( रविवारी अकरा वाजता सोसायटीची मिटींग होती. सक्रीय सभासद ह्या नात्याने विचार केला की मिटींग आधी दोनचार लोकांना भेटून मगच मिटींगला जायचे. सकाळी ठीक आठ वाजता जोशी साहेबांकडे गेलो. जोशी नुकतेच शाखेतून परत आले होते. )
मी : काय जोशी शाखेतून आले वाटता ?
जोशी : होय. राष्ट्रनिर्मीतीसाठी शाखेत जावेच लागते. मी तर तुम्हाला ही म्हणतो येत चला, पण तुमचे आपले भलतेच विचार.
मी : ते असु द्या. अकरा वाजताच्या मिटींगचे माहीत आहे ना ?
जोशी : होय. संदीप, हे बघ ढोबळे काका आले आहेत. त्यांच्यासाठी चहा घेऊन ये.
मी : चहा कशाला ? मी आताच चहा घेतलायं.
जोशी : अस का. ठिक आहे.
( तेवढयात संदीप बाहेर आला. )
मी : संदीप, अरे तुझी एअर इंडीयाच्या टेस्टची तयारी कशी सुरु आहे? तू आणि कांबळेचा मनोज मिळून रोज अभ्यास करताय असे कळलयं मला.
संदीप : आता कसला अभ्यास काका. मला एअर इंडीयाकडून परिक्षेच्याच आधी रिग्रेट लेटर आलयं.
मी : का रे बाबा ?
संदीप : काका माझ वय २५ च्या वर आहे. म्हणून मी एजबार झालोय. आता परिक्षाच नाही तर अभ्यास कसला बोडख्याचा करु ?
मी : मग कांबळेच्या मनोजच काय ?
संदीप : तो तर माझ्यापेक्षाही एका वर्षानी मोठा आहे. डिप्लोमा करतांना एक वर्ष फेल पण झाला होता तो. पण सवलत आहे ना त्याला. ५ वर्षाचे रिलॅक्सेशन म्हणे!
जोशी : ढोबळेसाहेब, तुम्हाला तरी पटत का हे ? अहो हा कांबळे आरक्षणामुळे चांगला सेल्स टॅक्स आफीसर झालाय आणि मी सेल्स टॅक्स मध्ये साधा क्लर्क. आरक्षणाच्या सवलती ऑफीसरच्या पोराला असाव्या की माझ्यासारख्या क्लर्कच्या. तुम्ही म्हणे समतावादी. ही कसली समता ? अहो कांबळेनी बराच काळा पैसा कमावला. तीन-चार लाख इंटेरीअर डेकोरेशनला लावले. आला कुठून एवढा पैसा? ते असू द्या. तुम्ही आरक्षणाबद्दल बोला.
मी : जोशी समतावाद म्हणजे काय ते नीट समजून घ्या. सद्य विषमतावादी व्यवस्थेत असमानांना समान मानून वागणे म्हणजे असमानता चिरकाल टिकविणे होय. समानता निर्माण करायची झाल्यास मागासलेल्या वर्गाला पुढारलेल्या वर्गापेक्षा जास्त संधी निश्चितच द्यावी लागेल. म्हणूनच आज तरी आरक्षण असावे ह्याच ठाम मताचा मी आहे. आजही दलीत, आदीवासी, मागासवर्गीय अतीशय हलाखीचे जीवन जगत आहे. आरक्षणामुळे दलीत व आदीवासीसाठी नोकऱ्यामध्ये राखीव जागेची निर्मीती झाली. राखीव जागा आपल्याच करीता आहे हे कळल्यावर ह्या वर्गात शिक्षणाची ओढ निर्माण झाली. आज दलीत-आदीवासी वर्गाची जी शैक्षणीक पात्रता वाढली आहे त्यास आरक्षणाचे तत्व मूळत: जबाबदार आहे.
जोशी : ढोबळे, बरोबर आहे. तुम्ही असेच बोलणार. तुम्ही ओबीसी ना. तुम्हालाही त्या व्ही.पी. सिंगाने आरक्षण लागू केले. त्यामुळे तुम्हीही आता कांबळेचीच बाजू घेणार.
