अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
मी. : वडसावित्रीचा उपवास कशासाठी करावा लागतो ?
सौ. साळवी : अहो ह्यादिवशी प्रत्येक स्त्री आपल्या पतीचे दिर्घायुष्य चिंतते व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करते.
मी: आमच्या शेजारी एक चोपडे कुटुंब राहते, त्या बाईचा नवरा रोज दारू पिऊन येतो व तीला सतावतो तरी ती वडसावीत्री करतेच हे योग्य आहे का ?
सौ. साळवी : बाई म्हटली की तीने वडसावीत्री करायलाच हवी.
मी : अहो रोज दारू पिऊन येणारा व बडवणारा नवरा जन्मोजन्मी मिळण्याची इच्छा बरोबर का ?
सौ. साळवी : अहो पण ती बाईची जात, तिने वडसावीत्री करणे जरूरीचे. ही धर्माची बाब आहे.
मी : वहीनी नाही. चुकताय तुम्ही. आपला नवरा कितीही वाह्यात, दारूडा, हिंसक असला तरी तोच नवरा मिळावा म्हणुन बाई, वडसावित्री करते. मग अशाच प्रकारे कशीही असली तरी , जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, म्हणुन साळवीसाहेब तुच्यासाठी, एखादा उपवास वा व्रत करतात का ?
सौ. साळवी : अहो साहेब म्हणजे पुरूषजात
मी : बस वहिनी यथेच सर्व घोटाळा आहे. लाथा मारणारा नवरा असला तरी स्त्रीने उपवास धरावा कारण ही स्त्री जात. आणि तुमच्यासारखी सुशील बायको असुनही, साळवीसाहबांनी काहीच कर नये, कारण, ही पुरूषजात. स्त्री - पुरष विषमतेच्या महावृक्षाचे बिजारोपण आम्ही आमच्या अशाच धार्मीक संस्कारातून वा उपवासतून करीत असतो. वडसावित्री सारख्या प्रथेतुन स्वाभाविकत:च पुरूषश्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ हा भाव समाजात निर्माण होत असतो. दारू पिऊन लाथा मारणार्या नवर्याच्या निषेधासाठी तरी कमीत कमी स्त्रीयांनी एखाद्या वर्षी तुमच्यासाठी वडसावत्रीचा उपवास मी करणार नाही असे नवर्यास बजावून सांगावे पती गेला म्हणून पतीच्या चितेचा दाह सहन करून आपल जीवन संपविणार्या सतींची प्रथा ही ह्याच तुमच्या वडसावित्रीच्या उपवासाच्या मानसिकतेचा परमोच्च बिदु होता. मरतमरत जगायच नवर्यासाठी आणि नवरा मेला की जगतजगत मरायचे नवर्यासाठी. हीच ती सती प्रथा. ह्या सतीप्रथेविरूद्ध बंड करणारा इतिहासातील पहिला राजा होय छत्रपती शिवाजी महाराज. शहाजी राजे गेल्यावर जीजाबाईंना सती जाण्याचे ठरविले. त्यावळेसे शिवाजींनी आपल्या आईला म्हटले, ‘आई, स्त्री ही फकत त्यांच्या पतीसाठी असते का ? पुत्रासाठी नाही ? पुरूषासाठी तर ती पत्नी असते आणि मुलांसाठी ती आई. शहाजीराजेच्या मृत्युनंतर पत्नी म्हणुन तर तुम्ही तशाच मृत झाल्या अहात पण आई म्हणुन तुम्ही माझ्यासाठी आताही जीवंत आहात.’ प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एखादी स्त्री असते. छत्रपती शिवरायांच्या यशामध्ये त्यांची आई होती. तिने तिच्या शिवबाला छत्रपती शिवराय बनवीला होता. शिवाजी आईला म्हणाले, ‘ह्या स्वराज्यासाठी गुरू म्हणून, मार्गदर्शन म्हणून मला तुझी फार मोठी गरज आहे. तु सती जाऊ नकोस.’ आपल्या ह्या बाळाच्या आवाजाला ओ देत जिजाबाई सती गेल्या नाही. क्षत्रिय स्त्री म्हणून सती जाण्याचा धर्म त्यांनी आपल्या बाळासाठी मोडला. ह्या जगात मृत्युशिवाय सनातन काहीच असु शकत नाही. काळाच्या ओघात सर्वच काही बलदल आहे आणि बदलत नाही तो, मागासलेला रहतो. ज्यांच्यात बदलण्याचे सामर्थ आहे, तेच जगालाही बदलु शकतात.
सौ. साळवी : तुम्ही आपल्याबद्दल असे बोलता. पण मुसलमान लोकही महीनामहीना भर उपवास करतात. ते त्यांचा उपवासाला रोझे असे म्हणतात.
मी : पहिले तर कुणी एक व्यक्ती असे करतो, म्हणून मी ही तसेच करावे, हे काही तर्कशास्त्र ठरू शकत नाही. आण रोझ्यांचंच म्हणायच झाला तर, त्या महिन्यात मुसलमान उपवास वगैरे करीत नाही तर त्यांच्या जेवणाची वेळ बदलवितात. सकाळचे जेवण ते सूर्योदयाच्या आधी करतात. ह्यामुळे निश्चितच पोटावर ताण येतोच. त्यातही ते उन्हाह्याचे दिवस असलेत, तर त्रास अधिकच होतो. असेच एकदा रोज्याच्या महिन्यात बुरखा घातलेली एक मुस्लिम महिला तीच्या हातात असलेल्या बाळासहीत चक्कर येऊन रस्त्यावर पडली. महिला बेशुद्ध होती आणि बाळ रडत होते. तिच्या भोवती लोक जमा झाले होते. मीही तेथे गेलो. रोझ्यामध्ये मुस्लीम लोक पाणीही पित नाही. बुरखाधारी मुस्लीम महिला म्हणुन लोकही गोंधळलेलेच. मी त्यातील काही लोकांना म्हटले, ‘अरे, ह्य महिलेला उचलून सावलीत तर ठेऊ या.’ काणीच सार येईना. महीला बुरखाही ह्यासाठी घालत की, तिला कुणीही पाहु नये, वरून गृहस्थ तिला हात लावून, सावलीत न्यायला सांगतो. मग मी पुन्हा म्हटले, ‘अरे हे बाळ इथ रडत आहे. ही आई आहे म्हणुन, तरी हिला उचलुन सावलीत नेऊ या.’ त्यानंतर दोन - तीन धडधाकट मुले समोर आली आण जवळच्याच एका दुकानाच्या सावलीत तिला आणली. दुकानदाराकडून पाणी मागून, त्याबाईच्या तोंडात ते पाणी ओतले. तिच्या तोंडावर पाणी शिंपडल. आणि ती शुद्धीवर आली. रडणारा बाळ तिने अंगाशी घेतलं. दुकानदारानी त्या बाईला माझ्याकडे, अंगुलीनिर्देश करन सांगितल, ‘बहन, ये अदमीने आपकी जान बचायी,’ माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकत ती म्हणाली, ‘काफीर कही का ? पाणी पिलाके मेरा रोझा डुबाया.’ अरेच्या शुक्रीयाच्या ठिकाणी शिव्याच मिळाल्या. पण मी तिच्याकडे बघितल. तिच्या डोळ्यात धर्म डुब्याचा कडवटपणा होता पण दृष्टीक्षेपात धन्यवादाचाच इशारा होता. हसतहसत मी तेथून निघोला वेळीच माणुस म्हणून दुसर्या माणसाला मदत करणे हाच खरा धर्म.
सौ. साळवी : तुम्ही बरोबरच वागला भाऊजी आपल्यापैकी कोणी दवाखान्यात अॅडमीट असला की तेव्हा कसला उपवास आणि कसल काय ? डॉक्टर ज्याप्रमाणे औषध आणि जेवण सांगतो तेवढच ऐकाव लागत.
मी : पण आपण तेवढ तरी ऐकतो का ? माझ्याच घरचीच गोष्ट सांगतो. आमच्या आईला अशक्त वाटायचे म्हणून घराजवळच्याच एका लेडी डॉक्टर कडे आईला घेऊन गेलो. आईला डायबीटीस झाल्याचे रक्त तपासणीनंतर समजले. डॉक्टरांनी विचारल की, ‘काही उपवास वगैरे करता का ?’ आई सोमवार करायची. डॉक्टरने सांगीतले, ‘बघा आता आपण सोमवार वगैरे करत जाऊ नका, खरतरं उपवास वगैरे कुठलेच करायची गरज नाही. जीवशास्त्राच्या प्रथमीक नियमानुसार शरीराला उर्जेसाठी अन्नाची गरज आहे आणि हे अन्न शरीराला नियमीत मिळाले, तर नियमीत उर्जा मिळेल व कामामध्ये नियमितता राहील आतातर तुम्हाला डायबीटीस झाला, त्यामुळे नियमीत अहार, वेळच्यावेळी औषध, सार नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.’ डॉक्टरांच्या सांगण्याचा आईवर काही एक फरक पडला नाही. तिचे सोमवार करणे सुरच होते आणि नेमके एका सोमवारी चक्कर येऊन ती पडली व दवाखान्यात अंडमीट करावे लागले. डॉक्टरांनी आईला सलाईन वगेरे लावून शुद्धीवर आणले व सांगितले की हे सर्व तुमच्या सोमवारचा उपवास करण्यामुळेच झाले. आतातरी सोमवारचे उपवास सोडा. आईने मात्र ह्यावेळेस डॉक्टराचा सल्ला मानला. काही काळाने माझ्या मुलीच्या पहल्या वाढदिवसाला ह्याच डॉक्टरबाईंना मी निमंत्रण दिले. वाढदिवसाला जेवणाचा बेत होता. मी डॉक्टरबाईंना म्हटल, ‘मॅडम, जेवण सुरू करा.’ त्यावर त्या म्हणाल्या ‘माफ करा हं आज पौर्णिमा आहे माझा उपवास असतो.’ मी म्हटल, ‘मॅडम पण तुम्ही डॉक्टर आहात, जीवनशास्त्राच्या प्र्राथमिक नियमाचे काय झाले’, त्यावर त्या बोलल्या, ‘आमचा रोहीत फार उशीरा झाला. तो व्हावा म्हणूनच मी हे उपवास सुर केल आणि नंतर रोहीत झाला. ह्या उपवासाशी माझ्या रोहीत बद्दलच्या भावना जुळलेल्या आहेत. मग येईल मी कधीतरी जेवायला.’ आणि डॉक्टरीन बाई निघुन गेल्या खरं तर जीवशास्त्र व आरोग्यशास्त्रात पारांगत एक महिला, उपवास आणि आपल्याला मुलगाहोणे हा एक अवैज्ञानीक संबंध मानते. दुसरे असे की हीच बया उपवास करीत असल्यामुळे पहिल्या भेटीतच ती माझ्या आईला उपवास करू नये हे ताकदीने सांगु शकली नाही., समजवू शकली नाही. दुसर्यांदा माझी आई आजारी होणे चक्कर येऊन पडणे, अॅडमीट होणे, दोन दिवस आमच्या घरच्या सर्वाचे चिंतेत जाणे ह्यास हीच महिला जबाबदार होती. आपल्या करिअर साठी व पैसा कमविण्यासाठी तिने जीवशास्त्राचा अभ्यास केला होता. पण तेच शास्त्र ती आपल्या रोजच्या जीवनात वा स्वत:च्या मनात उतरवू शकली नव्हती, कारण उपवासाची महा अंधश्रद्धा, तीच्या ह्या वैज्ञानीक सुसंगत अभ्यासालाही रोखत होती. आमच्या देशात विज्ञान शिकलेल्या व पोटापाण्यासाठी त्याचा उपयेग करणारे अनेक महाभाग आहेत, पण आचरणात त्यांच्या विज्ञान नाही, वैज्ञानीक दृष्टी नाही आणि म्हणुनच विज्ञाननिष्ठा अमेंरिकेची प्रगतीची तारीफ करणे., जमल्यास तेथील लोकांच्या एखाद्या वाईट गोष्टीबद्दल गवगवा करून, हे पाश्चात्य लोक असेच म्हणुन बोटे मोडणे व पुन्हा अमेरिकेत एखादी चांगली नोकरी मिळते का ? ह्या ध्यासात आमच्या डॉक्टर आणि इंजिनीयर झालेल्या पिड्या जगत आहेत. आम्ही कृतीत एक आणि विचारात एक असे अतिशय दांभीक जीवन जगत आहोत.
