कांबळे : ढोबळेसाहेब आपण उत्साही दिसता पण माझेही आपल्याएवढेच फुले आंबेडकर साहित्याचे वाचन आहे. मी ही आंबेडकरवादी आहे.
मी : मग फुले-आंबेडकरी विचार समाजात फैलविण्याचा तुम्ही प्रयत्न करता का ?
कांबळे : अहो तुमच्यासारखी समाजसेवेची हौस नाही मला. तशी हौस असावी लागते. वेळ असावा लागतो. पैसा खर्चावा लागतो.
मी : साहेब स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी वेळेचे कारण कृपया सांगू नका. वेळ कोणापाशीच नसतो, तो काढावा लागतो आणि माणूस तो तव्हाच काढतो जेव्हा त्याला त्या कार्याबद्दल रुची असते, कार्याची महती कळली असते. नुसते फुले-आंबेडकर वाचणे म्हणजे फुले-आंबेडकरवादी होणे नव्हे तर जो ह्या विचारांचा समाजात सक्रीय प्रसार करतो तो खरा फुले-आंबेडकरवादी. ब्राम्हणवादामुळे आजही समाजात जातीनिहाय शोषक व शासीत असे समाजाचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शोषक-शासीत रहीत समतावादी जातीयअंतवादी अहिंसक समग्र समाज परिवर्तनाची कार्यरत विचारधारा म्हणजेच फुले-आंबेडकरवाद. आणि कांबळेसाहेब हे काम मी हौस म्हणून किंवा इच्छा म्हणून नव्हे तर आज देशाची, समाजाची बाध्यताच आहे म्हणून करीत आहे. आणि कांबळे साहेब तुम्हाला आरक्षणापासून नोकरी मिळालेली आहे त्यादृष्टीने तुम्ही ह्या चळवळीची लेकरे आहात. त्यामुळे तुमची बाध्यता तर अधिकच वाढून जाते. एखाद्या बापाने शेतीत राबराब करुन पोराला मोठ कराव आणि मोठा डॉक्टर वा इंजिनीयर झाल्यावर पोरानी म्हणावं की आता बापाला कुण्या दुसऱ्यान हौस असेल म्हणून ठेवावं व स्वत: विसरावं. ह्यासारखा आपमतलबी व गद्दार पोरगा जगात कोठेच सापडणार नाही. म्हातारपणी बापाचा सांभाळ करावा ही हौस असो वा नसो पण ती बाध्यता निश्चित असते, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहीजे आणि आपला वाटाच मिळवून देणाऱ्या बापाला पोरांनी विसराव ह्यासारखे महापाप नाही. आम्ही मग आंबेडकरांना बाबासाहेब म्हणायच्याही लायकीचे नाही. कांबळेसाहेब फक्त डोळे बंद करुन विचार करा. आरक्षणाचे तत्व नसते तर तुम्ही आज कोठे असता. आरक्षणाद्वारे निर्माण झालेल्या नोकऱ्या व नोकरी करणारा वर्ग ही चळवळीची फार मोठी साधन आहेत. साधनांनाच आपल्या निर्मीतीचा व ध्येयाचा विसर पडला तर साधनही लवकरच नष्ट होतात. कारण उपयोगी नसलेली साधन कचऱ्याच्या भावात विकून टाकावी लागतात. आरक्षणाच्या माध्यमातून समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हास मिळाली आहे त्याचा पुरेपूर उपयोग आम्ही केला पाहीजे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, 'भारतासारख्या देशासाठी प्रातिनीधीक सरकार हे कुठल्याही कार्यक्षम सरकारापेक्षा जास्त उपयुक्त राहील.'
आरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी संधीचा विस्तार केला. खुल्या स्पर्धेत संधी मिळाली नसती म्हणून संधीचा रथ आमच्यापर्यंत आणला. पण ह्या संधीचा अधिक विस्तार करायचा म्हटल तर मिळालेल्या संधीतून अथक परिश्रमाने आम्हाला एवढा विकास करावा लागेल की आम्ही स्वबळावर खुल्या स्पर्धेतही संधी मिळवू शकू व बाबासाहेबांनी आणलेला संधीचा रथ आमच्याच समाजातील अतिशय मागासलेल्या व गरीब जनतेपर्यंत पोहोचवू शकू. आम्ही हे काम करू शकलो नाही व वारंवार ह्या रथात आम्ही व आमची पोर एवढच बसत राहिलो तर हा बहुजनसमाज स्वत:च हा रथ कोलमडून टाकेल, हे ही आम्ही लक्षात ठेवायला हवे. आम्हाला आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळाले आहे. लोकसंख्या करोडोत आहे तर नोकऱ्या फक्त लाखात. म्हणजेच शेकडा १ नोकरी. म्हणजेच ह्या गोष्टीचा आम्ही सातत्याने विचार करायला हवा की ह्या नोकऱ्या आम्ही खुल्या स्पर्धेत योग्यतेच्या आधारावर मिळविलेल्या नाही तर आमच्या समाजाच्या मागासलेपणाच्या आधारावर विकासासाठी मिळविलेल्या आहे. ह्या नोकऱ्यावर फक्त १ टक्के आमचा अधिकार आहे तर ९९ टक्के अधिकार मागासलेल्या समाजाचा आहे. जर दिवसाला आम्ही १०० घास ह्या नोकऱ्या मिळवून खात असू तर फक्त एकच घास आमच्या हक्काचा आहे बाकी ९९ घास आम्ही आमच्या लोकांच्या हिस्स्याचे खात आहोत. ह्यातील काही घास तरी समाजातल्या अतिदुर्बल बांधवांसाठी आम्ही राखून ठेवणार की नाही ? एवढी माणूसकी आमच्यातही नसेल तर आम्हीही कुठले फुले-आंबेडकरवादी.
