बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
आंबेडकरी चळवळीतील काही नेते व कार्यकर्ते हे प्रस्थापीत पक्षांचे चमचे बनून समाजस्वास्थ बिघडवीत आहेत.निवडणूकांच्या काळात आंबेडकरी विचारधारा ,निळा झेंडा यांच्याशी बेईमानी करीत आंबेडकरी जनतेची मते (व्होट) काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपा या पक्षाकडे वळवितात.अशा उपयांना आंबेडकरवादाशी काहीही देणे घेणे नसते.स्वत:चा स्वार्थ व त्यासाठी समाजाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावाचा वापर करणे या पलिकडे दुसरी कोणतीही विचारधारा त्यांच्याकडे नसते. असे भरकटलेले नेते व कार्यकर्त्यापुढे एका आदर्श व्यक्तीचे जीवन चरित्र समोर ठेवावे की ज्याद्वारे ते आपले संधीसाधूत्व सोडून खरे आंबेडकरवादी मिशनरी बनतील या उदात्त हेतुने बहुजन नायक कांशीराम या पुस्तकाची निर्मिती होत आहे. कांशीरामजीचे विचार आंबेडकरी समाजाने आत्मसात करुन एक सच्चा आंबेडकरवादी मिशनरी कार्यकर्ता बनला पाहीजे कारण मिशनरी कार्यकर्ताच आंबेडकरी चळवळ जीवंत ठेऊ शकतो.आंबेडकरी समाजात डोकावून पाहिल्यास एक भयानक सत्य दिसते,ते सत्य म्हणजे आंबेडकरी समाज स्वार्थी झालाय, राजकीय दृष्ट्या तो तत्सम पक्षांचा वेठबिगार तर झालाच परंतू सामाजीक व धार्मिक बाबतीमध्ये सुध्दा तो स्वत्व गमावून बसला आहे. आमच्या सारख्यांनी लिहतच जायचे परंतु समाजच परिवर्तीत व्हायची इच्छा दाखवीत नसेल तर लिहण्याचा खटाटोप तरी कुणासाठी करावा ?
पुस्तकाचे प्रयोजन फार पुर्वीचे होते, परंतु मध्ये आलेल्या काही तांत्रिक अडचणी मुळे सदर पुस्तक प्रकाशित करता आले नाही.माझ्या “बहुजनांचे मारेकरी' या पुस्तकानंतर येणारे हे दुसरे पुस्तक आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन बहुजनांचे मारेकरी या पुस्तकाबाबत पत्रे व दुरध्वनी द्वारे प्रतिक्रिया मिळाल्या. बहुजन नायक कांशीराम हे पुस्तक सुध्दा आपणांस आवडेल अशी अपेक्षा करतो. सदर पुस्तक लिहताना आयु. चंद्रकुमार कांबळे यानी आंबेडकरवादी राजकीय चळवळीशी सबंधीत पुस्तके शोधन देण्यास मदत केली त्यामुळे त्यांचे विशेष आभार. फुले आंबेडकरी चळवळीतील मिशनरी कार्यकर्ते आयु. सुरेश हिरे यांनी पुस्तकाच्या शुध्द लेखनात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानने क्रमप्राप्त आहे.