बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
राजकीय दृष्ट्या आपण दलित नेत्याना दोन विभागामध्ये विभाजीत करु शकतो.एक स्वतंत्र व स्वाभिमानी राजकीय नेतृत्व तर दुसरे पारतांत्रिक व गुलाम नेतृत्व. स्वतंत्र नेतृत्वावर कोणाचाही दबाव नसतो. त्यांची स्वतंत्र कार्य योजना असते. दुसऱ्या प्रकारातील नेते मुख्यत: इतर पक्षातील अनु. जाती जमातीच्या सेल सारखे असतात. त्यांच्याकडे स्वतंत्र विचार वा नीती नसते. ते आपल्या जाती बांधवाना ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. त्याना दलितांच्या विकासात्मक निर्णय प्रक्रियेत कोणतेही स्थान नसते. त्याना नेहमी आपल्या हायकमांडची भिती असते. ते केवळ त्या त्या पक्षात त्या त्या समाजाचे शो पिसेस असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र राजकारण केले होते. शेड्यूल्ड कॉस्ट फेडरेशन, स्वतंत्र मजुर पक्ष व रिपब्लिकन पक्ष अशा स्वतंत्र अस्तित्वाचे पक्ष निर्माण केले. त्याद्वारे बाबासाहेबांनी दलितांच्या स्वतंत्र विकासाच्या लढाईला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्र राजकीय लढाईचे सूतोवाच केले होते परंतु अल्पावधीतच नेतृत्वाचा कमकूवतपणा व संधिसाधू वृत्ती च्या अंत:कलहामूळे ह्या पक्षाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व नष्ट केले. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळया नेत्याना आमिषे दाखवून पक्ष दूभंगविण्यात आला. दलित नेते केवळ एकमेकाच्या टांगा खेचण्यात व्यस्त झालेत. काॅंग्रेसने या नेत्यांना केवळ आपल्या गोदीत बसविले नाही तर त्यांनी दलित समाजातील बुध्दिजीवी साहित्यिकानाही त्यात सामावून घेतले आहे.मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे कि दुसऱ्यावर अवलंबुन असणारे दलित नेतृत्व आपल्या समाजाच्या हिताच्या प्रती कधीच समर्पित नसते. त्याना त्यांच्या हायकमांडची भीती असते. त्यांचे काम केवळ आपल्या जातीच्या लोकांना एकजूट करुन त्या त्या पक्षाची व्होट बँक ( मतसंख्या ) वाढविण्यावर अधिक भर असतो कारण तीच त्या नेत्याची पात्रता असते व त्याच जोरावर मग ते आमदार, खासदार, मंत्री व वेगवेगळ्या महामंडळात पदे भूषविण्याच्या लायकीचे ठरत असतात. सत्ताधाऱ्यांच्या मागेपूढे राहणे हिच त्यांची गुणवत्ता असते.
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली राजकीय विचारधारेची लढाई कांशीरामजी निर्मित बहुजन समाज पक्ष लढवित आहे. या पक्षाने जातीच्या सीमा तोडल्या आहेत .बसपाच्या दलित नेतृत्वावर देशातील बहुजन समाज आपला विश्वास टाकताना दिसतो. देशात आधुनिक जगजीवनरामाच्या माध्यमातून काॅंग्रेसने स्वतंत्र दलित नेतृत्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेला रोखले.
बसपा हि एकमात्र राष्ट्रीय पार्टी आहे कि ज्यांच्यात केवळ दलितांचाच दबदबा आहे. देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमत:च दलित नेता असलेला पक्ष एका राज्यात स्वबळावर सत्तेवर असणे हे देशातील तमाम दलितासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज बहुजन समाज पक्षामध्ये ब्राम्हणासहित राजपुत, ठाकुर हे सुध्दा येत आहे परंतू हे सारे बहुजन समाज पक्षात सजावटी च्या सामानासारखे आहेत. जसे आपले काही दलित नेते दलित मतदार खिचण्यासाठी कांग्रेस,भाजपा व शिवसेना सारख्या पक्षात आहेत. बहुजन समाज पक्षाचे संपूर्ण नियंत्रण हे आंबेडकरवाद्यांच्या हातात आहे. त्यामुळे फुले आंबेडकरवादी जनतेने आपण कुठे जावे व आपला तारणकर्ता पक्ष कोणता असेल याचा शोध घेतला पाहिजे. कांशीरामजी म्हणत, आम्ही आपल्या स्वत:च्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठी का भांडतो ? का लढतो ? इतर पक्षात राहून दलितांचे उथ्थान होऊ शकते काय ? याचे उत्तर मी देन्याऐवजी डॉ. बाबासाहेबानी लाखो दलितांना आपल्या भाषणातून, लेखातुन व कार्यातून दिले आहे. बाबासाहेबांचे विचार हे आदेश म्हणून पाळले पाहीजे.
आजही देशात ब्राम्हण सर्व श्रेष्ठ समजला जातो.समाजकार्य, धार्मिक कार्य व राजकीय क्षेत्रात त्यांच्या शब्दाला अंतिमत: मान असतो परंतु स्वतंत्र व्यक्तिमत्वाची फुले आंबेडकरवादी विचारधारा स्विकारलेल्या लोकांनी ब्राम्हणी. गांधीवादी व मार्क्सवादी विचारधारेला समर्पित होणे हे कितपत योग्य आहे ? या देशात एक फार मोठी विडंबना आहे आणी ती म्हणजे ब्राम्हण नेतृत्व असलेला कोणताही पक्ष, कोणतीही संघटना संपूर्ण देशाची बनते परंतू इतर जातीच्या व्यक्ती एखाद्या पक्षाचा वा संघटनेचा मुख्य असेल तर तो पक्ष व त्या संघटनेला त्या व्यक्तीच्या जातीचे लेबल लावल्या जाते व त्या पार्टीला त्या जातीची पार्टी असे संबोधल्या जाते. आज बहजन समाज पार्टीला बहुजन समाजाच्या सर्व स्तरातुन पाठिंबा मिळत असतानाही टीव्ही व प्रिंट मिडीया बहुजन समाज पक्षाला दलितांची पार्टी असे नमुद करतात. यापेक्षा मोठा जातीयवाद कोणता असू शकतो ?