अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
सौ. साळवी : देवाधर्माविषयी तुम्ही असे बोलता मग आपण उपवास वगैरे करतो त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे ?
मी : वहीनी तुम्ही कोणकोणते उपवास करीता ?
सौ. साळवी : मी सोमवार नियमित करते.
मी : उपवास करता म्हणजे काय पुर्ण दिवस उपाशी राहाता का ?
सौ. साळवी : तस नव्हे. संध्याकाळी जेवण करून उपवास सोडते.
मी : म्हणजेच साध दिवसभरही तुम्ही उपवास करीत नाही आणि वरून म्हणला सोमवार करते. खरं सांगा फक्त रात्रीचेच जेवता की सकाळी पण काही खाता.
सौ. साळवी : आता तुमच्यापासुन काय लपवायच भाऊजी. सकाळी भगर किंवा साबुदाण्याची उसळ करून खाते.
मी : म्हणजेच सकाळी पण तुम्ही जेवताच.
सौ. साळवी : जेवत नाही उपवासाच खाते.
मी : उपवासाच म्हणून खाल्यानेही पोटातच जात असेल ना. तेही पोटाची भुक भागविण्याचेच काम करीत असेल ना. उपवास करण्यामागची जर मानसिकता असेल की, कमीतकमी आपण भुकेवर तरी मानसिक नियंत्रण ठेवण्याची सवय लावणे, तर तोही उद्देश फळाचे काहीतरी खाऊन तुम्ही हाणून पाडता. आपला आज उपवास आहे हा विचार आणि फराळाचे खाणे ही कृती, ह्यातून विचार एक आणि आचरण दुसरेच असा ढोंगी समाज निर्माण होतो. आि मग स्वत:च स्वत:ची फसवणूक करून, त्यास फसवणूक न मानणारे लोक, सहजगल्या दुसर्यांची फसवणूक करून, त्यासही फसवणूक न मानण्यात तरबेज असे, जीवन सहजरित्या जगतात. आषाढी एकादशीचा उपवास आमच्या घरी सर्वच करायचे. सकाळी साबुदाण्याची उसळ असायची व संध्याकाळी बाबा खाव्याची जिलेबी आणायचे. खाव्याच्या जिलेबीसाठी आषाढी एकादशीचा उपवास मला खुप आवडायचा. पण जेव्हा थोडी फार समज मला आली, तेव्हा मी आषाढी एकादशीचा उपवास काहीच न खाता करायचे ठरवीले. संध्याकाळी 6 वाजता पर्यंत मी काहीच खालले नाही. परंतु संध्याकाळी बाबा खाव्याची जिलबी आणतील तेव्हा प्रदीप खाईल, असे आईला वाटले. पण ह्यावेळेस संध्याकाळी खाव्याची जिलबी, मी खाल्ली नाही. मी उपवास अक्षरश: उपवासासारखाच केला. आई फार दु:खी झाली आणि त्यापुढे तिने मला कधीच उपवास कर असे म्हटले नाही. त्यावेळेस मी देवाला खुप मानायचो आणि त्याला यावेळेस वाटले होते की देवास आपण पवित्र मानतो आणि त्यासाठी येणार्या उपवासाबाबत आपण देवाशीच अशी दगाबाजी करणे, हे बरे नव्हे.
मागच्यावर्षीच्या श्रावण सोमवारांची गोष्ट आहे. माझा एक ढेरपोट्या सहकारी श्रावण महिन्यातील पाचही सोमवार करीत होता. मी सहजच त्यांस म्हटले ‘सावळेसाहेब, तुम्हाला तर उपवास करणे फार जड जात असेल, फराळाचे एवढेसे शेंगदाणे खाऊन कसा काय दिवस घालवता’ तो म्हणाला, ‘ढोबळेसाहेब, फराळाला तेल चालते, शेेंद मीठ चालते, भगर चालते, शिंगाड्याचे पीठ चालते, मग काय ? आपल्यालाही थोडफार डोके आहे बरं का ?’ पुढे तो म्हणाला, ‘फराळाला आलु चालतात, रताळी चालतात, मिरची चालते. मी बायकोला म्हटले, ‘अग, अस कर, आलू, मिरची, शेंद्रेमीठ, तेल वापरून झकास आलुची भाजी कर. रजाळ्याच्या आणी शिंगाड्याच्या पोळ्या आणि हवा तेवढा भगरीचा भात खाऊन घेतो. उपवासाला फळहार चालतोच 3,4 केळ आणीएखादा आंबा खाऊन घेतो. मग कसली भुक लागणार, ढोबळे साहेब ? कसा वाटला माझा उपाय ?’ मी म्हटले, ‘अहो साबळे, उपवासाच्या नावानी तर तुम्ही चक्क भोजनच करता’ सावळे म्हणाला, ‘ढोबळे, जरा संभाळुन बोला, मी भोजन नव्हे, उपवासाचा खातो.’ असेच एका गुरूवारी, आम्ही सर्व सहकारी आपआपले डबे, दुपारच्या लंचच्या वेळेस खात होतो. आमची एक सहकारीन सोबत बसली होती. तिचा गुरुवारचा उपवास होता. मी तिला म्हटले, ‘मॅडम, घ्या थोडी भाजी, माझ्या डब्यातील. झकास भाजी बनविली आहे प्रणिताने.’ भाजलेले शेंगदाणे तोंडात चघळत चघळत म्हणाली, ‘नाही हो, आज माझा गुरुवारचा उपवास आहे.’ आता त्याच तोंडातून ती उपवास आहे म्हणत होती आणि त्याच तोंडाने दाण चघळत होती. मला हसू आवरत नव्हते, पण मला तिच्या भावनाही दुखवायच्या नव्हत्या. तसाच तडकाफडकी केबीनच्या बाहेर येवून तोंडावर हात ठेऊन, हसावयास लागलो आश्चर्य वाटले, की जी जीभ काहीतरी आस्वाद घेत आहे, तीच जीभ उपवास आहे, असेही म्हणत आहे. एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यावरही, वैज्ञानीक दृष्टी आमच्यात निर्माण न झाल्याचा हा परिणाम आहे. आणि वहिनी फराळाला आलु चालतात, साबुदाणा व भगर चालते हे कोणत्या शास्त्रात वा पुराणात लिहीले आहे.
सौ. साळवी : सोमवारच्या उपवासाच काय घेऊन बसलात पण वडसावित्रीचा उपवास मात्र काहीच न खाता करते. पुर्ण दिवसभर उपाशी राहते.