Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

देशाचे दुश्मन

- लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर


श्री. के. ग. बागडे यांचे प्रस्तावनेसह देशाचे दुश्मन
आवृत्ती पहिली १९२५, किंमत ४ आणे
प्रकाशक : केशवराव मारुतीराव जेधे, जेधे मॅन्शन, पुणे
मुद्रक : रामचंद्र नारायण लाड, श्रीशिवाजी प्रिं. प्रेस, ५५६, सदाशिव पेठ, पुणे शहर.

श्री. केशवराव बागडे, बी. ए., एल. एल. बी यांची प्रस्तावना

     सदर पुस्तकाचे लेखक श्रीयुत दिनकरराव जवळकर यांनी त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहावी, अशी इच्छा प्रदर्शित केली व त्यांच्यासारख्या उत्साही गृहस्थाच्या म्हणण्यास मान द्यावा असे वाटल्यावरून मी हे चार शब्द लिहित आहे. महात्मा जोतिराव फुले यांची कामगिरी राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. जसजसा काळ लोटेल, तसतसे त्यांच्या कार्याचे महत्त्व सुजाण माणसांच्या प्रत्ययास अधिकाधिक येणार आहे. महात्मा फुले यांच्या हयातीत त्यांच्या निंदकांनी वाट्टेल तशी कठोर टीका केली; त्यांच्या पवित्र कामगिरीविषयी जाणूनबुजून जनतेत गैरसमज प्रसृत केला. काही कुटाळ लोकांची मर्यादा याच्याही पुढे जाऊन त्यांना महात्मा जोतिराव फुले व त्यांच्या पत्नी पुण्यश्लोक मातोश्री सावित्रीबाई यांचा नीचपणे छळ केला व अखेर त्यांना मारेकरी घालून जगातून नाहीसे करण्याचा दुष्ट उपद्व्याप करण्यासही त्यांच्या शत्रूंनी कमी केले नाही. महात्मा जोतिराव फुले यांनी ज्या बहुजन समाजाच्या हितार्थ आपला देह झिजवला, तो निरक्षर व अज्ञान असल्यामुळे व ज्यांच्या आसुरी स्वार्थाला त्यांनी आपल्या कामगिरीने वेसण घातली, ते लोक सुशिक्षित पण स्वतःच्या स्वार्थासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून टपून बसणारे असल्यामुळे महात्मा फुले यांच्या मोठेपणावर कृष्णपटल पडले आहे. 'काल' हा निर आहे; स्वार्थी माणसे स्वतःच्या पाताळयंत्रीपणाने व सैतानी स्वार्थांधतेने असत्यावर सत्याचा, पापावर पुण्याचा, जनताद्रोहावर लोकसेवेचा व स्वार्थपरायणेवर परोपकाराचा मुलामा चढविण्याचे लाघवी प्रयत्न करून अजाण व भोळ्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून तिची दिशाभूल करू शकतात. सर्वसामान्य जनता विचारक्षम व कार्यक्षम होईपर्यंत असा कटू प्रकार अनुभवाला येत जाणार हे निर्विवाद आहे. याच कारणपरंपरेमुळे आपल्या देशात होऊन गेलेल्या ब्राह्मणेतर साधुसंतांना, राजकारणी मुत्सद्यांना, स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या "वीरश्रेष्ठांना ब्राह्मण लोकांच्या निंदेच्या, छळाच्या व प्राणघाताच्या दिव्यातून तावून सुलाखून निघावे लागले व त्यांचे अद्वितीयत्व जगाच्या निर्दशनास येऊ शकले. अशा विभूतींच्या समकालीन निंदकांना वाटेल तितका उन्मादानंद झाला असला, तरी 'कालाचे' अपत्य 'इतिहास' ह्या बाबतीत सत्याचा निर्णय केल्यावाचून बहुतेक चुकत नाहीत. विभूतीसंबंधी समकालीन निंदा, छळ व प्राणघात वगैरे दुष्टांच्या कृतींना कालाने एकदा आपल्या उदरात ठाव देऊन त्यांना आपल्या भयंकर जठराग्नीची आंच दिली की त्यातून त्या थोर पुरुषांच्या कृतीने सत्कीर्तीरूप शुद्ध व तेजस्वी सुवर्ण बाहेर पडते. महात्मा जोतिराव यांच्या चारित्र्याला सर्वभक्षी व सर्वसाक्षी कालाच्या कारभाराचा हा नियम तंतोतंत लागू पडतो. त्यांचे निंदक व छलक स्मृतीशेष होत चालले असून महात्मा जोतिराव फुले यांच्या अनुयायांची संख्या गणितश्रेणीने चालली आहे.

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar    महात्मा जोतिराव यांच्या अफाट देशसेवेचे खरे स्वरूप जनतेच्या निदर्शनास आणण्यास त्यांच्या कामगिरीविषयी जितकी पुस्तके प्रसिद्ध होतील तितकी आवश्यक आहेत. राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेण्यापेक्षा, ज्या दोषांमुळे समाजातील संघटना बिघडली, बेकी माजली, तेज लोपले व समाज स्वार्थ रक्षणास असमर्थ बनला, ते दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करणारे गृहस्थच खरे राष्ट्रोद्धारक होत. महात्मा जोतिराव यांच्या शिक्षणाकडे व त्यांनी निधड्या छातीने केलेल्या अथांग कार्याकडे लक्ष दिले तर अर्वाचीन इतिहासात त्यांना उच्च स्थान मिळणार यात शंका नाही. महात्मा फुले यांच्या चरित्रातील काही गोष्टींवर प्रकाश पाडण्यास सहाय्यभूत होणारे हे पुस्तक लिहिण्याचा श्रीयुत दिनकरराव यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. या पुस्तकातील भाषापद्धती अगर विचारप्रदर्शन पद्धती ब्राह्मणांना आवडणार नाही; परंतु त्यामुळे रुष्ट न होता, सदर गृहस्थाचे पुस्तक वाचून त्यावर एकंदर पूर्वपरिस्थिती ध्यानात घेऊन विशेषतः रा. चिपळूणकर यांनी केलेली म. फुले यांची निंदा लक्षात घेऊन शांतपणे मनन केले पाहिजे. क्रियेस प्रतिक्रिया हा निसर्गदेवीच्या साम्राज्यातील अबाधितपणे व अव्याहतपणे परिणामकारक होणारा नियम आहे, तद्नुरोधाने म. जोतिराव फुले यांची निंदा करणाऱ्यांना प्रत्युत्तर मिळणे साहजिक आहे. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या प्रयत्नाने चिडून जाऊन प्रत्याघात करण्याचाही मोह कित्येकांना अनावर होण्याचा संभव आहे. परंतु त्यायोगे जनतेचा अगर देशाचा फायदा न होता तोटाच होणार, ही गोष्ट सर्वांच्या नजरेस आणणे माझे कर्तव्य आहे, असे समजून मी ती विरोधी वाचकांच्या निदर्शनास नम्रपणे आणीत आहे. सुशिक्षित समाजास वळण लावण्याचा अभिमान धरणाऱ्या कै. चिपळूणकर यांच्यासारख्या गृहस्थाने म. जोतिराव यांच्यावर बेभानपणे निंदास्त्र चालवावे, त्यांचा व त्यांच्या मतप्रणालीस मान्यता देणारे कै.टिळक यांचा पुणे म्युन्सिपालिटीने बहुमान करावा; व याच म्युन्सिपालिटीपुढे महात्मा जोतिरावांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वाचा गंभीर प्रश्न आला असता, काही ब्राह्मणमान्य वर्तमानपत्रांनी महात्मा फुल्यांची टवाळी करावी, म्युन्सिपालिटीच्या काही सभासदांना या ठरावाने माकडचेष्ट करण्याचा मोह उत्पन्न व्हावा ही अत्यंत उद्वेगकारक व चीड आणणारी बाब आहे. गोऱ्या नोकरशाहीचा दृष्टीकोन बदलण्याची उठाठेव करणाऱ्या काळ्या ब्राह्मणशाहीने अगोदर स्वत: च्या वृत्ती अंतर्मुख करून त्यांचे पृथ:करण करून पहावे, म्हणजे त्यात जनताद्रोह कसा सळसळतो आहे, हे प्रत्ययास येईल. इतरांवर केलेल्या अन्यायाची स्मृती जागृत करून ते अन्याय चालू ठेवण्याचा खटाटोप करण्याऐवजी, ते नाहीसे करण्यानेच देशाची खरी सेवा होणार आहे. या पुस्तकाने अशी भावना उत्पन्न होवो, अशी आशा व्यक्त करून ही प्रस्तावना संपवितो.

केशव गणेश बागडे
४२३, बुधवार पेठ, पुणे ता. २५ जुलै १९२५



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209