बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
'मोगलशाहीमध्ये वतनदारी पध्दत होती. शहाजीराजे हे आदिलशहा कडे वतनदार होते. हे वतनदार मुख्यता देशमुख, भोसले, मोरे, पाटील असायचे हे सारे शुद्र असल्याकारणाने वर्णव्यवस्थेमुळे त्याना शिक्षणाची दारे बंद होती. त्यामुळे वतनाचा कारभार करण्यासाठी ब्राम्हण कारकुनाची नेमणूक होत असे. हे ब्राम्हण कारकुन रयतेवर जुलुम करीत असत. सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याच्या शिवाजी महाराजाच्या प्रयत्नांना ब्राम्हण कारकुनाचा विरोध असे. राज्यभिषेकानंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती दिली होती. ह्या सुधारणा मुस्लिम धर्मात गेलेल्यांना परत हिंदु बनवून मानसन्मान देने, अस्पृश्य लोकांस मानाचे स्थान देऊन व स्वत:चे अंगरक्षक नेमून कृतीतून शिवरायानी जातीभेद व वर्णभेद नष्ट केला. स्त्रियांचा सन्मान केला,मनुस्मृतिच्या विरुध्द वागून महाराजानी सामाजीक सुधारणा केल्या. म्हणून ते मनुस्मृति विरुद्धचे बंडखोर ठरतात. त्याना जेव्हा ब्राम्हणांकडुन विरोध झाला तेव्हा महाराजानी 'ब्राम्हण म्हणुनी कोणाचा मुलाहिजा करणार नाही' अशी सक्त ताकीद दिली होती. हिंदु धर्म रक्षक म्हणून शिवाजी महाराजाना मिरवणार्या मतलबी लोकांनी विसरु नये की, याच हिंदु धर्माने व त्याच्या रक्षकांनी शिवाजी महाराजाच्या राज्यभिषेकाला विरोध केला होता 44 व्या वर्षी मुंज व एकदा झालेला विवाह दुसर्यांदा करावयास लावला होता. असे हास्यास्पद प्रकार ब्राम्हणांनी शिवाजी महाराजाकडून करवून घेतले. महाराज खरोखरच हिंदु धर्मरक्षक होते तर धर्माच्या ठेकेदारांनी शिवाजी महाराजाना राज्यभिषेक करण्यास विरोध का केला. ? महाराजाना वठणीवर आणण्यासाठी औरंगजेबाने जयसिंगास महाराष्ट्रात पाठविले होते. शिवाजी महाराजावर विजय कसा मिळवावा या चिंतेत तो असत्ताना इथल्या ब्राम्हणांनी शिवाजी महाराजाना हरविण्यासाठी देवीप्रयोगी अनुष्ठाने व कोटचंडी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे शिवराय मोगल साम्राज्यशाहीची मृत्युघंटा वाजवीत होते, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भिक्षुकशाही मात्र धार्मिक प्रतिक्रांतीद्वारे मोगल साम्राज्यशाहीचे मरण लांबणीवर टाकत होती. परंतु शिवाजी महाराजाचे राजेपण नाकारणारेच आज त्याना 'हिंदु धर्मरक्षक' संबोधित आहेत.
हिंदुत्ववादी शिवाजी महाराजाना 'गो-ब्राम्हण प्रतीपालक' अशी बिरुदावली लाऊन खोटा प्रचार करतात. श्री व.मा.पुरंदरे शिवाजी महाराजास गो-ब्राम्हण प्रतिपालक म्हणून शिवचरीत्र साधने खंड 5 क्र.534 व 537 या पत्राचा आधार घेतात. पण इतिहासकार श्री.शेजवलकर म्हणतात, 534 क्रमांकाच्या पत्रात शिवाजी महाराज स्वत:स गोब्राम्हण प्रतीपालक म्हणवून घेत नाहीत, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राम्हण शिवाजी महाराजास तशी पदवी देतो. क्रमांक 537 च्या पत्रात तर गो-ब्राम्हण प्रतीपालक असा शब्दच आलेला नाही. म्हणजे शिवाजी महाराजाना गो-ब्राम्हण प्रतीपालक म्हणणे हे सर्व खोटे आहे. ती धुर्त लोकांची चाल आहे हे सिद्ध होते. बरे शिवाजी महाराजा जवळ गायीचे किती कुरण होते ? गोशाळेसाठी शिवाजी महाराजाने कोणत्या प्रकारचे अनुदान दिले ? गाईच्या हत्त्येबाबत शिवाजी महाराजानी किती लोकाना यमसदनी पाठवून शिक्षा केल्या ?. शिवाजी महाराजाजवळ गायांचा साठा किती होता ?. दुधाचा विनियोग ते कसे करीत असत ?. याची माहीती शिवाजी महाराजाला गो-ब्राम्हण प्रतीपालक ठरविणारे देत नाहीत ?. कारण शिवाजी महाराजाला गायांकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता व तसे खोटे पुरावे तयार करायला ब्राम्हण कदाचीत विसरले असावेत.
शिवाजी महाराजाचा इतिहास लिहणार्या काही ब्राम्हणांनी शिवाजी महाराजाचे ब्राम्हणीकरण केले. कारण संपुर्ण बहुजन समाज शिवाजी महाराजाना आपले आराध्यदैवत मानतो त्यामुळे शिवरायाचे ब्राम्हणीकरण झाले म्हणजे शिवरायाना मानणार्या बहुजन समाजाचे ब्राम्हणीकरण करणे सोपे जाते. ब्राम्हण आपली लढाई स्वत: कधीच लढत नाहीत. ऊलट बहुजन समाजच ब्राम्हणांची लढाई लढत असतो. त्यामुळे लढाई बहुजन आपसातच लढत असतात. आज बहुजनांचे प्रतिप्रबोधन करण्याचा सपाटा ब्राम्हणानी चालविलेला आहे. प्रतिप्रबोधनामुळे प्रतिपरिवर्तन होते व प्रतिपरिवर्तनामुळे प्रतिक्रांती करणे सोपे जाते. ही प्रतिक्रांति करण्यासाठी आज ब्राम्हणांनी इतिहासाला मोठे शस्त्र बनविले आहे.त्यामुळे शिवरायाना ब्राम्हणीकरणाच्या बंदिगृहातून बाहेर काढण्यासाठी शिवरायाचा खरा इतिहास लोकांसमोर मांडावा लागेल. या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होऊन प्रबोधनाच्या माध्यमातून प्रतिक्रांतिचे अभियान समाप्त करने शक्य होईल.