बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
बामसेफच्या निर्मिती पासूनच या देशात एका सुप्त सामाजीक व राजकीय क्रांतीचे बीज रुजण्यास सुरुवात झाली होती. बामसेफ च्या माध्यमातून गैरराजकीय सामाजीक मुळे मजबूत केल्यानंतर मा.कांशीरामजी यांची नजर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय सत्ताधारी बना या संदेशाकडे गेली. तोपर्यंत बामसेफ च्या माध्यमातून जिल्हा पातळी पासुन ते राष्ट्रीय पातळी पर्यंत अभ्यासू वक्ते व नेते तयार झाले होते. केवळ सरकारी कर्मचायांना घेऊन चळवळी केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होऊ शकनार नाही.जोपर्यंत राजकीय सत्ता समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ते शासक बनू शकणार नाही.म्हणून त्यानी नवी संकल्पना काढली व ती संकल्पना होती सत्ता हे संघर्षातुन निर्माण होणारे अपत्य आहे ( Power will be the product of struggle ) व अशा संघर्षासाठी कर्मचारी वर्ग तयार होणे शक्य नाही हे ते जाणून होते. राजकीय सत्तेच्या संघर्षासाठी कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला तरी शासकीय कार्यवाही मुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊन बामसेफ चा आर्थिक कणाच मोडला जाईल या भीतीमूळे बामसेफ च्या संरचनेला धक्का न लावता डी.एस. 4 ची स्थापना केली.कांशीरामजी म्हणतात, दलित / बहुजन समाज संघर्षशील होता है, लेकीन उनका संघर्ष खुद के लिए नही बल्की दुसरों को सत्ता मे बिठाने के लिए होता है. ऐसा करके वे डॉ. बाबासाहाब के "आप इस देश के हुक्मरान बनो" इस आदेश का अपमान करते है.
मा. कांशीरामजी यांच्या सामाजिक संघर्षासोबतच राजकीय संघर्ष करण्याच्या भुमिके मुळे प्रथम राजकीय सत्ता कि सामाजीक परिवर्तन या मुद्द्यावर मतभेद झाल्यामुळे मा. डी. के. खापर्डे, मा. झल्ली, मा. वामन मेश्राम, मा. बी. डी. बोरकर व मा. गंगावने प्रभुतीनी कांशीरामजी पासून बाजूला होत सामाजीक परिवर्तनाला अग्रक्रम देत बामसेफ ला पुढे नेण्याचे कार्य केले. परंतु यानंतरही कांशीरामजी व डी.के.खापर्डे यांनी कधीच एकमेकावर टिका केली नाही. एकमेकांच्या चळवळीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. दोघांनीही एकमेकास पुरक अशाच भुमिका घेतल्या. दोघांच्याही चळवळीचा एकमेकांच्या चळवळीला फायदा होत राहीला परीणामी बहुजन समाज पक्ष झपाट्याने व मिशनरी कार्यकत्यांच्या रुपाने वाढत राहीला. आजही मा. डी. के. खापर्डे साहेबांचा हाच वारसा मा. वामन मेश्राम व मा. बी. डी. बोरकर हे नेटाने चालवित आहे. बामसेफ च्या अथक प्रयत्नाचा परीणाम म्हणून बहुजन समाजात बहुजन महानायकांचे विचार प्रसारीत होत आहेत. सामाजिक क्रांतीची जमीन तयार होत आहे. महाराष्ट्रात मराठ्यांनी हिंदु धर्माला झिडकारुन नव्या शिवधर्माची स्थापना केली याचे श्रेय बामसेफला व तिच्या प्रचार यंत्रणेला जाते. इतर समाजात जे फुले आंबेडकवादी विचारवंत मंडळी दिसतात ही बामसेफचीच देण आहे.
देशाच्या काही भागात नक्षलवाद व माओवादाच्या माध्यमातून गरीबी,असमानता, जमीनदारी व भांडवलशाही विरुध्द लढा देण्यात येत आहे. यात कार्यकर्ते म्हणून दलित आदिवासी तरुणाचा वापर करण्यात येत आहे परंतू या चळवळीची सारी सत्रे ब्राम्हणवादी मंडळीच्या हातात आहे त्यामुळे त्या त्या भागात समाजाच्या कल्याणाच्या समस्येवर तोडगा निघताना दिसत नाही. आपला लढा कोणत्या मुद्द्या सोबत आहे याचा खलासा ब्राम्हणवादी नक्षल नेता करताना दिसत नाही.हे नेते समोरा समोर टेबलवर बसून सरकारशी चर्चा करण्यास तयार होत नाही. आदिवासी दलितांना ते भुलथापा देताना दिसतात.या चळवळीतून नक्षलवाद अंगीकारलेले आदिवासी व दलित हे सामान्य आदिवासी / दलितानांच मारताना दिसतात.आप्त स्वकियांना मारण्यात कसली आली क्रांती ? पोलिसी कार्यवाहीत नक्षली दलित आदिवासीना मारण्यात सरकार उच्चवर्णीयांना कधी पाठवित नाही ते दलित आदिवासी पोलिसानाच पाठवित असतात. त्यामुळे दुस-या बाजूने दलित आदिवासी कडून दलित आदीवासीच मारला जातो. या नक्षल्यांचे ब्राम्हण नेते भांडवलदार व जमिनदाराकडून खंडण्या वसूल करीत असतात, अशी नक्षलवादी चळवळ फुले आंबेडकरी चळवळीला अभिप्रेत नाही म्हणुन मा. कांशीरामजीनी माओ कॅम्युनिस्टवादी चळवळीशी कधीच जवळकी दाखविली नाही. जे आदिवासी. दलित नक्षल्याच्या प्रभावाखाली ओढल्या गेले अशांना बामसेफ व बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातुन फुले आंबेडकर चळवळीत आणण्याचा प्रयत्न केला. ते नेहमी कॅम्युनिस्ट पक्ष व त्यांच्या वर्गीय विचारधारेवर ते सडकून टीका करीत असत. दलित आदिवासींच्या सामाजीक, राजकीय वा आर्थिक प्रश्नाच्या वेदना केवळ दलित आदिवासी माणूसच जाणू शकतो असे ते म्हणत असत. बहुजन समाजात स्वत्वाची भावना रुजवून सुप्त राजकीय व व्यवस्था परिवर्तनाचे अंकुर कांशीराम यानी लावले आहे. या अंकुराचे विशालकाय वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी फुले शाहू आंबेडकर विचारधारा माननाऱ्या समाजाची व व्यक्तींची आहे.