कांबळे : ढोबळेसाहेब, आपण माझे डोळे उघडलेत. दहा बारा वर्षाआधी आमच्या जुन्या वस्तीत, जेव्हा बाबासाहेबांची जयंती व्हायची तेव्हा बाबासाहेबांच्या नावानीच माझ्या अंगात स्फुरण चढायचे. बाबासाहेबांचे नाव घेतल तरी त्यांचे समग्र आयुष्य आठवून अंगावर रोंगटे उभे राहायचे. पण आज मला कळल की बाबासाहेबांच्या नावापेक्षा बाबासाहेबांच्या विचारात व कृतीत भयंकर ताकद आहे. नाव घेण्याच्या जल्लोषात विचारांचाच आम्हाला विसर पडला. बाबासाहेबांच्या पुतळयाला चपलांचा हार पडलेला पाहून रस्ता रोको व बंद करायला लागलो. संतापायला लागलो आणि दलित म्हणून मुख्य बहुजन समाजाच्या प्रवाहातून स्वत:च दूर व्हायला लागलो. आधीच ब्राम्हणवादी व्यवस्था आम्हास शास्त्राद्वारे बहिष्कृत करत होती. आता त्या व्यवस्थेने सरळ बाबासाहेबांच्या पुतळयाचाच उपयोग करुन आम्हास बहिष्कृत करण्याचे षडयंत्र रचत असावे, असा विचारच आम्ही केला नाही.
ढोबळे : पुतळा प्रकरणावरून सांगतो. पुतळ्याला टाकलेला हार हा एखाद्या समाजद्रोह्याचे काम आहे असे समजून तो हार लागलीच एखाद्या आमच्यातील शहाण्याने काढून फेकला असता तर त्या प्रकरणात आमच्या काही बांधवांचे बळी गेले नसते. ज्या बाबासाहेबांच्या पुतळयावरुन आम्ही एवढे रान उठवितो त्याच बाबासाहेबांना ते बडोद्याला चांगले अधिकारी असतांना हाताखालचा चपराशी बाबासाहेब अस्पश्य म्हणन पाणी द्यायचे नाकारतो तर दिवाण पाणी घेण्यास मनाई करतो. पण बाबासाहेब त्या चपराश्याचा किंवा दिवाणाचा सूड घेत नाही वा त्यांचा राग मनात धरत नाही तर अपमान पचवून व्यवस्था परिवर्तनाच्या कार्याला लागतात. बाबासाहेब विचार करतात की एवढा उच्चशिक्षित असूनही ही मंडळी माझ्याशी अशी का वागते? उत्तर मिळते. त्यांच्या मनात भिनलेला मनूचा कायदा आणि म्हणून ते १९२७ ला मनुस्मृतीचे दहन करतात. माणसाला माणूस म्हणून दर्जा देणारे कायदे निर्माण करण्याचा चंग बांधतात. भारताची राज्यघटना लिहितात आणि म्हणूनच त्यांच्या प्रचंड कार्यामुळेच त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात पंडीत नेहरु बाबासाहेबांनी देशाचे कायदेमंत्री व्हावे म्हणून आग्रह धरतात. ह्याप्रकारचे परिवर्तन आम्हास आवश्यक आहे. पुतळा प्रकरणानंतर भावनिक झालेले तरुण रस्त्यावर उतरतात.दिसेल ती बस फोडतात. रस्त्यावरिल वाहनांना रोखतात. एका प्रकारात माझ्या शेजारच्या माळी वहिनीची लूना काही युवकांनी खाली पाडली व वहिनी कश्याबश्या धावत घरी आल्या व म्हणाल्या, 'भाऊ तुम्ही कितीही म्हणा, कितीही आरक्षण आणि सवलती ह्यांना द्या, ही दलित मंडळी कधीच सुधरणार नाही.' एव्हाना आतापर्यंत माळी वहिनींना, मी फुले आंबेडकर । विचार सांगत आलेलो, पण आता त्या मात्र ऐकायच्याच मन:स्थितीत नसतात. ओबीसी व दलितातील ही दरी निर्माण करायला आम्हीच कारणीभूत ठरतो. आणि ज्यांना हे घडवायचे असते त्यांना एक चपलेचा हार ब्रम्हास्त्र ठरतो. अशा प्रकरणामागील मनूवादी मानसशास्त्र आम्ही समजून घेतले पाहिजे. पुतळयांना हार घालणारे जसे पाताळयंत्री असतात तेवढेच धोकादायक हार न काढणारे ही असतात. गळयातला हार दाखवून लोकांच्या मनातल्या भावना भडकवायच्या व ह्या भावनांच्या बळावर राजकारणाची पोळी शेकणारे आमच्यातही काही कमी नसतात. समाजाचे हेही खरे हितशत्रू होत. ह्यांना चांगले ओळखून चळवळीपासून चार हात दूर ठेवले पाहीजे वा त्यांच्यात योग्य परिवर्तन घडविले पाहिजे. कुठलीही लढाई ही भावनिक आधारावर नव्हे तर वैचारिक आधारावर लढली पाहिजे.
कांबळे : तुमचे म्हणने बरोबर आहे. जोशी साहेब अजून काय बोललेत माझ्याबद्दल ?
मी : जोशी म्हणालेत कांबळेनी फ्लॅटच्या इंटेरिअर डेकोरेशनवर तीन चार लाख खर्च केले ? आला कुठून एवढी पैसा ?
कांबळे : ढोबळेसाहेब. जोशी हे कुठल्या उद्देशाने बोलले हे मला कळत नाही, पण ते बोलले ते खरेच. माझ्या समाजातील करोडो कुटुंबे आजही झोपडपट्टीत व रस्त्यावर राहत असताना माझा फ्लॅट असा आलिशान सजविण्याचा मला काही एक अधिकार नाही. कालच चळवळीत काम करणारा बामसेफचा एक कार्यकर्ता अधिवेशनासाठी वर्गणी मागायला आला तर मी त्याला पिटाळून लावले. चूक केले. मी स्वत: समाजासाठी जर मी काही एक करीत नाही तर कमीतकमी चळवळ चालविणाऱ्या कार्यकर्त्यांना तरी मदत करायलाच पाहिजे. फ्लॅटवर खर्च केलेल्या तीन-चार लाख रुपयांनी गृहरचना बदलते तर चळवळीवर खर्च केलेल्या १००० रुपयांनी समाजरचना बदलते, ह्या जाणिवेलाही मी बोथट झालो ह्याचे वाईट वाटते. ढोबळेसाहेब ओबीसी सेवासंघाच्या येणाऱ्या अधिवेशनासाठी मी तनमनधनाने मदत करेल. अग, ढोबळेसाहेबांसाठी चहा घेऊन ये.
मी : नको, मी सकाळीच चहा घेऊन निघालो होतो. कांबळे : नको कसा ? तुम्हाला घ्यावाच लागेल.
ढोबळे : ठीक आहे. एवढा आग्रह करता तर घेतोच चहा.