स्वगत
बहुजनांच्या अधोगतीला कोण कारणीभूत आहे ?. याचा उलगडा झाल्यानंतर बहुजन संस्कृती नष्ट व्हायला व बहुजन समाजाच्या आजच्या अवस्थेला जे जबाबदार आहेत त्या शत्रूला ओळखण्यासाठी व अशा शत्रू पासून सावध राहिले पाहीजे हे बहुजन समाजाला सांगावे असे बर्याच दिवसापासून माझ्या मनाला वाटत होते. आजपर्यंत मनात दडी मारुन बसलेले ते विचार पुस्तकाच्या स्वरुपातुन बहुजन समाजाला सांगण्याचे माझे स्वप्न साकार झाले याचा आनंद होत आहे.
बहुजन समाजातीलच परंतु स्वत:ला ब्राम्हण समजणारे डॉ. श्रिकांत जिचकार यानी नागपुर मध्ये गायत्री महायज्ञाचे आयोजन केले होते. देशभरातील लोक या यज्ञात सहभागी झाले होते. या यज्ञाला विरोध करण्यासाठी श्री. नागेश चौधरी व डॉ. सिमा साखरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्रीकांत जिचकाराच्या पुतळ्याची नागपुरच्या धनवटे रंगमंदिरापासुन यज्ञ स्थळापर्यंत गाढवावरुन यात्रा काढण्यात आली होती. तेव्हा पहिल्यांदाच मी माझे मित्र डॉ. प्रमोद मुनघाटे सोबत महायज्ञाला विरोध करण्यासाठी सहभागी झालो होतो. विद्यार्थीदशेत चळवळीत सहभागी होण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग परंतु माझ्या विचाराला चालना देणारा होता.
माझ्या विचारांच्या जडण-घडणीत माझे बंधु विठ्ठल राऊत व प्रा. विज्ञानदेव राऊत यांचे मोलाचे योगदान आहे. घरच्या माणसांची मदत उपकाराच्या भावनेतुन केलेली नसते तरीही त्याच्या मदत करण्याच्या भावनेचा मला आदर केला पाहिजे. एरवी अती खोडकर असलेली माझी मुलगी प्राची पुस्तकाचा कच्चा मसुदा लिहताना मात्र त्रास देत नव्हती याबद्दल तिचे विशेष आभार मानले पाहीजे. सदर पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष, फुले आंबेडकरी चळवळीतील विचारवंत व माझे स्नेही मा. प्रदीप ढोबळे यांचे सोबत चर्चा केली. लगेचच त्यानी सदर पुस्तक ओबीसी सेवासंघ प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्याची जबाबदारी स्विकारली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. फुले आंबेडकरी चळवळीतील श्री. जनार्धन पाटील व श्री जे. के. पोळ यानी पुस्तकाच्या शुध्दलेखनात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे.