देशात धर्मवादी प्रवृतीचा सुळसुळाट सगळीकडे झाला आहे. धर्मवादी राजकारणामुळे बहुजनाच्या आर्थिक व सामाजिक हिताकडे फार दुर्लक्ष झाले आहे.वर्णव्यवस्था टिकवून त्या व्यवस्थेचे नियंत्रण हे पुर्णत: ब्राम्हणी मानसिकतेकडे कायमचे ठेवण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक स्तरावर धर्माचा आसरा घेण्यात आला आहे. आत्मविनाशाच्या या संकल्पनेत बहुजन समाजाला पुरते अडकवून ठेवण्यात आले आहे.
ब्राम्हणी व्यवस्थेला चार्वाक,बुध्द,महावीर, चक्रधर,कबीर यांच्या पासून ते शिवाजी महाराज, म.फुले, शाहू महाराज, पेरीयार ई.व्ही.रामास्वामी नायकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे पर्यंत सर्वानी कसून विरोध केला व समतामूलक समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी वैदिक-आर्याच्या मगरमिठीतुन बहुजन समाजाला मुक्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तर्काच्या प्रमेयावर चार्वाकानी वैदिकआर्याना आव्हान दिले तर गौतम बुध्दानी गुलामी व्यवस्थेच्या विरोधात जाणा-या विज्ञ नवादी बौध्दिक तत्वज्ञानाचा उगम केला. परंतु बुध्दाच्या क्रांतीनंतर या देशात पुष्यमित्र शुंग या वैदिकाने प्रतिक्रांती केली.पुष्यमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी घटनेच्या माध्यमातुन उलटे टांगले. परंतु आता परत धर्माच्या माध्यमातून प्रतिक्रांतीची चक्रे उलटी फिरायला लागली आहेत. क्रांती करणा-या महापुरुषाच्या अनुयायांचा निभाव धर्मवादी सनातन्याच्या समोर लागत नाही हे एक कटू सत्य आहे. आज वैदिकांनी अनेक क्षेत्रात हस्तक्षेप करून बहुजनाचा भौतिक विकास थांबविला आहे तर बहुजन समाजही धर्माच्या खोट्या अवडंबराखाली दबला असल्यामुळे तो नवचेतनावादी बनू पाहत नाही तर धर्मांध लोकांच्या हातचे खेळणे झाला आहे.हिंदुत्ववादी विचारधारेमुळे सामान्य माणसाचे जिवन व्याधीग्रस्त झाले आहे. हिंदुत्ववादी तत्वाचा मुळ हेतू सामाजिक समानतेचे व विश्वासाचे अभिसरण रोखून सनातनवाद नव्या स्वरूपात बहुजनावर लादणे हा आहे. यासाठी मानवी प्रगतीचे हत्यार असणा-या शिक्षणाचे शहरी भागात बाजारीकरण तर ग्रामीण भागात निकृष्ठीकरण करुन बहुजनाच्या पिढ्यांना ना-लायक व आर्थिक दुर्बल करण्याचे हेतुपुरस्पर प्रयत्न चालु आहेत. जातीजातीत व धर्माधर्मात तेढ वाढवून हा देश नेहमी अशांत रहावा अशी तजवीज कावेबाज सनातनवादी वैदिक करीत आहेत पण देखावा मात्र हिंदुहीत व राष्ट्रहिताच्या आभासाचा केल्या जात आहे. बहुजनाचे सक्षमीकरण होऊ न देण्याचा सनातनवाद्यांचा कावा आहे. मानवी विकासाच्या प्रश्नाशी निगडीत नसलेल्या गोष्टी ऊकरुन काढून वेगवेगळ्या धर्म व जातीमध्ये तेढ वाढविणे. बुवाबाजी,अंधश्रध्दा व धर्मवाद अशा व्यसनी बनविणाया बाबीत बहुजन समाजाला अडकविण्यात येत आहे.या देशातील बहुजन शासनकर्ता बनू शकणार नाही. याची समीकरणे वैदिकांकडून आखल्या जात आहे.आणि चुकूनच एखादा बहुजन शासक व सशक्त झाला तर त्याला हा शास्ता वर्ग आपल्या नादी लावीत असतो. याचे कारण स्पष्टच आहे, वैदिक धर्माच्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेत कोणतेच मुलभूत परिवर्तन होऊ न देणे हा आहे.
मी शाळेत असतानाचे काही प्रसंग आठवतात. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी माझी क्रीडा सचिव म्हणून निवड झाली होती.स्नेहसंमेलनाच्या कालावधीत ताडोबा या राष्ट्रीय उद्यानात सहल जायची होती. तेव्हा शाळेच्या एका शिक्षकाने मुलांच्या घोळक्यातून बोलावून मला घरून गादी आणायला सांगितले. मी क्रीडासचीव असतानाही इतराना न सांगता मला ते काम सांगीतले. तेव्हा तो शिक्षक जातीवादाचा बळी होता. जातीच्या उतरंडीत खालच्या जातीच्या मुलांकडून स्वत:ची कामे करवून घेणे हे त्याच्या मानसिकतेत होते. एकदा नागपूरवरुन कॉलेजची परीक्षा आटोपून गावी परत आलो त्याच दिवशी गावच्या एका कुंभाराने काही मडकी घरी आणुन दिली. त्या बदल्यात आईनी त्याला ज्वारी दिली. आईने ममतेने त्याला जेवणाचा आग्रह केला तेव्हा घरी बरोबर खायलाही न मिळणारा कुंभार म्हणतो महाराच्या घरी जेवण करुन व पाणी पिऊन मी स्वत:ला बाटवून घेत नाही. या दोन उदाहरणातून आर्य ब्राम्हणानी निर्माण केलेली जातीयवादी व विटाळपणाची भावना समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत कशी झिरपली आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बहुजन समाजाच्या डोक्यात शिरलेल्या अशा जातीयवादी मानसिकतेत आपल्याला बदल करावयाचा आहे.
मी लहान असतानाची घटना आहे. गावचा पाटील (पुर्वीचा मालगुजार) चाबकाच्या फटक्याने अख्या गावासमोर एका व्यक्तीला मारीत होता. तो सारखा ओरडून लोकाकडुन सरंक्षण मागत होता परंतु पाटलाला अडविण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. संपुर्ण गाव व समाज लाचारपणे ते पाहात होता. या घटनेतून मला सांगायचे आहे की समुह कितीही मोठा असू द्या पण तो लाचार व स्वाभिमानशुन्य असेल तर एक व्यक्ती त्या समुहावर भारी पडत असते. बहुजन समाजही असाच लाचार व स्वाभिमानशुन्य आहे त्यामुळेच अल्पसंख्यांक वैदिकांची विचारधारा त्यांच्यावर हावी झालेली आहे. ती विचारधारा फेकुन देण्याची क्षमता बहुजन समाजात निर्माण होणे आवश्यक आहे.
आर्य निर्मित जाती व वर्णव्यवस्थेला जर नष्ट करायचे असेल तर जाती-वर्ण व्यवस्था निर्माण कर्त्याच्या मुळावरच घाव घालावा लागेल.या देशातल्या वैदिक ब्राम्हणांवर एवढा दबाव आणावा लागेल की त्यांनी स्वत:हून पुढे होऊन बहुजन समाजापुढे आव्हान करावे की, देशाची समाज व्यवस्था व जातीव्यवस्थेची निर्मिती आमच्या पूर्वजांनी स्वार्थासाठी केली. वेद, पुराणे, रामायण, महाभारत, भगवतगीता हे सारे कोणत्याही देवाने लिहिले. नसून आमच्या पूर्वजानी लिहिले आहे. व त्या सा-या काल्पनिक कथा आहेत. सत्यनारायणाच्या कथेने पूजा घालणा-यांचे काहीही भले होत नाही.त्याने केवळ आम्हा ब्राम्हणांचे भले होते. ब्राम्हणांचे वर्चस्व सर्व समाजावर अबाधित ठेवण्यासाठी धर्माचे शस्त्र आमच्या हातात दिले आहे असा कबुलीजबाब जर ब्राम्हणांनी दिला तर बहुजनांना त्यातला खोटेपणा कळेल.
आपल्या देशात समाजाची विभागणी ही बहुजन व अल्पजन अशी झाली आहे. वास्तविक सर्वात जास्त संख्येत समयोचित जिवन जगतो तो बहुजन समाज व जो समाज बहुसंख्य समाजाच्या समयोचित जिवन विचार प्रणालीशी भिन्नता दाखवतो तो समाज अल्पजन असतो. देशातील बहुजन समाज हा वैदिक ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या वर्णव्यवस्थेतील शुद्र समाज व वर्णव्यवस्थेच्या बाहेरील अस्पृश व आदिवासी समाज आणि ज्यांच्यावर सामाजिक व धार्मिक अन्याय व अपमान झाला व या अन्यायाला कंटाळुन मायेची पाखर दाखविणा-या दुस-या धर्मात प्रवेश घेतला असे सर्व गट मिळून जो एक संघीय समाज तयार होतो, त्याला बहुजन समाज म्हणतात. आज बहुजन समाजाला परीवर्तनाची गरज आहे. परीवर्तनासाठी बहुजन समाजाला जागृत आणि संघटीत करण्याची आवश्यकता आहे. आणि हे परीवर्तन म्हणजे तरी काय? “ भिका-याला भीक देणे ही सेवा होय, पण भिका-याला भीक मागण्याची पाळीच येऊ न देणे हे परीवर्तन होय.” गुलाम मालकाच्या बरोबरीला येणे हे परीवर्तन होय. हिंदुधर्म व्यवस्थेत इतर समाज घटकांना ब्राम्हणाबरोबरीचे सामाजिक व धार्मिक अधिकार प्राप्त होणे म्हणजे परीवर्तन होय. ब्राम्हणाने बहुजनाच्या हातून घराची वास्तुशांती करणे, ब्राम्हणाने मांग-मेहतराची कामे करणे, सरकारी ऑफीसात चपराश्याच्या जागेसाठी अर्ज करणे, जातीव्यवस्थेच्या ऊतरंडीतील खालच्या जातीच्या लोकानी तिरुपती, सिध्दीविनायक मंदीराचा मुख्य पुजारी होणे, ब्राम्हणाने सत्यनारायणाच्या पुजा बहुजनाद्वारे आपल्या घरी घालणे हे परीवर्तन होय.सदर परिवर्तन घडविण्यासाठी नवनिर्मितीची चळवळ उभी करणे आवश्यक बनले आहे. ही चळवळ उभी करताना मागच्या पिढ्यांनी आरंभ केलेल्या चळवळीतील गुणदोषाची तसेच आम्ही बहुजन संख्येने अधिक असतानाही अल्पसंख्यांक वैदिकांचे मानसीक व सांस्कृतीक गुलाम कसे झालो याची प्रथम कठोर चिकित्सा करावी लागेल. नवनिर्मितीची चळवळ ही नेहमी संघर्षाची चळवळ असते. नवा संघर्ष विधायक व्हायचा असेल तर नवनिर्मितीचे नेतृत्व हे परिपक्व अशा संघटनेकडे व इमानदारीने नवनिर्माणाची जबाबदारी पेलण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती समुहाकडे जाणे इष्ट आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून सुखी व समृध्दीमय जिवन जगणा-या बहुजन संस्कृतीला गालबोट कसे व कोणी लावले. सहजीवनाची संस्कृती निर्माण करणा-या भारतातील महानायकांना बाहेरुन आलेल्या विदेशी वैदिकांनी कसे कपट कारस्थाने करुन ठार मारले. आर्य संस्कतीच्या विरोधात लढताना मुळनिवासी लोकामध्ये दुहीचे वातावरण तयार करुन त्याना एकमेकांविरुध्द वापरुन संपविले व उरलेल्यांना गुलाम बनवून येथील समृध्द संस्कृती ताब्यात घेतली आणि आपली विदेशी वैदिक संस्कृती मुळनिवासियावर लादली. मुळनिवासी समाज तेव्हाही भोळाभाबडा होता जसा तो आज आहे. या मुळनिवासी बहुजन समाजाने विदेशी वैदिकांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला. विदेशी वैदिकांनी आपल्या संस्कृत भाषेला देवाची भाषा व स्वत:ला पृथ्वी वरचे देव घोषित करुन काही ग्रंथ लिहिले. या ग्रंथाला अपौरेषमय ठरविले. अशा ग्रंथातील एक ग्रंथ म्हणजे मनुस्मृती हा होय.या ग्रंथानुरुप देशात प्रतिक्रांती करण्यात आली. बहुजन संस्नृती नष्ट करण्यात आली.बहुजनाच्या नायकाच्या खुनाच्या दिवसाला विदेशी अल्पसंख्य वैदिकांनी आपला विजय दिवस मानला व तशा कथा प्रसृत केल्या. पुढे-पुढे तर या वैदिकांचा विजयी दिवस बहुजन समाज आपलाच विजय दिवस समजून साजरा करणे सुरु केले ते आजतागायत चालू आहे. याचा उलगडा करण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे.
सदर पुस्तकात टंकीत झालेला बहुजनांवरील अन्याय व हा अन्याय पुसून काढण्यासाठी आजच्या नव्या पिढीस नव्या चळवळी उभारण्यास जोश व होश निर्माण होण्यास मदत झाली तर हे पुस्तक लिहण्याचा हेतु साध्य झाला असे होईल.
बापु म. राऊत
नेरूळ, नवी मुंबई