ह्याच अनुषंगाने मला स्वामी परमहंसाची एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा एक बाई स्वामी परमहंसाकडे आपल्या मुलाला घेऊन गेली व स्वामींना म्हणाली, ‘ह्या पोराला साखर खायची फार वाईट सवय आहे. त्यामुळे ह्याच्या पोटत नेहमीच किउे होतात. स्वामी, ह्याची ही सवय आपण सोडवून द्यावी.’ स्वामींजीनी त्या महिलेस एका आठवड्यांनी यावयास सांगतिले. आठवड्यांनी ती बाई आली. तिला स्वामीजींनी पुन्हा पुढच्या आठवड्यास येण्यास सांगितले. असे होत होत सहा आठवडे निघुन गेल. ह्यावेळेस मात्र स्वामीजींनी या मुलाला सांगितले. ‘बेटा साखर खाऊ नये. साखर खाणे वाईट आहे. जा आता.’ ह्यावर त्या मुलाची आई म्हणाली. ‘स्वामीजी फक्त ऐवढेच सांगायचे होते तर मला सहा आठवडे चकरा कशाला मारायला लावल्या. एवढे तुम्ही पहिल्या भेटीत सांगु शकले असते.’ त्यावर परमहंस बोलले, ‘आई तुला कस सांगू, पहिल्यांदा जेव्हा तु माझ्याकडे आलीस तेव्हा मलाही साखर खावी ही वाईट सवय होती. मला वाटले एका आठवड्यात मी ही सवय सोडेल. पण मलाच ही सवय सोडायला सहा आठवडे लागले. आता माझी ही वाईट सवय पुर्णपणे सुटली आहे आणि म्हणुनच मला समजविण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि मी ह्या तुझ्या मुलाला सांगु शकलो की साखर खाणे ही वाईट सवय आहे. ती सवय सोडून दे. स्वत:च संस्काराचे बिजारोपण झाल्याशिवाय तो संस्कार दुसर्याला देऊ शकतो.’ ती बाई मुलाला घेऊन निघन गेली. परमहंसाच्या ह्या प्रामाणीक पणातुनच एखादा जगप्रसिद्ध विवेकानंदासारखा शिष्य होऊ शकतो.
