत करु शकला नाही. ह्या उलट तुमच्यातील बुद्धीजीवींनी स्वत: निर्माण केलेल्या साहित्याला दलित साहित्य म्हणवून घेण्यात मोठेपणा मानला. साहीत्यच दलित असल्यामुळे ओबीसी पासून ते दूर राहिले. ओबीसी बहुजन बुद्धीवाद्यांचे वस्तुस्थितीवादी दलित साहित्य सोडून मनुवाद्यांचे मनोरंजनात्मक व कल्पनावादी ललीत साहित्य वाचत राहिले. साहित्य हे समाजाला जोडायचे वा तोडायचे दोन्हीही काम करु शकते. त्याच साहित्याला जर बहुजन साहित्य हे नाव दिले असते तर बऱ्याच ओबीसींना ते वाचावेसे वाटले असते. दलित व ओबीसी हे दोन्हीही ह्या समाजव्यवस्थेचे कमीअधिक प्रमाणात बळीच आहेत. साहित्यामुळे दलित व ओबीसी ह्यांची नाळ जुळली असती पण तसे झाले नाही. बाबासाहेबांना बहुजनांचे नेते सिद्ध करणे हे तुमच्यातील बुद्धीजीवींनी ठरविले असते तर ते तेवढेसे कठिणही नव्हते. थोडाबहुत बाबासाहेबांच्या इतिहासात डोकावून डोके लावण्याचा भाग होता. उदाहरणार्थ, बाबासाहेबांनी सायमन कमिशनसमोर इतर मागासवर्गासाठीही आरक्षणाची मागणी केली. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ओबीसींना आरक्षण मिळण्याची तरतूद म्हणून कलम ३४० टाकले. कलम ३४० ची अंमलबजावणी होत नाही हे पाहून पंडीतांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. डॉ. आंबेडकर – डॉ. पंजाबराव देशमुख संबंध, डॉ. आंबेडकर-नारायण नागो पाटील संबंध वगैरे. बाबासाहेबांनी 'हु वेअर द् शुद्राज्' हा ग्रंथ ओबीसींना त्यांचा पूर्व इतिहास कळावा व त्यांची झोपलेली अस्मिता जागावी ह्या करिताच लिहीला. तर दुसरा ग्रंथ 'रिडल्स् ऑफ हिंदुइझम' हाही ओबीसींना जागृत करण्यासाठीच लिहीला. ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच डॉ. आंबेडकर म्हणतात की -' हा ग्रंथ मी मागासवर्गीय हिंदु जातींना ब्राम्हणांच्या तावडीतून सोडविण्याकरिता लिहित आहे.' माझ्या माहीतीनुसारही डॉ. आंबेडकरांनी स्वत:ला कधीच दलित नेते मानले नाही तर वस्तुस्थितीला अनुसरून त्यांनी स्वत:स वेळप्रसंगी अस्पृश्यांचा प्रतिनिधी असेच म्हटले आहे. प्रतिनिधी आणि नेता यात फार फरक आहे. उदा. जसवंतसिंग परदेशात जातात तेव्हा ते भारताचे प्रतिनीधी असतात तर जेव्हा ते सर्वपक्षिय बैठकीत भाग घेतात तेव्हा ते भाजपाचे प्रतिनिधी असतात पण नेते मात्र ते त्या जनतेचे असतात जे त्यांना नेता म्हणून मान्यता देतात. ज्या दलित लेखकांनी बहुजनवादाच्या प्रक्रीयेत आपले साहित्य समर्पित केले अशा बुद्धीजीवी अनुसूचित जातीतील लेखकांचे मात्र आम्ही अभिनंदन करायलाच पाहिजे.
फुल्यांच्या बाबतीतही मनुवाद्यांनी असेच काही केले. फुल्यांनी अस्पृश्यांसाठी घरच्या पाण्याचा हौद खुला केला एवढाच प्रचार करून फुल्यांना दलिताचा नेता बनविले. तर फुल्यांची जात माळी असल्यामुळे त्यांचे भाजी मंडईत पुतळे उभारुन ठिकठिकाणी फुले मार्केट निर्माण केले. फुले हे भारतीय शिक्षणक्रांतीचे जनक त्यामुळे त्यांचे नाव खर तर विद्यापिठांना द्यायला हवे होते व त्यांचा जन्मदिवस हाच 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करावयास हवा पण तसे करतील तर ते मनुवादी कसले? पण आम्ही हाही प्रश्न स्वत:स विचारायला पाहिजे की त्या दृष्टीने आम्ही काही केले का? बोला कांबळे साहेब. बाबासाहेबांनी आरक्षणाचे तत्व ह्यासाठी अवलंबिले की आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण होणारा कर्मचारी वर्ग हा समतावादी राज्य निर्मितीच्या लढाईची फौज बनेल. पण बाबासाहेबांनी पाहिले की ह्या आरक्षण प्रक्रियेद्वारे त्यांच्या इर्दगिर्द फक्त बाबू व हुजऱ्यांची फौज निर्माण झाली आहे. तेव्हा महापरिनिर्वाण दिनाच्या काही दिवस आधी बाबासाहेब म्हणाले होते – 'मुझे मेरे समाजके पढे लिखे लोगोनेही धोका दिया.' आपल्या समाजातील अश्या पोटभरु व लाचार लोकांकरिता समाजात 'दलित ब्राम्हण' हा शब्द रुढ झाला आहे. आरक्षणातून नोकरी मिळाली की माझे काम झाले हे मानण्याऐवजी आताच माझे खरे काम सुरू होत आहे ही भावना आरक्षणातून नोकरी मिळविणाऱ्या वर्गाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. नेहमीच आपल्या अधोगतिसाठी ब्राम्हणांकडे अंगुलीनिर्देश करण्याचे सोडून स्वत: मी समाजासाठी काही केले पाहिजे ही भावना आता आमच्या मनात रुजली पाहिजे. ह्यापुढल्या काळात आम्हीच आमच्या स्वातंत्राचे वा गुलामीचे कारण ठरू हे आम्ही जाणून घेतले पाहिजे.