मी : जोशी साहेब प्रश्न बाजू घेण्याचा नव्हे. तुम्ही आरक्षणाला जोशी, ढोबळे, कांबळे ह्या तीन व्यक्तीच्या स्वरुपात पाहताय, त्यातून तुम्हाला जे दिसतय ते व्यक्तीसापेक्ष आहे. ह्याच आरक्षणाला आपण ब्राम्हण समाज, ओबीसी, दलीत समाज ह्या नजरेतून पहाल तर चित्र अतीशय निराळे दिसेल. उदाहरण घ्यायचेच झाले तर भारतीय प्रशासनातील प्रथम वर्ग श्रेणीच्या नोकऱ्याबद्दल बघू शकतो. जोश्यांचा संदीप जरी एका नोकरीला मुकतोय तरी ५ टक्के असलेला ब्राम्हण समाज ७० टक्के प्रथमश्रेणी प्रशासकीय नोकरीवर आरुढ आहे. लोकसंख्येने २३ टक्के असलेला दलीत-आदीवासी समाज ८ टक्के प्रथम श्रेणी नोकऱ्यावर आहे. तर ५२ टक्के असलेला ओबीसी समाज फक्त ४ टक्के प्रथम श्रेणी नोकऱ्यावर आहे. ह्याबाबत ओबीसीची स्थिती तर दलीत-आदीवासीपेक्षाही मागासलेली आहे. तुम्हा लोकांची स्थिती सर्वोत्कृष्ट आहेच.
जोशी : म्हणजे तुम्ही आरक्षणाचे फायदे घेणारच ?
मी : ओबीसी म्हणून निश्चितच पण ढोबळे म्हणून नाही.
जोशी : ते कसे जरा विस्ताराने समजवा ?
मी : मी ढोबळे स्वबळावर नोकरीला लागलोय. मी नोकरीवर लागतांना कुठल्याच आरक्षणाचा फायदा घेतला नाही. माझ्या मुलांनी आरक्षणाचा फायदा घ्यावा असे मलाही वाटत नाही. जेव्हा त्यांचा बाप स्पर्धेतून स्वबळावर नोकरी मिळवू शकतो तर त्यांनीही तोच मार्ग स्विकारावा हाच माझा आग्रह असेल आणि माझ्या मुलांना त्या लायकीचा बनविण्यास काहीच कसर मी सोडणार नाही. खुल्या स्पर्धेतून त्यांचा जो शाश्वत विकास होईल, जो आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल, तो आरक्षणातून नोकरी मिळविल्यावर निश्चितच होणार नाही, हे ही कळतय मला. पण जेव्हा प्रश्न ओबीसी समाजाचा, बहुजनांचा असेल, तेव्हा आरक्षण असावेच ह्या आग्रही भुमिकेचाही मी असेन. कारण आजही आमचा समाज खुल्या स्पर्धेत टिकू शकेल अशा स्थितीत पोहोचलेला नाही. बहुजनसमाज लौकरात लौकर खुल्या स्पर्धेत टिकण्याचा स्थितीत यावा असे मलाही वाटत, पण त्यासाठी त्यांना काही काळ आरक्षणाच्या पायऱ्या वापरु द्याव्या लागतील. आमचा समाज खुल्या स्पर्धेत टिकावा हेच तर आमचे ध्येय आहे. मग आरक्षणाची गरजच उरणार नाही. ही स्थिती तुम्हाला कशी वाटेल ?
जोशी : निश्चितच स्वागतार्ह ! पण हे आरक्षण संपेल केव्हा ?
मी : हे ह्या देशातील ब्राम्हणवाद्यावर पण बरेच अवलंबून आहे. बरेच ब्राम्हण आरक्षणाच्या प्रक्रियेत खिळ घालतात व आरक्षणाचा बॅकलॉग निर्माण करून आरक्षण संपण्याची प्रक्रिया लांबवितात.