इंजिनियरींग कॉलेजला असतांना मनोज नावाचा माझा एक मित्र होता. काही दिवसापासुन तो रात्रीचा घाबरून उठायचा व मग त्याला झोपच लागायची नही. कॉलेजच्या डॉक्टरानी मानसोपचार तज्ञाकडे त्यांस पाठविले. नऊ वाजता मानोसपचार तज्ञाचा दवाखाना उघडतो म्हणुन बरोबर नऊच वाजता मनोजला घेऊन डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरीही नऊ वाजता आले. दहा मिनीटांनी डॅक्टरचे केबीन उघडून बघीतले तर हे डॉक्टर, केबीनमधील देवांच्या फोटोची पूजा करत होते. अर्धा तास झाला, पुन्हा दरवाजातुन डोकावून पाहीले, आता तोच प्रकार. मग मनोजला म्हंटले, ‘मनोज चल, हा डॉक्टर भलताच की दिसतो. हा मानसोपचार तज्ञ आहे, पण ह्याला, मानसशास्त्राचा अभ्यास व्यवस्थित आत्मसात झालेला दिसत नाही.’ खर तर देवाची निर्मीतीच मुळात माणसाच्या मनाने केलली आहे. आदिकाळात आदिमानवास विज्ञानाची ओळख नव्हती. घर्षणामुळे आग लागून जंगलाची जंगल जळून खाक व्हायची. ह्या भितीपायी त्याने आगीस देव मानले. जंगल जळाल्यामुळे ज्या प्राण्यावर वा फळावर त्याची गुजराण व्हायची ती जळून नष्ट व्हायची. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी मलेल्या जनावरांचे मास व फळे साठवून ठेवण्याची बुद्धी त्यास आली. वादळ वार्या पावसामुळे त्यांच्या राहायची गैरसोय व्हायची, ह्यातूनच गुफेत राहणे व स्वत:चे घर बांधणे ही बौध्दीक संकल्पना त्यांच्या मनात आली. पण ह्याच प्रक्रियेने तो आग, पाऊस आणि वादळे ह्यांनी अस अचानक येऊन त्यांची गैरसोय करू नये म्हणून, मानसिक अवस्थेतून, त्यांची पूजा करून, त्यास देव मानून, समाधान करण्याची क्ृलती योजली. आजही भोळेभाबडेे अज्ञानी लोक दु:खाच्या वा संकटाच्या प्रसंगी देवाची आठवण करूनच वा देव माझ्या पाठीशी उभा आहे ह्या विचारातून, स्वत: स्वत:स मानसीक सामर्थ्य देतात. पण हे सामर्थ्य एक देव नावाच्या कल्पनेवर अवलंबून असते, ते वास्तविकेत नसते. हचा बोध हळूहळू माणसाला होतो. लहापनपणी मी हनुमानाची खुप भक्ती करायचो. प्रत्येक शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जायचो. मला असे वाटायच की माझ्यावर कधी काळी प्रसंग बेतला, तर हनुमान माझ्या पाठीशी आहे एवढेच नव्हे तर वेळ तो स्वत:च प्रगट होऊन, माझे रक्षण ही करेल. शाळेत आठव्या वर्गात असतांना दोन वर्ष नापास झालेल्या, एका बलदंड वर्गमित्राशी, दोन हात करायची माझ्यावर वेळ आली तो जरी बलदंड असला तरी मी त्याचा चांगलाच बदडून काढू शकतो, हा विश्वास हनुमानजीमुळे माझ्या मनात होता. फाईटींग सुर झाली. त्याच्या हातच्या दोनचार बुक्या खाल्यावर मी हनुमानजींची आळवणी करू लागलो. पण कसला हनुमान येतो धाऊन, माझ्या मदतीला. शेवटी सर्व शक्तीनिशी तेथुन पळत सुटलो. घरी येऊन आरशासोर उभा राहिलो, तर काय त्या बलदंड मुलांनी मारून मारुन, मलाच हनुमान बनवले होते. आठडाभर मग मी लाजेखातर शाळेत गेलो नाही. वर्गातील सर्वच मुल मुली हसतील, अशी भिती मला वाटायची. पण ह्या आठवड्याभरात मी विचार केला, की माझा तो