बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
फुले - शाहु - आंबेडकर व पेरीयार यांचा वारसा सांगत अतिशुद्र जातीच्या आर्थिक, सामाजीक, सांस्कृतीक कार्यक्रमाबाबतचे पर्याय शुद्र जातीपुढे ठेवून ब्राम्हणवाद विरोधी सुत्राची मांडणी केली. भाईचारा बनाओ चा कार्यक्रम राबवून फुल्यांच्या शुद्रादीशुद्र व अस्पृशांची एकता या भुमिकेशी त्यांनी नाळ जोडली.साधन - संपत्तीहीन, ग्रामीण भागात विखुरलेल्या अस्पृश्य जातीना व समाजऋण परत करावयाचे आहे ही भावना असलेल्या आंबेडकरी नोकरवर्गाला एकत्र करुन सत्तास्पर्धेत हस्तक्षेप करण्याची निर्णायक क्षमता कांशीरामजीनी हस्तगत केली. माझ्या समाजाच्या हितासाठी मी कोणाशीही युती करु शकतो.त्यासाठी मला कोणी संधीसाधू म्हटले तरी चालेल अशी भूमिका कांशीराम घेतात. ऊत्तर प्रदेशात भाजपाच्या साह्याने सत्ता हातात घेतली असली तरी भाजपाच्या डोक्यावर लाथ ठेऊन शंभर टक्के आंबेडकरवाद अंमलात आणला हे बहुजन समाज पक्षाचे विरोधकही मान्य करतात.
भाजपाला राजकीय सत्तेत सहभागी करुन घेताना कोणतीही व कसल्याही प्रकारची वैचारीक तडजोड करण्यात आली नव्हती तर व्यवहारीक तडजोडीचा मार्ग मोकळा ठेऊन इतरांचे शिरकाण करीत स्वत:ची शक्ती वाढवली.जातीयवादी व मनुवादी सत्तेवर येतात म्हणुन स्वतःच्या पायावर उभेच रहायचे नाही हा रिपब्लिकन नेत्यांचा आवडता सिध्दांत कांशीरामजीने धुडकाऊन लावला. कांशीरामजीच्या मते व्यवहार हाच राजकारणाचा पाया असतो.राजकारण हे स्वप्नांच्या सहाय्याने पुढे जाऊ शकत नाही.आदर्शवादास व्यवहाराचीजोड असल्याशिवाय शक्तीशाली राजकारण निर्माण होऊ शकत नाही. आंबेडकरी राजकीय शक्ती देशात निर्माण करून बाबासाहेबांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याकडे कच करीत आपल्याच हयातीत लोह महिला मायावतीकडे पक्षाची सुत्रे दिली. खऱ्या अर्थाने ते बाबासाहेबांच्या रथाचे सारथी होते. कांशीरामजींनी बहुजन जातीचा समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय अभ्यास केला आणि संघर्षाची नवी शैली निर्माण केली.वेळ, पैसा व मनुष्यबळ याचा कमीत कमी ऊपयोग करुन चळवळ अधिकाधिक गतीमान केली. चमचेगिरी करनाऱ्या नेत्यांना दूर करुन स्वत:च्या पायावर ऊभे राहणारे कार्यकर्ते घडविले. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी साऱ्या देशभर उभारली. फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष स्वत:च्या ताकदीवर स्वतंत्र पणे उभा रहावा म्हणून त्यांनी आपले सारे लक्ष उर्वरित भारतावर केंद्रित केले. पण जेव्हा महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष स्वत:च्या पायावर उभा राहू शकत नाही असे दिसले तेव्हा बहुजन समाज पार्टीचा मोर्चा महाराष्ट्रात वळविला. पण महाराष्ट्रात सत्तेचे दलाल अधिक असल्यामुळे बसपाला अपेक्षीत यश मिळत नाही याची खंत वेळोवेळी कांशीरामजीनी बोलून दाखविली होती.
बहुसंख्येने असलेल्या महारामध्ये राजकीय सत्ता स्वत:च्या हाताने हिसकावून घेण्याची मनस्थिती नाही या बद्दलची चीड कांशीरामजीच्या मनात सतत सलत होती. महारानी दुसऱ्याचे लांगुलचालन करण्यापेक्षा सत्तेच्या किल्ल्या स्वत:च्या हातात घेण्यासाठी पेटून उठले पाहीजे असे त्यांना वाटत असे. म्हणून ते कधी कधी चिडून, ये महार कभी नहीं सुधरेंगे असेही म्हणत. यात महाराबद्दल कसलीही द्वेषभावना कांशीरामजीच्या मनात नव्हती तर चिडून तो देनेवाला समाज बनावा याची प्रेरणा त्यातून निर्माण व्हावी असा हेतू होता.
आजची खरी सत्ता पुढाऱ्यांच्या हातात नसून ती नोकरशहांच्या हातात आहे. त्यामुळे नोकरशाहीच्या चौकटीत बदल करुन बहुजन समाजाचे अधिकारी येतील व त्यांना साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते असतील तेव्हा बहुजन समाज कसा असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे करा. प्रशासन व्यवस्था बहूजनाची असेल, उद्योग व व्यापारात बहजन समाजाचा पुढाकार असेल. गरीबच गरिबी हटविणारे बनले तर देश समृध्द होईल की नाही ? याचा विचार करा. हेच कांशीरामजींचे मिशन होते. त्यांचे स्वप्न होते देशातील मुलनिवासी या देशाचा सत्ताधारी व्हावा.