ब्राम्हणवाद हे ऐतखाऊचे अर्थशास्त्र आहे. हे अर्थशास्त्र विषम वाटपावर आधारलेले आहे. फुले-आंबेडकरवाद हे शेतकऱ्याचे व कामगाराचे अर्थशास्त्र आहे. हे अर्थशास्त्र उत्पादकतेवर आधारलेले आहे. 'तुम्ही कमवा आम्ही खातो' हे ब्राम्हणवादाचे अर्थशास्त्र आहे तर 'सर्वच कमवू सर्वच खाऊ' हे फुले-आंबेडकरवादाचे अर्थशास्त्र आहे. ब्राम्हणवाद हे तोकडीचे व वजाबाकीचे अर्थशास्त्र आहे तर फुले-आंबेडकरवाद हे मुबलकतेचे व बेरजेचे अर्थशास्त्र आहे. ब्राम्हणवाद हे माणसाला माणसापासून तोडणारे समाजशास्त्र आहे तर फुले-आंबेडकरवाद माणसाला माणसाशी जोडणारे समाजशास्त्र आहे.
कांबळे : ढोबळेसाहेब, माणसं आम्हीही जोडू इच्छितो. पण दुसरे जुळायलाच तयार नसतील तर आम्ही काय करणार? लोकशाहीच्या प्रक्रियेमुळे आता सर्वच जातींना एक दुसऱ्यांशी जोडून घ्यावे लागते. पण ही जोडणी फक्त निवडणुकीपर्यंतच मर्यादीत राहत असेल तर ही जोडणी कुचकामी आहे. कालपर्यंत छत्रपती शिवरायांना, फुल्यांना व शाहू महाराजांना शुद्र लेखणारे ब्राम्हण आज तुम्हा ओबीसींना 'गर्वसे कहो हिंदु है' चा नारा देऊन जोडून घेतात फक्त सत्तेपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी. पण सत्तेत आल्यावर तुम्हाला तुमचा वाटा मिळतो का ? मंडल आयोग हे ओबीसी हिंदुसाठीच होते ना मग त्याविरुद्ध दंगल करणारे, सरकारे पाडणारे व सुप्रिम कोर्टात जाणारे कोण ह्यांची जात वेगळयाने सांगायची तम्हाला तरी गरज नाही. दुसरीकडे आम्ही तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतो, तेही सत्तेतील तुमची हिस्सेदारी ठरवून. 'जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी हिस्सेदारी.' फक्त सत्तेपर्यंत पोहोचून सत्तेचे फायदे घेणे हे आमचे लक्ष्य नसून सत्तेद्वारे समग्र समाज व्यवस्थेचे परिवर्तन हे आमचे लक्ष्य आहे. ज्या समाजव्यवस्थेत माणूस हा माणूस म्हणून ओळखला जाईल, जात म्हणून नव्हे. असे असूनही ओबीसी आम्हास सहकार्य का करत नाही हे आम्हास कळत नाही ?
ढोबळे : मला वाटतं आता ज्याप्रमाणे आपण बोललात तसे किती ओबीसीशी यापूर्वी बोलले आहात ?
कांबळे : मी स्वतः कुणाशीच बोललो नाही. पण दलीत चळवळीतील माझे काही मित्र त्यांच्या अनुभवाने मला असे सांगतात.
मी : माफ करा. तुमचे ते मित्र ब्राम्हणवादी व्यवस्थेचे एकतर हस्तक आहेत किंवा पूर्णपणे गुलाम मानसिकतेचे आहेत. त्यांच्यासारख्या लोकांच्या प्रचाराला बळी पडून आपणासारखी बुद्धीवादी मंडळी घरीच बसून राहते आणि त्यामुळेच ब्राम्हणवाद्यांना खुले रान मिळते. तुमचे मित्र चळवळीचे हितशत्रु आहेत. चळवळीच्या हितशत्रूच्या हातात सूत्रे आल्यामुळे ज्या महाराष्ट्रात फुले-शाहु-आंबेडकरांचा जन्म झाला त्या महाराष्ट्रात ही चळवळ गतप्राण होत आहे, तर उत्तर भारतात हीच चळवळ उग्र स्वरुप धारण करीत आहे. ही खरी सत्यस्थिती आहे.