बलदंड मित्र दोन वर्ष नापास जरी झाला असला तरी, तो चंगला खेळाडू होता. त्याचे शरीर पिळदार होते. त्यांच्या देहयष्टीपुढे मी एकदमच हडकुळा होतो आणि तो मला मारणार हे निश्चितच होते. सोबतच हे ही कळले की नियमित हनुमानाच्या देवळात गेल्यामुळे हनुमान मदतीला वगैरे येईल, ही फक्त माझी भोळी भाबडी भावना होती. हनमुानाची भक्ती करणे, म्हणजे देवळात जाणे व पुजणे नव्हे, तर हनुमानाचे ज्याप्रमाणे, पिळदार शरीर आहे, त्याचा आदर्श ठेऊन नियमित व्यायाम करणे, दंडबैठका मारणे, जिममध्ये जाणे व त्यातून सुदृढ शरीर निर्माण करणे. आजही आपण विचार केला तर आपल्याला कळते की धनाची देवता लक्ष्मी हीची पूजा जगाच्या पाठीवर भारतात जेवढी केली जाते., तेवढी कोठेच नसेल, पण तरीही देश धनवान असण्याऐवजी, 50 टक्क्यापेक्षा जास्त लोक ह्या देशात गरीबी रेषेच्या खाली जगतात. 50 टक्के लोकांना एकवेळचे जेवण सुद्धा मिळत ही. जगाच्या पाठीवर विद्येची देवता सरस्वती हीची पूजा भारतात जास्त होेते. पण तरीही ह्याच देशात जवळ जवळ 40 टक्के पुरूष व 60 टक्के स्त्रिया ह्या असाक्षर व अज्ञानी आहेत. ह्यामुळे आज आम्हाला प्रतिमांच्या मागचा अर्थ दाखवा लागेल. वा वेळ पडल्यस प्रतिकेही बदलावी लागतील. लक्ष्मीची पूजा करण्याचा अर्थ फायनन्स मॅनेजमेंटमधये एमबीए व पी.एच.डी करणे असा धरावा लागेल वा सरस्वतीची पूजा करण म्हणजे एखादा वैज्ञानिक शोधासाठी आपले जीवन समर्पित करणे, असा लावावा लागेल. प्रतिकच बदलायची झाल्यास गरिब शिक्षकाचा खेड्यातील पगार, ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत, ह्या देशातील सर्वसाान्य माणसांना, रिलायन्ससारख्या एका मोठ्या उद्योगाच्या भागीदार बनवितो. देशात आर्थीक क्रांती आणतो तो धिरूभाई अंबानी, लक्षमीच्या ठिकाणी आम्हाला प्रतिक मानावा लागेल,. तर ‘विद्याविना मती गेली’, असे जाणून सकळ बहुजनासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणारा व त्यांच्या ह्या कार्यात, त्यास साथ देणारी, त्यांची अर्धांगीनी, सावित्री फुले ही नव्या सरस्वतीची प्रतीक म्हणून आम्हास मान्य करावे लागतील.
साळवी : तुमचे म्हणने बरोबर आहे ढोबळे साहेब. पण तुमचा मित्र मनोज त्याचे काय झाले.
मीः मानसशास्त्राची चार दोन पुस्तक मीही वाचली होती. शाम मानवांचा कॅडर कॅम्प एव्हाना मी अटेंड केला होता. मी मनोजला अंतर्मनातून बोलायला लावले. मनोज त्याच्या अंतर्मनातून बोलला की त्याला तो ज्या होस्टेलमध्ये रहातो, तेथल्या वार्डनची, एक नकळत भिती निर्माण झालेली आहे. तो झोपला की अंतर्मनाच्या ह्या भीतीमुळेच तो रात्रीच जागा होऊन उठतो. पण उठेपर्यंत ता पडलेले स्वप्न विसरून जायचो. ताबडतोब मी त्याला हॉस्टेलची रूम सोडून नवीन रूम घेऊन राहायला सांगितले. आता रात्रीचा तो वार्डन त्याच्या रूमपाशी नाही हा विचार त्याच्या अंतर्मनात गेल्यावर तो कधीच रात्रीचा झोपेतुन उठला नाही व सुरळीत रित्या अभ्यास करुन त्याने इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले.