बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
म.ज्योतीराव फुलेंच्या घरी शेतीचा हिशोब करण्याकरीता एका ब्राम्हण कारकूनाची नेमणूक करण्यात आली होती. ज्योतीरावांची कुशाग्र बुध्दी पाहून कारकुन भटास धडकी भरत असे. ब्राम्हणाला वाटे हा शिकला तर आपली नोकरी जाईल.म्हणून त्याने ज्योतीरावांच्या वडिलास सांगीतले की, ज्योतीराव शिकल्यास शेती बुडेल, घरावर आपत्ती कोसळेल. त्यामुळे ज्योतीरावाना शिकवू नये. त्याचे सल्ल्यावर ज्योतीरावास शाळेतुन काढण्यात आले. परंतु गफार बेग या मुस्लीम व लिजीट या ख्रिश्चन व्यक्तीच्या प्रोत्साहानामुळे ज्योतीराव शिकायला लागले तर भटामुळे शाळा सोडावी लागली. बहुजनाच्या उध्दाराची तळमळ कोणात आहे ह्या फरकाची नोंद बहुजन समाजाने घेतली पाहीजे. शुद्र आहे म्हणून ज्योतीरावास ब्राम्हणाच्या वरातीतून हाकलून दिले. हे जेव्हा ज्योतीरावानी आपल्या पित्यास सांगितले तेव्हा ते ज्योतीरावास म्हणाले," अरे ब्रिटिशांचे राज्य आहे म्हणून तू सुखरुप जिवंत घरी पोहोचलास, पेशव्यांचे राज्य असते तर तुला हत्तीच्या पायदळी तुडविले असते" याचा ज्योतीरावाच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. शुद्र, अतीशुद्र यांच्या हलाकीचे व दारिद्र्याचे मुळ कारण हे अज्ञान, अंधश्रध्दा, परंपरा, शिक्षणाचा अभाव व वैदिक ब्राम्हणांचे जुलमी धर्मग्रंथ हेच आहेत याची जाणीव त्याना झाली.
म. फूलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी प्रथम मुलीची शाळा काढली. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल म्हणून ब्राम्हणांनी आरडाओरड केली. सामाजिक बहिष्काराच्या धमक्या दिल्या. तेव्हा सावित्री व ज्योतीरावास त्यांच्या वडिलानी घर सोडावयास लावले. ऊस्मान शेख या मुसलमान गृहस्थाने त्याना आश्रय दिला. सावित्रीबाईने प्रथम स्त्रीयाना शिकविण्यास सुरुवात केली. शाळेत जात असताना गुलाम बहुजनांच्या स्त्रियांनी त्यांच्या अंगावर शेणाचा मारा केला. एका गुलाम बहुजनाने सावित्रीबाईशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला तरीही त्या आपल्या ध्येयापासून किंचीतही ढळल्या नाही. शिकलेल्या स्त्रियांनी स्वयंपाक केला तर तांदळाच्या अळ्या होतात एवढे शिक्षण स्त्रियांसाठी वाईट असते अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी बहुजन समाजात पेरण्यात आल्या. म.फुलेंचे विचार ऐकून बहुजन समाज जागृत झाला तर ब्राम्हणाचे सर्व कटकारस्थाने बहुजन समाजास कळतील व मग बहुजन समाज ब्राम्हणाविरुध्द उठाव करुन ब्राम्हण जातीला संपवून टाकतील असी भीती ब्राम्हणांना होती. म्हणून त्यांनी आपल्या पूर्वजांप्रमाणे कट रचला व बहुजन समाजाच्या लोकांच्या हातून महात्मा फुलेंना मारण्याचे ठरविले. धोंडीराम नामदेव जाधव व त्याच्या एका साथीदारास म.ज्योतीराव फुलेंना मारण्यासाठी पाठविण्यात आले. परंतु म. फुलेंचा तेजस्वी बाणा व उपदेश ऐकून मारेकरीच गली तगात्र झाले व दोघेही म. ज्योतीराव फुलेंचे परम शिष्य बनले. ज्यांनी म.ज्योतीराव फुलेंना मारण्यासाठी पाठविले त्यानाच मारण्यासाठी जाधवानी म.ज्योतीराव फुले कडे परवानगी मागीतली तेव्हा म. फुले म्हणाले, "लोकाना मारणे हा आपला धर्म नाही तर भटा-ब्राम्हणांच्या गुलामीतून बहुजन समाजाला मुक्त करणे हे आपले ध्येय आहे" म. फुलेंनी बहुजन समाजात स्वाभिमान जागृत करण्याचे महतकार्य केले.
सावित्रीबाईच्या शाळेतील मुक्ता साळवे या 14 वर्षाच्या मातंग मुलीने एक मार्मिक प्रश्न उपस्थीत केला होता, हिंदु धर्माचे धर्मग्रंथ वाचण्याचा आम्हास अधिकार नाही तर तो आमचा धर्म कसा काय असू शकतो ? ब्राम्हण हे आमच्या धर्माचे कसे काय असू शकतात ?. अलिकडे काही मंडळी म.ज्योतीराव फुलेंचे विचार डोक्यावर घेऊन नाचत आहेत.विचार डोक्यावर ठेवायचे नसतात तर ते डोक्यात घालायचे असतात.त्यानंतरच ख-या संघर्षाला सुरुवात होईल. म. फुलेंच्या माळी समाजाने अजुनही म.फुलेंचे विचार स्विकारले नाही. म. फुलेंना ते आपला उध्दारकर्ता मानीत नाहीत.सावता माळी या भटाच्या गुलामाची पूजा अर्चा करतात पण घरात म. फुलेंचे फोटोही लावीत नाही तर काही लोक त्यांचे विचार डोक्यात न घालता केवळ राजकारणासाठी त्यांच्या नावाचा ऊपयोग करतात.